Tuesday, November 28, 2023

नष्ट झालेले आठवे आश्चर्यः गुलाबी - शुभ्र छते

ऋतुपर्ण


कोलोसस ऑफ रोड्स, ग्रेट पिरॅमिड ऑफ गीझ, बॅबिलोनचे हँगिंग गार्डन, ऑलिम्पियातील झ्यूसचा पुतळा, इफिसस येथील आर्टेमिसचे मंदिर, हॅलिकर्नासस येथील समाधी आणि अलेक्झांड्रियाचे दीपगृह अशी जगातील सात प्राचीन आश्चर्ये तसेच, ताजमहाल (आग्रा, भारत), द ग्रेट वॉल (चीन), क्राइस्ट द रिडीमर स्टॅच्यू (रिओ डी जानेरो),माचू पिचू (पेरू), चिचेन इत्झा (युकाटन प्रायद्वीप, मेक्सिको), रोमन कोलोसियम (रोम), पेट्रा (जॉर्डन) ही जगातील सात अर्वाचिन आश्चर्ये आहेत. पण तुम्हांला एक आठवं आश्चर्य माहीत आहे का? हे आठवं आश्चर्य आज अस्तित्वात नाही. मग हसे आठवं आश्चर्य कुठे नष्ट झालं? कसं नष्ट झालं? केव्हा नष्ट झालं? त्याचीच तर ही रहस्यरंजक गोष्ट...
न्यझीलंडमधील रोटोमहाना हे 2200 एकरात विस्तारलेलं विस्तीर्ण असं एक सरोवर आहे. ह्या सरोवराच्या निर्मितीच्या आधी उत्तरेकडील दिशेला प्राचीन काळापासून गुलाबी आणि पांढर्‍या रंगाचे स्तर होते. त्याला छत (पिंक- व्हाईट टेरेसेस) असं म्हटलं जायचं. इथल्या माओरी जमातीच्या पूर्वजांच्या पवित्र जमिनीवर हे हे चकाकणारे स्तर पुरातन काळात निर्माण झाले होते. हे स्तर पाहण्यासाठी जगभरातून पर्यटकांची रीघ लागून राहात असे. ही गुलाबी- शुभ्र छते 10 जून 1886 पर्यंत अस्तित्वात होती. त्यानंतर ती नष्ट झाली. जोवर हे स्तर होते, तोवर त्यांची गणना जागतिक आश्चर्यांमध्ये केली जात होती.
हे गुलाबी-शुभ्र स्तर म्हणजे जगातले सर्वात मोठे सिलिकाचे साठे होते. कि क्लोराईड पाणी मिश्रित असलेल्या दोन भू-औष्णिक झर्‍यांमुळे सिलिका-सॅच्युरेटेड स्तर तयार झाले होते.  हे जगप्रसिद्ध झरे हॉट स्प्रिंग्स आणि गीझर्सच्या समूहाचा भाग होते, मुख्यतः पिनॅकल रिज नावाच्या पूर्वेकडील रिजच्या बाजूने हे झरे वहात होते.
रोटोमहाना परिसराला भेट देणार्‍या पहिल्या युरोपियनांपैकी एक अर्न्स्ट डायफेनबॅक हा एक होता. जून 1841 च्या सुरुवातीला न्यूझीलंड कंपनीच्या अभ्यासपाहणीच्या दौर्‍यावर असताना त्यांनी छोटी सरोवरे आणि गुलाबी- शुभ्र स्तरांना काही काळ भेट दिली. त्यांच्या ‘ट्रॅव्हल्स इन न्यूझीलंड’ या पुस्तकातील त्यांच्या भेटीच्या वर्णनामुळे गुलाबी आणि शुभ्र टेरेसेसमध्ये युरोपीयनच नव्हे, तर जगभरातील पर्यटकांच्या मनात त्याविषयी रस निर्माण झाला. गुलाबी- शुभ्र छते  हे न्यूझीलंडचे सर्वात प्रसिद्ध पर्यटन आकर्षण बनले. तोपर्यंत न्यूझीलंड युरोपीय लोकांसाठी तुलनेने दुर्गम होता आणि जहाजाने जाण्यासाठी अनेक महिने लागत असत. ऑकलंड ते टॉरंगा हा प्रवास सामान्यत: स्टीमरने आणि इतर वाहनांच्या माध्यमातून आणि पायीदेखील हा प्रवास करावा लागे. “पर्यटक सकाळी 11 च्या सुमारास शुभ्र स्तरांवर पोहोचतील, तेथील प्रेक्षणीय स्थळे पाहतील, उकळत्या झर्‍यावर शिजवलेले बटाटे आणि कौरा (गोड्या पाण्यातील क्रेफिश) यांचे दुपारचे जेवण घेतील, गुलाबी टेरेसेस ओलांडतील, तेथे स्नान करतील आणि नंतर परत जातील,” असे वर्णन चार्ल्स ब्लॉमफिल्डने केलेले आहे.
गुलाबी आणि पांढरे टेरेस स्प्रिंग्स सुमारे 3,900 फूट अंतरावर होते. शुभ्र स्तर रोटोमहाना सरोवराच्या उत्तर-पूर्व टोकाला होत्या आणि कैवाका वाहिनीच्या प्रवेशद्वारावर पश्चिमेकडून वायव्येकडे त्यांचे तोंड  होते. ते  सुमारे 82 फूट) खाली तलावाच्या काठावर उतरले. गुलाबी टेरेस पश्चिमेकडील किनार्‍यावरील तलावाच्या चार पंचमांश वाटेने पूर्वेकडून आग्नेय दिशेला होते. मध्य आणि वरच्या खोर्‍यांवर ( इंद्रधनुष्य ट्राउटच्या रंगासारखे) गुलाबी दिसणे हे अँटिमनी आणि आर्सेनिक सल्फाइड्समुळे होते. याच  गुलाबी टेरेसमध्ये असलेले सोन्याचे मोठे प्रमाण संशोधकांना साद घालत होते.
हे गुलाबी आणि शुभ्र स्तर  पूर्वी सुमारे 1,000 वर्षे जुने मानले जात होते. पण नव्या संशोधनानुसार ज्या हायड्रोथर्मल सिस्टमने हे स्तर मजबूत बनले, ते 7,000 वर्षांपर्यंत प्राचीन असू शकते. सिलिका पर्जन्यामुळे कालांतराने अनेक पूल आणि पायर्‍या तयार झाल्या. जेव्हा थर्मलचे स्तर गिझरपासून दूर दुसर्‍या दिशेने वळतात, तेव्हा पृष्ठभागावर सिलिका पायर्‍या तयार होतात. हजारो वर्षे पडणार्‍या पावसाचाही ह्या स्तरांच्या निर्मितीवर परिणाम झाला होता. कालांतराने दोन्ही प्रकारची निर्मिती वाढली कारण सिलिकाने भरलेले पाणी त्यांच्यावर सतत कोसळत राहिले.  भूगर्भशास्त्रज्ञ फर्डिनांड फॉन हॉचस्टेटर यांनी ह्या स्तरांना 1859 मध्ये भेट दिली. ह्या स्तरांच्या  निर्मितीसाठी निःसंशयपणे हजारो वर्षे लागली असावीत, असे निरीक्षण हॉचस्टेटर यांनी नोंदवलं.  जेव्हा हे गुलाबी- शुभ्र स्तर अस्तित्वात होते, तेव्हा त्या खोर्‍यात दोन मोठे आणि सहा लहान जलाशय होते. त्यातल्या एका मोठ्या सरोवराचं नाव रोटोमाकारीरी असं होतं.
10 जून 1886 ह्या दिवशी तरावेरा पर्वतावर ज्वालामुखीचा मोठा प्रचंड असा उद्रेक झाला. आणि त्या उद्रेकात हे आठवं आश्चर्य नष्ट होऊन गेलं. सुमारे चाळीस किलोमीटरच्या परिसरात राखेचा थर पसरला. लाव्हा वितळून गुलाबी- शुभ्र स्तर त्याखाली गाडले गेले. खालच्या बाजूला जिथं लाव्हारस पसरला त्या जागी लाव्हा थंड झाल्यावर त्या ठिकाणी  पाणी साठत गेले आणि  रोटोमहाना हा तलाव निर्माण झाला. आता त्या ठिकाणी नव्यानं संशोधन सुरू झालेलं आहे. वितळलेल्या लाव्हा रसाच्या 114 फूट खाली हे गुलाबी- शुभ्र स्तर असावेत असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. येथे सापडलेल्या राखेच्या संशोधनानुसार हा उद्रेक बेसॉल्टिक स्फोटाची प्रक्रिया होती. 

