Tuesday, November 28, 2023

गरीब हेल्पर ते स्वतःच्या उद्योगाचे मालक - खडतर संघर्षाची कहाणीः उदय भोसले

आजचे उद्योजक उदय अण्णासाहेब भोसले हे एके काळी कोल्हापुरातील एका कारखान्यात पाणी भरणे, सफाई करणे अशी हलकी कामे करत होते. शाळा आणि घरची जबाबदारी पेलवत त्यांनी आयटीआय देखील पूर्ण केले. उदय भोसले हे इथेच थांबले नाहीत, तर स्वत:चा कारखाना काढण्याचे स्वप्नदेखील पूर्ण केले. आज कोल्हापुरातील जुने, जाणकार आणि नामवंत उद्योजकांपैकी ते एक आहेत. ते आयटीआय शिकत असताना ते दुसरीकडे कारखान्यात छोटी-मोठी कामेदेखील करत असत.

अगरबत्ती पॅकिंग, मूर्तींची विक्री

उदय नऊ वर्षाचे असताना वडिलांचा अपघाती मृत्यू झाला. परिस्थिती हलाखीची. पण त्यातूनच त्यांनी उभारी घेतली. आई सुमित्रा यांनी कष्टाची पराकाष्ठा करून आपल्या मुलांना वाढवले. उदय यांना सहा भावंडे. उदय यांनी बालपणापासूनच आपल्या कुटुंबीयांना घर चालवण्यासाठी मदत केली. अगरबत्ती पॅकिंग करण्याचे काम भोसले कुटुंबीयांनी हाती घेतले. यातून किरकोळ पैसे मिळायचे. तर उदय भोसले हे छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांच्या मूर्ती दुकानांमध्ये जाऊन विकायचे. एका मूर्तीमागे पाच रुपयांचा नफा होत असे. नंतर चहापूड विकण्याचाही व्यवसाय त्यांनी केला.

शिकत असताना कारखान्यात काम

उदय यांनी संजीवनी इंजिनिअर्स या कारखान्यामध्ये एकूण 10 वर्षे काम केले. ह्या काळात ते सगळी कामे शिकून तरबेज झाले. त्यांना  त्यावेळी बसचा प्रवास देखील परवडत नसे. सगळी ये-जा सायकलवरून सुरू होती. पुढे त्यांनी हेल्पर मशीनवर काम करता करता ड्रिल मशीनवर काम करायला सुरुवात केली. कारखान्याच्या मालकांचा विश्वास इतका होता की, कारखान्याची किल्लीच उदय यांच्याकडे देण्यात आली होती. पुढे हेल्पर ते लेथ मशीन कामगार आणि पुढे  कामगार ते उद्योजक असा परिपूर्ण प्रवास झाला.

1992 मध्ये 1600 रुपये पगार झाला होता, जेव्हा उदय यांनी नोकरी सोडली, पुढे, 1999 मध्ये त्यांनी स्वतःचा कारखाना उभा करण्याचा निश्चय केला. मग, संजीवनी इंजिनिअर्सच्या मालकांच्या सहकार्याने सुरुवातीला उद्यमनगर आणि नंतर  शिरोली एमआयडीसी येथे त्यांचा कारखाना स्थापित झाला.  विवाहाच्या आधी त्यांना 16000 रुपयांचे सेकंड हॅण्ड लेथ मशीन विकत घेतले. एका को-ऑपरेटिव्ह बँकेकडून 10 हजार रुपयांचे कर्ज मिळाले. वरील 6 हजार रुपयांची जमवाजमव करून लेथ मशीन खरेदी केले. उद्यमनगरात मित्राची जागा भाड्याने घेतली. त्यावेळी त्याला 300 रुपये भाडे होते.

धाडसाने सुरु केला कारखाना

नोकरी चालू असतानाचा स्वत:च्या लेथ मशीनवर कामावरून सायंकाळी आल्यानंतर प्रॅकिट्स केली. त्यावेळी उदय यांना आकांक्षा एंटरप्रायझेसचे मालक भाटवडेकर यांनी मदत केली. उदय यांनी आपल्या कारखान्याला काम मिळावे, अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली. उदय यांना भाटवडेकर यांनी सुरुवातीला पाठिंबा दिला.

