पत्रपल्लव
Tuesday, November 28, 2023
निरोगी जीवनाचा मूलमंत्र: योगसाधना*
नदी म्हणजे आपली आई...
यददः संप्रयतीरहवनदता हते ।
तस्मादा नद्यो नाम स्थ ता वो नामानि सिन्धव: ॥
(अथर्ववेद. तिसरे कांड, तिसरा अनुवाक, तेरावे सूक्त)
‘हे जला, मेघांना तोडून तू बाहेर येतोस, ते जल पृथ्वीवर इकडून तिकडे वाहताना नाद करते. म्हणून वाहणार्या तुझे नाव नदी पडले आहे,’असे म्हटले आहे. आदिम जीवना मानवी जीवनापासून नदी ही पूजनीय होती आणि समाजजीवनात तिला सर्वार्थाने महत्त्व प्राप्त झाले होते. नदी हे त्या परिसराचे भूषण असते आणि आभूषणही असते. एखाद्या मोठ्या भूप्रदेशावरून एका दिशेकडून दुसरीकडे वाहत जाणारा नैसर्गिक रुंद थंड पाण्याचा प्रवाह म्हणजे नदी अशी तिची शास्त्रीय व्याख्या आहे. नदीचा उगम हा प्रामुख्याने पर्वतातून होतो. मग पर्वत बर्फाच्छादित असो वा नसो. जलाशय, लहान- मोठे झरे एकत्र येऊनही नदी तयार होते आणि प्रवाहित होऊन वहायला लागते. कोणताही भूप्रदेश असो, त्यातून पाणी वाहून नेणार्या पाण्याच्या सार्या प्रवाहांची मिळून नदीप्रणाली होता. त्या सार्या प्रदेशाला त्या विशिष्ट नदीचे खोरे असे म्हटले जाते. नदीचा उगम होतो किंवा ती जिथून वाहते, तिथली जमीन क्षारयुक्त नसते, म्हणून ते पाणी गोड असते. पण नदीचे गोड पाणी ज्या समुद्र नामक अथांग जलाशयाच्या दिशेने जाऊन त्याला मिळते, तो प्रदेश क्षारानेच भरलेला असल्यामुळे समुद्र खारा असतो, परिणामी गोड पाण्याची नदी समुद्रात शिरताच खारीच होऊन जाते.
नदीला ‘नद’ असाही एक शब्द आहे. ‘नदी’ चा ‘नद’ केव्हा होतो? तर नदी जेव्हा छोटी असते, तेव्हा ती ‘नदी’च असते. मात्र अनेक छोट्या एकत्र येऊन पुढे वाहायला लागतात, त्या अतिप्रचंड प्रवाहाला ‘नद’ म्हणतात. नदी समुद्राला मिळते तेव्हा तिची रुंदी वाढते. पाणी खारट व्हायला सुरुवात होते. नदी समुद्राला मिळते त्या भागाला खाडी म्हणतात. काही वेळा असे असते की, नदी नसते, पण खाडी असते. हे कसे काय? समुद्र समुद्रकिनार्यावरील खडक झिजून झिजून अणकुचीदार झालेला असतो. अशा धोकादायक किनार्यांना दंतूर म्हणतात. अशा दंतूर किनार्याच्या भूभागातून काही अंतर पाणी जमिनीत घुसते त्या जलाशयालाही खाडी म्हणतात. पण ती नदी मात्र नसते.
नदीच्या उगमाचे अनेक प्रकार आहेत. पर्वतावरून होणारा उगम, तलाव आणि झर्यांमधून होणारा उगम, दलदलीच्या ठिकाणाहून होणारा उगम, बर्फाळ प्रदेशातून होणारा उगम. ‘ऋषीचे कूळ आणि नदीचे मूळ शोधू नये’ अशी म्हण आहे. कारण नदीचे मूळ अतिशय दुर्गम ठिकाणी असते. अगदी करंगळीएवढ्या धारेपासून नदीची सुरुवात होते. मग ही धार पुढे पुढे वाहत जाते, तसतसे ओढे, झरे यांचे प्रवाह त्या धारेला यऊन मिळत मिळत नदीचे पात्र विशाल होत जाते. अनेकदा भूगर्भातील पाणीही पृष्ठावर येऊन नदीला मिळते आणि पात्र आणखीन मोठे होते. काही वेळा नदीचे पात्र लहान दिसते, पण आत पाण्याचा विपुल साठा असतो.
‘नदीचे माहेर’ ही ग. दि. माडगूळकर यांची एक प्रसिद्ध कविता आहे. त्या कवितेत ते म्हणतात-
नदी सागरा मिळता, पुन्हा येईना बाहेर, अशी शहाण्यांची म्हण, नाही नदीला माहेर!
काय सांगू रे बापा रे, तुम्ही आंधळ्यांचे चेले, नदी माहेराशी जाते, म्हणुनची जग चाले!
सारे जीवन नदीचे, घेतो पोटात सागर, तरी तिला आठवतो, जन्म दिलेला डोंगर!
डोंगराच्या मायेसाठी, रूप वाफेचे घेऊन, नदी तरंगत जाते, पंख वार्याचे लेऊन!
पुन्हा होऊन लेकरू, नदी वाजवते वाळा, पान्हा फुटतो डोंगरा, तेव्हा येतो पावसाळा...!
याचा अर्थ हेच सांगतो की, नदीचा प्रवाह सुरुवातीला लेकरासारखा लहान असतो. नदी हा जलचक्राचा एक भाग आहे, हा शास्त्रीय सिद्धांतच कवी ह्या कवितेत सांगतो. नदी हा समृद्ध जलस्रोत असतो. म्हणूनच सगळ्या आदिम मानवी वसाहती नदीच्या काठाला वसल्या. तिथेच त्या समृद्ध झाल्या, त्यांचा विस्तार झाला. शहराचा आराखडा हा नदीच्या पात्रानुसार ठरतो.
सामान्यतः नद्या उगमापासून आरंभ करून, उताराकडे वाहात जातात व समुद्रास मिळतात. काही वेळा सूर्याच्या उष्णतेने बाष्पीभवन होऊन त्या मध्येच आटूनही जातात. काही वेळा नदीतील पाणी जमिनीतील भेगांमध्ये झिरपून जाऊ शकते, आणि नंतर भूगर्भात पाण्याचा साठा तयार होतो. नदी लुप्त होणे किंवा गुप्त होणे याचा अर्थ हाच असावा. प्राचीन भारतातील सरस्वती नदी भूगर्भात अशीच लुप्त झाली. या शिवाय शेती आणि औद्योगिकीकरणामुळे पाण्याचा अवाजवी उपसा होतो आणि नदी आटते. भूभागांची सीमा ठरवणे, वाहतुकीचे माध्यम व दिशादर्शक म्हणून नदीचा उपयोग शतकानुशतके होत आला आहे. दाट अरण्यांच्या प्रदेशांत तोडलेले वृक्ष वाहून इच्छित ठिकाणी नेण्यासाठीही नद्यांचा उपयोग केला जातो. अनादी काळापासून अन्न मिळवण्यासाठी नद्यांचा उपयोग होत आला आहे. नद्यांतील जीवसष्टीचे एक चक्र असते. यामुळे अनेक प्रकारचे मासे मिळतात. फक्त मासेमारीच नव्हे तर शेतीसाठी व पर्यायाने अन्न उत्पादनासाठी नदीच्या पाण्याचा उपयोग होत आला आहे.