गरीब हेल्पर ते स्वतःच्या उद्योगाचे मालक - खडतर संघर्षाची कहाणीः उदय भोसले

आजचे उद्योजक उदय अण्णासाहेब भोसले हे एके काळी कोल्हापुरातील एका कारखान्यात पाणी भरणे, सफाई करणे अशी हलकी कामे करत होते. शाळा आणि घरची जबाबदारी पेलवत त्यांनी आयटीआय देखील पूर्ण केले. उदय भोसले हे इथेच थांबले नाहीत, तर स्वत:चा कारखाना काढण्याचे स्वप्नदेखील पूर्ण केले. आज कोल्हापुरातील जुने, जाणकार आणि नामवंत उद्योजकांपैकी ते एक आहेत. ते आयटीआय शिकत असताना ते दुसरीकडे कारखान्यात छोटी-मोठी कामेदेखील करत असत.

अगरबत्ती पॅकिंग, मूर्तींची विक्री

उदय नऊ वर्षाचे असताना वडिलांचा अपघाती मृत्यू झाला. परिस्थिती हलाखीची. पण त्यातूनच त्यांनी उभारी घेतली. आई सुमित्रा यांनी कष्टाची पराकाष्ठा करून आपल्या मुलांना वाढवले. उदय यांना सहा भावंडे. उदय यांनी बालपणापासूनच आपल्या कुटुंबीयांना घर चालवण्यासाठी मदत केली. अगरबत्ती पॅकिंग करण्याचे काम भोसले कुटुंबीयांनी हाती घेतले. यातून किरकोळ पैसे मिळायचे. तर उदय भोसले हे छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांच्या मूर्ती दुकानांमध्ये जाऊन विकायचे. एका मूर्तीमागे पाच रुपयांचा नफा होत असे. नंतर चहापूड विकण्याचाही व्यवसाय त्यांनी केला.

शिकत असताना कारखान्यात काम

उदय यांनी संजीवनी इंजिनिअर्स या कारखान्यामध्ये एकूण 10 वर्षे काम केले. ह्या काळात ते सगळी कामे शिकून तरबेज झाले. त्यांना  त्यावेळी बसचा प्रवास देखील परवडत नसे. सगळी ये-जा सायकलवरून सुरू होती. पुढे त्यांनी हेल्पर मशीनवर काम करता करता ड्रिल मशीनवर काम करायला सुरुवात केली. कारखान्याच्या मालकांचा विश्वास इतका होता की, कारखान्याची किल्लीच उदय यांच्याकडे देण्यात आली होती. पुढे हेल्पर ते लेथ मशीन कामगार आणि पुढे  कामगार ते उद्योजक असा परिपूर्ण प्रवास झाला.

1992 मध्ये 1600 रुपये पगार झाला होता, जेव्हा उदय यांनी नोकरी सोडली, पुढे, 1999 मध्ये त्यांनी स्वतःचा कारखाना उभा करण्याचा निश्चय केला. मग, संजीवनी इंजिनिअर्सच्या मालकांच्या सहकार्याने सुरुवातीला उद्यमनगर आणि नंतर  शिरोली एमआयडीसी येथे त्यांचा कारखाना स्थापित झाला.  विवाहाच्या आधी त्यांना 16000 रुपयांचे सेकंड हॅण्ड लेथ मशीन विकत घेतले. एका को-ऑपरेटिव्ह बँकेकडून 10 हजार रुपयांचे कर्ज मिळाले. वरील 6 हजार रुपयांची जमवाजमव करून लेथ मशीन खरेदी केले. उद्यमनगरात मित्राची जागा भाड्याने घेतली. त्यावेळी त्याला 300 रुपये भाडे होते.

धाडसाने सुरु केला कारखाना

नोकरी चालू असतानाचा स्वत:च्या लेथ मशीनवर कामावरून सायंकाळी आल्यानंतर प्रॅकिट्स केली. त्यावेळी उदय यांना आकांक्षा एंटरप्रायझेसचे मालक भाटवडेकर यांनी मदत केली. उदय यांनी आपल्या कारखान्याला काम मिळावे, अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली. उदय यांना भाटवडेकर यांनी सुरुवातीला पाठिंबा दिला.

एकाच कारखान्यात अनेक वर्षे नोकरी 

नोकरीत असताना मनुग्राफ कारखान्यासाठीची कामे केली जायची. मनुग्राफचे प्रॉडक्ट बनवण्यात उदय भोसले यांचा हातखंडा होता. चोख आणि परफेक्ट काम करणारे उदय भोसले यांची ओळख निर्माण झाली होती. त्यामुळे मनुग्राफच्या वरिष्ठांशी उदय भोसले यांचे चांगले संबंध होते. उदय यांनी त्यांना काम देण्यासंदर्भात विनंती केली. तेव्हा मनुग्राफने थेट उदय यांना व्हेंडर करून घेतले. तसे पाहता मोठे युनिट असल्याशिवाय कोणतीही कंपनी व्हेंडर करून घेत नाही. पण, उत्तम काम आणि विश्वास या जोरावर उदय सलग पाच वर्षे यांना मनुग्राफचे व्हेंडर होता आले.

अद्ययावत मुद्रण साहित्याची निर्मिती

मनुग्राफ यांचे मॅन्युफॅक्चरिंग प्रिंटिंग मशीन युनिट होते. त्यांचे सर्व मशीन जगभर निर्यात व्हायचे. मनूग्राफचे काम पूर्ण केल्यानंतर उदय यांची कल्याणी ब्रेक्स या पुण्याच्या कंपनीनीचे प्रवीण सोनार यांच्याशी ओळख होऊन ती दृढ झाली. त्या कंपनीसाठी 10 वर्षे काम केले. गाड्यांच्या ब्रेक्स लाईनर्सचे व्हिल्स एंडरचे सॅम्पल बनवून देण्याचे काम त्यांनी केले. मित्रांचा ग्रुप तयार करून मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू केलं.

आयटीआयचे विद्यार्थी कामासाठी येऊ लागले

आयटीआयचे विद्यार्थी अ‍ॅप्रेंटिससाठी उदय भोसले यांच्या कारखान्यात येऊ लागले. हे विद्यार्थी शिकता शिकता कामेही करू लागली. संध्याकाळी चारनंतर उदय यांनी ह्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आणि होतकरू बनवले. हेच विद्यार्थी पुढे जाऊन मोठ्या कंपन्यांचे मालक बनले आहेत. वारणा कोडोली येथील प्लामाग, कल्याणी ब्रेक्सचे व्हील सिलिंडरचे जॉब- एम एन एफ, एच एम, ई टी एल, टीएम सी, सी एम सी हे पाच प्रकार ते बनवायला लागले. मनुग्राफ सोबतच मेनन ऑटोमोबाईल यांचे प्रॉडक्ट्स त्यांनी बनवले. कोल्हापुरातील प्रसिद्ध घाटगे पाटील यांचे केटवॉल, चारेक प्रकारचे रोलर, मेनन ऑटोमोबाईलचे डॉयल पिन अशी अनेक उत्पादने उदय इंडस्ट्रीजमध्ये तयार व्हायला लागली. अनेक मोठ्या इंजिनिअरिंग कंपन्यांचे थर्ड पार्टी म्हणून उदय काम पाहू लागले. कारखान्यामध्ये जॉब वर्क्स व्हिल सिलेंडर्स, केट वॉल- त्याचेही अनेक भाग असतात तेही, व्हॉल गार्ड, स्पेशल बोर्ड्स अशा प्रकारचे अनेक सुटे भाग ते बनवायला लागले. विशेषतः अत्याधुनिक प्रकारची मुद्रणाची यंत्रसामुग्री करण्यासाठी प्रीटिंग मशीनचे प्रॉडक्ट तयार केले जायचे.

मित्रांसह काम

उदय भोसले यांनी मोठ्या प्रमाणावर निर्यात दर्जाची उत्पादने बनवायला आरंभ केल्यानंतर आणखी दोन कारखानदार मित्रांना सोबत घेऊन ते एकत्रित काम करायला लागले. आयटीआयचे विद्यार्थी आणि काही कामगार घेऊन उदय यांनी कामात सातत्य ठेवले. उत्पादने पुढे नेण्यासाठी सातत्याने काम करत राहणे अपरिहार्य होते. कामाची आवड, अफाट कष्ट करण्याची तयारी, कामातील कौशल्य, दर्जा राखण्याचा ध्यास याच्या जिवावर उदय भोसले हे पुढे जात राहिले. मध्यंतरी आलेली महामंदी आणि कोरानाची दोन वर्षे हा काळ भीषण होता. पण त्या बिकट काळातही कामाच्या दर्जावर टिकून राहून उदय भोसले यांनी आपला उद्योग सतत अग्रेसर ठेवला. आज कौटुंबिक जीवनात सुखी असलेले उदय भोसले आपल्या उद्योगात निव्वळ आपल्या कष्टाच्या बळावर ठामपणे उभे आहेत. 

