पत्रपल्लव
------------------------------ ----------------
योग करणे म्हणजे फक्त योगासने करणे असा अनेकांचा गैरसमज आहे. योगासने हा योगसाधनेचा केवळ एक भाग आहे. योग ही एक जीवनशैली आहे. योग म्हणजे आत्मिक आणि शारीरिक शुद्धीकरण असे म्हणता येईल. कोरोनाच्या काळानंतर अख्खं जग आरोग्याबाबत जागृत झालं आहे. अनेकजण व्यायामाच्या वेगळ्या पद्धती अवलंबत आहेत. त्यापैकी एक आहे 'योग'. 'योग'कडे कल असणाऱ्यांची संख्या अफाट आहे. देश - विदेशातून अनेक लोक 'योग' शिकण्यासाठी भारतात येतात. 'योग शिकण्याचे महत्त्वच इतके सुंदर आणि परिणामकारक आहे की, ज्याला योग समजला, तो जीवनात आनंदी राहणारा व्यक्ती असेल', असे म्हणायला हरकत नाही.
'शरीर आणि मन' या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हजारो वर्षांपूर्वी ग्रीक लोकांनी 'निरोगी शरिरात निरोगी मनाचा वास' (A sound mind as a beured both) असा सिद्धांत मांडला होता. या सिद्धांतावर यांच्या शिक्षणाची समग्र पद्धती आधारलेली होती. तर योग आणि आसने आपल्याला सुदृढ ठेवण्यास परिणामकारक ठरतात.
शरिराच्या अंतर-बाह्य भागांना निरोगी ठेवण्याची क्रिया म्हणजे 'योगासने'. जोपर्यंत शरिराचे आंतर-बाह्य भाग निरोगी नसतात, तोपर्यंत कोणतेही काम आपण चांगल्या प्रकारे करू शकत नाही. कारण 'शरीर आणि मन' हे एकमेकांशी जोडलं गेलं आहे. एकाला दुखावलं तर दुसरा चांगला राहू शकणार नाही. म्हणूनच जीवनात योगासनांचे महत्त्व खूप आहे. आरोग्याच्याहीने योगासनांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
*अनेकविध आजार, रोगांवर उपाय काय?*
अनेक वर्षापासून माणूस धकाधकीच्या जीवनात आणि कलहात वावरतो आहे. माणूस म्हणून जगताना त्याला अनेक आव्हाने आणि संकटांना तोंड द्यावे लागत आहे. परिणामी त्याचे आपल्या शरिरावर वाईट परिणाम पाहायला मिळत आहेत. आज आपण स्वतःला आधुनिक व सुसंस्कृत समजतो. परंतु, असं मुळीच समजू नका. अहो, झोपेच्या गोळ्यांशिवाय रात्री आपण झोपू शकत नाही. संधिवाताचा त्रास, युरिक अॅसिड वाढणे, डोकेदुखी, अन्न पचत नाही, मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी असे आपले काही ना काही दुखत असते. आणि त्यासाठी महागडी औषधे, अँटिबायोटिक्स आणि टॉनिक घ्यावेच लागते. बरं, इतके करूनही ते मुळापासून पूर्णपणे बरे होत नाही. अविरतपणे ही औषधे आपणांस खावी लागतातच. घड्याळाचे काटे जसे धावतात, असे आयुष्य धावत आहे. अनेक रोग, आजार होत आहेत. तर याला आपण कसे रोखू शकतो? आपल्या शारीरिक आणि दुखण्यांवर आणि मानसिक यातनांवर उपाय योगासने आहेत, असे म्हणायला हरकत नाही.
*योग म्हणजे काय?*
'युज' या संस्कृत शब्दापासून 'योग' हा शब्द रूढ आला आहे. योग म्हणजे संयोग होय. आत्मा आाणि परमात्मा यांचा संयोग योगाद्वारे होते. ऋषीमुनींनी शरीर, मन आणि आत्म्याच्या शुद्धीकरणासाठी 'योग'चे आठ अंग सुचवले आहेत. यास 'अष्टांग योग' असे म्हणतात. योगाची आठ अंगे खालीलप्रमाणे आहेत.