नदीचे पात्र सहसा एकच असते. परंतु काही वेळा नदी एकाच वेळी अनेक पात्रांनीही वाहते. नदीचा प्रवाह दुप्पट झाला, तर तिची वहनक्षमता चौसष्टपट वाढते. पर्वतीय प्रदेशात पाण्याच्या प्रवाहामुळे कठीण खडकांचीही धूप झालेली आहे. त्यामुळे खडकांच्या बारीक तुकड्यांची वाळू बनते. काही वेळा पठारी प्रदेशात प्रवाहाच्या ताकदीमुळे नदी आपला मार्ग बदलते आणि तिचा मार्ग लहान होतो. काही वेळा नद्या काठावरचा गाळ प्रवाहात ओढतात. हा गाळ प्रवाहाच्या मध्य भागात जमत जातो आणि त्याचे बेट तयार होते. या भूभागांना त्रिभुज प्रदेश असे म्हटले जाते. गाळापासूच तयार झाल्यामुळे हे त्रिभुज प्रदेश अतिशय सुपीक असतात. असे प्रदेश नदीच्या मुखाजवळ तयार होतात. काही वेळा पर्वतीय प्रदेशात वाहणार्या नद्या धबधबे निर्माण करतात. अशी ठिकाणे सहलींचे केंद्र बनतात. काही वेळा खळखळत वाहणार्या पाण्यात कायाकिंग नावाचे वेगवान नौकानयन केले जाते. जोरदार प्रवाह असलेल्या नद्यांपासून वीजनिर्मिती केली जाते.
औद्योगिकीकरणातील रासायनिक द्रव्ये आणि गावे व शहरातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी नद्यांचा वापर गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. त्यामुळे नद्यांचे प्रदूषण अतोनात वाढले आहे. सहसा नदीचे पाणी तिच्या ठरलेल्या पात्रातूनच वाहते. मोठ्या नद्यांची पूररेषा मात्र नेहमीच्या पात्रापेक्षा अधिक अंतर विस्तारते. पण, सर्वसाधारणपणे नदीचे पात्र व पूर आलेल्या नदीचे पात्र हे सहसा बदलत नाही. नद्या या सुरक्षेचे माध्यम म्हणूनही वापरल्या गेल्या आहेत. तसेच राजकीय सीमा म्हणूनही त्यांचा उपयोग झालेला दिसतो. भारतातील अनेक राज्यांच्या सरहद्दी नदीचे प्रवाह ठरवतात. सातार्याचे शाहू छत्रपती आणि कोल्हापूरकर छत्रपती यांच्यात अनेक लढाया झाल्या आणि शेवटी तह होऊन वारणा नदी ही दोन्ही राज्यांची सीमा ठरवण्यात आली.
जीवसृष्टीचे एक स्वतंत्र चक्र नदीवर अवलंबून असते. यात अनेक प्रकारचे सजीव, परजीवी सजीव आणि वनस्पती समाविष्ट होतात. नदीतील बहुतेक जीव हे गोड्या पाण्यात जगणारेच असतात. परंतु काही मात्र खार्या पाण्यातही जगू शकतात. उदा. सामन नावाचे मासे नदी व समुद्र दोन्हीकडे राहू शकतात. काही मासे समुद्रातून पोहत नदीत येतात व उगमाकडील बाजूस अंडी घालतात.
पूर येणे ही नदीच्या नैसर्गिक चक्राचा भाग आहे. नदीकाठाची धूप व आसपासच्या मैदानात साठणारी गाळवजा माती ही पुरामुळेच होते. माणसाने आपल्या सोयीनुसार बंधारे घालून, काठ बांधून व प्रवाह वळवून पूर येण्यावर निर्बंध घातले आहेत. तरीही अनेकदा शहराची रचना करतांना जलप्रवाहाची दिशा व वेग विचारात न घेतल्याने पूर येतात व मोठी जीवित आणि वित्तहानी होते. शहरी भागात, जर नदीपात्राच्या पूररेषेचा विचार न करता अतिक्रमण करून वसाहती बांधल्या, तर पूर आल्यावर नदीचे पाणी शहराच्या अंतर्भागात घुसते. मुंबईमध्ये मिठी नावाच्या नदीच्या पूर रेषेचा विचार न करता तिच्या पात्रात बांधकामे केल्यामुळे नदीचे पाणी शहरात घुसले होते. मुंबईत एक नदी आहे, हे असंख्य मुंबईकरांना हा महापूर आल्यावरच समजले.
नदीच्या पाण्याचा सुयोग्य वापर व्हावा यासाठी बहुतेक वेळा प्रवाहाचे नियमन केले जाते. यामुळे त्यांच्यापासून मानवाला पोहोचणारी हानीही कमी होते.साखर कारखान्यांची मळी हा नदीच्या प्रदूषणाचा मोठा कारक आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात हे प्रमाण जास्त आढळते. जमीन ओलिताखाली आणण्यासाठी आणि पिण्यासाठीही पाण्याचा प्रवाह धरणे बांधून अडवला जातो. धरणातून सुयोग्य रीतीने मिळालेल्या प्रवाहाच्या आधारे वीज निर्मितीसारखी कामे साधली जातात. नदीचे नियोजन ही सातत्याने चालणारी गोष्ट आहे. आपल्याला घातलेल्या बांध-भिंती नदी नष्ट करते. तसेच बांधांमधले धातूचे भाग गंजतात व बदलावे लागतात. धरणाच्या भिंतींना पाण्याच्या धडकांनी तडे जातात व बाहेर पडलेल्या पाण्याने बरीच हानी होते. याशिवाय अशा प्रकारच्या पाणी नियोजनाने विस्थापित झालेल्या लोकांचे प्रश्न उभे राहतात.
हे झाले एकूणच नदी ह्या विषयाचे. आता आपण विचार करू या गंगा आणि यमुना ह्या आपल्या देशातील प्रमुख नद्यांविषयी! ह्या दोन्ही नद्यांचे प्रदूषण गेल्या अनेक वर्षात अफाट वाढलेले आहे. गंगा नदी ही केवळ भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिकदृष्टया महत्त्वाची आहे एवढेच नव्हे, तर देशातली 40 टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या ही नदी सांभाळते. 2014 मध्ये न्यूयॉर्कमधल्या मॅडीसन स्क्वेअर येथे भारतीय समुदायासमोर बोलताना आपले पंतप्रधान म्हणाले, आपण गंगा नदी स्वच्छ केली, तर देशातल्या 40 टक्के जनतेला त्याचा मोठा लाभ होईल. म्हणूनच गंगा स्वच्छता हा एक आर्थिक कार्यक्रमही आहे. हा विचार समोर ठेवून केंद्र सरकारने गंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी आणि तिचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ‘नमामि गंगे’ हे एकात्मिक अभियान हाती घेतले आहे. गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने 2019-2020 पर्यंत 20हजार कोटी रुपये खर्चाच्या कृती आराखडयाला संमती दिलेली आहे. गंगा पुनरुज्जीवनाच्या आव्हानाचे बहुस्तरीय, विविध संबंधित तसेच विविध पैलू असलेले स्वरूप लक्षात घेऊन केंद्र-राज्य सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला. कृती आराखडा तयार करणे, केंद्र तसेच राज्य स्तरावरील देखरेख वाढविणे याद्वारे हे सहकार्य वाढवण्यात येत आहे.कार्यक्रमाची अंमलबजावणी तीन भागात करण्यात आली आहे. तातडीने दृश्य परिणामांसाठी,प्रारंभिक स्तरावरील उपक्रम, पाच वर्षांच्या काळात अंमलबजावणी करण्यासाठीचे मध्यम उपक्रम आणि 10 वर्षात अंमलबजावणी करण्यासाठीचे दीर्घकालीन उपक्रम. असा कार्यक्रम राबवून गंगा नदी स्वच्छ करण्यात येईल. शासनाच्या सगळ्या प्रयत्नांना लोकांनीही योग्य प्रतिसाद दिला, तर हे अभियान लवकर पूर्णत्वाला जाईल. आपण भारतीय नदीला आई मानतो. जन्मभर नदी माणसाला आणि एकंदरीतच सार्या जीवसृष्टीला साथ करते. म्हणूनच नदीचे महत्त्व आपण नीट ओळखून आपली ‘आई’ समजूनच तिची जपणूकआणि तिची सेवा करायला हवी!
धातूंच्या मूर्ती, पुतळे यांसह प्रभावळी- मखरांतही प्राविण्य!