पिढीजात मालमत्ता नाकारून उभारला स्वतःचा उद्योग

यशकथा

स्वालिया शिकलगार
------------------------------------------------------------------
दीड वर्षे वय असताना पितृछत्र हरपलं. कोकणातील वडिलोपार्जित मालमत्ता सोडून आई आणि मामांसमवेत राजमोहन रासम कोल्हापुरात आले. मेेकॅनिकल इंजिनिअर झाले. विविध ठिकाणी अनेक प्रकारची कामे करून मशिन शॉप आणि फौंड्रीच्या कामाचा दांडगा अनुभव गाठीशी जमा केला. सुमारे साठ प्रकारची ऑटो उत्पादने घडवण्यावर प्रभुत्व मिळवलं. स्वतःचा उद्योग उभा करण्याचं स्वप्न बाळगून ते पूर्ण केलं. आणि आज एक सुखी कौटुंबिक आयुष्य ते जगत आहेत.
----------------------------------------------------------------------------


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील फोंडा घाटाच्या जवळ हरकुळ खुर्द हे एक छोटंसं गाव. त्या रासम हे त्या गावातलं इनामदार घराणं. राजमोहन बाळासाहेब रासम हे या घराण्यातले. त्यांना अजूनही सावकार असं संबोधलं जातं. बारा गावची इनामदारी आणि मालमत्ता सोडून राजमोहन रासम यांच्या आई कोल्हापूरला आल्या. त्याला कारणही तसंच घडलं.  राजमोहन हे दीड वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले. त्यानंतर त्यांचे कर्नल असलेले मामा त्यांना कोल्हापूरला घेऊन आले. त्यांना लहानाचं मोठं केलं, शिक्षण दिलं. त्यांचे पाच मामा. सगळे सैन्यात, पोलिसात आणि शासकीय खात्यातले उच्चाधिकारी. म्हणून त्यांच्या मामांना आपल्या घरात कुणीतरी उद्योगपती व्हावं, असं वाटत होतं. ते स्वप्न पुढं राजमोहन यांनी पूर्ण केलं. कारण त्यांनाही ती आत्यंतिक आवड होतीच. वडिलोपार्जित मालमत्तेकडे पाठ फिरवून आपण उद्योजक व्हावं ही इच्छा त्यांना स्वतःलाही होतीच.
राजमोहन यांचं शालेय शिक्षण कोल्हापुरात विद्यापीठ हायस्कूलमध्ये झालं. त्यानंतर न्यू कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. पण ग्रुपला अपेक्षेप्रमाणे गुण न मिळाल्यामुळे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही. मग एफ. वाय.  बी. एस्सी. केलं. त्याच वेळी कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (के. आय. टी.) ही संस्था कोल्हापुरात सुरू झाली. राजमोहन यांनी तिथं प्रवेश घेतला. तिथून त्यांनी ए. एम. आय. ई. (मेकॅनिकल इंजिनिअरिंग) केलं. शिक्षण चालू असतानाच मशीन शॉपचा अनुभव घेण्यासाठी  कोल्हापूर अ‍ॅक्सेलमध्ये सहा महिने इन्स्पेक्टर म्हणून काम केलं त्यानंतर  आणि फौंड्रीचा अनुभव घेण्यासाठी  एस. जे. आयर्न स्टीलमध्ये सुपरवायझर म्हणून त्यांनी काम केलं. त्यानंतर मेनन मेटॅलिक्सच्या चंद्रा अलाईजचस्टील फौंड्रीमध्ये शिफ्ट इंजिनिअर म्हणून, मग आर. एस. झंवर इंडस्ट्रीजमध्ये डेव्हलपमेंट इंजिनिअर म्हणून, जैन स्टीलमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून, एस. एस. इंडस्ट्रीजमध्ये सल्लागार म्हणून अशा विविध जबाबदार्‍या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या. या कालावधीत कास्टिंग, मशिन शॉप, मोल्डिंग आणि मेल्टिंग प्रोसेसचा मोठाच अनुभव घेतला. हे करत असताना बहुस्तरीय पातळीवर मशिन शॉप, स्टील कास्टिंग वर्क्स,  सी. आय. कास्टिंग, सँड कास्टिंग (सीओ2), हाय प्रेशर मोल्डिंग लाईन्स, मेल्टिंग प्रोसेस अशा कामात उच्च दर्जाचं कौशल्य प्राप्त केलं.
1991 च्या सुमारास सी. एन. सी. मशीन्स आली. त्यावर त्यांनी काम केलं. तेव्हा तो नवाच अनुभव होता. त्यावेळपर्यंत गाठीशी अनुभव बर्‍यापैकी जमा झाला होता. आता त्यांना स्वतःचा उद्योग उभा करावा असं वाटायला लागलं. हा जीवनसंघर्ष सुरू असताना 1993 मध्ये राजमोहन विवाहबद्ध झाले. संसाराची जबाबदारी आली. पण स्वतःचा उद्योग उभा करण्याची जिद्द होती. 1995 मध्ये त्यांनी नोकरी सोडली. त्यांना आधी फौंड्री सुरू करायची होती. पण फौंड्रीसाठी भांडवल जास्त लागतं. त्यासाठी 1995 च्या सुमारास 45 ते 50 लाख रुपये भांडवलाची गरज होती. कच्चा माल घेण्यासाठी पैसा जास्त लागतो. तेवढं कर्ज बँका देत नसत. मग त्यांनी मशीन शॉप सुरू करायचा निर्णय घेतला. दोन लेथ मशिन्स घेऊन वाय. पी. पोवार नगरात कारखाना सुरू केला. ओळखी चांगल्या असल्यामुळं कामं मिळायला लागली. पण फौंड्रीचा विचार मनातून जात नव्हता. मग एक जाहिरात वाचनात आली. 1998 मध्ये टोप संभापूरच्या पुढं मंगरायाची वाडी या गावात एक फौंड्री चालवायला द्यायची होती. ती राजमोहन यांनी चालवायला घेतली. मशीन शॉपही सुरूच होतचं. कालांतरानं मूळ मालकांनी करार संपल्यावर फौंड्री बंद केली. दरम्यान, एस. जे. आयर्नचं शिरोलीत एक फौंड्री युनिट त्यांनी चालवायला घेतलं, क्यूपोला फर्नेसच्या कामाचा दीर्घ अनुभव त्यांनी संपादन केला. 2005 मध्ये जागतिक मंदीचा एक फटका बसला. राजमोहन डगमगले नाहीत. मशिन शॉपमध्ये लेथ मशिन्सची संख्या वाढवली, सहा मशिन्स झाली. मग मिलिंग मशीन, ड्रिलर मशीन घेतलं. कामगारांची संख्याही तीनपासून पंधरापर्यंत वाढवली, दोन पाळ्यांमध्ये काम सुरू झालं. श्री स्वामी समर्थ इंजिनिअर्स ह्या त्यांच्या मशीन शॉपची सुरुवातीची गुंतवणूक मशीन आणि इतर खर्च धरून तीन लाख होती. जागा भाड्यानं होती. महिन्याला वीस हजार भाडं जायचं. नंतर एका उद्योगाकडून मोठं जॉबवर्क मिळालं. ब्रेक ड्रम, ब्रेक डिस्क, ऑईल इंजिन्स, रॉकर, पिस्टन्स असे सुमारे साठ प्रकारचे ऑटो जॉब्ज त्यांनी उत्पादित केले. आणि करतही आहेत. भरपूर कामांचा लोंढाच त्यांच्याकडे असतो. सातत्याने कामे सुरू असतात. महामंदी आणि कोरोनाच्या काळात काही प्रमाणात मंदी आली असली, तरी राजमोहन यांच्या दृष्टीने तो आव्हान पेलण्याचा काळ होता. ती आव्हानं त्यांनी प्रयत्नपूर्वक पेलली.  फौंड्री चालवताना आणि मशिन शॉप चालवताना अनेक कटू अनुभवांनाही तोंड द्यावं लागलं. पण खंबीरपणे उभे  राहून त्यांनी सगळ्या संकटांवर मात केली.
उत्पादनातील दर्जात्मक व्यवस्थापनाचा, एसजी आणि सीआय कास्टिंगच्या कामाचा, गॅटिंग डेव्हलपमेंटचा, कास्टिंग आणि मेल्टिंग प्रोसेसचा, हाय प्रेशर मोल्डिंग लाईन्सच्या कामाचा, क्यूपोला,  इलेक्ट्रिक आणि इंडक्शन फर्नेस प्रॉडक्शन लाईनच्या कामाचा तसेच संघटनात्मक कामगारांच्या व्यवस्थापनाचा दीर्घ अनुभव राजमोहन यांच्या गाठीशी आहे. राजमोहन यांची मुलगी बी. ई. शिकली आणि ती आता पॅरिसला नोकरीला असते आणि मुलगा पुण्यात बी. बी. ए. शिकत आहे. 