१ ) यम : 'यम' म्हणजे 'संयम'. एकूण यम पाच आहेत, ते पुढील प्रमाणे असे -
अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह.
*आपल्या उक्तीने, कृतीने किंवा मनाने कोणत्याही प्राणिमात्राला उपद्रव होणार नाही याची खबरदारी घेणे म्हणजे 'अहिंसा' होय.
* जे डोळ्यांनी पाहिले, स्वत:च्या कानांनी ऐकलं, तसे सादरीकरण करणे म्हणजे 'सत्य' होय.
*मनाने किंवा प्रत्यक्षात चोरी न करणे तसेच संपत्तीचा मोह न धरणे म्हणजे 'अस्तेय' होय.
* सर्व इंद्रियांवर ताबा मिळवणे म्हणजे 'ब्रह्मचर्य'
* सर्व उपभोगांचे त्याग म्हणजे 'अपरिग्रह' होय.
२ ) नियम : नियमदेखील पाच आहेत. ते पुढीलप्रमाणे - शौच, संतोष, तप, स्वाध्याय (अध्ययन) आणि ईश्वरप्रणिधान (ईश्वराची आराधना, उपासना).
३) आसन : 'स्थिरमुखमासनम्'.
आसन केल्याने नाडीशुद्धी होते, आरोग्य सुधारते. शरीर आणि मनाला ऊर्जा प्राप्त होते. आसने अगणित आहेत. त्यातील काही सोप्या आसनांद्वारे आपण आपल्या निरोगी शरीर मिळवू शकतो.
४) प्राणायाम : प्राणायाम' या शब्दाचा अर्थ 'प्राणावर नियंत्रण असा होतो. शरीराच्या बाह्य स्वच्छतेसाठी गरज असते, त्याप्रमाणे मनाच्या शुद्धीसाठी प्राणायामाची आवश्यकता असते.
५) प्रत्याहार : प्रत्याहारामुळे साधकाचे अचपळ मन शांत होते. चंचल इंद्रिये शांत स्थिर होतात.
६ ) धारणा : स्वतःचे शुद्ध मन एकाग्र करणे याला 'धारणा' असे म्हणतात.
७ ) ध्यान : ध्यानाद्वारे मनातील राजस व तामस या दोषांचा नाश होतो. मन एकाग्र आणि शांत होते.
८) समाधी : साधकाने चित्ताची एकाग्रता वाढवली पाहिजे; कारण ध्यानाची परमसीमा म्हणजेच 'समाधी' होय. आपले अनेक ऋषी पूर्वी समाधी अवस्थेत राहायचे.
आत्मिक आणि शारीरिक उन्नतीसाठी हे पाच अंग खूप महत्त्वाचे आहेत. याप्रकारे आसने म्हणजे अष्टांग योगाचे फक्त एक अंग आहे. पण याचे पालन करणेही तितकेच कठीण आहे. यापैकी आपण फक्त आसने करतो. यामध्ये योगासने, प्राणायाम, सूर्यनमस्कार, आहार अशा अनेकविध अंगे महत्त्वाची आहेत. योगासने केल्याने शरीर निरोगी राहण्यास मदत होते. चपळता वाढते, ऊर्जा-उत्साह वाढतो. त्याशिवाय शरीर लवचिक बनते.
*योगासनांचे फायदे काय?*
आपल्याला योगासने कशी करावीत आणि त्याचे फायदे काय आहेत, हे माहिती असायलाचं हवे. भविष्यकाळात विविध रोग, आजारांपासून बचावासाठी आसने फलदायी ठरतील, असे म्हणायला हरकत नाही.
आपल्या शरिरातील घाण वेगवेगळ्या मार्गांनी बाहेर पडत असतात. त्यात गुदद्वार नाकपुड्या, कान, डोळे, तोंड, जननेंद्रिये आणि त्वचेद्वारे आपल्या शरिरातील अस्वच्छता बाहेर पडते. हे घटक जर शरिरातून बाहेर पडल्या नाहीत तर अनेक प्रकारचे रोग जडतात. शरीराचे संतुलन बिघडते. आपले शरीराचे संतुलना आणि आरोग्य चांगले ठेवण्यासाठी योगासने खूप महत्त्वाची आहेत.