यशकथा
- spगोव्याच्या फातर्फा येथील श्रीशांतादुर्गा देवीसमोर मी उभा होतो. दर्शन घेता घेता देवीची चांदीची नक्षीदार आणि अतीव सुंदर प्रभावळ लक्ष वेधून घेत होती. नंतर कासारपालला गेलो. तिथल्या श्रीमहामाया कालिका मंदिरात गेलो. तिचं दर्शन घेताना पुन्हा लक्ष वेधून घेतलं ते तिच्या चांदीच्या प्रभावळीनं. आणखी काही मंदिरात गेलो. तिथंही तशाच प्रभावळी, तशीच आसने. तर लक्षात आलं की, ह्या सगळ्या प्रभावळी आणि आसनांची घडण एका प्रकारची आहे. एकाच कलाकाराच्या हातून त्यांची निर्मिती झालेली आहे. मी सहज म्हणून महाजनांकडे चौकशी केली, तर त्यांनी मला सांगितलं की, ह्या प्रभावळी आणि इतर सर्व चांदीच्या, पंचधातूंच्या जडणघडणीचे शिल्पकार कोल्हापूरचे आहेत. त्यांचं नाव आहे, सचिन सदानंद ओतारी.
ओतकाम हा ओतारी समाजाचा परंपरागत उद्योग. ओतारी समाजात सगळ्यांचं आडनाव ओतारीच असतं. सोन्यापासून जस्तापर्यंत सर्व प्रकारच्या धातूंचं ओतकाम हा समाज करतो. सचिन ओतारी यांच्या वडिलांचा बफिंगचा आणि पॉलिश कामाचा व्यवसाय होता. त्यामुळे सचिन हेहि बारावी झाल्यानंतर पॉलिशचं काम करायला लागले. चांदीच्या मूर्ती, मखरं, प्रभावळी यांना ते पॉलिश करायचे. पण मग एके वर्षी चांदीचे दर गगनाला भिडले. चांदीची कामं खूप कमी झाली. त्यामुळं अर्थातच पॉलिशची कामंही मंदावली. एकदा एका व्यापार्यांनी सचिन ओतारी यांना दुर्गा देवीच्या मूर्तीचं ओतीव काम करायला सांगितलं. ओतकाम हा परंपरागत व्यवसाय सचिन हे बघत, बारकाईनं निरीक्षण करत आले होते. ही दुर्गेची मूर्ती अश्वारूढ हवी होती. अगदीच नवख्या असलेल्या सचिन यांनी अश्वारूढ दुर्गेची मूर्ती बनवायला घेतली. पंचधातूंमधून ही मूर्ती घडवायची होती. सोनं, चांदी, तांबे, पितळ आणि जस्त असे पंचधातू. पितळ हा मुख्य धातू. इतर धातू आवश्यक त्या प्रमाणात. मूर्तीचा मेणाचा साचा बनवला. मातीच्या पेटीत तो दाबून बसवला. त्यात रस ओतला. आणि त्यानंतर विविध प्रक्रिया करून ही मूर्ती तयार करण्यात आली. 2003 मध्ये ह्या मूर्तीची किंमत वीस हजार रुपये झाली. अपार परिश्रम होते, पण त्यातून सचिन यांच्यातील कलाकार आकारास येत होता.
ही अश्वारूढ दुर्गेची मूर्ती लोकांनी पाहिल्यावर ते प्रभावित झाले. मग त्यांच्याकडे विविध मूर्तींची मागणी यायला लागली. सचिन यांनाही ओतकामात अधिकाधिक प्राविण्य मिळत गेले. त्यांच्या कामातील कौशल्य आणि सफाईदारपणा लोकांना आकृष्ट करत होता. दरवर्षी 15 ते 18 मूर्ती घडवण्याची मागणी यायला लागली. तेवढ्या मूर्ती ते बनवायला लागले. ओतीव मूर्तीकामाबरोबरच सचिन यांनी नक्षीकामाच्या क्षेत्रात प्रवेश केला. मंदिरातील मूर्तीच्या पाठीमागील प्रभावळी, उंबरठा, चौकट, दरवाजे ही सगळी कामे ओतकाम करून मूय स्वरूपात तयार करणं आणि त्यावर नक्षीकाम करणं यात सचिन तरबेज होत गेले. त्यांनी कोल्हापुरातील गुजरीतील आझाद गल्लीत कारखाना सुरू केला. कामांची सुरुवात कोल्हापुरातून झाली. नंतर बाहेरगावच्या अनेक ग्राहकांनी मागणी करायला सुरुवात केली. अर्धा महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातून त्यांना प्रचंड मागणी यायला लागली. मूर्ती आणि नक्षीकामासाठी ते सर्वत्र जायला लागले. आधी ज्या त्या ठिकाणी जायचं, तिथली मापं घेऊन यायचं, येऊन कामं घडवायची आणि नंतर ती घेऊन जाऊन त्या त्या ठिकाणी पक्की बसवायची. एक महिना आधी मागणी नोंदवून घेतल्यानंतरच ते काम करायला घेतात.
पहिल्यांदा मातीचं मॉडेल बनवायचं, त्यानंतर त्याचा प्लास्टर मोड बनवायचा, नंतर मेण किंवा फायबरयात प्रतिकृती तयार केली जाते. मॉडेल मातीच्या पेटीत दाबायचं आणि तयार झालेल्या साच्यात धातूचा रस ओतायचा. त्यातून मूर्ती तयार होते. मग कानस आणि ग्राइंडर यांनी घासून त्यानंतर चेहरा, डोळे, दागिने, मुकुटातील नक्षी इत्यादी काम मोळ्यांनी कोरून घ्यायचं. शेवटी पॉलिश करायचं. नक्षीकामासाठी पहिल्यांदा हव्या असलेल्या आकारात कागदावर आरेखन करायचं, ते नक्षीकाम सपाट पत्र्यावर चिकटवायचं. मुख्य नक्षीचा भाग उठाव करून घ्यायचा आणि मग त्यात लाख भरून फिनिशिंग करायचं अशी प्रक्रिया असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, श्रीस्वामी समर्थ, श्रीगणपती, श्रीजोतिबा, श्रीदुर्गा, श्रीमहालक्ष्मी, श्रीकालभैरव अशा अनेक देवदेवता यांच्या मूर्ती, बकर्यांचे आणि इतर प्राण्यांचे पुतळे तसेच असंख्य मखरे आणि प्रभावळी अशी अनेकविध कामे सचिन करत आलेले आहेत. सचिन ओतारी यांच्या एकसंबा येथील बकर्यांचे पुतळे, कोल्हापुरातील साई मंदिर येथील आसन, प्रभावळ आणि मूर्ती, गोव्यातील कालिका मंदिर आणि शांतादुर्गा मंदिर येथील प्रभावळी, कोल्हापुरातील श्रीअंबाबाई मंदिरातील उत्सवमूर्तीचे आसन आणि प्रभावळ यासह अशा अनेक कामांची तज्ज्ञ, भाविक, सामान्य लोक यांच्याकडून वाखाणणी झालेली आहे.
सचिन ओतारी यांचा मोठा मुलगा ऋतुराज ओतारी कलामंदिर महाविद्यालयात शिल्पकलेचं प्रशिक्षण घेत आहे. मॉडेल बनवणं, फायबर तसेच दगड आणि लाकूड यात कोरीव काम करणं, धातूच्या ओतकामाची प्रक्रिया इत्यादी विषयात तो अधिकाधिक प्राविण्य मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरा मुलगा एम. बी. ए. शिकत आहे. दोन्ही मुलगे कामात तरबेज असून सचिन यांना कामात हातभार लावीत आहेत. वार्षिक पंधराहून अधिक लाखांची आर्थिक उलाढाल होत आहे.