कनिष्ठ मध्यमवर्गीय ते कष्टाळू उद्योगपती

  कोल्हापुरातलं एक कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंब! शशिकला आणि मारुती भोपळे हे दाम्पत्य. मारुती हे बँकेत दफ्तरी. त्यांना तीन मुले. महेश, गणेश आणि योगेश.  तसं हे एकत्र कुटुंब. कुटुंबातील सदस्य 14 आहेत. शाळेत शिकता शिकताच स्वतःचा उद्योग असावा, असं स्वप्न महेशनं बाळगलं होतं. 23 जुलै 1980 या दिवशी जन्मलेल्या महेश यांचं शिक्षण 1995 मध्ये दहावी, 1997 मध्ये बारावी पूर्ण झालं. त्यानंतर त्यांनी कळंबा रोडवरील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात (आय. टी. आय.) प्रवेश घेतला. दरम्यान 1997 ते 2002 ह्या कालावधीत एका पेट्रोल पंपावर अटेंडंट म्हणून नोकरी केली.  2002 मध्ये आय. टी. आय. पूर्ण झाल्यावर शिरोली औद्योगिक वसाहतीत एका उद्योगात सी. एन. सी. ऑपरेटर म्हणून नोकरी केली नोकरी 2011 पर्यंत केली. हे काम करत असतानाच आपले स्वतःचे मशीन शॉप असावे ही मूळची तीव्र इच्छा अधिकच बळावत गेली. पण धाडस व भांडवल कमी पडत होते.

त्या वेळी त्यांचे मित्र पुढे आले व त्यांनी महेश यांना भागिदारी व्यवसाय सुरू करू या असे सुचवले. महेशने भावांना सोबत घेऊन व्यवसाय सुरू कारावा, असं वडिलांना वाटत होत. बाहेरचे भागीदार घेण्याऐवजी आपल्याच भावंडांना घ्यावं, असं ते म्हणत होते. पण मित्रांनी आरंभापासून साथ दिली होती. त्यांना वार्‍यावर सोडून भावांना सोबत घेणे हे योग्य वाटत नव्हतं. वडील नाराज होते, पण त्यांनीच 1लाख 16 हजार रुपयांचे भांडवल दिलं. चार भागीदार  मिळून श्री एंटरप्राइज   नावाची आपली स्वतःची छोटीशी कंपनी महेश यांनी स्थापन केली. पूर्वी पेट्रोल पंपावर कामगार असताना लग्नासाठी कुणी मुलगी देत नव्हतं. पण ते सी. एन. सी. मशीन शिकून तरबेज झाले, कारखान्यात पगार वाढला.  त्यानंतर त्यांना सधन कुटुंबातील मुलगी राजलक्ष्मी ही पत्नी म्हणून मिळाली. महेश उद्योजक होण्यात पत्नीची  साथ मोलाची मिळाली. मोठी मुलगी राजलक्ष्मी आणि लहान मुलगी महेश्वरी ही आहे.
 उद्योग तर सुरू झाला. पहिली ऑर्डर ब्रेक डिस्कची श्री कणेरी इंडस्ट्रीज यांनी दिली.  त्यांना पहिले बिल सात हजार  मिळाले. हळुहळू कामात सुधारणा करून 2018 पर्यंत त्यांचं बिल महिन्याला 40 हजारपर्यंत पोहोचलं.  मग त्यांनी मार्च 2018 ला त्यांनी आणखीन एका भागिदाराचा समावेश  करून श्री शुभलाभ सी. एन. सी. वर्क्स या नावाने नवीन कंपनी चालू केली. सुरुवातीला प्रत्येकी 4 लाख भांडवल घालून ही कंपनी चालू केली  त्या वर्षी त्यांची वार्षिक उलाढाल 19 लाख रुपयांची झाली.  महेश हे महिन्याला 1700 डिस्क सप्लाय करत होतो तो 2018 ला डेली 500 ब्रेक डिस्क म्हणजे 1महिन्याला 12 हजार ते 12 हजार 500 पर्यंत वाढवले. तोपर्यंत कोविडचे संकट आले.  सर्व काही ठप्प झाले, पण कोरोना काळात सर्व कामगारांना पगार दिला. अजूनही महेश आणि त्यांचे भागीदार वर्षातून एकदा सगळ्या कामगारांना घेऊन सहल काढतात.  चार महिन्यात मंडळींनी पुन्हा उभारी घेतली. नंतर बंधू योगेश यालाही सोबत घेतलं. अपार परिश्रम करून भागिदारीत उद्योग यशस्वी करून दाखवायचा अशी जिद्द बाळगली होती. लग्न हे त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे वळण ठरले. महेश आणि त्यांच्या भागिदारांच्या उद्योागात दुग्ध प्रक्रिया यंत्रणेमधील पार्ट,  एस. पी. एम. मधील पार्ट, फास्टनर्स-   जसे  नट- बोल्ट,  शेती लाईन मधील लहान- मोठे विविध पार्ट, गियर बॉक्स मधील पार्ट, आणखीन काही सुट्टे पार्ट, लिफ्ट मधील पार्ट. हे सगळे मिळून महिन्याला चार मशीन्सवर सुमारे  40 हजार पार्ट बनवले जातात. दुग्ध प्रक्रिया यंत्रणेमधील काम मिळवताना भरपूर धावपळ झाली; पण प्रयत्न, चिकाटी व कामावरील एकाग्रता ह्या जोरावर ते मिळालं. गुणवत्तापूर्वक उत्पादन  करण्यात सातत्य आहे. लिफ्टमधील पार्ट इटलीला निर्यात होतो, तर नट- बोल्ट नावाचा  पार्ट अद्वैत फास्टनर्स मध्ये जातो व तिथून पुढे परदेशात निर्यात होतो.
14 कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन -----  वार्षिक आर्थिक उलाढाल 45 लाखाची आहे.
महेश यांची मुलगी राजनंदिनी ही सध्या तीन वर्षाचा डिप्लोमा करत आहे. 2027 मध्ये ती बी. ई. शिकत होईल. त्यानंतर ती आणि माझे दोन भाऊ मिळून स्वतंत्र उद्योग सुरू करणार आहेत. आत्ता महेश यांच्या कंपनीत चार सी. एन. सी. मशीन्स, 14 कर्मचारी अशी यंत्रणा कार्यरत आहे. आपल्या यशात सर्व मित्रपरिवार व त्यांनी जिथे नोकरी केली, तेथील आस्थापनांचे मालक यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभल्याची कृतज्ञता ते व्यक्त करतात. त्या सर्व मालकांनी खूप प्रेरणा व काम दिले त्यामुळे आपण येथवर पोहोचलो, असं महेश म्हणतात. आत्ता कंपनीवर कोणतेही कर्ज नाही,वार्षिक आर्थिक उलाढाल 45 लाखाची आहे.  फक्त  लहानपणी चे मित्र 10 वीचे वर्गमित्र,  आय. टी. आय. चे वर्गमित्र  आणि व्यवसायिक मित्र, सनदी लेखापाल यांच्या मार्गदर्शन आणि सहकार्याने आपला प्रवास सुरू राहील, आपले 2028 पर्यंत स्वतःच्या जागेत मशीन शॉप सुरू करायचे  व सी. एन. सी. मशीनची संख्या 15 करायची हे स्वप्न आहे. घरी असणारं मोठं कुटुंब आणि उद्योग विश्वातलं कुटुंब असा सुखाचा संसार महेश भोपळे करत आहेत.

दोन कोटीचा गोडवा देणारे ‘मधाचे गाव’

केंद्रीय मंत्रालयाने आयोजित केलेल्या ‘सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन व्हिलेज’ या  अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणार्‍या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्याच्या भुदरगड तालुक्यातील ‘मधाचे गांव पाटगाव’ कास्य पदकाने सन्मानित झाले. ‘मधाचे गाव’ ह्या उद्योगामुळेे हे पाटगाव राज्याच्या चर्चेत आले. येथे कित्येक दशकापासून मधाचा व्यवसाय चालत आलेला आहे. मध्यंतरीच्या काळात नैसर्गिक आपत्तीमुळे मध उत्पादनात घट झाली होती.पण अलिकडच्या काळात राज्य शासनाने विशेष लक्ष दिल्याने ही उत्पादन वाढले आहे. वर्षाला दोन कोटी रुपयाचा वीस हजार किलो मध पाटगावातून उत्पादित होतो.तसेच पर्यटनातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे. मधमाशी पालनासाठी या गावात होत असलेल्या या प्रयत्नांची दखल आता देश पातळीवरही घेतली जात आहे.       हे केंद्र नाबार्डच्या शेती उत्पादक संस्थेच्या माध्यमातून वाटचाल करणारी ही मध उत्पादक शेती संस्था म्हणून कार्यरत राहणार आहे.

