Tuesday, June 28, 2022

Madhuri Dixit : माधुरीचा आईसह मोठ्या बहिणींचा फोटो पहिल्यांदाच आला समोर


धकधक गर्ल माधुरी दीक्षितचे लाखो दिवाने आहेत. तिच्या एका स्माईलसाठी चाहते प्रतीक्षा करत राहतात. तिच्या जीवनाशी संबंधित अपडेट जाणून घ्यायला ते उत्सुकही असतात. आता असाच सुखद माहिती चाहत्यांसाठी आहे. तिचा एक दुर्मिळ फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये नेमकं आहे तरी काय पाहुया. 

माधुरी दीक्षितने रविवारी मदर्स डे निमित्त तिची आई स्नेहलता दीक्षित यांच्यासाठी एक कॅप्शन लिहिलीय. कॅप्शनमध्ये म्हटलंय- Happy Birthday, Aai! They say a mother is a daughter’s bestfriend. They couldn’t be any more right. From everything that you’ve done for me, the lessons that you’ve taught have been the biggest gift for me from you. I wish you only good health & happiness! ❤️.

#MothersDay #Mother #MotherLove #Motherhood #Maa. 

तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोन फोटो शेअर केले आहेत. पैकी पहिल्या फोटोमध्ये माधुरी दीक्षित, आई स्नेहलता आणि माधुरीचे पती डॉ. नेने दिसत आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये मध्भागी आई आणि सभोवताली तिघी बहिणी दिसतात. यात माधुरीच्या दोन मोठ्या बहिणीदिसत असून तिघींनीही ब्लॅक कलरचा ड्रेस घातला आहे. आई आणि मोठ्या बहिणींसह माधुरीचा हा दुर्मिळ फोटो इन्स्टाग्रामवर पहायला मिळत आहे. माधुरी चार भावंडांमध्ये सर्वात लहान असून दोन मोठ्या बहिणी आणि एक मोठा भाऊ आहे.

नेटफ्लिक्सच्या आगामी द फेम गेममधील माधुरी दीक्षित, मुस्कान जाफेरी आणि लक्षवीर सरन या कलाकारांच्या भूमिका असणार आहेत. 


Prathmesh Parab : 'दिल से अमीर' प्रथमेशला ब्लॉकबस्टर सिनेमांची लॉटरी



दगडू इज बॅक : 'हम गरीब हुए तो क्या हुआ दिल से अमीर है’ प्रथमेशला सिनेमांची लॉटरी

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'हम गरीब हुए तो क्या हुआ दिल से अमीर है’ असं म्हणत दगडू या भूमिकेतून प्रथमेश सगळ्यांसमोर आला आणि सगळ्यांचा लाडका सुद्धा झाला. याआधी बालक पालक मधून देखील प्रथमेशने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता, पण टाईमपासचा बिनधास्त, टपोरी आणि प्रेमळ दगडूने त्याला विशेष ओळख मिळवून दिली. त्यानंतर 'दिल से अमीर' असलेल्या दगडूने लागोपाठ अनेक चित्रपट लाईन केले. इतकेच नव्हे तर भूवन बाम फेम 'ताजा खबर' या हिंदी वेब सीरीजमध्येही त्याला भूमिका मिळाली. 

प्रथमेश येत्या काळात 'दृश्यम' चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये दिसणार आहे. शिवाय, टाईमपासच्या तिसऱ्या भागात आणि टकाटक चित्रपटाच्याही सिक्वेलमधून तो चाहत्यांच्या भेटीला येणार असल्याचे सर्वश्रुत आहेतच! थोडक्यात काय तर प्रथमेश परबला ब्लॉकबस्टर सिनेमांची लॉटरीच लागली आहे. 

प्रथमेशची अभिनय कारकीर्द अॅक्टींग क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या सर्व यूथला प्रेरणादायी आहे, त्यामुळे सोशल मीडियावर त्याचे लाखो फोलोव्हर्स देखील आहेत. प्रथमेशने लवकरच प्रदर्शनाच्या वाटेवर असलेल्या टाईमपास-३ संबंधित एक पोस्ट त्याच्या सोशल मीडियावर टाकली आहे. 

'टाईमपास' चित्रपटाच्या कथेइतकीच जवळची वाटतात ती या सिनेमातील गाणी. अवघ्या महाराष्ट्राला, 'प्रेमाचे वेड' लावणाऱ्या, टाईमपास १ आणि २ च्या गाण्यांइतकीच, धमाकेदार गाणी "टाईमपास ३" मध्ये देखील आहेत बरं का!! आई बाबा आणि साई बाबा शप्पथ....जाम भारीssssssssss वाटलं. 

असंच प्रेम राहू द्या, कारण #Dagadu_is_Back असे लिहित त्याने आपला आनंद व्यक्त केला आहे.

डॉ. अमोल कोल्हे घेऊन येतायेत 'शिवप्रताप गरुडझेप'



पुढारी ऑनलाईन डेस्क : रक्ताचा एकही थेंब न सांडता आपल्या बुद्धिचातुर्याच्या बळावर औरंगजेबाच्या बलाढ्य मुघल सत्तेचा पोलादी पहारा भेदला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग जिवंत करणारा डॉ. अमोल कोल्हे यांचा 'शिवप्रताप गरुडझेप' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवणारा 'टिझर' नुकताच प्रदर्शित झाला आहे.