संपर्क- 9225800334
इन्स्टाग्राम- _shrisamartharts_
पी. डी. सावंत - सेंद्रीय शेतीतून उभारला लाखांचा उद्योग
- स्वालिया शिकलगार
पांडुरंग दिगंबर सावंत हे एक सेंद्रीय शेती करणारे शेतकरी आहेत. याच सेंद्रीय शेतीतून त्यांनी लाखोंचा नफा मिळणारा सेंद्रीय उत्पादनांचा उद्योग उभारला. हा उद्योग उभारण्यात त्यांची पत्नी पूजा सावंत यांची खंबीरपणे साथ मिळाली. दोघे मिळून शेती आणि उद्योग पाहतात. सिकंदर टाकळी (ता. मोहोळ, सोलापूर) या ठिकाणी पी. डी. सावंत यांची तब्बल २० एकर शेती आहे. इतक्या मोठ्या जागेत केवळ सेंद्रीय शेती केली जाते. सेंद्रीय शेती काळाची गरज ओळखून केवळ नफा न बघता पयार्वरणाचे संवर्धन व्हावे आणि जमिनिचा कस टिकून राहावा, यासाठी सेंद्रीय शेती केली आणि यातूनच सेंद्रीय उत्पादनांची विक्री करणारा सावंत ऑरगॅनिक फार्म या नावाने उद्योग आज दिमाखात उभा आहे.पी. डी. सावंत यांचे शिक्षण मेकॅनिकल इंजिनिअरींग (१९८१) झाले आहे. ते सुरुवातीला शुगर इंडस्ट्रीमध्ये ट्रेनी इंजिनिअर म्हणून रुजू झाले. १९८२-८३ मध्ये महाराष्ट्र सरकारच्या पाटबंधारे विभागात ज्युनिअर इंजिनिअर म्हणून काम पाहिले. पुढे १९८५ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन आरटीओ झाले. शासकीय नोकरी सांभाळत असताना पी. डी. सावंतांचे वडील दिगंबर सावंत यांचे सन २००४ मध्ये निधन झाले. त्यानंतर वडील दिगंबर सावंत यांनी कष्टाने उभारलेली शेतीची जबाबदारी पी. डी. सावंत यांच्याकडे आली. एकीकडे आरटीओची नोकरी आणि दुसरीकडे शेती अशी दुहेरी जबाबदारी पी. डी. सावंत यांच्यावर येऊन पडली.
दरम्यान, सेंद्रीय शेतीमधील विविध नवनव्या प्रयोगाविषयींचा अभ्यास करण्यासाठी पी. डी सावंत यांनी न्युझीलँड आणि ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. त्यावेळी न्युझीलँडच्या दौऱ्यात तेथील सेंद्रीय शेती ही किती उपयोगी आहे, हे पाहून त्यांनी सेंद्रीय शेतीच करण्याचे ठरवले.
सेंद्रीय शेती कशी करावी, यासाठी त्यांनी सन २००६-२००७ मध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली, राहुरी कृषी विद्यापीठ येथील तज्ज्ञांचे मागदर्शन घेतले. शेतीसाठी पाणी, जमिनीचे परीक्षण, हवामान या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर सिकंदर टाकळी येथील गावात मातीत फळबागांची लागवड चांगल्या पद्धतीने होईल, असे निष्पन्न झाले. त्यानुसार, शेतामध्ये काही जातीवंत रोपे व कलमे आणून लावली. सुरुवातीला भौतिक फळपद्धतीने लागवड केली.
नफा देणारी भौतिक फळपद्धत लागवड
सेंद्रीय शेती करताना त्यांनी हापूस, केशररत्न आंबा, कालिपत्ती चिकू, नारळ, मोठा आवळा (कांचन ७), सर्व प्रकारचे लिंबू, सीताफळ, चंदन, साग, औषधी वनस्पती-रुद्राक्ष, बेहडा, अश्वगंधा यासारखी फळे आणि औषधी वनस्पतींची लागवड केली. शेतात राशींनुसार नक्षत्र गार्डन देखील उभारले. यासाठी भौतिक फळपद्धत वापरण्यात आली. (भौतिक फळ पद्धत म्हणजे एक फळ नाही आले तर दुसरं पिक येते)
अवषर्णग्रस्त भाग असूनही पाण्याचे उत्तम नियोजन
अवषर्णग्रस्त भाग असून देखील पी. डी. सावंत यांनी विहीर, शेततळे आणि ठिबक सिंचनच्या माध्यमातून पाण्याचे व्यवस्थापन करण्यात आले. शेतात सेंद्रिय फळबागा आणि मिश्रपिकेदेखील घेतली गेली. लसुण, हरभरा, भूईमूग, कारले, ज्वारी, गहू, उसासोबत आंतरपिकेदेखील घेतली. सेंद्रिय केशररत्न आंब्याचे उत्पादन घेण्यात आले. हा आंबा लंडन तेसच स्वित्झर्लंडला निर्यात करण्यात आला. आवळा आणि सर्व जातीचे लिंबू दुबई येथे निर्यात करण्यात आले. तसेच कोणतेही केमिकलयुक्त किटकनाशकांचा वापर न करता शेण, गोमूत्रापासून त्याचबरोबर गांडूळ खते, निम अर्कची फवारणी पिकांवर करण्यात आली. यामुळे फळे पिकांची चव, वास, रंग आणि अधिक काळ टिकून राहण्याची क्षमता अधिक राहिली.
सेंद्रिय उद्योग उभा करण्यात पत्नीची मोलाची साथ
पांडुरंग सावंत यांच्या पत्नी पूजा सावंत यांना शेती करताना आपण एखादा सेंद्रिय उद्योग उभारावा, अशी कल्पना सुचली. आपल्याच सेंद्रिय शेतीतून आलेली फळे-पिके यांच्यावर प्रक्रिया करून ती बाजारपेठेत आणण्याचे प्रयोजन आखले. त्यानुसार, सांवत जोडप्याने माकेर्टिंग, बाजारपेठेचे आव्हान असतानादेखील आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर सेंद्रिय उत्पादनांचा उद्योग उभारला.
सोलापूर ते कोल्हापूर असा कच्च्या मालाचा प्रवास
सेंद्रिय शेतीतून मिळणारी पिके, फळे, औषधी वनस्पती थेट सोलापुरातून कोल्हापुरात आणला जातो. कोल्हापुरातील गोकूळ शिरगाव येथील कारखान्यात प्रोसेसिंगसाठी कच्चा माल आणल्यानंतर त्यावर प्रक्रिया केला जातो. कच्च्या उत्पादनावर प्रक्रिया करून ते बॉटल्समध्ये भरणे, बॉटल्सचे डिझायनिंग-लेबलिंग करणे तसेच पॅकेजिंग केले जाते. या सर्व प्रक्रियेसाठी दुसऱ्या फूड इंडस्ट्रीची मदत घेतली जाते. पक्का माल तयार झाल्यानंतर ती उत्पादने कोल्हापुरातील 'सावंत ऑरगॅनिक मार्ट मॉल' याठिकाणी पोहोचवली जातात.
सावंत ऑरगॅनिक मार्ट मॉल दिमाखात उभा
सावंत ब्रँडची उत्पादने एकाच छताखाली मिळावी, यासाठी कोल्हापूर शहरात सावंत ऑरगॅनिक मार्ट नावाने मॉल उभारण्यात आला आहे. फळांपासून तब्बल ५० प्रकारची उत्पादने घेतली जातात. त्याचसोबत जवळपास ५०-६० विविध प्रकारचे धान्य, कडधान्य आणि इतर उत्पादने मॉलमध्ये विक्रीसाठी ठेवली जातात. आवळ्यापासून कँडी, च्यवनप्राश आणि गोड, तिखट लोणचे, आवळा कँडी बनवली जाते. आंब्यापासून पल्प, जाम, लोणची बनवले जाते. नारळापासून कोकोनेट ऑईल तयार केले जाते. ८६०३२ हा या उसापासून काकवी, गूळ आणि गूळ पावडर बनवले जाते. हळद, तेल, धान्य, कडधान्य, साखर, तांदूळ, पोहे अशी विविध सेंद्रिय उत्पादनांची निर्यातदेखील केली जाते.
सर्टिफाइड ऑरगॅनिक शेती
सावंत हे आपल्या शेतीचे वषार्तून एकदा खूप खर्चिक ऑडिट करतात. दरवर्षी केरळची लॅकॉन सटिर्फिकेशन प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था ऑडिट करून त्यांना सेंद्रिय शेतीचे प्रमाणपत्र देते. अशा प्रकारे सेंद्रिय उत्पादनांची विश्वासार्हता जपली जाते.