    संस्थात्मक पातळीवर बाजारात ‘पाटगाव’ ह्या नावानेच मधाचा स्वतंत्र ब्रँड देशभर आणि जगभर पोहोचेल या दृष्टीनेही प्रयत्न केले जात आहेत. मधाची आधारभूत किंमत ठरविली जाणार आहे.  मध उत्पादनातील प्रशिक्षित मनुष्यबळ विकसित करण्याचा प्रशासन भर देणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यानुसार ही  मधपाळांची शेती संस्था स्थापन करण्यात आली. या संस्थेद्वारे परिसरात कॉमन फॅसिलिटी सेंटर चालवले जाणार आहे. त्याद्वारे मध उत्पादन वाढीसाठी प्रयत्न होतील. याबरोबरच जीआय टॅगिंग आणि ट्रेडमार्कची प्रक्रियाही केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
मधाचे उत्पादन,मध संस्थेची देखभाल, तसेच प्रशिक्षणे,अभ्यास दौरे आयोजित करण्यात येणार आहेत. मधाचे ब्रँडिंग व मधासाठी बाजारपेठही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती  या यंत्रणेतून मिळत आहे. यासाठी मध संस्थेला 10 लाखाचे अनुदानही उपलब्ध झाले आहे. त्याचबरोबर पाटगाव आणि परिसरातील 100 जणांना केंद्र शासनाच्या ‘बी’ किपिंग ट्रेनिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट पुणे या संस्थेकडून ‘बी ब्रिडिंग’चे प्रशिक्षण दिले गेले आहे.या वर्षी  पाटगावसह परिसरातील शिवडाव, आंतुर्ली, पाळ्याचाहुडा, मठगाव अशा जवळच्या वाड्यावस्त्यांवरील 286 मधपाळांकडे सुमारे 20 हजार किलो मध उत्पादन झाला आहे. यासाठी  खादी व ग्रामोद्योग मंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रीमती अंशू सिन्हा, महात्मा गांधी राष्ट्रीय फेलो  संदेश जोशी,  जिल्हा खादी व ग्रामद्योग अधिकारी दत्तात्रय कुरुंदवाडे आदिंचे सहकार्य लाभले आहे.    
      शाश्वत विकासाचा पथदर्शी प्रकल्प राबविणार्‍या पाटगावची सामाजिक, नैसर्गिक, आर्थिक निकषाच्या आधारे या स्पर्धेसाठी निवड झाली होती. देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील 750 हून अधिक गावांमधून केवळ 35 गावांना हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाला आहे.   सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या पाटगावसह पाच ग्रामपंचायती एकत्र येऊन याठिकाणी तयार होणार्‍या शुद्ध व नैसर्गिक मधाची निर्मिती करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ व जिल्हा नियोजन समितीच्यावतीने हा कार्यक्रम राबविण्यात येत असून याव्दारे ही गावे स्वयंपूर्ण होण्याची वाटचाल सुरू आहे.
मध उद्योगाबरोबरच या ठिकाणच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी आता शासकीय पातळीवर काम चालू आहे. मध उत्पादक, विक्रेत्यांसह महिलांनाही रोजगार उपलब्ध करुन देत पाटगावबरोबरच आजूबाजूच्या गावांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी व मध निर्मिती व विक्री उद्योगाला चालना देण्यात येत आहे.
   पाटगावच्या मधाचे ब्रँडींग, पॅकेजिंग, लेबलिंग व मार्केटींगसाठी प्रशासनाच्या वतीने सूक्ष्म नियोजन सुरु आहे. अधिकाधिक मध उत्पादकांना प्रशिक्षण देणे, मधपाळांना मधपेट्या देणे, आवश्यक कर्ज पुरवठा करणे यासाठी तसेच पाटगावसह इतर  ग्रामपंचायती अंतर्गत गावांमध्ये मधपाळ तयार करुन येथील नागरिकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न होत आहेत.
    पाटगाव परिसरातील दुर्लक्षित पर्यटन स्थळांचा विकास होण्यासाठीही उपाययोजना करण्यात येत आहेत. या ठिकाणी भेट देणार्‍या पर्यटकांच्या सोयीसाठी कोल्हापूर ते पाटगाव मार्गावर माहिती फलक लावण्यात आले आहे. तसेच पर्यटन संचालनालयाच्या वतीने पर्यटकांसाठी याठिकाणी न्याहारी व निवासाची व्यवस्था, स्वच्छतागृह आदी सुविधा अधिक दर्जेदार पध्दतीने देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पाटगावमध्ये मधुमक्षिका पालनाबाबत माहिती देणारे माहिती केंद्र तयार करण्यात आले आहे. याठिकाणी भेट देणार्‍या नागरिकांना मधाच्या पेट्या, मधनिर्मिती प्रक्रिया पाहता येण्यासाठी लवकरच या ठिकाणी हनी पार्क (मध उद्यान) तयार करण्यात येणार आहे. पाटगाव मध्ये सुरु होणार्‍या सामूहिक सुविधा केंद्रात पाटगाव परिसरात तयार होणार्‍या मधाचे संकलन प्रक्रिया व विक्री होणार असल्यामुळे येणार्‍या पर्यटक व नागरिकांना शुद्ध व नैसर्गिक मध व त्यापासून तयार होणारी दर्जेदार उत्पादने खरेदी करण्याची संधी मिळेल.
         या उपक्रमांतर्गत पाटगाव परिसरातील दुर्लक्षित पर्यटन स्थळांचा विकास होण्यासाठीही उपाययोजना करण्यात येत आहेत. या ठिकाणी भेट देणार्‍या पर्यटकांच्या सोयीसाठी कोल्हापूर ते पाटगाव मार्गावर माहिती फलक लावण्यात आले आहे. तसेच पर्यटन संचालनालयाच्या वतीने पर्यटकांसाठी याठिकाणी न्याहारी व निवासाची व्यवस्था, स्वच्छतागृह आदी सुविधा अधिक दर्जेदार पध्दतीने देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पाटगावमध्ये मधुमक्षिका पालनाबाबत माहिती देणारे माहिती केंद्र तयार करण्यात आले आहे. याठिकाणी भेट देणार्‍या नागरिकांना मधाच्या पेट्या, मधनिर्मिती प्रक्रिया पाहता येण्यासाठी लवकरच या ठिकाणी हनी पार्क (मध उद्यान) तयार करण्यात येणार आहे. पाटगाव मध्ये सुरु होणार्‍या सामूहिक सुविधा केंद्रात पाटगाव परिसरात तयार होणार्‍या मधाचे संकलन प्रक्रिया व विक्री होणार असल्यामुळे येणार्‍या पर्यटक व नागरिकांना शुद्ध व नैसर्गिक मध व त्यापासून तयार होणारी दर्जेदार उत्पादने खरेदी करण्याची संधी मिळेल.

निरोगी जीवनाचा मूलमंत्र: योगसाधना*

पत्रपल्लव



----------------------------------------------
योग करणे म्हणजे फक्त योगासने करणे असा अनेकांचा गैरसमज आहे. योगासने हा योगसाधनेचा केवळ एक भाग आहे. योग ही एक जीवनशैली आहे. योग म्हणजे आत्मिक आणि शारीरिक शुद्धीकरण असे म्हणता येईल. कोरोनाच्या काळानंतर अख्खं जग आरोग्याबाबत जागृत झालं आहे. अनेकजण व्यायामाच्या वेगळ्या पद्धती अवलंबत आहेत. त्यापैकी एक आहे 'योग'. 'योग'कडे कल असणाऱ्यांची संख्या अफाट आहे. देश - विदेशातून अनेक लोक 'योग' शिकण्यासाठी भारतात येतात. 'योग शिकण्याचे महत्त्वच इतके सुंदर आणि परिणामकारक आहे की, ज्याला योग समजला, तो जीवनात आनंदी राहणारा व्यक्ती असेल', असे म्हणायला हरकत नाही.

'शरीर आणि मन' या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हजारो वर्षांपूर्वी ग्रीक लोकांनी 'निरोगी शरिरात निरोगी मनाचा वास' (A sound mind as a beured both) असा सिद्धांत मांडला होता. या सिद्धांतावर यांच्या शिक्षणाची समग्र पद्धती आधारलेली होती. तर योग आणि आसने आपल्याला सुदृढ ठेवण्यास परिणामकारक ठरतात.
 
