केशवराव भोसले नाट्यगृह म्हणजेच पूर्वाश्रमीचे पॅलेस थिएटर. शाहू महाराज १९०२ साली विलायतेस जागतिक दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी रोमलाही भेट दिली. तेथील कुस्ती मैदान आणि नाट्यगृह पाहून तशीच योजना आपल्या कोल्हापूर संस्थानात राबवावी, असे त्यांनी त्याचवेळी ठरविले.
परत आल्यावर त्यांनी त्यासाठी जुन्या खासबागेच्या परिसराची पाहणी केली. एकदा मनावर घेतलं की महाराज त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करीत. त्याचे मूर्त स्वरूप म्हणजे आजचे प्रचंड कुस्त्यांचे मैदान आणि केशवराव भोसले नाट्यगृह होय. या भूतपूर्व पॅलेस थिएटरचा प्लॅन कागलचे ओव्हरसियर जिवबा कृष्णाजी चव्हाण यांच्याकडून त्यांनी करून घेतला.
१९१३ साली पॅलेस थिएटरच्या बांधकामास सुरुवात झाली आणि १९१५ साली हे काम पूर्णही झाले. अवघ्या दोन वर्षांत बांधून झालेल्या या थिएटरचा उद्घाटन समारंभ १९१५ च्या दसऱ्यास युवराज राजाराम महाराज यांच्या हस्ते झाला. उद्घाटनाच्या वेळी महाराजांनी कामावरील सर्व कामगार, कंत्राटदार आणि सर्व संबंधित लोकांचा यथोचित सत्कार केला. या कामाचे कंत्राट बाळकृष्ण गणेश पंडित यांना देण्यात आले होते. त्यांनी त्यासाठी लोखंडी गर्डर्स परदेशातून आणून घेतले. प्रत्यक्ष गर्डर फूट, दीड फूट रुंदीचा आहे. त्यावर कंपनीचे नावही आहे. नाट्यगृहाची रचना, आवाज आणि कोणत्याही वर्गातल्या प्रेक्षकास नाटक चांगले दिसावे अशी योजना केली आहे. स्टेजच्या खाली विहिरीएवढी खोली आहे आणि त्यावर जाड सागवानी फळ्या आहेत. त्यामुळे आवाज घुमत नाही, असे पूर्वी सांगायचे. बांधकामावर महाराजांनी स्वतः जातीने देखरेख ठेवली होती. या नाट्यगृहासारखे महाराष्ट्रात कुठेही दुसरे नाट्यगृह नाही, अशी कबुली अनेकांनी दिली आहे. राजाराम कॉलेजच्या गॅदरिंगसाठी एकदा राजगोपालाचारी आले होते. त्यांनीही नाट्यगृहाच्या रचनेचे कौतुक केले होते.
या नाट्यगृहाचा प्रारंभ किर्लोस्कर कंपनीच्या 'मानापमान" या नाटकाने झाला. शाहू महाराजांनी त्यावेळी किर्लोस्कर कंपनीस मुद्दाम निमंत्रित केले होते. या नाट्य प्रयोगाच्या वेळी दुसरे एक नाट्य घडले, असे आमचे नाट्यप्रेमी मित्र बाबूराव देशपांडे खुलवून सांगत. ते असे, की यावेळी नाटककार राम गणेश गडकरी आणि नटश्रेष्ठ चिंतामणराव कोल्हटकर येथे आले होते. ते दोघे सायंकाळी पूर्वेकडील खासबागेच्या हिरवळीवर बसत. त्याचवेळी गडकऱ्यांना "राजसंन्यास" नाटकाची कल्पना सुचली असे म्हणतात. पूर्वीची आसन व्यवस्था
पूर्वी रंगभूमीच्या समोर जुन्या लाकडी खुर्चा होत्या. म्हणजे त्या खुच्र्यांना हात नव्हते. सुमारे दीडशे ते दोनशे खुर्चा असत. खुर्चाच्या भागास 'खड्डा' म्हणत. त्यांच्यावर दोन अडीच फूट उंचीची सर्व थिएटरभर शहाबादी फरशी घातलेली जागा होती. त्याला ओटा म्हणत. ओट्यात दीड-दोनशे माणसे शहाबादी काळ्या फरशीवर बसत आणि शेवटी भितीपर्यंतही अशीच काळ्या फरशीची प्रशस्त जागा होती. त्यावर प्रेक्षक खाली बसत. त्या वर्गाला 'पीट' म्हणत. पीट म्हणजे सिनेमा थिएटरमधला थर्ड क्लास आणि ओटा म्हणजे सेकंड क्लास. पिटात सामान्य प्रेक्षक बसत. श्रीमंत माणसं खड्ड्यातील खुर्ध्यावर तर मध्यमवर्गाची लोकं ओट्यात बसत. खड्डा, ओटा आणि पीट यांच्यामध्ये भला मोठा आडवा पूर्व-पश्चिम लाकडी कठडा असे. काही आगाऊ प्रेक्षक डोअरकीपरची नजर चुकवून ओट्यात अतिक्रमण करीत. नट मंडळीही पिटातल्या प्रेक्षकांच्या टाळ्या आणि शिट्ट्यांनी सुखावत. चांगले गाणे झाले की "वन्समोर" असा गिल्ला करून ते नटनट्यांना पुन्हा गायला लावत आणि टाळ्या, शिट्या, हशाचा पाऊस पडे. पिटातल्या प्रेक्षकांची पसंती ही चांगल्या अभिनयाची पावती समजत. त्यावेळी काही वृत्तपत्रे तर 'पिटातल्या शिट्ट्या' नामक शीर्षक नाटकांच्या वृत्तांतांना देत असत. माडीवर रंगभूमीच्या समोर दहा-बारा पायऱ्यांची मजबूत सागवानी लाकडाची गॅलरी असून त्यात पुरुष प्रेक्षक बसत.