सेंद्रिय उत्पादनांची मागणी आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अनेक रिटेलर्स आणि होलसेलर्स ग्राहक थेट सावंत यांच्याशी संपर्क साधून उत्पादने खरेदी करतात. तसेत पी. डी. सावंत हे बी २ बी व्यवसाय (बिझनेस टू बीझनेस) करण्यात सध्या अग्रेसर आहेत. मार्जिन ठेवून आणि डिस्काऊंट देऊन काही इतर आरगॅनिक शॉपींना उत्पादनांचा पुरवठा केला जातो. कोल्हापूर, मुंबईतील अनेक आरगॅनिक दुकाने, मॉल्ससाठी उत्पादने निर्यात केली जातात. या सेंद्रिय उद्योगाची वार्षिक उलाढाल अंदाजे २० ते २५ लाख इतकी आहे.
आकाशवाणी, दूरदर्शन अशा अनेक वृत्तवाहिनींवरदेखील मुलाखतीत सावंत यांनी सरकारलादेखील विनंती केलीय की, प्रत्येक जिल्ह्यात सेंद्रिय बाजारपेठ असावी. आता पुण्यात असा उद्योग उभारण्याचा सावंत यांचा मनोदय असून त्यांचे कार्य अविरतपणे सुरु आहे.
अनेक पुरस्कारांचे मानकरी
पूजा सावंत आणि पांडुरंग सावंत यांना नागपूर येथे राजभवनमध्ये २०१० ला जिजामाता कृषी भवन पुरस्कार मिळाला. त्यावेळी के शंकरनारायणन हे राज्यपाल आणि अशोकराव चव्हाण हे मुख्यमंत्री होते. गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी देखील सावंत यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव केला आहे.
p d sawant mobile no - 9822152777
...मला आणा कोल्हापुरी साज!
गेली अनेक वर्षे मी ‘एक हौस पुरवा महाराज मला आणा कोल्हापुरी साज’ ही लावणी ऐकत आलेली आहे. पूर्वी फक्त मराठी आणि आज सगळ्याच प्रांतामधील स्त्रीला कोल्हापुरी साजाचं एवढं आकर्षण का वाटतं, हे मला अरुण रघुनाथ संकपाळ यांनी घडवलेला साज समक्ष डोळ्यांनी पाहून समजलं. हा अलंकार वैशिष्ट्यपूर्ण आहे. ह्या सगळ्या वैशिष्ट्यांसह उत्कृष्ट साज बनवणारे ते उद्योजक आहेत. त्यांचे वडील रघुनाथ यांनी पाचवी- सहावी शाया झाल्यानंतर ते मुकुंदराव भोसले आणि दत्तात्रय बळवंत पोतदार, मल्लाप्पा बळवंत पोतदार यांच्याकडे सोनारकाम शिकले. विशेषतः ते कोल्हापुरी साज घडवायला शिकले. त्यात त्यांनी प्राविण्य मिळवलं. 1960-61 पासून ते स्वतंत्रपणे साज घडवायला शिकले. डाकवे गल्लीत एक जागा भाड्यानं घेऊन ते आणि पाच- सहा मित्रांनी साज घडवण्याचा कारखाना सुरू केला. ते पप्पा नावानं सर्वपरिचित होते. आज त्यांचाच वारसा अरुण संकपाळ हे समर्थपणे चालवत आहेत. त्यांनी उद्योग वाढवला. त्याचा विस्तार केला. अरुण यांनी सांगितलेली माहिती मोठी रोचक आहे.
साज ह्या अलंकाराचा उगम 600 वर्षांपूर्वी झाला. त्यातल जे नक्षीकाम असते, तिला पान अशी संज्ञा आहे. साजातला प्रत्येक घटक वैशिष्ट्यपूर्ण असतो. साज घडवताना 11 पासून 21 पानाड्यांचा उपयोग होतो. हे घटक असेः 1)चाफेकळी- आकार आणि रंगानं देखणी. सौंदर्य आणि विकासाचे प्रतीक, 2)पंच पानाडी- बेलपान, तुळस पान, विड्याचे पान, आंब्याचे पान आणि गवताचे पाते यांचं प्रतीक,3)बेलपान- शिवशंकराला आवडणारे त्रिदल पान.उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचे प्रतीक, 4)दोडका- फळभाजीचे प्रतीक, 5)कार्ले- षड्रसाचे आणि औषधी वनस्पतीचे प्रतीक, 6)सूर्य- तेजाचे प्रतीक असलेल्या श्रेष्ठ देवाचे प्रतीक, 7)माणिक पानाडी- सूर्याचे रत्न, लाल रंगाचे स्वामीभक्तीचे प्रतीक, 8) मत्स्य- विष्णूचा पहिला अवतार, दशावताराचे प्रतीक, 9)कूर्म- विष्णूचा दुसरा अवतार, दशावताराचे दुसरे प्रतीक, 10)नरसिंह- संकटसमयी धावून येणार्या दैवताचे प्रतीक, 11)गुलाबफूल- अत्तराचा जनक असलेले फूल, प्रेमाचे प्रतीक, 12)भ्रमर- रसिकांचा राजा, स्वाद घेण्याची क्षमता, सहिष्णुतेचे प्रतीक,13)चंद्र- शीतलतेचे प्रतीक, 14)पाचू- बुध ग्रहाचे रत्न, सांसारिक सौख्य वाढवणारे, साफल्याचे प्रतीक, 15)गंडभैरी- मिथुन चिन्ह, दोन देह पण आत्मा एक, स्त्री- पुरुष मीलनाचे प्रतीक, 16)मोरचेल- सत्तेचे, राजवैभवाचे प्रतीक, पतीला राजवैभव मिळावे ही भावना, 17)मोरपीस- वैभव, विलास, श्रीकृष्णाने आपल्या मस्तकी धारण केलेले पीस, विविधरंगी सौंदर्याचे प्रतीक, 18) शंख-ध्वनीचे प्रतीक, श्रीकृष्णाचे आवडते रणवाद्य, आवाज दुमदुमत ठेवण्याचे प्रतीक, 19)वाघनख- शस्त्राचे प्रतीक, आवाजाला धार यावी म्हणून शंखाजवळ असलेली पानाडी, 20)नाग- स्त्री- पुरुषाच्या अत्युत्तम मीलनाचे प्रतीक, शासनकर्त्याचे प्रतीक, 21)ताईत- साजातील आणखी एक महत्त्वाचे पान, आपल्या पतीला दृष्टिबाधेपासून वाचवण्याचे प्रतीक. ही झाली 21 पानाडी. आता आणखी तीन घटक असेः 1) जवमणी- साजामध्ये प्रत्येक पानास दोन मणी घालणारा डमरूसदृश मणी. हा घडवताना कारागिराचे कसब पणाला लागते. अरुण संकपाळ यांचा पुतण्या रतन श्रीनिवास संकपाळ हा जवमणी घडवण्यात प्रवीण आहे, 2)-घागरी- प्रत्येक पानास 3 पासून 5 घागर्यांचे घोस लावतात. हे जलकुंभाचे प्रतीक आहे. प्रेमाचे प्रतीक, 3)गोंडा- कोल्हापुरी साज हिरव्या रेशमी धाग्यांमध्ये गुंफतात, त्यास लाल रेशमी भरजरी गोंडे लावतात, सौभाग्याचे लेणे.
साजातील पानाड्यांची सुरुवात चाफेकळीपासून होते आणि ताईत हे पान शेवटी येते. 124 सुट्या भागांमधून साज घडतो. 70 ग्रॅमच्या गळाभरून घसघशीत साजाचे 124 भाग आणि नक्षीकामातील इतर भाग जोडायला कारागिराचे कसब पणाला लागते.