एकाच कारखान्यात अनेक वर्षे नोकरी 

नोकरीत असताना मनुग्राफ कारखान्यासाठीची कामे केली जायची. मनुग्राफचे प्रॉडक्ट बनवण्यात उदय भोसले यांचा हातखंडा होता. चोख आणि परफेक्ट काम करणारे उदय भोसले यांची ओळख निर्माण झाली होती. त्यामुळे मनुग्राफच्या वरिष्ठांशी उदय भोसले यांचे चांगले संबंध होते. उदय यांनी त्यांना काम देण्यासंदर्भात विनंती केली. तेव्हा मनुग्राफने थेट उदय यांना व्हेंडर करून घेतले. तसे पाहता मोठे युनिट असल्याशिवाय कोणतीही कंपनी व्हेंडर करून घेत नाही. पण, उत्तम काम आणि विश्वास या जोरावर उदय सलग पाच वर्षे यांना मनुग्राफचे व्हेंडर होता आले.

अद्ययावत मुद्रण साहित्याची निर्मिती

मनुग्राफ यांचे मॅन्युफॅक्चरिंग प्रिंटिंग मशीन युनिट होते. त्यांचे सर्व मशीन जगभर निर्यात व्हायचे. मनूग्राफचे काम पूर्ण केल्यानंतर उदय यांची कल्याणी ब्रेक्स या पुण्याच्या कंपनीनीचे प्रवीण सोनार यांच्याशी ओळख होऊन ती दृढ झाली. त्या कंपनीसाठी 10 वर्षे काम केले. गाड्यांच्या ब्रेक्स लाईनर्सचे व्हिल्स एंडरचे सॅम्पल बनवून देण्याचे काम त्यांनी केले. मित्रांचा ग्रुप तयार करून मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू केलं.

आयटीआयचे विद्यार्थी कामासाठी येऊ लागले

आयटीआयचे विद्यार्थी अ‍ॅप्रेंटिससाठी उदय भोसले यांच्या कारखान्यात येऊ लागले. हे विद्यार्थी शिकता शिकता कामेही करू लागली. संध्याकाळी चारनंतर उदय यांनी ह्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आणि होतकरू बनवले. हेच विद्यार्थी पुढे जाऊन मोठ्या कंपन्यांचे मालक बनले आहेत. वारणा कोडोली येथील प्लामाग, कल्याणी ब्रेक्सचे व्हील सिलिंडरचे जॉब- एम एन एफ, एच एम, ई टी एल, टीएम सी, सी एम सी हे पाच प्रकार ते बनवायला लागले. मनुग्राफ सोबतच मेनन ऑटोमोबाईल यांचे प्रॉडक्ट्स त्यांनी बनवले. कोल्हापुरातील प्रसिद्ध घाटगे पाटील यांचे केटवॉल, चारेक प्रकारचे रोलर, मेनन ऑटोमोबाईलचे डॉयल पिन अशी अनेक उत्पादने उदय इंडस्ट्रीजमध्ये तयार व्हायला लागली. अनेक मोठ्या इंजिनिअरिंग कंपन्यांचे थर्ड पार्टी म्हणून उदय काम पाहू लागले. कारखान्यामध्ये जॉब वर्क्स व्हिल सिलेंडर्स, केट वॉल- त्याचेही अनेक भाग असतात तेही, व्हॉल गार्ड, स्पेशल बोर्ड्स अशा प्रकारचे अनेक सुटे भाग ते बनवायला लागले. विशेषतः अत्याधुनिक प्रकारची मुद्रणाची यंत्रसामुग्री करण्यासाठी प्रीटिंग मशीनचे प्रॉडक्ट तयार केले जायचे.

मित्रांसह काम

उदय भोसले यांनी मोठ्या प्रमाणावर निर्यात दर्जाची उत्पादने बनवायला आरंभ केल्यानंतर आणखी दोन कारखानदार मित्रांना सोबत घेऊन ते एकत्रित काम करायला लागले. आयटीआयचे विद्यार्थी आणि काही कामगार घेऊन उदय यांनी कामात सातत्य ठेवले. उत्पादने पुढे नेण्यासाठी सातत्याने काम करत राहणे अपरिहार्य होते. कामाची आवड, अफाट कष्ट करण्याची तयारी, कामातील कौशल्य, दर्जा राखण्याचा ध्यास याच्या जिवावर उदय भोसले हे पुढे जात राहिले. मध्यंतरी आलेली महामंदी आणि कोरानाची दोन वर्षे हा काळ भीषण होता. पण त्या बिकट काळातही कामाच्या दर्जावर टिकून राहून उदय भोसले यांनी आपला उद्योग सतत अग्रेसर ठेवला. आज कौटुंबिक जीवनात सुखी असलेले उदय भोसले आपल्या उद्योगात निव्वळ आपल्या कष्टाच्या बळावर ठामपणे उभे आहेत. 

No comments:

Post a Comment

सालिह

**स्वालिया** (Swaliya / Swaliha) या नावाचा मुख्य अर्थ **"पुण्यवान", "सदाचारी", "धार्मिक" किंवा "चांगल्या ...