महिलांची अजब आसन व्यवस्था
रंगभूमीच्या उजव्या आणि डाव्या बाजूच्या गॅलऱ्या या महिला प्रेक्षकांसाठी असायच्या. महिलांची बसण्याची ही व्यवस्था अजब आणि न्यारी होती. म्हणजे उजव्या बाजूच्या गॅलरीत घरंदाज स्त्रिया बसायच्या. तेथे भितीवर लाकडी बोर्डच होता. माझ्या अजून लक्षात आहे, पांढऱ्या रंगावर काळ्या रंगाने 'कुलीन स्त्रिया' असे लिहिले होते. तेथे घरंदाज स्त्रिया व त्यांच्यासमोर पश्चिम गॅलरीत चक्क 'वेश्या' असा पूर्वी बोर्ड होता म्हणे. जुने लोक सांगायचे, या ठिकाणी वेश्या, नायकिणी आणि कसबिणी असे संबोधले जाणाऱ्या स्त्रिया बसायच्या. मला काही तो बोर्ड वाचायला मिळाला नाही, परंतु पूर्वी म्हणे वेश्या तेथे पावडर लावून गिऱ्हाईक हेरणाऱ्या नजरेने पाहत असत. तेही चक्क विजेच्या प्रकाशात त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीचे विदारक दर्शन या स्त्रियांच्या खास आसन व्यवस्थेवरून होते. स्त्रियांच्याकडे पाहण्याचा तत्कालीन समाजाचा दृष्टिकोनही दिसून येतो. त्यावेळी महिला या शब्दाचा लोकव्यवहारात जन्मच नसावा. परंतु पूर्वीची मंडळी आणि त्या वेश्याही प्रामाणिक असाव्यात. तेथे बसण्यास त्यांना कसलाही संकोच वाटत नसे. आपला व्यवसायही त्या प्रामाणिकपणे करीत, त्यात सोंगढोंग काही नसे.
पूर्वी आताप्रमाणे नाटक सुरू झाल्यावर दिवे मालवले जात नसत. वीज येण्यापूर्वी गॅसबत्त्या ढणढणत असत. कोल्हापुरात १९२० साली वीज आली.
बोलपटांचा जमाना सुरू झाल्यावर नाटकांची संख्याही रोडावली. केव्हातरी महिना, दोन महिन्यांतून एखादं-दुसरे नाटक व्हायचे. नाटक रात्री दहा वाजता सुरू होत असे आणि आठ वाजल्यापासून थिएटर बाहेरच्या वरच्या ठिकाणी बँड वाजवला जायचा, आज नाटक आहे म्हणून लोकांना कळण्यासाठी. एक-दीड रुपयांचे तिकीट असे. स्त्रिया आणि वेश्यांना आठ- आणे तिकीट दर होता. एरवी रात्रन्दिवस नाट्यगृह बंदच असे. आम्ही तेथे खेळायला जायचो. परंतु गोविंदा नावाचा रखवालदार आम्हाला हाकलून द्यायचा. दम द्यायचा. काळा, उंच होता तो. रखवालदार राहायलाही तेथेच असे. प्रयोगच्यावेळी पडदे सरकवणे, लाइट लावणे, बंद करणे, घंटा वाजविणे ही सर्व कामे तोच करे ! सारा वन मॅन शो होता. आता त्यासाठी दहा- बारा नोकर आहेत. खुर्चीवर जाण्यासाठी जे प्रवेशद्वार होते तेथे व्हरांडा होता. त्यावर पत्रा होता. तेथे टेबल, खुर्ची टाकून खुर्त्यांचा प्लॅन समोर ठेवून तिकीट विक्री होई.
पुढे १९५७ साली बाळासाहेब देसाई बांधकाम मंत्री झाल्यावर त्यांनी पॅलेस थिएटरचे 'नामकरण केशवराव भोसले नाट्यगृह' केले. केशवराव भोसले बालगंधर्वांच्या तोडीस तोड अभिनेते आणि गायक होते. कोल्हापूरचे सुपुत्र होते! त्यांचे हे यथोचित स्मारक झाले आहे.
No comments:
Post a Comment