शरिराच्या अंतर-बाह्य भागांना निरोगी ठेवण्याची क्रिया म्हणजे 'योगासने'. जोपर्यंत शरिराचे आंतर-बाह्य भाग निरोगी नसतात, तोपर्यंत कोणतेही काम आपण चांगल्या प्रकारे करू शकत नाही. कारण 'शरीर आणि मन' हे एकमेकांशी जोडलं गेलं आहे. एकाला दुखावलं तर दुसरा चांगला राहू शकणार नाही. म्हणूनच जीवनात योगासनांचे महत्त्व खूप आहे. आरोग्याच्याहीने योगासनांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

*अनेकविध आजार, रोगांवर उपाय काय?*

अनेक वर्षापासून माणूस धकाधकीच्या जीवनात आणि कलहात वावरतो आहे. माणूस म्हणून जगताना त्याला अनेक आव्हाने आणि संकटांना तोंड द्यावे लागत आहे. परिणामी त्याचे आपल्या शरिरावर वाईट परिणाम पाहायला मिळत आहेत. आज आपण स्वतःला आधुनिक व सुसंस्कृत समजतो. परंतु, असं मुळीच समजू नका. अहो, झोपेच्या गोळ्यांशिवाय रात्री आपण झोपू शकत नाही. संधिवाताचा त्रास, युरिक अॅसिड वाढणे, डोकेदुखी, अन्न पचत नाही,  मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी असे आपले काही ना काही दुखत असते. आणि त्यासाठी महागडी औषधे, अँटिबायोटिक्स आणि टॉनिक घ्यावेच लागते. बरं, इतके करूनही ते मुळापासून पूर्णपणे बरे होत नाही. अविरतपणे ही औषधे आपणांस खावी लागतातच. घड्याळाचे काटे जसे धावतात, असे आयुष्य धावत आहे. अनेक रोग, आजार होत आहेत. तर याला आपण कसे रोखू शकतो? आपल्या शारीरिक आणि दुखण्यांवर आणि मानसिक यातनांवर उपाय योगासने आहेत, असे म्हणायला हरकत नाही.

*योग म्हणजे काय?*  
'युज' या संस्कृत शब्दापासून 'योग' हा शब्द रूढ आला आहे. योग म्हणजे संयोग होय. आत्मा आाणि परमात्मा यांचा संयोग योगाद्वारे होते. ऋषीमुनींनी शरीर, मन आणि आत्म्याच्या शुद्धीकरणासाठी 'योग'चे आठ अंग सुचवले आहेत. यास 'अष्टांग योग' असे म्हणतात. योगाची आठ अंगे खालीलप्रमाणे आहेत.

१ ) यम : 'यम' म्हणजे 'संयम'. एकूण यम पाच आहेत, ते पुढील प्रमाणे असे -
अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह.
*आपल्या उक्तीने, कृतीने किंवा मनाने कोणत्याही प्राणिमात्राला उपद्रव होणार नाही याची खबरदारी घेणे म्हणजे 'अहिंसा' होय.
* जे डोळ्यांनी पाहिले, स्वत:च्या कानांनी ऐकलं, तसे सादरीकरण करणे म्हणजे 'सत्य' होय.
*मनाने किंवा प्रत्यक्षात चोरी न करणे तसेच संपत्तीचा मोह न धरणे म्हणजे 'अस्तेय' होय.
* सर्व इंद्रियांवर ताबा मिळवणे म्हणजे 'ब्रह्मचर्य'
* सर्व उपभोगांचे त्याग म्हणजे 'अपरिग्रह' होय.

२ ) नियम : नियमदेखील पाच आहेत. ते पुढीलप्रमाणे - शौच, संतोष, तप, स्वाध्याय (अध्ययन) आणि ईश्वरप्रणिधान (ईश्वराची आराधना, उपासना).

३) आसन : 'स्थिरमुखमासनम्'.
आसन केल्याने नाडीशुद्धी होते, आरोग्य सुधारते. शरीर आणि मनाला ऊर्जा प्राप्त होते. आसने अगणित आहेत. त्यातील काही सोप्या आसनांद्वारे आपण आपल्या निरोगी शरीर मिळवू शकतो.

४) प्राणायाम : प्राणायाम' या शब्दाचा अर्थ 'प्राणावर नियंत्रण असा होतो. शरीराच्या बाह्य स्वच्छतेसाठी गरज असते, त्याप्रमाणे मनाच्या शुद्धीसाठी प्राणायामाची आवश्यकता असते.

५) प्रत्याहार : प्रत्याहारामुळे साधकाचे अचपळ मन शांत होते. चंचल इंद्रिये शांत स्थिर होतात.

६ ) धारणा : स्वतःचे शुद्ध मन एकाग्र करणे याला 'धारणा' असे म्हणतात.

७ ) ध्यान : ध्यानाद्वारे मनातील राजस व तामस या दोषांचा नाश होतो. मन एकाग्र आणि शांत होते.

८) समाधी : साधकाने चित्ताची एकाग्रता वाढवली पाहिजे; कारण ध्यानाची परमसीमा म्हणजेच 'समाधी' होय. आपले अनेक  ऋषी पूर्वी समाधी अवस्थेत राहायचे.

आत्मिक आणि शारीरिक उन्नतीसाठी हे पाच अंग खूप महत्त्वाचे आहेत. याप्रकारे आसने म्हणजे अष्टांग योगाचे फक्त एक अंग आहे. पण याचे पालन करणेही तितकेच कठीण आहे. यापैकी आपण फक्त आसने करतो. यामध्ये योगासने, प्राणायाम, सूर्यनमस्कार, आहार अशा अनेकविध अंगे महत्त्वाची आहेत. योगासने केल्याने शरीर निरोगी राहण्यास मदत होते. चपळता वाढते, ऊर्जा-उत्साह वाढतो. त्याशिवाय शरीर लवचिक बनते.

*योगासनांचे फायदे काय?*
आपल्याला योगासने कशी करावीत आणि त्याचे फायदे काय आहेत, हे माहिती असायलाचं हवे. भविष्यकाळात विविध रोग, आजारांपासून बचावासाठी आसने फलदायी ठरतील, असे म्हणायला हरकत नाही.

आपल्या शरिरातील घाण वेगवेगळ्या मार्गांनी बाहेर पडत असतात. त्यात गुदद्वार नाकपुड्या, कान, डोळे, तोंड, जननेंद्रिये आणि त्वचेद्वारे आपल्या शरिरातील अस्वच्छता बाहेर पडते. हे घटक जर शरिरातून बाहेर पडल्या नाहीत तर अनेक प्रकारचे रोग जडतात. शरीराचे संतुलन बिघडते. आपले शरीराचे संतुलना आणि आरोग्य चांगले ठेवण्यासाठी योगासने खूप महत्त्वाची आहेत.

योगासने विविध प्रकारात विभाजन करण्यात आले आहे.

१) बैठी आसने
२) पोटावर झोपून करण्याची आसने
३) पाठीवर झोपून करण्याची आसने
४) गुडघ्यावरील आसने
५) हातावरील आसने
(६) उभे राहून करण्याची आसने
(७) शीर्षासने

यापैकी काही सोपी आसनेही तुम्हाला घरी बसून करता येईल.

(१) पद्मासन - दमा, झोप येत नाही अशांसाठी हे आसन उपयुक्त आहे. हे आसन सुरुवातीला १ मिनिटे करावे. नंतर सराव करून हळूहळू हे आसन जमेल. या आसनामुळे अंतस्त्रावी ग्रंथी कार्यक्षम बनतात. शरीरातील चरबी कमी होते.

(२) बद्ध पद्मासन - हे आसन केल्याने फुप्फुस, जठर, लिव्हर कार्यक्षम होतात. सांधेदुखी नाहीशी होते.

(३) पर्वतासन - या आसनांमुळे हातांचे स्नायू लवचिक आणि बळकट होतात. फुफ्फुसे, पोटाचे विकार होत नाहीत.

(४) लोलासन - या आसनामुळे जठरग्नी प्रदीप्त होतो. आतडी सशक्त होते. नाड्यांची अशुध्दी तसेच आतड्यांचे विकार आणि पोटात मुरडा येणं कमी होतं.

(५) कुक्कुटासन - आतड्यांना येणारी सूज यामुळे कमी होते. कफ, अपचन कमी होते.

(६) सिद्धासन - क्षय, दमा,  हृदयरोग असे विकार बरे होण्यास मदत मिळतात.

(७) सिंहासन - तुम्हाला चिरतरुण, तेजस्वी दिसायचे आहे का, तर सिंहासन करा. स्मरणशक्तीसाठीही हे आसन उपयुक्त आहे. या आसनामध्ये जीभ ताणून बाहेर काढली जाते, त्यामुळे चेहऱ्याचे स्नायू ताणले जातात. त्यामुळे चेहरा सुंदर दिसतो.

(८) वीरासन - या आसनामुळे फुफ्फुसे पोट आणि पाठीच्या कण्याचे विकार नाहीसे होतात. या आसनामुळे हातांच्या स्नायूंना चांगला व्यायाम होतो.

