Monday, March 24, 2025

एका वर्षात मोती पिकवणारे शिवाजी विद्यापीठ

नवनवीन संशोधन करणारे कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ पुन्हा एकदा संशोधनात्मक उपक्रम राबवण्यास यशस्वी ठरले. चक्क एका वर्षात मोती पिकवणारे विद्यापीठ म्हणून शिवाजी विद्यापीठाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. याआधी रेशीम शेती ‘सॉईल टू सिल्क’ प्रकल्प, मधमाशा पालन, जलसंवर्धन, अवकाश संशोधन केंद्र, रेशीम शेती, फुलपाखरू उद्यान, सेंद्रिय गुळ उत्पादन, लिड बॉटॅनिकल गार्डन, जैव तंत्रज्ञान संशोधन, पामच्या ६४ दुर्मीळ प्रजातींचे संवर्धन असे अनेक यशस्वी उपक्रम राबवण्यात आले आहेत. शोभेच्या मत्स्य उत्पादनानंतर आता नैसर्गिक पद्धतीने मोती पिकवणारा प्रकल्प साकार झाला आहे. गोड्या पाण्यातील मोत्यांचे संशोधन, उत्पादन असा प्रयत्न यशस्वी ठरलाय.

 
केवळ अलंकारच म्हणून नव्हे तर औषध निर्मिती आणि सौंदर्य अंलकारमध्ये मोत्यांचे महत्त्व आहे. समुद्रातील शिंपल्यापासून मोती तयार होत असल्याचे सर्वश्रृत आहे. चीनमधील शांघायमध्ये गोड्या पाण्यातील शिपल्यांसह संवर्धित मोती तयार करण्याचे प्रयत्न यशस्वी झाले. तेव्हापासून चीन जगातील सर्वात मोठा गोड्या पाण्यातील मोती संवर्धक व उत्पादक देश बनलाय. चीनमध्ये दरवर्षी १५०० मे. टनांपेक्षा जास्त मोतींचे उत्पादन होते. आता कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या गोड्या पाण्यातील मोती संशोधन केंद्राचे समन्वय, प्राणी शास्त्रज्ञ डॉ. नितीन कांबळे यांच्या सहकार्यातून गोड्या पाण्यातील मोत्यांच्या शेतीचा प्रयोग यशस्वी ठरलाय. आजही या प्रकल्पावर निरंतर अभ्यास आणि काम सुरु आहे.

वर्षभर संशोधन आणि मेहनत करत नैसर्गिक पद्धतीने मोती पिकवण्याची शेती नावारुपास आलीय. २८ फेब्रुवारी, २०२४ रोजी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते प्राणीशास्त्र अधिवाभाच्या परिसरात गोड्या पाण्यातील मोती संशोधन केंद्राचे उद्घाटन झाले. 

विद्यार्थ्यांना केवळ अभ्यास आणि संशोधन न करता स्वत:चा व्यवसाय यातून करता यावा, यासाठी या केंद्राने महाराष्ट्र जैवविविधता मंडळाच्या मान्यतेने या ठिकाणी गोड्या पाण्यातील मोत्यांविषयी संशोधन-विकास सुरु केले. कोल्हापुरात मोत्यांची शेती करणारे उद्योजक दिलीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शंभर प्राण्यांचे संगोपन करण्यास सुरु केले. योग्य देखभाल आणि संवर्धनामुळे या शिंपल्यांपासून चांगल्या प्रकारचे मोती तयार होऊ लागले. शिवाजी विद्यापीठात निर्माण झालेला पहिला मोती महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते भेट देण्यात आला आहे.  

*असे पिकवले गेले मोती*
 
भोगावती नदीतील १०० शिंपले जमा करण्यात आले. पाण्याच्या टाकीतील पाणी नदीसारखा प्रवाह निर्माण केला गेला. पाण्यातील ऑक्सिजनची पातळी कायम राखली. पाणी प्रदुषित होणार नाही याची दक्षता घेण्यात आली. पाण्याचा दर्जा योग्य राखण्यासाठी रोज निरीक्षण करण्यात आले. प्राण्याचे वय, वजन, त्याची संवेदनक्षमता आदी गुणधर्मांचाही अभ्यास केला. त्यांच्या प्रकृतीची योग्य काळजी घेतली. त्यामध्ये पाण्यात संवर्धनासाठी सोडलेल्या १०० शिंपल्यांमधील मृत्यूदर अवघा २० टक्के इतका आढळला. म्हणजे शंभरातील ८० शिंपले जगले. सर्वसाधारणपणे यांचा मृत्यूदर हा ४० टक्क्यांच्या घरात असतो. तो कमी करण्यात यश आले. महत्त्वाचे म्हणजे प्राण्यांची योग्य देखभाल करताना त्यांना आवश्यक त्या प्रमाणात अन्नपुरवठा करण्यात आला.

*कमी भांडवलात उत्तम व्यवसाय अन्‌  रोजगार*
 
पारंपरिक शेतीला पर्याय आणि जोडव्यवसाय म्हणून विद्यार्थी आणि शेतकरी मोती व्यवसायाची निवड करू शकतात. मोत्यांची योग्य प्रकारे शेती (लागवड) करून उत्तम आर्थिक नफा मिळू शकतो. यासाठी फारसे भांडवल लागत नाही. योग्य जागा, कृत्रिम किंवा नैसर्गिक तलाव तसेच २५ ते ३० हजार गुंतवणुकीत मोत्यांच्या शेतीचा व्यवसाय करता येतो. १२ ते १८ महिन्य़ांच्या या कालावधीत ३ ते ४ लाखांचे उत्पन्न मिळू शकते. कारण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दर्जेदार मोत्यांना मोठी मागणी आहे.  आता हा प्रयोग अधिक व्यापक करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. 

- डॉ. नितीन कांबळे (शिवाजी विद्यापीठ गोड्या पाण्यातील मोती संशोधन केंद्राचे समन्वयक) मोबाईल क्र.- 9850148586

 Dr. Nitin Kamble +919850148586


No comments:

Post a Comment

सालिह

**स्वालिया** (Swaliya / Swaliha) या नावाचा मुख्य अर्थ **"पुण्यवान", "सदाचारी", "धार्मिक" किंवा "चांगल्या ...