Sunday, December 31, 2023

ब्रिटिश गुप्तहेर नूरची चित्तथरारक गोष्ट

- ऋतुपर्ण

मूळ भारतीय वंशाची असलेली ब्रिटिश गुप्तहेर नूर इनायत खान, हिची एक बुद्धिमान, चतुर, सुंदर गुप्तहेर  म्हणून ओळख होती. नूरच्या वडिलांचे नाव इनायत खान, जे एक भारतीय होते तर आई ओरा बेकर अमेरिकन होती. इनायत खान हे टिपू सुलतानचे पणतू होते. इनायतचा जन्म 24 जानेवारी 1914 रोजी झाला होता. तिने दुसर्‍या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश सैन्यातून मित्र राष्ट्रांसाठी हेरगिरी केली होती. एक भारतीय राजकुमारी ही ब्रिटनची ‘स्पेशल सिक्रेट एजंट’ म्हणून नाझींविरोधात लढली. गुप्तहेर म्हणून तिची  साधीसुधी ओळख नव्हती, तर प्राणांची बाजी लावून दुसर्‍या महायुद्धाच्या काळात हेरगिरी करण्यासाठी तिला फ्रान्समध्ये पाठवण्यात आले होते.  तिच्या मृत्यूनंतर अनेक दशकांनंतरही गुप्तहेरांच्या जगात एका तिला साहसी वीरांगनेचा दर्जा का दिला जातो? हे तिच्या साहसकथा  वाचताना कळते. तिचे वडील इनायत खान हेे सूफी उपदेशक होते.सूफी तत्त्वज्ञानाचा प्रसार व्हावा म्हणून नूर हिनेही हा वारसा पुढे चालवण्याचा प्रयत्न केला. खान परिवार आधी रशियाला गेला. नंतर ब्रिटनला, मग फ्रान्सला! नूर एक बुद्धिमान तरुणी होती. ती फ्रेंच भाषा बोलू शकत होती. याशिवायही अनेक भाषा तिला अवगत होत्या शिवाय पियानो ती छान वाजवायची. पियानोच्या सुरांवर सूफी संगीताचा ती प्रसार करायची. जेव्हा दुसरे महायुद्ध सुरू झाले तेव्हा ती केवळ 25 वर्षांची होती. पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीला सर्वजण इंग्लंडला गेले. नंतर 1920 मध्ये पॅरिसला गेले. 1927 मध्ये मध्ये भारत यात्रेच्या दरम्यान तिच्या वडिलांचा मृत्यू  झाला. त्यावेळी ती 13 वर्षांची होती. घरातील कर्ता पुरुष गेल्याने सर्व जबाबदारी नूरवर आली. वयाच्या 26 व्या वर्षापर्यंत नूर आपल्या लहान भावा- बहिणींसोबत राहिली.
नूर इनायतवर पुस्तक लिहिणारी श्रावणी बसू यांच्या ‘द स्पाय प्रिन्सेस : द लाईफ ऑफ नूर इनायत खान’ पुस्तकात नूरचे वर्णन असे करण्यात आले आहे, ‘नूर खूप शांत स्वभावाची होती. तिला वाचन- लिहिण्याची आवड होती. तिला संगीतदेखील आवडत असे. ती पियानोसह वीणावादन देखील करत असे. वयाच्या 25 व्या वर्षी तिने आपले पहिले पुस्तक छापले होते. ती बुद्धाच्या जातक कथांनी प्रेरित होऊन तिने मुलांसाठी कथांचे पुस्तक छापले होते. ती अनेक मासिकांमध्ये लिहायची.’
1940 मध्ये नाझींनी फ्रान्सवर ताबा मिळवला. त्यावेळी नूर फ्रेंच लोकांसोबत ब्रिटनला गेली. तिथे पोहोचताच युद्धात सहभागी होण्याच्या तयारीला लागली. ज्यावेळी ती लंडनमध्ये गेली होती, तेव्हा ब्रिटिश लष्कराचे मोठे-मोठे फलक लावण्यात आले होते. ‘लष्कराला मनुष्यबळाची अतिशय आवश्यकता आहे,’ असे त्यावर लिहिले होते. नूरने ब्रिटिश सैन्यात नोकरीसाठी अर्ज केला. पण, लष्कराकडून तिला नकार कळवण्यात आला. नूरचे वडील सूफी प्रसारक होते, भारतीय होते. ते इंग्रजांविरुद्ध लढणार्‍या टिपू सुलतानचे पणतू होते. नूरदेखील मॉस्कोमध्ये जन्मली