‘राजा शिवछत्रपती’ आणि ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकांनी जगभरात अफाट लोकप्रियता मिळवली. या मालिकेतील भूमिकांमुळे छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज म्हटलं की, डॉ. कोल्हे यांचंच नाव प्रेक्षकांच्या मनात ठसलं आहे. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक कर्तृत्वाची महती सांगणारा 'शिवप्रताप' मालिकेतील 'गरुडझेप' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

या चित्रपटाचा 'टिझर' प्रदर्शित झाला असून या भव्यदिव्य चित्रपटाची झलक व धारदार संवादाची प्रचिती दिसून येते. या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांची अटक, औरंगजेबाच्या दरबारातील बाणेदार प्रसंगाबरोबरच त्यांचे चातुर्य, शौर्याचा इतिहास पुन्हा एकदा जिवंत होणार आहे.

'जगदंब क्रिएशन' प्रस्तुत करीत असलेल्या डॉ. अमोल रामसिंग कोल्हे निर्मित 'शिवप्रताप गरुडझेप' चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत स्वतः डॉ. अमोल कोल्हे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Friday, June 24, 2022

CIFF2022 ढाकामध्ये 'मोऱ्या'ची निवड


आपलं आरोग्य पणाला लावून नरकयातना भोगत गल्ल्या-गटारांची साफसफाई करणाऱ्या सिताराम जेधे उर्फ मोऱ्याची हृदयस्पर्शी कथा' आगामी "मोऱ्या" या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. लेखक, दिग्दर्शक आणि प्रमुख अभिनेता अशी त्रिसूत्री सांभाळण्यात यशस्वी ठरलेल्या जितेंद्र पुंडलिक बर्डे यांची ही पहिलीच कलाकृती 'ढाका फेस्टिवल’ आयोजित  'सिनेमेकिंग इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’-(CIFF) मध्ये निवडली गेली आहे. या चित्रपटाच्या टीझरचे प्रदर्शन जगप्रसिद्ध 'कान्स महोत्सवात' करण्यात आले होते. चित्रपटाचा टिझर पाहून अनेक चित्रपट रसिक - समीक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली होती.

आपल्या पहिल्या कलाकृतीला 'सिनेमेकिंग इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’-(CIFF) मध्ये निवडल्याने हा माझा आणि माझ्या सर्व कलावंतांचा गौरव आहे, असे लेखक  - दिग्दर्शक जितेंद्र पुंडलिक बर्डे म्हणाले. "मोऱ्या" चित्रपटाचा विषय आणि सादरीकरणासाठी केलेले सखोल संशोधन, या निवडीने सार्थकी लागल्याचे सिद्ध झाले आहे. जगभरातील तसेच तळागाळातील सर्व सामान्य प्रेक्षकांपर्यंत ही कलाकृती पोहचावी अशी आमच्या सर्व कलावंतांची इच्छा होती आणि ती सुरुवात 'सिनेमेकिंग इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’-(CIFF) पासून होत असल्याने चित्रपटातून जे दाखवायचे आहे ते नक्की शेवटच्या प्रेक्षकांपर्यंत पोहचेल अशी खात्री झाली आहे" असे जितेंद्र बर्डे सांगतात.

या चित्रपटाची निर्मिती' टॉर्टुगा मोशन पिक्चर्स', तृप्ती कुलकर्णी, राजेश विश्वनाथ अहिवळे, सहनिर्माता मंदार मांडके यांनी केली असून उमेश जगताप, संजय भदाणे, धनश्री पाटील, राहुल रोकडे, सुरज अहिवळे, रुद्रम बर्डे, कुणाल पुणेकर, शिवाजी गायकवाड, दीपक जाधव, विजय चौधरी, अविनाश पोळ, रुपाली गायके आणि जितेंद्र पुंडलिक बर्डे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


malaika-arjun: फक्त जॅकेट घालून मलायका अर्जुनसोबत सुट्टीवर


अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा अभिनेता अर्जुन कपूरच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी सुट्टीवर गेले आहेत. मलायका अर्जुनची ही स्टाईल पाहून अनेकजण कयास लावत आहेत की, दोघंही  वाढदिवसाला रोमँटिक मूडमध्ये असतील. बी-टाऊनचे स्टार जोडपे अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा त्यांच्या रोमँटिक बाँडिंग पाहायला मिळाली. दोघंही व्हेकेशनवर जातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हे कपल आपापल्या कामात कितीही बिझी असू दे पण, कोणत्याही विशेष प्रसंगी ते दोघेही एकमेकांसोबत आनंद साजरा करण्यासाठी वेळ काढतात.  मलायका अरोरा पार्ट्यांची किती शौकीन आहे हे सर्वांनाच माहित आहे. आता मलायका अर्जुन कपूरचा वाढदिवस एका खास पद्धतीने साजरा करताना दिसणार आहे.

यंदाही मलायकाने अर्जुन कपूरच्या वाढदिवसानिमित्त काहीतरी खास प्लान केला आहे. अभिनेत्री तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अर्जुन कपूरला खासगी सुट्टीवर घेऊन गेली आहे. अशा परिस्थितीत हे स्टार कपल नुकतेच मुंबई विमानतळावर स्पॉट झाले. याचदरम्यान अर्जुन मलायकाचा एक व्हिडिओ समोर आला आहे जो खूप व्हायरल होत आहे.

