अदिती टोपकर-कुलकर्णी सध्या कोल्हापुरात आपल्या सेंद्रीय खतांच्या उद्योगात आहेत. बी.कॉम, एलएलबीमधून शिक्षण घेतलेल्या अदिती यांनी गार्डनिंग अँड नर्सरी मॅनेजमेंट डिप्लोमाचे शिक्षण घेतले आहे. आता त्या एमबीए देखील करत आहेत. त्यांनी घेतलेल्या या शिक्षणाचा उपयोग त्यांच्या उद्योगातही करता आला. पुण्यात सीए करत असताना कोविड काळात त्या कोल्हापुरात परतल्या. त्याचवेळी सेंद्रीय खतांचे उत्पादन करण्याची कल्पना त्यांना सुचली. त्यांच्या आई शैला शरद टोपकर सायकॉलॉजिस्ट आहेत. त्याचबरोबर त्या शेतकऱ्यांसाठी रमाई एन्टरप्रायझेसच्या माध्यमातून खतांचे उत्पादन करायच्या. त्यामुळे अदिती यांना खतांचे प्राथमिक ज्ञान आपल्या आईकडून मिळाले.
'रमाई ऑरगॅनिक्स'ची अशी झाली उभारणी
सुरुवातीला शेतकऱ्यांना खते पुरवठा केला जायचा. पुढे 'हम करे सेंद्रिय क्रांती' हा टॅग घेऊन Urban Line सुरु केली. त्यामध्ये फुलझाडे आणि फळबागांसाठी सेंद्रीय खते उपलब्ध करून देण्यात आली. (Land Scaping, Home gardening) यासाठी त्यांनी वेबसाईट सुरू केली. सोशल मीडिया टीम, मार्केटिंग टीम उभारली. सेंद्रीय खतांचे दोन प्लँट उभारण्यात आले. एक हमीदवाडा (ता. कागल, जि. कोल्हापूर) आणि दुसरा जयसिंगपूर (कोल्हापूर)
साडे तीन वर्ष ते या सेंद्रीय शेणखत उद्योगात आहेत. त्यांनी गार्डनिंग अँड नर्सरी मॅनेजमेंट (शिवाजी विद्यापीठ) येथून प्रशिक्षण घेतले आहे. फर्टीलायझर कंट्रोल ऑर्डर अंतर्गत शासनाचे लायसन (उत्पादनाचे) त्यांच्याकडे आहे. त्यांची उद्योगातील टीम देखील कुशल आणि चांगली असल्यामुळे सगळ्या गोष्टी शक्य झाल्या. अदिती यांच्याकडे १० फिक्स कामगार आहेत. प्रोडक्शन टीममध्ये पाच ते सहा लोक काम करत आहेत. दोन ऑफिस स्टाफ, एक टेक्निकल एक्सपर्ट आणि एक मार्केटिंग हेड असे लोक आहेत. मोठे ऑर्डर असेल तर अधिकचे कामगार डेली बेसिसवर घेतले जातात.
सेंद्रीय खतांच्या उद्योगासाठी सुरुवातीला पाच ते सात लाखांची गुंतवणूक करण्यात आली. अनेक ठिकाणी झाडांसाठी, फळांसाठी, बागांसाठी उपयुक्त सेंद्रीय खते वापरली जातात. सर्व प्रोडक्ट प्युअर देशी गाईच्या शेण आणि गोमूत्र पासून बनवले जो. घरातील ओल्या कचऱ्याचे खतांमध्ये रुपांतरण करण्यासाठी डिकंपोझिंग कल्चर सुद्धा त्यांच्याकडे उपलब्ध आहेत.
टोपकर यांच्या या उद्योगात एकूण सात प्रकारची उत्पादने आहेत. यामध्ये लिक्विड स्वरूपात ४ आहेत. गार्डन मॅन्युअर, enriched वर्मी कंपोस्ट आणि पॉट मिक्स असे इतर ३ उत्पादने आहेत. टोपकर यांची काही प्रसिद्ध उत्पादने आहेत. यामध्ये जीवामृत लिक्विड टॉनिक, दशपर्णी अर्क, बायो ॲक्टिव्ह यांचा समावेश आहे.