(९) मंडूकासन - हे आसन करीत असताना शरीराचा आकार बेडकासारखा दिसतो. म्हणून याल 'मंडूकासन' म्हणतात. नितंब, पोटावरील मेद, मंड्यांवरील मेद कमी करण्यास मदत होते. या आसनामुळे पचनशक्ती सुधारते.

(१०) गोमुखासन - पायाचा संधिवात, मूळव्याधीची तक्रारही दूर होते. पाठीचे दुखणे, काखेतील दुखणे, मारलेली लचक बरे होण्यास मदत होते. लहान-लहान सांध्यांसाठी ही आसने उपयुक्त ठरतात.

(११) पश्चिमोत्तानासन - हे आसन सुरुवातीला काही सेकंद करावे. आसन जमल्यानंतर त्याची वेळ वाढवून ३० सेकंदापर्यंत नेऊ शकता. या आसनास 'उग्रासन' असे सुद्धा म्हणतात. हे आसन करताना खाली वाकताना पोट आत खेचले जाते. आसनामुळे पोटातील चरबी कमी होते. त्यामुळे पचनशक्ती सुधारते.

(१२) उत्तानपादासन - या आसनामुळे कमरेतील दुखणे कमी होते. दमा नियंत्रणात येतो.

(१३) जानुशिरासन - या आसनामुळे पोटांच्या स्नायूंचा व्यायाम होतो. त्यामुळे पचनशक्ती सुरळीत बनते. अपचनाच्या तक्रारी कमी होतात. बद्धकोष्ठता असणाऱ्यांनी हे आसन सुरुवातीला हळूहळू करावे. त्याशिवाय शरीरातील चरबीदेखील कमी होते. त्याचबरोबर, मूळव्याधीची समस्या कमी होण्यास मदत होते.

नदी म्हणजे आपली आई...

स्वालिया शिकलगार


यददः संप्रयतीरहवनदता हते ।
तस्मादा नद्यो नाम स्थ ता वो नामानि सिन्धव: ॥
(अथर्ववेद. तिसरे कांड, तिसरा अनुवाक, तेरावे सूक्त)
‘हे जला, मेघांना तोडून तू बाहेर येतोस, ते जल पृथ्वीवर इकडून तिकडे वाहताना नाद करते. म्हणून वाहणार्‍या तुझे नाव नदी पडले आहे,’असे म्हटले आहे. आदिम जीवना मानवी जीवनापासून नदी ही पूजनीय होती आणि समाजजीवनात तिला सर्वार्थाने महत्त्व प्राप्त झाले होते. नदी हे त्या परिसराचे भूषण असते आणि आभूषणही असते. एखाद्या मोठ्या भूप्रदेशावरून एका दिशेकडून दुसरीकडे वाहत जाणारा नैसर्गिक रुंद थंड पाण्याचा प्रवाह म्हणजे नदी अशी तिची शास्त्रीय व्याख्या आहे. नदीचा उगम हा प्रामुख्याने पर्वतातून होतो. मग पर्वत बर्फाच्छादित असो वा नसो. जलाशय, लहान- मोठे झरे एकत्र येऊनही नदी तयार होते आणि प्रवाहित होऊन वहायला लागते. कोणताही  भूप्रदेश असो, त्यातून पाणी वाहून नेणार्‍या पाण्याच्या सार्‍या प्रवाहांची मिळून नदीप्रणाली होता. त्या सार्‍या प्रदेशाला त्या विशिष्ट नदीचे खोरे असे म्हटले जाते. नदीचा उगम होतो किंवा ती जिथून वाहते, तिथली जमीन क्षारयुक्त नसते, म्हणून ते पाणी गोड असते. पण नदीचे गोड पाणी ज्या समुद्र नामक अथांग जलाशयाच्या दिशेने जाऊन त्याला मिळते, तो प्रदेश क्षारानेच भरलेला असल्यामुळे समुद्र खारा असतो, परिणामी गोड पाण्याची नदी समुद्रात शिरताच खारीच होऊन जाते.
नदीला ‘नद’ असाही एक शब्द आहे. ‘नदी’ चा ‘नद’ केव्हा होतो? तर नदी जेव्हा छोटी असते, तेव्हा ती ‘नदी’च असते. मात्र अनेक छोट्या एकत्र येऊन पुढे वाहायला लागतात, त्या अतिप्रचंड प्रवाहाला ‘नद’ म्हणतात. नदी समुद्राला मिळते तेव्हा तिची रुंदी वाढते. पाणी खारट व्हायला सुरुवात होते. नदी समुद्राला मिळते त्या भागाला खाडी म्हणतात. काही वेळा असे असते की, नदी नसते, पण खाडी असते. हे कसे काय? समुद्र समुद्रकिनार्‍यावरील खडक झिजून झिजून अणकुचीदार झालेला असतो. अशा धोकादायक किनार्‍यांना दंतूर म्हणतात. अशा  दंतूर किनार्‍याच्या भूभागातून काही अंतर पाणी जमिनीत घुसते त्या जलाशयालाही खाडी म्हणतात. पण ती नदी मात्र नसते.
नदीच्या उगमाचे अनेक प्रकार आहेत. पर्वतावरून होणारा उगम, तलाव आणि झर्‍यांमधून होणारा उगम, दलदलीच्या ठिकाणाहून होणारा उगम, बर्फाळ प्रदेशातून होणारा उगम. ‘ऋषीचे कूळ आणि नदीचे मूळ शोधू नये’ अशी म्हण आहे. कारण नदीचे मूळ अतिशय दुर्गम ठिकाणी असते. अगदी करंगळीएवढ्या धारेपासून नदीची सुरुवात होते. मग ही धार पुढे पुढे वाहत जाते, तसतसे ओढे, झरे यांचे प्रवाह त्या धारेला यऊन मिळत मिळत नदीचे पात्र विशाल होत जाते. अनेकदा भूगर्भातील पाणीही पृष्ठावर येऊन नदीला मिळते आणि पात्र आणखीन मोठे होते. काही वेळा नदीचे पात्र लहान दिसते, पण आत पाण्याचा विपुल साठा असतो.
‘नदीचे माहेर’ ही ग. दि. माडगूळकर यांची एक प्रसिद्ध कविता आहे. त्या कवितेत ते म्हणतात-

नदी सागरा मिळता, पुन्हा येईना बाहेर, अशी शहाण्यांची म्हण, नाही नदीला माहेर!
काय सांगू रे बापा रे, तुम्ही आंधळ्यांचे चेले, नदी माहेराशी जाते, म्हणुनची जग चाले!
सारे जीवन नदीचे, घेतो पोटात सागर, तरी तिला आठवतो, जन्म दिलेला डोंगर!
 डोंगराच्या मायेसाठी, रूप वाफेचे घेऊन, नदी तरंगत जाते, पंख वार्‍याचे लेऊन!
पुन्हा होऊन लेकरू, नदी वाजवते वाळा, पान्हा फुटतो डोंगरा, तेव्हा येतो पावसाळा...!

याचा अर्थ हेच सांगतो की, नदीचा प्रवाह सुरुवातीला लेकरासारखा लहान असतो. नदी हा जलचक्राचा एक भाग आहे, हा शास्त्रीय सिद्धांतच कवी ह्या कवितेत सांगतो. नदी हा समृद्ध जलस्रोत असतो. म्हणूनच सगळ्या आदिम मानवी वसाहती नदीच्या काठाला वसल्या. तिथेच त्या समृद्ध झाल्या, त्यांचा विस्तार झाला. शहराचा आराखडा हा नदीच्या पात्रानुसार ठरतो.
सामान्यतः नद्या उगमापासून आरंभ करून, उताराकडे वाहात जातात व समुद्रास मिळतात. काही वेळा सूर्याच्या उष्णतेने बाष्पीभवन होऊन त्या मध्येच आटूनही जातात. काही वेळा नदीतील पाणी जमिनीतील भेगांमध्ये झिरपून जाऊ शकते, आणि नंतर भूगर्भात पाण्याचा साठा तयार होतो. नदी लुप्त होणे किंवा गुप्त होणे याचा अर्थ हाच असावा. प्राचीन भारतातील सरस्वती नदी भूगर्भात अशीच लुप्त झाली. या शिवाय शेती आणि औद्योगिकीकरणामुळे पाण्याचा अवाजवी उपसा होतो आणि नदी आटते. भूभागांची सीमा  ठरवणे, वाहतुकीचे माध्यम व दिशादर्शक म्हणून नदीचा उपयोग शतकानुशतके होत आला आहे. दाट अरण्यांच्या प्रदेशांत तोडलेले वृक्ष वाहून इच्छित ठिकाणी नेण्यासाठीही नद्यांचा उपयोग केला जातो. अनादी काळापासून अन्न मिळवण्यासाठी नद्यांचा उपयोग होत आला आहे. नद्यांतील जीवसष्टीचे एक चक्र असते. यामुळे अनेक प्रकारचे मासे मिळतात. फक्त मासेमारीच नव्हे तर शेतीसाठी व पर्यायाने अन्न उत्पादनासाठी नदीच्या पाण्याचा उपयोग होत आला आहे.