अर्जुन मलायकाचा लूक

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की मलायका अरोरा यावेळी फक्त जॅकेट आणि बूटमध्ये दिसत आहे. यासोबतच त्याने ब्रँडेड हँडबॅगने त्याचा लूक पूर्ण केला, अर्जुन कपूरबद्दल सांगायचे तर तो कॅज्युअल लूकमध्येही खूपच हँडसम दिसत आहे. यादरम्यान अर्जुन मलायकाची बॉन्डिंग जबरदस्त दिसत आहेत.

अर्जुन कपूर २६ जून रोजी त्याचा ३७ वा वाढदिवस साजरा करणार आहे. अर्जुन कपूरला त्याचा खास दिवस मलायका अरोरासोबत घालवायचा आहे, यासाठी हे जोडपे खासगी सुट्टीसाठी रवाना झाले आहेत. आता अर्जुन मलायकाच्या या खासगी व्हेकेशनच्या रोमँटिक फोटोंची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहेत.

ठिपक्यांची रांगोळी मालिकेत नवा ट्विस्ट, अभिनेत्री वीणा जगपातची होणार एन्ट्री




छोट्या पडद्यावरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. कानेटकर कुटुंब प्रेक्षकांच्या कुटुंबाचाच एक भाग झालं आहे. लवकरच या कुटुंबात नव्या सदस्याची एन्ट्री होणार आहे. या नव्या सदस्याचं नाव आहे अवंतिका कानेटकर चौधरी. अवंतिका ही विनायक कानेटकरांची मुलगी. प्रेमविवाह केला म्हणून तिला कुटुंबापासून कायमचं दूर करण्यात आलं. इतक्या वर्षांनंतर पुन्हा अवंतिका कानेटकर कुटुंबात दाखल होणार आहे. अवंतिकाच्या येण्याचं नेमकं कारण काय याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.


सुप्रसिद्ध अभिनेत्री वीणा जगताप अवंतिकाची भूमिका साकारत असून हे पात्र साकारण्यासाठी ती अतिशय उत्सुक आहे. तिची ही पहिलीच मालिका. मात्र, पहिल्याच दिवशी सेटवर तिची सर्वांसोबतच छान मैत्री झालीय. कानेटकर कुटुंबाची मी चाहती होतेच; या कुटुंबाचा भाग होताना अतिशय आनंद होतोय अशी भावना वीणाने व्यक्त केली. 
अवंतिका या व्यक्तिरेखेबद्दल सांगताना ती म्हणाली, अवंतिका आर्थिक सल्लागार आहे. उच्चशिक्षित असली तरी आपल्या रितीपरंपरा जपणारी. अवंतिका हे पात्र माझ्या स्वभावाच्या अगदी मिळतं जुळतं आहे असं मला वाटतं. जे असेल ते समोरासमोर बोलून मोकळी होणारी अशी अवंतिका साकारण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे.

दीपक राणेंचा आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे सिनेमा एकाच वेळी सहा भाषांत प्रदर्शित होणार



मराठी सिनेमाने ग्लोबल विचार करायला हवा असं आपण नेहमी म्हणतो.  त्यासाठी तो मराठी सिनेमा मराठी भाषिकांपुरता मर्यादित न राहता, देशभरात वेगवेगळ्या भाषेतल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचला पाहिजे. हाच विचार घेऊन निर्माते दीपक पांडुरंग राणे आपला आगामी मराठी सिनेमा पॅन इंडिया प्रदर्शित करणार आहेत. दीपर राणे यांनी आत्तापर्यंत दुनियादारी, तु ही रे, ७२ मैल, लकी, खारी बिस्कीट, दगडी चाळ असे वेगवेगळ्या विषयाचे सिनेमा आणले आहेत. त्यानंतर आता आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे हा एक एक्शन सिनेमा घेऊन आले आहेत. या सिनेमाचे टायटल रिलीज नुकतेच करण्यात आले. आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे हा सिनेमा मराठी – कन्नड भाषेत चित्रीत झाला आहे. त्याशिवाय हिंदी, तमिळ, तेलगुस मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे.

या सिनेमाच्या पोस्टरला सोशल मिडीयावर चांगला प्रतिसाद मिळाला. आपला मराठी सिनेमा सीमा ओलांडतो आहे या बद्दल प्रेक्षकांनी कौतुक केले आहे. या बद्दल निर्माते दीपक पांडुरंग राणे म्हणतात,’’ ,’’दाक्षिणात्य प्रादेशिक सिनेमांनी त्यांच्या सीमा कधीच ओलांडल्या आहेत. मराठी सिनेमाही  आपल्या सीमा ओलांडू शकतो. 

मराठी सिनेमा विषयी कुतुहल आणि कौतुक सर्वच सिनेसृष्टीत आहे. नवनवीन विषय हाताळण्यात मराठी सिनेमा कुठेच मागे नाही. त्यामुळेच आपणही आपला सिनेमा वेगवेगळ्या भाषेत प्रदर्शित केले पाहिजेत. त्यामुळे मराठी सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचेल.”

या सिनेमात कन्नड स्टार कवीश शेट्टी, मेघा शेट्टी आणि मराठीतील स्टार कलाकार शिवानी सुर्वे आणि विराट मडके यांच्या मुख्य भूमिका आहे. सदागरा राघवेंद्र यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. दीपक राणेंसोबत या सिनेमाची निर्मीती विजय कुमार शेट्टी यांनी केले आहेत. 