जीवामृत -जीवामृत लिक्विड टॉनिकला चांगली मागणी आहे. झाडांच्या संपूर्ण वाढीसाठी हे वापरतात. जीवामृत हे १५ ते १८ महिने कालावधीपर्यंत टिकतात. यामध्ये गोमूत्र, काळा गुळ वापरले जाते.
दशपर्णी अर्क- १० वनस्पतींपासून दशपर्णी अर्कहा बनवला जातो. ज्याचा उपयोग किडनाशक म्हणून केला जातो. हे लिक्विड दुर्मीळ उत्पादन आहे. झाडांना, प्राण्यांना यापासून कोणतीही हानी नाही. शिवाय घरातल्या मुलांना सुद्धा यापासून कोणतेही नुकसान नाही. गुलाब, जास्वंद झाडांसाठी बुरशी लागू नये म्हणून हे वापरले जाते.
बायो ॲक्टिव्ह- झाडांचे फळे उत्तम येण्यासाठी. बियांचे जर्मिनेशन पूर्ण होण्यासाठी वापर होतो. या प्रोडक्टलाही अधिक मागणी आहे.
ही खते तयार केली गेली की, ती लॅब टेस्टिंगसाठी पाठवले जातात. खतामध्ये एनपीकेचे (नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश)प्रमाण किती आहे हे देखील तपासले जाते.
कोल्हापूर-गोवा येथे या उत्पादनांना खूप मागणी
कोल्हापूर-गोवा येथे या उत्पादनांना खूप मागणी आहे. ही उत्पादने ॲमेझॉनवर देखील उपलब्ध असल्यामुळे भारतात सगळीकडे वितरण होतं. पुण्यात गिरमे फार्म, मगरपट्टा सिटी गार्डन, जगताप नर्सरी, कोल्हापुरातील शिवाजी युनिव्हर्सिटीला देखील खते पुरवली गेली आहेत. शिवाय सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याला सुद्धा खतांचा पुरवठा केला गेलाय. अनेक इंडस्ट्रीजना हा पुरवठा केला जातो. गोव्यातील २० ते ३० नर्सरीत खते पुरवली जातात. यातून मिळणारे वार्षिक उत्पन्न २५ ते ५० लाखापर्यंत आहे.
गार्डनचे हेल्थ चेकअप केलं जातं
गार्डन्स मेंटेनन्स अंतर्गत लँडस्केपिंगसाठी सर्व प्रकारच्या गोष्टींचा पुरवठा केला जातो. यामध्ये निश्चित स्थळी भेट दिली जाते. त्या-त्या ठिकाणी गार्डनचे हेल्थ चेकअप केलं जातं. त्यामध्ये मातीचे परीक्षण केलं जातं, बुरशी आहे का, याची तपासणी केली जाते, झाडांची परिस्थिती पाहून त्यांना खते आणि इतर संबंधित गोष्टी पुरवल्या जातात.
गार्डन अंडर वन रूफ संकल्पना
गार्डन अंडर वन रूफ संकल्पना हा टोपकर यांचा आगामी प्रोजेक्ट आहे. यामध्ये ॲग्री मॉल किंवा ॲग्री शॉपी सुरु केली जाणार असून त्यामध्ये झाडे, खुरपे, अवजारे, रोपे, कुंड्या मिळणार आहेत. शिवाय सेंद्रीय भाज्यांचा प्रोजेक्ट सुरू केला जाणार आहे. त्याचबरोबर बुक कॅफे आणि गार्डन शॉपी असा एक प्लान्ट बेस्ड कॅफे असणार आहे. सध्या सांगली जत येथे सेंद्रीय आंबा शेतीसाठी काम सुरू आहे. एप्रिल मे च्या शेवटी ही लागवड केली जाणार आहे.
जास्तीत जास्त उत्पन्न मिळण्यासाठी भरमसाठ रसायनांचा वापर केला जातो. त्यामुळे आज आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या उद्भवल्या आहेत. त्यामुळे सेंद्रिय खत वापरणं किती गरजेचे आहे, हे भविष्याच्या दृष्टीने आणि आरोग्याच्या दृष्टीने हे समोर येतं.






%20(1).jpg)