दहावी झाल्यानंतर अरुण उद्योगात आले. त्यांच्या पूर्वी लहान मध्यम आणि मोठा असे तीन प्रकारचे साज बनवले जात. त्यांच्या काळात त्यांनी आणखी दोन प्रकारांची भर घातली. आणि आकारानुसार साजाचे पाच प्रकार झाले. त्यांच्या कारखान्यात 15 ग्रॅम 11 जोडपासून पुढे 20- 25- 30- 40-50ग्रॅमपर्यंत आणि त्याच्याही पुढे जाऊन 150 ग्रॅमपर्यंतही साज घडवले जातात. संकपाळ यांच्याकडे बेलपान, वज्रटीक, चाँद चौकी, पारंपरिक मुसलमानी गलसुरी,पेट्या, जवमणी इत्यादी सुटे भाग 80 मिलिपासून दीड-दोन ग्रॅमपर्यंत नग तयार होतात. ही सर्व आभूषणे पूर्णपणे हातांनी बनवले जातात. यात यंत्रांचा वापर केला जात नाही. ही अतिशय नाजूक कारागिरी आहे. सोन्याच्या अतिशय पातळ पत्र्यापासून हे भाग बनवले जातात.
काही महानगरांमध्ये यंत्रांच्या सहाय्याने साज पनवण्याच प्रयत्न केला जातो, पण अस्सल कोल्हापुरी बाजाची सर त्या साजांना येत नाही. साज घडवण्यात कोल्हापूरची मक्तेदारीच आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. सामान्यतः साज घडवण्यासाठी 92 ते 95 टंच सोन्याचा उपयोग केला जातो. एक साज घडवण्यासाठी तीन दिवस लागतात. ग्राहकांच्या मागणीनुसार हॉलमार्क साजही घडवला जातो.
पूर्वीच्या काळी केवळ लाखेचे साज बनवले जात होते. गेल्या दहा वर्षात भरीव आणि भरीव-पोकळ साज बनवण्याची नवी परंपरा अरुण संपाळ यांनी निर्माण केलेली आहे. त्यात लाख नसते. पूर्वीच्या घाटाच्या ठिकाणी आधुनिक पद्धतीचे पदक वापरण्याची पद्धत संकपाळ यांनी सुरू केली. साज खपण्याचे प्रमाण पूर्वीपेषाही आता वाढलेले आहे. हा नमुना अँटिक असल्यामुळं आधुनिक काळातील महिलाही मोठ्या हौसेनं तो गळ्या धारण करतात. सोन्याच्या दरानुसार साजाच्या किंमती बदलतात. लहान 20 ग्रॅम- 1 लाख 22 हजार, त्याहून थोडा मोठा- 25 ग्रॅम- 1 लाख 54 हजार, मध्यम 30 ग्रॅम- 1 लाख 85 हजार, त्याहून मोठा 40 ग्रॅम- 2 लाख 50 हजार, सर्वात मोठा 50 ग्रॅम- 3 लाख 10 हजार रुपये. अर्थात 250 ग्रॅमचा साजही घडवला जातो.
कोल्हापुरात दररोज कमीत कमी शंभर साज विकले जातात. दररोजची तीन कोटी रुपयांची उलाढाल होते. अरुण संकपाळ यांच्याकडून दररोज दोन साज विकले जातात. विक्रीमध्ये वस्तुविनिमयाचा भाग असतो, तथापि, त्यांची दरमहा 60 लाखांची उलाढाल असते. संकपाळ हे उत्पादक असल्याने त्यांचा संबंध व्यापार्यांशी असतो, थेट ग्राहकांशी नसतो. संकपाळ यांनी घडवलेले साज संपूर्ण भारतासह इंग्लंड, कॅनडा, अमेरिका, पोर्तुगाल, फ्रान्स, रशिया, स्वीडन, दुबई याही देशात निर्यात होतात. इग्लंडच्या राणीच्या गळ्यातही कोल्हापुरी साज आहे आणि तो थेट कोल्हापुरातूनच गेलेला आहे, असे अरुण संकपाळ सार्थ अभिमानानं सांगतात.
ह्या उद्योगात स्वतः अरुण, त्यांचा मुलगा कपिल, पुतण्या रतन यांच्यासह विश्वास माने, गोपाळ सांगवडेकर, अक्षय कांबळे, शहाजी शेख, अभिजित जाधव, उत्तम पवार, सार्थक चौगुले हे कारागीर कार्यरत आहेत.
ग्राहकांमध्ये गोडवा निर्माण करणारे ढिसाळ फरसाण स्वीट मार्ट
कोल्हापुरातील भाऊसिंगजी रोडवर गेली ६० वर्षांपासून महानगपालिकेसमोर असणारे ढिसाळ यांचे सर्वात जुने दुकान होय. प्रसिद्ध खत्री यांच्या मिठाईच्या दुकानानंतर गोड आणि नमकिन पदार्थ बनवणारे ढिसाळ फरसाण स्वीट मार्ट नावाने दुकान नावारूपास आले. सध्या या दुकानाचे सर्व काम दिलीप ढिसाळ हे १९७५ पासून ते आजतागायत पाहतात. या कामात त्यांना त्यांचा मुलगा विजय ढिसाळ मदत करतात. हा व्यवसाय पुढे नेणारे दिलीप ढिसाळ यांची ही दुसरी पिढी आहे. फरसाण आणि पेढ्यांसाठी प्रसिद्ध असणारे ढिसाळ हे स्वत: दिवाळीच्या सणासाठी लागणारे सर्व पदार्थ आणि फराळ तयार करून विकतात. उत्कृष्ट प्रतीचे आणि रुचकर फराळ बनविण्यात ढिसाळ यांचा हातखंडा आहे. अप्रतिम चव आणि गुणवत्ता असल्याने विविध पदार्थांची दिवाळीच्या सणामध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री होते. शिवाय इतर गोडधोड आणि नमकिन पदार्थांची रिटेल आणि होलसेल विक्री होतच असते.
दिवाळीत होते गोडधोड-नमकीनची प्रचंड विक्री
दिवाळीचा फराळ म्हणजे गोडधोड. फराळ आपल्या नातेवाईंकामध्ये-शेजाऱ्यांना देऊन सामाजिक बंध जपण्यासाठी दिवाळीचा काळ उत्तम मानला जातो. समाजाची वीण घट्ट होण्यासाठी फराळ हे एक माध्यम ठरते. याकाळात अनेक गोड, खारे पदार्थ विक्रीची दुकाने पदार्थांनी सजलेली असतात. ढिसाळ यांच्याकडेही दिवाळी फराळाची मागणी अधिक असते. अधिकरून फराळामध्ये पुडाची वडी, मसाला वडी, तिखट शेव, चिवडा याची मागणी प्रचंड असते. ढिसाळ यांच्याकडे दिवाळीमध्ये तब्बल १० प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. त्यामध्ये गोड-नमकिन खारी बुंदी, रवा-बेसन-बुंदीचे लाडू, चिवडा, मसाले चिरोटे, शंकरपाळे, चकली, म्हैसूरपाक, बारीक-मोठी शेव, भाकरवडी, करंज्या अशा पदार्थांचा समावेश आहे. हे सर्व पदार्थ मिळून तब्बल एक ते दीड टन मालाची विक्री दिवाळी काळात होते. महत्त्वाचे म्हणजे, ढिसाळ हे स्वत: हे फराळ तयार करतात. खूप जुने दुकान असल्याने आणि ग्राहकांची विश्वासर्हता टिकून राहिल्यामुळे असंख्य गिऱ्हाईकांची रिघ ढिसाळ यांच्या दुकानामध्ये लागलेली असते.