विश्वनायकद्वारे हिंदी रंगमंचावर 'विकास' झेप, आमदार संजय केळकर रामकृष्ण परमहंस यांच्या भुमिकेत



पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी टेलिव्हिजन क्षेत्रातील प्रसिद्ध चेहऱ्यांपैकी एक अभिनेता विकास पाटीलला आता त्याचे चाहते एका वेगळ्याच भूमिकेत पाहणार आहे. 'विश्वनायक' या हिंदी महानाट्यात तो स्वामी विवेकानंद यांची भूमिका करणार आहे.

 
'विश्वनायक स्वामी विवेकानंद यांची भूमिका साकारण्याची संधी मला लाभली हे माझं मोठं भाग्य आहे. आतापर्यंत अनेक भुमिका केल्या पण हिंदी रंगमंचावर इतक्या मोठ्या महामानवाची व्यक्तीरेखा लोकांसमोर सादर करणं माझ्यासाठी मोठं आव्हानात्मक आहे, पण तितकीच अभिमानाची गोष्ट देखील आहे' असे विकासने सांगितले.
गंधार प्रोडक्शन निर्मित या हिंदी महानाटकाचे दिग्दर्शन प्रां मंदार टिल्लू यांचे आहेत. शिरीष लाटकर यांचे लेखन आहे. तसेच श्रद्धा सचिन मोरे यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे.

विशेष म्हणजे, या हिंदी नाटकात ठाणे आमदार संजय केळकर रामकृष्ण परमहंस यांच्या व्यक्तीरेखेत दिसून येणार आहेत. शिवाय सतीश आगाशे, नीलपरी खानवलकर, राजू आठवले, सुकन्या काळण, मकरंद पाध्ये हे मराठी कलाकारांचा देखील सहभाग आहे.

Thursday, June 23, 2022

पूजा कातुर्डेचा नवा नाट्यानुभव ‘रविवार डायरीज’



मुंबई : 

अनेक मालिकांमध्ये काम केल्यानंतर अभिनेत्री पूजा कातुर्डे वेगळा नाट्यानुभव घेऊन आली आहे. आपण सगळे जणं काही ना काही शोधत असतो, या शोधाचा प्रवास दाखवणारं रविवार डायरीज हे

नवीन नाटक पूजा तिच्या मित्रमंडळींसोबत घेऊन आली आहे. या नाटकाचा प्रयोग नुकताच मुंबईत काही मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. नाट्यनिर्माते प्रसाद कांबळी, दिग्दर्शक मंगेश कदम, अभिनेता मिलींद फाटक उपस्थित होते.

पूजा या नाटकाबद्दल सांगते, “रविवार डायरीज हा वेगळा प्रयोग आम्ही केला आहे.

आपण सोमवार ते शुक्रवार आपलं काम करतो आणि वीकेण्डला पार्टी करतो. प्रत्येक जण संपूर्ण आठवडा रविवार कधी येतो हे पाहात असतो. आपण सगळ्याच प्रकारे एका चक्रात अडकलो असतो. त्यावरच रविवार डायरीज हे नाटक आहे.”


एका माणसाला शर्ट घ्यायचा असतो, त्यासाठी तो मॉलमध्ये जातो. मनासारखा शर्ट शोधण्यासाठी तो बराच प्रयत्न करत असतो. त्यासाठी तो फक्त शर्ट नसतो तर अपेक्षा आणि स्वप्न असतात. त्यासाठी तो मॉलमध्ये अनेक रात्री घालवतो. त्यातून त्याला काय मिळतं ? त्याचा शोध नक्की कसला असतो ? हे दाखवणारा हा नाट्यानुभव आहे. हे ठराविक साच्यातील नाटक न करता नाट्यवाचन, नाट्यानुभव असा हा वेगळा प्रयोग आहे.

“हे नाटक प्रत्येकाला आपलंसं वाटणारं आणि प्रत्येक जण यातून काहीतरी घेऊन जाणारं आहे”,असं पूजा सांगते.  

या नाटकाचं लेखन दिग्दर्शन चैतन्य सरदेशपांडेनी केलं आहे. तर पूजा सोबत यात अभिनेत्री दीप्ती लेलेही आहे. या नाटकाचे पुढचे प्रयोग पुणे, नाशिक,धुळे इथेही होणार आहेत.

‘भिरकीट’ची रेश्मा उर्फ मोनालिसा बागल जिंकतेय प्रेक्षकांची मनं...



मुंबई : 

संपूर्ण महाराष्ट्रात, १७ जूनला प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवाणी त्यांच्या जवळच्या सिनेमागृहात सज्ज झाली आणि त्या मेजवाणीचं नाव आहे ‘भिरकीट’.

क्लासिक एंटरप्राईज प्रॉडक्शन प्रस्तुत, सुरेश जामतराज ओसवाल आणि भाग्यवंती ओसवाल निर्मित, अनुप जगदाळे लिखित-दिग्दर्शित ‘भिरकीट’ सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. हा सिनेमा प्रेक्षकांचे मनोरंजन करतच आहे, पण तसेच या सिनेमातील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळतंय. असंच एक सिनेमातलं गोड, सुंदर पात्रं म्हणजे रेश्माचं पात्रं जे साकारलंय अभिनेत्री मोनालिसा बागल हिने.

‘भिरकीट’ चित्रपटाची गोष्ट ग्रामीण भागातील, एका छोटयाशा खेड्यात घडते. गाव म्हंटलं की गावाकडची गोष्ट, तेथील लोकांची बोलीभाषा, शैली ही पाहायला मिळतेच आणि मोनालिसाने साकारलेलं रेश्माचं पात्रं हे फारच विशेष आहे. तिचा आवाज, तिची गावाकडची भाषा आणि अर्थात अभिनय पाहायला खूप छान वाटलं अशा प्रतिक्रिया तिला तिच्या चाहत्यांनी दिल्या.