होती आणि फ्रेंच नागरिक होती. काही नुकतीच फ्रान्समधून परतली होती. अशा  परिस्थितीत ब्रिटिश लष्कराकडून तिची निवड केली जाणे अशक्यप्रायच. त्यावेळी तिचा अर्ज रद्दबातल ठरवण्यात आला होता. पण, नूर गप्प बसणारी नव्हती. तिने हिंमत न हारता ब्रिटिश लष्कराला पत्र लिहिलं. तिने या पत्रात म्हटले होते की, तिची आई एक ब्रिटिश नागरिक आहे. ती स्वतः ब्रिटनमध्ये ब्रिटिश प्रोटेक्टिव्ह पासपोर्ट  घेऊन राहत आहे, त्यामुळे तीदेखील ब्रिटिशच आहे. त्यानंतर लष्कर अधिकार्‍यांनी तिला मुलाखतीसाठी बोलावले.
तिच्या चरित्रात दिलेल्या माहितीनुसार, तिला मुलाखतीत अतिशय खोचक प्रश्न विचारण्यात आले.  
पहिला प्रश्न असा होता, “महात्मा गांधी यांच्याविषयी तुझे काय विचार आहेत?”
तिने उत्तरादाखल सांगितले, “महात्मा गांधी भारतात जे करत आहेत, त्यमुळे मी  प्रभावित झालेले आहे.”
 लष्करी अधिकार्‍यांनी तिला दुसरा प्रश्न उपस्थित केला,  
 “ जे ब्रिटिश सरकारच्या विरोधात लढत आहेत, त्या भारतीय  नेत्यांना तू पाठिंबा देशील का?”
 यावर नूर म्हणाली, “सध्या फॅसिझमच्या विरोधात युद्ध सुरू आहे आणि ब्रिटनला पूणर्पणे पाठिंबा देणं हे माझं कर्तव्य आहे . परंतु, हे युद्ध संपताच मी भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईला पाठिंबा देईन.”
या उत्तराने ब्रिटिश अधिकार्‍यांवर प्रभाव पडला. त्यानंतर तिची निवड झाली. नोव्हेंबर 1940 मध्ये तिला ब्रिटिश लष्करात एअर फोर्समध्ये सेकंड क्लास ऑफिसर म्हणून नियुक्त करण्यात आले. ती नोराह बेकर नावाने वुमेन्स ऑग्जिलरी एअरफोर्स मध्ये दाखल झाली. एक वायरलेस ऑपरेटर म्हणून तिने प्रशिक्षण घेतले. त्यावेळी एक महिला म्हणून हे काम खूप जिकीरीचे होते. तिला अवगत असणार्‍या भाषा आणि हे तंत्रज्ञानाचे कौशल्य इथे उपयोगी पडले होते. 1943 मध्ये स्पेशल ऑपरेशन्स एक्झिक्युटिव्ह म्हणून तिला फ्रान्स सेक्शनमध्ये काम करावे लागले होते. नूर ही पहिली रेडिओ ऑपरेटर होती, जिला नाझी व्याप्त फ्रान्समध्ये पाठवण्यात झाले होते.
तब्बल दीड वर्षांनंतर तिला स्पेशल ऑपरेशन एक्झिक्युटिव्हच्या मुलाखतीसाठी बोलावण्यात आले. फ्रेंच भाषेवर तिची मजबूत पकड होती. ही एक सिक्रेट ब्रिटिश फोर्स होती, जी युरोपमध्ये नाझींविरोधात स्थानिक विद्रोहात मदतीसाठी गुप्तहेर पाठवले जायचे. या कामात सामान्य वेतन मिळायचे. जीवावर बेतणारे काम होते पण, हे धाडस नूर करायला तयार झाली. कधी कधी वायरलेस ऑपरेशनच्या प्रशिक्षणावेळी नूर घाबरायची. सर्व अधिकार्‍यांना वाटायचे की, नूर एक गुप्तहेर म्हणून काम करू शकत नाही. पण, फ्रेंच भाषेवरील प्रभुत्व आणि संदेश तत्काळ कोड-डीकोड करणे हे पाहून नूरला हेरगिरी करण्यासाठी रेडिओ ऑपरेटर बनवून ला 1943 मध्ये फ्रान्समध्ये पाठवण्यात आले. तिचे कोड नाव होते- ममेडेलिज:
हे काम आधी पुरुषच करायचे. जर्मन सीक्रेट पोलिस ‘गेस्टापो’ ऑपरेटरचे इलेक्ट्रॉनिक सिग्नलच गुप्तहेरांना ओळखून सहजपणे पकडू शकत होते. आणि लवकरच झालेही तसेच. जर्मनीने सर्व ऑपरेटर्सना पकडले. तेव्हा एकच ट्रान्समीटर शिल्लक राहिले होते - ते होते नूर इनायत खान. ब्रिटिश सैन्याने नूरला माघारी बोलावलं. पण नूरने परत येण्यास नकार दिला. पुढील काही महिने नूर एकटीच फील्ड ऑपरेटर म्हणून काम करत राहिली. त्यावेळी ती आपल्या मिशनपासून मागे हटली नाही. तिला माहिती होतं की, तिने एकाच जागेवरून जर 15 मिनिटांपर्यंत मेसेज पाठवला तर जर्मन सैन्याला तिचा ठावठिकाणा समजेल. त्यामुळे ती नेहमी संदेश पाठवल्यानंतर पार्कमध्ये जायची. एक दिवया ती आपल्या ट्रान्समिशन मशीनसोबत पार्कमध्ये होती. तेव्हा जर्मन सैनिकांनी तिला अडवून तिची चौकशी केली.
“तुझ्या ब्रीफकेस मध्ये काय आहे?”
 नूर म्हणाली, “सिनेमा दाखवायची मशीन आहे.”
 अशा प्रकारे जर्मन सैन्यांच्या डोळ्यात धूळ फेकून ती फरार होत राहिली. पण तिचा चेहरा शत्रूने ओळखला  होता. त्यामुळे प्रत्येक दिवशी तिला आपलं बाह्यरूप बदलावं लागत असे. ती बराच काळ अनेक ठिकाणे आणि पोशाख बदलत राहिली.
त्यावेळी नाझी जर्मनीने एक सीक्रेट पोलिस दलाची निर्मिती केली होती. नाव होतं- गेस्टापो.  हेरगिरी करताना नाझी सैनिकांकडून पकडल्या गेलेल्या नूरला तिच्याच सहकार्‍यांनी धोका दिला होता. पैशाच्या लोभाने तिच्या जवळच्या सहकार्‍याने तिच्याविषयीची सगळी गुप्त माहिती नाझी सैन्यांना सांगितली. यामुळे नूरचे सर्व रहस्य उघड झाले आणि ऑक्टोबर 1943 मध्ये गेस्टापोने तिला पकडलेे. तुरुंगात तिचा अतोनात छळ करण्यात आला. एका अपार्टमेंटमधून केवळ पाच सहा सैनिकांनी तिला घेरलं. विश्वासू सहकार्‍यांनीच विश्वासघात करून  तिची सर्व गुपिते उघड केली होते. गेस्टापोंनी तिला पकडून जर्मनीला नेलं. जर्मन अधिकार्‍यांसाठी नूर खूप धोकादायक कैदी होती. तुरुंगात इतका छळ होऊनही नूरने ना आपल्या स्वत:बद्दल काही सांगितले, ना ब्रिटन लष्कराविषयी. जर्मनीला तिने कुठलीही गोपनीय माहिती दिली नाही. तिने दोनवेळा तुरुंगातून पलायन करण्याचा प्रयत्न केला. पण ती अयशस्वी ठरली. पलायनावेळी दोन्ही वेळा ती पकडली गेली. जर्मन सैन्याने तिच्याकडून ब्रिटिश लष्कराबद्दल माहिती काढण्याचा वारंवार प्रयत्न केला. पण, नूरचे खरे नावदेखील ते माहिती करू शकले नाहीत, असे म्हटले जाते.
अखेर 27 नोव्हेंबर, 1943 रोजी नूर इनायत खानला पॅरिसहून जर्मनीला नेण्यात आले. जवळपास नऊ ते दहा महिने त्रास देऊन तिच्याकडून गोपनीय माहिती काढून घेण्याचा प्रयत्न होत राहिला. तरीही, जर्मन सैन्याला एका अक्षराचादेखील थांगपत्ता तिने लागू दिला नाही. सप्टेंबर, 1944 मध्ये नूर इनायतला एका कँपमध्ये नेण्यात आले. 13 सप्टेंबर. 1944 रोजी तिला गोळी मारण्यात आली. मृत्यूसमयी ती 30 वर्षांची होती. तिच्यावर गोळी झाडल्यानंतर शेवटचा शब्द तिच्या तोंडातून निघाला तो म्हणजे मलिबेरेते. हा एक फ्रेंच शब्द असून त्याचा अर्थ ‘स्वातंत्र्य’ असा होतो. जेव्हा जेव्हा जगभरातल्या मोठमोठ्या गुप्तहेरांबद्दल चर्चा होते, तेव्हा नूर इनायत खानचे आदराने घेतले जाते.

No comments:

Post a Comment

सालिह

**स्वालिया** (Swaliya / Swaliha) या नावाचा मुख्य अर्थ **"पुण्यवान", "सदाचारी", "धार्मिक" किंवा "चांगल्या ...