६० वर्षांपूवीचे दुकान आणि उद्योग
कोल्हापुरातील जुन्या खुणा असलेले ढिसाळ फरसाण स्वीट मार्ट या दुकानाचा जसा जुना लूक होता, तो आताही तसाच आहे. पांडुरंग ढिसाळ यांनी आपले भाऊ खंडेराव यांच्यासोबत मिळून १९६८ रोजी यांनी हे दुकान उभारले होते. कोल्हापुरातील प्रसिद्ध खत्री यांच्या दुकानानंतर ढिसाळ यांचे फरसाण दुकान सर्वात जुने आहे. पांडुरंग आणि खंडेराव या ढिसाळ बंधूंनी आपला स्वत:चा उद्योग उभारावा ही इच्छा बाळगून हे दुकान सुरु केले. पुढे जाऊन पांडुरंग यांच्या आणखी दोन भावंडांनी नोकरी सोडली आणि या दुकानासाठी हातभार लावला. असे ढिसाळांची चार भावंडे फरसाण स्वीट मार्ट उद्योगात जोडले गेले. पुढे त्यांनी स्वत:चा कारखाना काढून मिठाई, नमकीन पदार्थ बनवणे सुरु केले. कालानुरुप, त्या-त्या भावंडांनी आपले स्वतंत्र उद्योग उभे केले.
चविष्ट फरसाण तयार करणे ही ढिसाळ बंधूंची खासियत आहे. त्यावेळीही फरसाणला प्रचंड मागणी होती आणि आजदेखील ढिसाळ यांच्या सर्व पदार्थांना ग्राहकांची पसंती आहे. आजदेखील कोल्हापुरी मिसळसाठी लागणारे फरसाण ढिसाळ यांच्याच कारखान्यातून खरेदी केला जातो. जसजसा उद्योग वाढत गेला, तसतसे दुकानामध्ये विविध वस्तू विक्रीला ठेवण्यात आले. यामध्ये पेढे, लाडू, मिठाई, मलई बर्फी, खवा पेढे, खवा बर्फी या पदार्थांचा समावेश आहे. खासकरून ढिसाळ यांच्याकडे कंदी पेढ्यांचीही अधिक मागणी असते. पेढे आणि बर्फी चार दिवसांपासून अधिक काळ टिकू शकत नाहीत. पावसाळ्यात-उन्हाळ्यात माल अधिक खराब होतो. त्या काळात मालाची क्वांटीटी कमी केली जाते. त्यामुळे पेढे, बर्फीसारखे गोड पदार्थ बनवण्यापासून ते विक्री होऊपर्यंत टिकून राहण्यासाठी खूप काळजी घ्यावी लागते. म्हणून जोखीम घेऊन हे पदार्थ तयार करावे लागतात.
नृसिंहवाडीतून आणला जातो खवा
फराळाचे पदार्थ असो किंवा अन्य मिठाईसाठी लागणार खवा खास शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी (जि. कोल्हापूर) या गावातून आणला जातो. (कृष्णा - पंचगंगा संगम स्थळ असलेली नृसिंहवाडी खव्यासाठी प्रसिद्ध आहे.) या खव्याची उत्कृष्ट चव आहे. शुद्ध दूध आणि अस्सल खव्यापासून ढिसाळ हे अनेक पदार्थ आपल्या कारखान्यामध्ये बनवतात. यासाठी कारखान्यामध्ये ३ कारागीर काम करतात. कोल्हापुरातच लक्षतीर्थ वसाहत जवळ सुतारमळा येथे हा कारखाना आहे. विशेष म्हणजे सर्व पदार्थ हातांनी बनवले जातात. कुठल्याही मशीन्सचा वापर ते करत नाहीत.
जशी मागणी येईल तसा पदार्थांचा पुरवठा केला जातो. कारखान्यात तयार होणारा माल टेम्पोतून दुकानात आणला जातो. शहरातल्या शहरात दुकान आणि कारखाना यांच्यातील अंतर फार नसल्याने वाहतुकीचा खर्च वाचतो. त्यांची वार्षिक उलाढाल ३० लाख आणि वार्षिक नफा सुमारे १० लाख इतका आहे.
ढिसाळ यांना या उद्योगाचा डोलारा उभारताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. पण, संकटसमयी दिलीप यांचा भाचा आणि मेव्हणे यांच्याकडून मदत मिळाली आणि पुन्हा डौलात कारखाना सुरु झाला. गिऱ्हाईक आमचे दैवत अशी टॅगलाईन घेऊन दिलीप ढिसाळ यांचा फरसाण स्वीटमार्ट उद्योग आता प्रगतीपथावर सुरु आहे.
दिलीप ढिसाळ मोबाईल क्र - ९६३७८३७७८४
विजय ढिसाळ मोबाईल क्र- ८७९६४४६०६१
ठसकेबाज ठुशीचे उत्पादकः भवानी गोल्ड अँड सिल्व्हर
कोणत्याही सोहळ्यात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे दागिने बघायला मिळतात. पण त्यातल्या ठुशी ह्या आभूषणाचा ठसका काही निराळाच आहे. वैविध्यपूर्ण दागिन्यांंमध्ये ठुशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता मागणीनुसार बाजारामध्ये विविध प्रकारच्या ठुशीच्या वेगळ्या डिझाईन्स दिसतात. इतकंच नाही, तर मंगळसूत्रांमध्येही ठुशीचं डिझाईन दिसून येतं. ठुशीतल्या पदकाचा भाग हा हिर्यांनी अथवा खड्यांनी सजलेला असतो. ठुशी हा खरं तर खास मराठी दागिना म्हणून ओळखला जातो. हा दागिना गळ्याभोवती बांधला जातो. ठुशीच्या मध्यभागी पाचू, माणिक, रत्न यासारखे खडे जोडले जातात. ठुशी म्हणून खरं तर ठासून भरलेले गोल मणी. छोट्या मण्यांच्या गळ्याबरोबर असलेला हा दागिना अत्यंत उठावदार असून कोणत्याही वयाच्या स्त्रीचं सौंदर्य खुलवून दाखवतो.
ठुशीच्या उत्पादनात कोल्हापूरच्या भवानी गोल्ड अँड सिल्व्हर ह्या उद्योगाचं स्थान अग्रभागी आहे. हे उद्योजक आहेत वैभव सुरेंद्र पुरवंत. पूर्वीच्या काळात स्त्रिया पायाच्या बोटांत चांदीच्या मासोळ्या घालत असत. वैभव यांचे आजोबा नारायण यांनी ह्या मासोळ्यांचं उत्पादन 1920 मध्ये सुरू केलं. हे उत्पादन थेट ग्राहकांपर्यंत जायचं. मधे दलाल नव्हता.1971 मध्ये सुरेंद्र पुरवंत यांनी प्रामुख्याने चांदीची इतर उत्पादनं करायला सुरुवात केली. त्यांनी चांदीची अनेक आभूषणे आणि वस्तू व्यापार्यांमार्फत परप्रांतात पाठवली. नंतर वैभव पुरवंत यांनी चांदीकडून सोन्याकडे प्रवेश केला. ठुशी हा खास कोल्हापुरी अलंकार गेल्या 400 वर्षांपासून प्रसिद्ध आहे. पण मध्यंतरी एका वाहिनीवर ‘जय मल्हार’ ही मालिका आली आणि त्यातल्या म्हाळसाच्या गळ्यातील ठुशी पाहून ती स्त्रियांमध्ये नव्याने अतिप्रिय ठरली. तेव्हा वैभव पुरवंत यांनी हे अचूक हेरलं आणि इतर दागिन्यांपेक्षा कोल्हापुरी धाटणीच्या ठुशीवर लक्ष केंद्रित केलं. आत वैभव यांच्यासोबत त्यांचा मुलगा तनिष्क हाहि ठुशी घडवण्यात वाकबगार झालेला आहे.ठुशीमध्ये आठ प्रमुख प्रकार आहेतः एकेरी पानाडी ठुशी, पूर्ण झालर ठुशी, अर्धी झालर ठुशी, महाळसा ठुशी, वज्रटीक ठुशी, बेलपान ठुशी, टीक ठुशी, घाटदार ठुशी. ह्या सर्व प्रकारच्या ठुशीचं उत्पादन वैभव पुरवंत करतात. त्यांची ठुशी कोल्हापूर परिसरासह प्रामुख्यानं मराठवाड्यात जाते. कमीत कमी अडीच ग्रॅम वजनापासून ठुशी घडवता येते. मग ग्राहकाच्या मागणीप्रमाणे जास्तीत जास्त कितीही वजनाची ठुशी घडवता येते. अडीच ग्रॅम वजनाची ठुशी सुमारे वीस हजार रुपये किमतीची असते.