या चित्रपटाने मोनालिसाला काय दिलं असा प्रश्न तिला विचारलेला असताना तिने सांगितले की, “या सिनेमाने मला अप्रतिम अनुभव दिला. दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मला या सिनेमाने दिली. विशेष करुन गिरीश कुलकर्णी, हृषिकेश जोशी, कुशल बद्रिके यांच्यासोबत काम करायला मिळालं याचा आनंद वाटतोय. तानाजीसोबत यापूर्वी पण काम केलं आहे, त्यामुळे त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव हा भन्नाटच असतो. सहकलाकारापेक्षा मित्र या नात्याने आम्ही एकत्र काम करतो म्हणून रेश्मा आणि मच्या साकाराताना मजा आली.

‘कॅप्टन ऑफ दि शिप’ अनुप सरांच्या दिग्दर्शन कौशल्याविषयी सर्वजण भरभरुन बोलत आहेत आणि ते खरंच आहे. इतक्या साऱ्या कलाकारांना एकत्र घेऊन चित्रपटाची गोष्ट मांडणं सोपं नाही पण त्यांनी ते उत्तमरित्या केलं. त्यासाठी त्यांचे विशेष कौतुक व्हायला हवं. सिनेमाचं संगीत तर कमालीचं आहे. नकाश अजिज यांचं गाणं खूप भारी वाटलं. कोरिओग्राफर राहुल-संजीव यांच्यासोबतचा हा माझा तिसरा सिनेमा, त्यामुळे त्यांच्यासोबत पुन्हा काम करायला मिळालं. अशा बऱ्याच आनंदी, मजेशीर, समाधानकारक गोष्टी ‘भिरकीट’ने मला दिल्या.”



राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर भव्य चित्रपट निर्मिती


मुंबई : 

अलीकडच्या काळात मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती मोठया प्रमाणावर होताना दिसतेय आणि रसिकप्रेक्षकही त्याला मनापासून दाद देताना दिसताहेत. अशाच वेळी महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही इतिहासात मानाचं आणि अभिमानाचं स्थान असलेल्या लोककल्याणकारी राजे राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित भव्य मराठी चित्रपटाच्या निर्मितीची घोषणा करण्यात आली आहे. चित्रपटाचे नाव आहे... 'शाहू छत्रपती'.

ब्रिटीश राजसत्तेच्या काळात रयतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी लढणारे, सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता दलित व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांचे जीवनकार्य चित्रपटाद्वारे जनसामान्यांपर्यत पोहचविण्याचा होणारा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे.

डॉ.जितेंद्र आव्हाड प्रस्तुतकर्ता असलेल्या 'शाहू छत्रपती' चित्रपटाची कथा ज्येष्ठ लेखक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या अनेक दशकांच्या संशोधन कार्यावर आधारित असून या चित्रपटाचे दिग्दर्शन युवा दिग्दर्शक वरुण सुखराज करणार आहेत. विद्रोह फिल्म्स या चित्रनिर्मिती संस्थेतर्फे या भव्य चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे.

यंदाचे वर्ष हे राजर्षी शाहू महाराजांचे स्मृतीशताब्दी वर्ष आहे. राजर्षी शाहूंनी त्यांच्या कारकिर्दीत काळाच्या पुढे असणारे जनकल्याणाचे असंख्य निर्णय घेतले आणि राबवले. शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, स्त्रिया, दलित अशा समाजघटकांसाठी राजर्षी शाहूंनी भरीव कार्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, प्रबोधनकार ठाकरे अशा अग्रगण्य समाजसुधारकांना राजर्षी शाहूंनी सर्वार्थाने सहाय्य केले. राजर्षी शाहूंचा गौरवशाली इतिहास लवकरच मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना या भव्य चरित्रपटाच्या माध्यमातून पहायला मिळणार आहे. 



विशेष म्हणजे हा चित्रपट मराठीसोबत इतर भाषांमध्येही प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. इतर ऐतिहासिक चरित्रपटांहून वेगळ्या कालखंडात घडणारी ही कथा असून ह्याद्वारे शाहू महाराजांच्या काळातील महाराष्ट्र मोठ्या पडद्यावर पहायची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. या चित्रपटाच्या  अधिक तपशीलाबाबत लवकरच घोषणा केली जाणार आहे.


राजर्षी शाहू महाराजांचा इतिहास 'शाहू छत्रपती' या बिगबजेट चित्रपटाच्या माध्यमातून विविध भाषांतून देश आणि जगभरातील लोकांना पहायला मिळणे केवळ मराठी चित्रपटसृष्टीसाठीच नव्हे तर प्रत्येक मराठी जनासाठी आत्यंतिक आनंदाची गोष्ट आहे. 

अशोक सराफ यांची 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर हजेरी उपस्थिती!