नदीचे पात्र सहसा एकच असते. परंतु काही वेळा नदी एकाच वेळी अनेक पात्रांनीही वाहते. नदीचा प्रवाह दुप्पट झाला, तर तिची वहनक्षमता चौसष्टपट वाढते. पर्वतीय प्रदेशात पाण्याच्या प्रवाहामुळे कठीण खडकांचीही धूप झालेली आहे. त्यामुळे खडकांच्या बारीक तुकड्यांची वाळू बनते. काही वेळा पठारी प्रदेशात प्रवाहाच्या ताकदीमुळे नदी आपला मार्ग बदलते आणि तिचा मार्ग लहान होतो. काही वेळा नद्या काठावरचा गाळ प्रवाहात ओढतात. हा गाळ प्रवाहाच्या मध्य भागात जमत जातो आणि त्याचे बेट तयार होते. या भूभागांना त्रिभुज प्रदेश असे म्हटले जाते. गाळापासूच तयार झाल्यामुळे हे त्रिभुज प्रदेश अतिशय सुपीक असतात. असे प्रदेश नदीच्या मुखाजवळ तयार होतात. काही वेळा पर्वतीय प्रदेशात वाहणार्‍या नद्या धबधबे निर्माण करतात. अशी ठिकाणे सहलींचे केंद्र बनतात. काही वेळा खळखळत वाहणार्‍या पाण्यात कायाकिंग नावाचे वेगवान नौकानयन केले जाते. जोरदार प्रवाह असलेल्या नद्यांपासून वीजनिर्मिती केली जाते.
औद्योगिकीकरणातील रासायनिक द्रव्ये आणि गावे व शहरातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी नद्यांचा वापर गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. त्यामुळे नद्यांचे प्रदूषण अतोनात वाढले आहे. सहसा नदीचे पाणी तिच्या ठरलेल्या पात्रातूनच वाहते. मोठ्या नद्यांची पूररेषा मात्र नेहमीच्या पात्रापेक्षा अधिक अंतर विस्तारते. पण, सर्वसाधारणपणे नदीचे पात्र व पूर आलेल्या नदीचे पात्र हे सहसा बदलत नाही. नद्या या सुरक्षेचे माध्यम म्हणूनही वापरल्या गेल्या आहेत. तसेच राजकीय सीमा म्हणूनही त्यांचा उपयोग झालेला दिसतो. भारतातील अनेक राज्यांच्या सरहद्दी नदीचे प्रवाह ठरवतात. सातार्‍याचे शाहू छत्रपती आणि कोल्हापूरकर छत्रपती यांच्यात अनेक लढाया झाल्या आणि शेवटी तह होऊन वारणा नदी ही दोन्ही राज्यांची सीमा ठरवण्यात आली.
 जीवसृष्टीचे एक स्वतंत्र चक्र नदीवर अवलंबून असते. यात अनेक प्रकारचे सजीव, परजीवी सजीव आणि वनस्पती समाविष्ट होतात. नदीतील बहुतेक जीव हे गोड्या पाण्यात जगणारेच असतात. परंतु काही मात्र खार्‍या पाण्यातही जगू शकतात. उदा. सामन नावाचे मासे नदी व समुद्र दोन्हीकडे राहू शकतात. काही मासे समुद्रातून पोहत नदीत येतात व उगमाकडील बाजूस अंडी घालतात.
पूर येणे ही नदीच्या नैसर्गिक चक्राचा भाग आहे. नदीकाठाची धूप व आसपासच्या मैदानात साठणारी गाळवजा माती ही पुरामुळेच होते. माणसाने आपल्या सोयीनुसार बंधारे घालून, काठ बांधून व प्रवाह वळवून पूर येण्यावर निर्बंध घातले आहेत. तरीही अनेकदा शहराची रचना करतांना जलप्रवाहाची दिशा व वेग विचारात न घेतल्याने पूर येतात व मोठी जीवित आणि वित्तहानी होते. शहरी भागात, जर नदीपात्राच्या पूररेषेचा विचार न करता अतिक्रमण करून वसाहती बांधल्या, तर पूर आल्यावर नदीचे पाणी शहराच्या अंतर्भागात घुसते.  मुंबईमध्ये मिठी नावाच्या नदीच्या पूर रेषेचा विचार न करता तिच्या पात्रात बांधकामे केल्यामुळे नदीचे पाणी शहरात घुसले होते. मुंबईत एक नदी आहे, हे असंख्य मुंबईकरांना हा महापूर आल्यावरच समजले.
 नदीच्या पाण्याचा सुयोग्य वापर व्हावा यासाठी बहुतेक वेळा प्रवाहाचे नियमन केले जाते. यामुळे त्यांच्यापासून मानवाला पोहोचणारी हानीही कमी होते.साखर कारखान्यांची मळी हा नदीच्या प्रदूषणाचा मोठा कारक आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात हे प्रमाण जास्त आढळते. जमीन ओलिताखाली आणण्यासाठी आणि पिण्यासाठीही पाण्याचा प्रवाह धरणे बांधून अडवला जातो. धरणातून सुयोग्य रीतीने मिळालेल्या प्रवाहाच्या आधारे वीज निर्मितीसारखी कामे साधली जातात. नदीचे नियोजन ही सातत्याने चालणारी गोष्ट आहे. आपल्याला घातलेल्या बांध-भिंती नदी नष्ट करते. तसेच बांधांमधले धातूचे भाग गंजतात व बदलावे लागतात. धरणाच्या भिंतींना पाण्याच्या धडकांनी तडे जातात व बाहेर पडलेल्या पाण्याने बरीच हानी होते. याशिवाय अशा प्रकारच्या पाणी नियोजनाने विस्थापित झालेल्या लोकांचे प्रश्न उभे राहतात.
 हे झाले एकूणच नदी ह्या विषयाचे. आता आपण विचार करू या गंगा आणि यमुना ह्या आपल्या देशातील प्रमुख नद्यांविषयी! ह्या दोन्ही नद्यांचे प्रदूषण गेल्या अनेक वर्षात अफाट वाढलेले आहे. गंगा नदी ही केवळ भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिकदृष्टया महत्त्वाची आहे एवढेच नव्हे, तर देशातली 40 टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या ही नदी सांभाळते. 2014 मध्ये न्यूयॉर्कमधल्या मॅडीसन स्क्वेअर येथे भारतीय समुदायासमोर बोलताना आपले पंतप्रधान म्हणाले, आपण गंगा नदी स्वच्छ केली, तर देशातल्या 40 टक्के जनतेला त्याचा मोठा लाभ होईल. म्हणूनच गंगा स्वच्छता हा एक आर्थिक कार्यक्रमही आहे. हा विचार समोर ठेवून केंद्र सरकारने गंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी आणि तिचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ‘नमामि गंगे’ हे एकात्मिक अभियान हाती घेतले आहे. गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने 2019-2020 पर्यंत 20हजार कोटी रुपये खर्चाच्या कृती आराखडयाला संमती दिलेली आहे. गंगा पुनरुज्जीवनाच्या आव्हानाचे बहुस्तरीय, विविध संबंधित तसेच विविध पैलू असलेले स्वरूप लक्षात घेऊन केंद्र-राज्य सहकार्य  वाढवण्यावर भर देण्यात आला. कृती आराखडा तयार करणे, केंद्र तसेच राज्य स्तरावरील देखरेख वाढविणे याद्वारे हे सहकार्य वाढवण्यात येत आहे.कार्यक्रमाची अंमलबजावणी तीन भागात करण्यात आली आहे. तातडीने दृश्य परिणामांसाठी,प्रारंभिक स्तरावरील उपक्रम, पाच वर्षांच्या काळात अंमलबजावणी करण्यासाठीचे मध्यम उपक्रम आणि 10 वर्षात अंमलबजावणी करण्यासाठीचे दीर्घकालीन उपक्रम. असा कार्यक्रम राबवून गंगा नदी स्वच्छ करण्यात येईल. शासनाच्या सगळ्या प्रयत्नांना लोकांनीही योग्य प्रतिसाद दिला, तर हे अभियान लवकर पूर्णत्वाला जाईल. आपण भारतीय नदीला आई मानतो. जन्मभर नदी माणसाला आणि एकंदरीतच सार्‍या जीवसृष्टीला साथ करते. म्हणूनच नदीचे महत्त्व आपण नीट ओळखून आपली ‘आई’ समजूनच तिची जपणूकआणि तिची सेवा करायला हवी!

सालिह

**स्वालिया** (Swaliya / Swaliha) या नावाचा मुख्य अर्थ **"पुण्यवान", "सदाचारी", "धार्मिक" किंवा "चांगल्या ...