योगासने विविध प्रकारात विभाजन करण्यात आले आहे.
१) बैठी आसने
२) पोटावर झोपून करण्याची आसने
३) पाठीवर झोपून करण्याची आसने
४) गुडघ्यावरील आसने
५) हातावरील आसने
(६) उभे राहून करण्याची आसने
(७) शीर्षासने
यापैकी काही सोपी आसनेही तुम्हाला घरी बसून करता येईल.
(१) पद्मासन - दमा, झोप येत नाही अशांसाठी हे आसन उपयुक्त आहे. हे आसन सुरुवातीला १ मिनिटे करावे. नंतर सराव करून हळूहळू हे आसन जमेल. या आसनामुळे अंतस्त्रावी ग्रंथी कार्यक्षम बनतात. शरीरातील चरबी कमी होते.
(२) बद्ध पद्मासन - हे आसन केल्याने फुप्फुस, जठर, लिव्हर कार्यक्षम होतात. सांधेदुखी नाहीशी होते.
(३) पर्वतासन - या आसनांमुळे हातांचे स्नायू लवचिक आणि बळकट होतात. फुफ्फुसे, पोटाचे विकार होत नाहीत.
(४) लोलासन - या आसनामुळे जठरग्नी प्रदीप्त होतो. आतडी सशक्त होते. नाड्यांची अशुध्दी तसेच आतड्यांचे विकार आणि पोटात मुरडा येणं कमी होतं.
(५) कुक्कुटासन - आतड्यांना येणारी सूज यामुळे कमी होते. कफ, अपचन कमी होते.
(६) सिद्धासन - क्षय, दमा, हृदयरोग असे विकार बरे होण्यास मदत मिळतात.
(७) सिंहासन - तुम्हाला चिरतरुण, तेजस्वी दिसायचे आहे का, तर सिंहासन करा. स्मरणशक्तीसाठीही हे आसन उपयुक्त आहे. या आसनामध्ये जीभ ताणून बाहेर काढली जाते, त्यामुळे चेहऱ्याचे स्नायू ताणले जातात. त्यामुळे चेहरा सुंदर दिसतो.
(८) वीरासन - या आसनामुळे फुफ्फुसे पोट आणि पाठीच्या कण्याचे विकार नाहीसे होतात. या आसनामुळे हातांच्या स्नायूंना चांगला व्यायाम होतो.
(९) मंडूकासन - हे आसन करीत असताना शरीराचा आकार बेडकासारखा दिसतो. म्हणून याल 'मंडूकासन' म्हणतात. नितंब, पोटावरील मेद, मंड्यांवरील मेद कमी करण्यास मदत होते. या आसनामुळे पचनशक्ती सुधारते.
(१०) गोमुखासन - पायाचा संधिवात, मूळव्याधीची तक्रारही दूर होते. पाठीचे दुखणे, काखेतील दुखणे, मारलेली लचक बरे होण्यास मदत होते. लहान-लहान सांध्यांसाठी ही आसने उपयुक्त ठरतात.
(११) पश्चिमोत्तानासन - हे आसन सुरुवातीला काही सेकंद करावे. आसन जमल्यानंतर त्याची वेळ वाढवून ३० सेकंदापर्यंत नेऊ शकता. या आसनास 'उग्रासन' असे सुद्धा म्हणतात. हे आसन करताना खाली वाकताना पोट आत खेचले जाते. आसनामुळे पोटातील चरबी कमी होते. त्यामुळे पचनशक्ती सुधारते.
(१२) उत्तानपादासन - या आसनामुळे कमरेतील दुखणे कमी होते. दमा नियंत्रणात येतो.
(१३) जानुशिरासन - या आसनामुळे पोटांच्या स्नायूंचा व्यायाम होतो. त्यामुळे पचनशक्ती सुरळीत बनते. अपचनाच्या तक्रारी कमी होतात. बद्धकोष्ठता असणाऱ्यांनी हे आसन सुरुवातीला हळूहळू करावे. त्याशिवाय शरीरातील चरबीदेखील कमी होते. त्याचबरोबर, मूळव्याधीची समस्या कमी होण्यास मदत होते.
No comments:
Post a Comment