मुंबई : 

मनोरंजनसृष्टीतील अथांग सागरामध्ये अभिनयाचं स्वतंत्र बेट असणारे विनोदाचे बादशाह अशोक सराफ ज्ञान आणि मनोरंजनाच्या अद्भुत खेळात म्हणजे  'कोण होणार करोडपती'च्या मंचावर सहभागी होणार आहेत. दोन आठवड्यांपूर्वी  सोनी मराठी वाहिनीवर 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाचं नवं पर्व सुरू झालं. पहिल्या आठवड्यात ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा आणि काजोल विशेष पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तर दुसऱ्या आठवड्यात ज्येष्ठ लेखिका आणि समाजसेविका पद्मश्री सुधा मूर्ती उपस्थित होत्या. 'कोण होणार करोडपती'च्या आगामी भागात मराठी मनोरंजनसृष्टी ज्यांना 'अशोक मामा' म्हणून ओळखते असं अभिनयाचं स्वतंत्र बेट असणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ उपस्थित राहणार आहेत. त्यांना या मंचावरून ऐकणं ही प्रेक्षकांसाठी निश्चितच पर्वणी ठरणार आहे. 

अशोक मामांनी वयाची पंच्याहत्तरी नुकतीच पूर्ण केली असली, तरी त्यांचा या वयातला उत्साह दांडगा आहे. अशोक सराफ यांच्याबरोबर त्यांचे धाकटे बंधू सुभाष सराफ आणि पत्नी निवेदिता सराफ यांच्या भगिनी डॉ. मिनल परांजपे हेही सहभागी होणार आहेत.  

यशाचं शिखर गाठूनही पाय कायम जमिनीवर असणाऱ्या अशोक मामांनी  विनोदी भूमिकांबरोबरच  गंभीर भूमिकासुद्धा चोख  बजावल्या आहेत आणि म्हणूनच काही मोजक्या चतुरस्र अभिनेत्यांमध्ये त्यांची गणना होते. सिनेसृष्टीतल्या त्यांच्या कारकिर्दीमधल्या वैविध्यपूर्ण भूमिका त्यांनी जबरदस्त अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनावर कोरून ठेवल्या आहेत. अभिनयातल्या अशा तळपणाऱ्या सूर्याच्या येण्यानी 'कोण होणार करोडपती'चा मंच उजळून निघणार आहे.

'कोण होणार करोडपती'च्या याही पर्वात दर आठवड्यातल्या शनिवारच्या भागात विशेष पाहुणे सहभागी  होणार आहेत. समाजाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींची भेट आणि त्यांचे कार्य या विशेष भागांतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. 

पंढरपूरजवळील एचआयव्हीग्रस्त मुलांसाठी काम करणार्‍या आणि त्यांना आधार देणार्‍या प्रभा-हिरा प्रतिष्ठान संचलित 'पालवी' या सेवाभावी संस्थेसाठी अशोक सराफ 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळणार आहेत.

अशोक सराफ हे नाव घेतल्यानंतर 'अशी ही बनवाबनवी', 'धुमधडाका', 'नवरा माझा नवसाचा' असे अनेक हीट चित्रपट आपल्या डोळ्यांसमोर येतात. त्यांचा 'ययाती'पासून सुरू झालेला नाट्यसृष्टीतला प्रवास आत्ताच्या 'व्हॅक्युम क्लिनर'पर्यंत अव्याहतपणे सुरू आहे. अशोक मामांना चित्रपटसृष्टीत पदार्पण करून ५० वर्षं पूर्ण झाली आहेत. 

'कोण होणार करोडपती'च्या मंचावर सिनेनाट्यसृष्टीतल्याअनेक आठवणींना उजाळा देण्यात आला.  मनोरंजनसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी अशोक मामा बँकेत नोकरी करायचे आणि एकीकडे नाटकाचे दौरे करायचे. त्या वेळी खोटं मेडिकल सर्टिफिकेट देऊन बँकेत घेतलेल्या सुट्ट्यांचे मजेदार किस्से मामा आणि त्यांचे बंधू यांनी या वेळी सांगितले. 

लहानपणी प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्याबरोबर नाटकात काम केल्याच्या आणि त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळल्याच्या आठवणीही मामांनी सांगितल्या. 

'ययाती आणि देवयानी' ह्या नाटकातून त्यांनी रंगमंचावर पदार्पण केलं, 'प्रेमा तुझा रंग कसा' या नाटकातला पँटची नाडी सुटल्याचा गमतीशीर किस्सा, 'भस्म' चित्रपटातल्या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत, संगीताची आवड; अशा अनेक आठवणी आणि किस्से यांमुळे 'कोण होणार करोडपती'चा हा विशेष भाग  अधिकच रंगतदार होणार आहे.

अशोक सराफ यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्याला आणि दिलदार माणसाला  'कोण होणार करोडपती'च्या मंचावर पाहणं, ही प्रेक्षकांसाठी अभिमानास्पद आणि आनंददायी गोष्ट असणार आहे. पाहायला विसरू नका - 'कोण होणार करोडपती' - विशेष भाग, 25 जून, शनिवारी रात्री 9 वा. आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

सोनू निगमच्या हस्ते रितू जोहरीचा 'द इमॉर्टल्स' अल्बम लाँच



मुंबई :

संगीतकार, गीतकार आणि गायक रवींद्र जैन यांनी त्यांच्या गझलींनी चाहत्यांच्या मनावर राज्य केले. चोर मचाये शोर (1974), गीत गाता चल (1975), चितचोर (1976), आंखियों के झारोखो से (१९७८), राम तेरी गंगा मैली (१९८५), मेहंदी (१९९१), विवाह (२०१६) यांसारख्या चित्रपटांमधील त्यांचे संगीत अविश्वसनीय आहे. तसेच रामायण (१९८७), श्री कृष्ण (१९९३) इत्यादी टीव्ही शोमधील त्यांच्या गाण्यांनी सर्व वयोगटातील श्रोत्यांच्या हृदयात विशेष स्थान मिळवले. या प्रतिभावान कलाकाराचे ९ ऑक्टोबर २०१५ रोजी निधन झाले आणि संगीत विश्वातील एक मौल्यवान हिरा हरपला. परंतु त्यांच्या चाहत्यांना सांगण्यात आनंद होत आहे की आगामी अल्बममध्ये रवींद्र जैन यांनी लिहिलेल्या गझल 'द इमॉर्टल्स' या म्युझिक अल्बमद्वारे प्रदर्शित करण्यात येणार आहेत, त्यातील सर्व गझल रवींद्र जैन यांनी लिहिल्या आहेत. तर पात्र आणि प्रतिभावान गायिका रितू जोहरी हिने आपल्या सुरेल आवाजाने या गझलांना सजवले आहे.

'द इमॉर्टल्स'मध्ये पाच गझल आहेत, ज्यांचे गीत 'बेबसी दे गया', 'उमर भर इम्तिहान लिती है', 'अब जो जिंदगी है', 'झूठे को भी वो हाल मेरा' आणि 'जिन पर गझल कहें' आहेत. रितूने सर्व गझल गायल्या असून या गझलींना संगीत शिव राजोरिया यांनी दिले आहे.

याबद्दल बोलताना रितू जोहरी म्हणाल्या, 'संगीतात डॉक्टरेट शिकत असताना मला दादूचा सहवास मिळाला आणि त्यांच्या कुटुंबाचा एक भाग बनण्याची संधी मिळाली. त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने माझ्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ज्यासाठी मी त्यांची सदैव ऋणी राहीन."

रितू जोहरी अधिकृत यूट्यूबवर 'बेबसी दे गया'चा म्युझिक व्हिडिओ रिलीज झाला आहे. या अल्बममध्ये रितू जोहरी गझल गाताना आणि रवींद्र जैन यांची पत्नी दिव्या जैन जुनी छायाचित्रे पाहताना आपल्या मृत पतीची आठवण काढत आहे. रितू जोहरी याबद्दल म्हणाल्या की, दिव्या जैन ही तिच्या पतीसारखीच एक सुंदर व्यक्ती आहे. 

या म्युझिक व्हिडीओमधला तिचा अभिनय प्रेमाने भरलेला आहे. या म्युझिक व्हिडीओमधली तिची भूमिका अशी होती की तिला त्यात सहभागी होण्याची संधी नाकारता आली नाही. मला खात्री आहे की गझल चित्रित करताना जुनी चित्रे पाहून ती भारावून गेली असेल. या खास गाण्याचा एक भाग असल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!

रवींद्र जैन यांनी लिहिलेल्या या गाण्याचे बोल नक्कीच श्रोत्यांच्या हृदयाला भिडतील असा विश्वासही रितू जोहरीला आहे. रितू जोहरीचा जन्म आग्रा येथील संगीत घराण्यात झाला आहे. त्यांचे आजोबा कै. पं. सुनेहरीलाल शर्मा हे आग्रा येथील प्रसिद्ध व्यक्ती आणि प्रसिद्ध संगीतकार होते. रितूने दिवंगत उस्ताद शब्बीर अहमद खान यांच्याकडून आग्रा घराण्याच्या गायनाचे प्रशिक्षण घेतले. यासोबतच त्यांनी त्यांची आई मिथलेश जोहरी यांच्याकडूनही गझल गायनाचे शिक्षण घेतले. रितूचे वडील एसएस जोहरी हे निवृत्त बँक व्यवस्थापक आहेत, त्यांच्याकडून तिला खूप प्रोत्साहन आणि पाठिंबा मिळाला आहे.

ती वयाच्या १० व्या वर्षापासून परफॉर्म करत आहे. तिने आग्रा येथील नाद साधना, उस्ताद फयाज खान संमेलन, भारतीय संघ, विष्णू दिगंबर संमेलन, अजय खन्ना स्मृती महोत्सव, बसंत महोत्सव, ताज महोत्सव, मल्हार रंग, श्री दोरीलाल स्मृती गझल येथे सादरीकरण केले आहे. तिने भारतातील अनेक भागांमध्ये कार्यक्रमही केले आहेत.
तिने झाशी महोत्सव, तानसेन महोत्सव, वृंदावन, मथुरा रिफायनरी, बाजू बावरा संगीत महोत्सव (मथुरा), खुजराव महोत्सव, शरद महोत्सव, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ (नवी दिल्ली), स्वामी हरिदास संगीत संमेलन इत्यादींमध्ये सहभाग घेतला आहे. त्यांनी भजनही केले आहे. संध्या कॉलेज, फिरोजाबाद, ऋषिकेश महोत्सव इत्यादींमध्ये दाऊ दयाल पीजीमध्ये भाग घेतला आणि जयपूर, रायपूर, नागपूर, हाथरस, अलीगढ, मेरठ इत्यादी शहरांमध्ये तसेच टोरंटो, मॉन्ट्रियल, व्हँकुव्हर, एडमंटन, कॅल्गरी इत्यादी शहरांमध्ये गाण्याची संधी मिळाली.


मुत्सद्दी म्हणून गझल करण्यासाठी त्या ICCR (इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स) च्या माध्यमातून जर्मनीलाही गेल्या. याशिवाय त्यांनी मुंबईतील प्रसिद्ध गझल जोडी भूपेंद्र आणि मितालीसोबतही गाणी सादर केली आहेत.

२०१० मध्ये, प्रसिद्ध गझल गायक गुलाम अलीसोबत रितूचा पहिला अल्बम बेगानी व्हिजन कॉर्पोरेशनने प्रसिद्ध केला. नुकताच त्यांचा रूपकुमार राठोडसोबतचा 'परसेप्शन' हा गझल अल्बमही रिलीज झाला. रितू जोहरी ही ऑल इंडिया रेडिओ, आग्राची बी.ए. उच्च दर्जाची कलाकार आहे. ती नियमितपणे दूरदर्शन आणि A.I.R वर कार्यक्रम करते. त्यांना संगीत शिरोमणी, संगीत सुमन आणि संगीत कल्प या पदव्या देण्यात आल्या आहेत.

येत्या रविवारी प्रवाह पिक्चरवर पाहायला मिळणार सुपरहिट ‘झिम्मा’ सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

मुंबई : 

‘पावनखिंड’ सिनेमाच्या दमदार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरनंतर प्रवाह पिक्चर भेटीला घेऊन येणार आहे आणखी एक सुपरहिट सिनेमा ‘झिम्मा’. संसाराच्या रहाटगाड्यातून बायकांना स्वत:साठी असे खूप कमी क्षण मिळतात. घरच्या आणि ऑफिसच्या जबाबदाऱ्या पार पाडताना स्वत:साठी जगायचच राहून जातं. मात्र अश्यात एखादी छानशी ट्रीप प्लॅन होते आणि आयुष्यच बदलून जातं. अश्याच एका भन्नाट ट्रीपमध्ये आयुष्य नव्याने गवसलेल्या सात स्त्रियांची गोष्ट झिम्मा सिनेमातून पाहायला मिळणार आहे. या सिनेमाचं वेगळेपण म्हणजे यातली भन्नाट पात्र. प्रत्येकालाच आपली आई, आपली मुलगी, आपली पत्नी, आपली आजी आणि आपली मैत्रीण भेटल्याचा आभास नक्कीच होईल. सिनेमातल्या पात्रांसोबत घरबसल्या प्रेक्षकांनाही एका छान सहलीचा आनंद लुटता येईल.

सोनाली कुलकर्णी, निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले या अभिनेत्रींनी या सिनेमात आपल्या जबरदस्त अभिनयाने सप्तरंग भरले आहेत. तर सिद्धार्थ चांदेकरचा हजरजबाबीपणा सिनेमात वेगळीच रंगत आणतो. हेमंत ढोमेने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

आयुष्य भरभरुन जगायला शिकवणाऱ्या झिम्मा सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिनज प्रीमियर नक्की पहा येत्या रविवारी म्हणजेच २६ जूनला दुपारी १ वाजता तुमच्या टीव्हीच्या पडद्यावर म्हणजेच प्रवाह पिक्चरवर. चला पिक्चरला जाऊया.


महामिनिस्टरचा महाअंतिम सोहळा : अख्खा महाराष्ट्र पाहणार ११ लाखांची पैठणी



मुंबई : 

महिला वर्गात लोकप्रिय असलेला झी मराठीवरील 'होम मिनिस्टर' हा कार्यक्रम १८ वर्षाहून ही जास्त काळ महाराष्ट्रातील, देशातील तमाम वहिनींचा सन्मान करत आला आहे. या कार्यक्रमाचं महामिनिस्टर हे पर्व तमाम वहिनींच्या भेटीस आलं आणि प्रचंड गाजलं. ११ लाखांच्या पैठणीसाठी महाराष्ट्रातील १० शहरांमध्ये चुरस रंगली. अहमदनगरच्या अपेक्षा पवार, पनवेलच्या सोनाली पाटील, ठाण्याच्या सुवर्ण पेंढारे, नाशिकच्या डॉ. रुपाली पाखरे, औरंगाबादच्या शरयू पाटील, रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणे, पुण्याच्या कावेरी मत्रे, कोल्हापूरच्या सलोनी येवलेकर, सोलापूरच्या सपना रंगदाळ, नागपूरच्या निवेदिता गुरुभेले या वहिनींनी त्यांच्या शहरात १.२५ लाखाच्या पैठणीचा मान मिळवला आणि आता या १० जणींमध्ये येत्या रविवारी प्रसारित होणाऱ्या महाअंतिम सोहळ्यात ११ लाखांच्या पैठणीसाठी जबरदस्त सामना रंगणार आहे.

या पर्वाच्या सुरुवातीपासून ११ लाखांच्या पैठणीची चर्चा सर्वत्र सुरु होती. सोन्याची जर आणि हिरे जडवलेली ही पैठणी पाहण्याचा क्षण आता जवळ येऊन ठेपला आहे. कुठलं शहर या पैठणीचा मान पटकावणार? महाराष्ट्राच्या महापैठणीची मानकरी ठरणार कोणती नगरी? हे प्रेक्षकांना रविवारी महाअंतिम सोहळ्यात पाहायला मिळेल. 

या महाअंतिम सोहळ्यानंतर सोमवार २७ जून पासून होम मिनिस्टरच 'खेळ सख्यांचा चारचौघींचा' हे नवीन पर्व प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या पर्वात वहिनी त्यांच्या आवडत्या ग्रुप म्हणजेच महिला मंडळासोबत सहभागी होऊ शकतात.


सालिह

**स्वालिया** (Swaliya / Swaliha) या नावाचा मुख्य अर्थ **"पुण्यवान", "सदाचारी", "धार्मिक" किंवा "चांगल्या ...