आधुनिक ठुशीमध्ये टेंपल ज्वेलरी हा प्रकार घडवला जातो. ह्या ठुशीमध्ये पदकावर श्रीमहालक्ष्मीचा ठसा असतो. ठुशी तयार करण्यासाठी लागणार्या मण्यांचे चार प्रकार असतात. ह्या चार प्रकारांचे संमिश्र नक्षीकाम घेऊन ठुशी गाठवली जाते. पैकी मण्यांचे आणि त्यातही लाखी मण्यांचे उत्पादन फक्त कोल्हापुरात केले जाते. पोत मणी, स्पॉट माणी, जवमणी, लाखी मणी (किंवा नक्षी मणी) हे चार प्रकार वापरून ठुशी घडवली जाते. गहू मणी हाहि एक प्रकारचा वैशिष्ट्यपूर्ण मणी आहे, पण त्याचा उपयोग अपवादाने केला जातो.
ठुशी गाठवण्याचेही दोन प्रकार आहेत. पारंपरिक पद्धतीनुसार वज्रटीक ही गादीवर गाठवली जाते, तर ठुशी नायलॉन दोर्यात गाठवली जाते. केंद्र शासनाच्या नियमानुसार 18, 20 आणि 22 कॅरेट सोन्यामध्ये ठुशीचं उत्पादन केलं जातं. ठुशीबरोबरच वैभव यांची इतर आभूषणांची सगळी उत्पादने मागणीनुसार व्यापार्यांकडे जातात. वैभव यांच्याकडून दरमहा जवळ जवळ 30 ठुशींचे उत्पादन होते व त्यांची विक्री होते. ठुशीबरोबरच सोन्यामधले बंगाली धाटणीचे दागिनेही वैभव पुरवंत घडवतात. त्यांची वार्षिक उलाढाल 70 लाखांच्या आसपास आहे.
ठुशीचे आणखी काही प्रकार असे आहेतः
महालक्ष्मी ठुशी
हा प्रकार इतिहासकालीन दागिन्यांपैकी एक आहे. ही ठुशी भरीव असते. तसंच यामध्ये ठुशीचे जास्त पदर असतात. पारंपरिक ठुशीमध्ये एकच माळ असते. पण या ठुशीमध्ये एका खालोखाल एक असे हाराप्रमाणे पदर असतात. तिला एक राजघराण्यातील दागिन्यांचा लुक असतो. ही ठुशी परिधान केल्यावर गळा अगदी भरलेला दिसतो.
क्लासिक गोल्डन ठुशी
काही स्त्रियांना पारंपरिक रूपाच्या ठुशी आवडत नाहीत. त्यांच्यासाठी आधुनिक नक्षीकाम असलेली ही ठुशी आहे.हे नक्षीकाम बारीक असतं. तुकोणत्याही प्रकारच्या कपड्यांवर ही ठुशी घालता येते. पारपंरिक ठुशीमध्ये मण्यांची एकमेकांमध्ये गुंफण असते. पण तशी गुंफण ह्या ठुशीत नसते. हल्ली अनेक समारंभामध्ये साडीपेक्षा घागरा आणि चोळी घालण्याची फॅशन आली आहे. त्यामुळे अशा फॅशनेबल कपड्यांवर अशी ठुशी खूप शोभून दिसते.
कोल्हापुरी लांबट मण्यांची ठुशी
प्रत्येक ठुशीचं डिझाईन हे वेगळं असतं. ठुशी ही गळ्याभोवतपरिधान केली जाते, म्हणून तिचा आकार गोलाकार असतो. ह्या कोल्हापूरी प्लेन लांबट मण्यांच्या ठुशीमध्ये बर्यापैकी लांबट आकाराची ठुशी मिळते. यामध्ये लांबट मणी असल्यामुळेच याला लांबट ठुशी असं म्हटलं जातं. काही लोकांना गोल आकाराचे मणी आवडत नाहीत अथवा काही जणांना नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं घेण्याची हौस असते. त्यांच्यासाठी अशा प्रकारची ठुशी नक्कीच उपयोगी पडते. एक वेगळ्या पद्धतीचा अलंकार परिधान केल्याचा आनंद मिळतो.
हस्तकारागिरीची ठुशी
या ठुशीला पारंपरिक ठुशीप्रमाणेच जास्त प्रमाणात मागणी आहे. सध्या सोन्याप्रमाणेच चांदीच्या ठुशीची मागणीही वाढताना दिसून येत आहे. ह्या ठुशी वेगवेगळ्या डिझाईनच्या साड्यांवर अथवा कुर्त्यांवरही खुलून दिसतात. ज्यांना कॉटनच्या साड्या अथवा ड्रेस घालण्याची हौस आहे त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. शिवाय हस्तकारागिरी असल्याने त्यांचे अनोखेपण शोभून दिसते.
कोल्हापुरी वज्रटिक ठुशी
खास कोल्हापुरी बाज असलेली वज्रटिक ठुशी पूर्वी केवळ कोल्हापूर परिसरात जास्त वापरात होती.तिचे नक्षीकाम आणि मणी इतके आकर्षक असतात की, आता याची मागणी बाहेरही खूप वाढलेली आहे. वज्रटिक ठुशीचं डिझाईन हे महालक्ष्मी ठुशीशी मिळतंजुळतं आहे. तिच्यामध्ये कोल्हापुरी ठसका दिसून येतो. अगदी भरलेल्या मण्यांची अशी ही ठुशी घातल्यानंतर भारदस्तपणाचा अनुभव येतो. -
डिझाईनर ठुशी
पारंपरिक दागिने प्रत्येक स्त्रीला आवडतातच असं नाही. आता वेगवेगळ्या फॅशनेबल कपड्यांवर तसे फॅशनेबल दागिने परिधान करायला पसंती दिली जाते. तशा वैविध्यपूर्ण कपड्यांवर अशा प्रकारच्या डिझाईनर ठुशी घालून परंपरा आणि आधुनिकता असा मेळ साधता योतो. ह्य ठुशीमध्ये वेगळी वेणी ठुशी अथवा वेगवेगळ्या रंगाच्या ठुशी घेता येतात.
राजस्थानी कंठी ठुशी
आता फक्त महाराष्ट्रातच नव्हे, इतर प्रांतातही ठुशी लोकप्रिय झालेली आहे. राजस्थानी कंठी ठुशी हा अलंकार आता सर्वत्र वापरला जातो. हे डिझाईन राजस्थानी बाजाने बनवण्यात आलं असलं तरी त्याचं महाराष्ट्रीय वैशिष्ट्य जपलेलं असतं. वेगळ्या प्रकारच्या आधुनिक पेहरावावर अशा प्रकारची राजपूती कंठी ठुशी वापरली तर ती निश्चितच छान शोभून दिते. ही फॅशन सध्या खूप प्रचलित झालेली आहे. बर्याच डिझाईनर लेहंग्यावर अशा प्रकारचे दागिने सुंदर दिसतात.
फॅन्सी ब्रॉड ठुशी
ही अधिक फॅशनेबल ठुशी आहे. हिचा एक पदर मोठा असतो. ह्या ठुशीचं डिझाईन योग्य तर्हेने बनवण्यात आलेलं असतं. परंपरागत ठुशीप्रमाणे हिचं डिझाईन नाही. हिचे मणी अगदी एकमेकांमध्ये गुंफलेले नसतात. तसंच यामध्ये काही ठिकाणी मोती आणि इतर खड्यांचाही वापर करण्यात येतो. पारंपरिक ठुशीमध्ये तसा करण्यात येत नाही.
गडी ठुशी
महालक्ष्मी आणि वज्रटिक ठुशी या दोन्हींचा सुरेख मेळ म्हणजे गडी ठुशी. हिचं डिझाईन थोडं वेगळं असतं. ही ठुशी अगदी गळ्याबरोबर घातली की, तिचा उठाव खूपच सुंदर दिसतो. वरच्या बाजूला केवळ डिझाईनची पट्टी आणि तिच्याखाली गुंफलेले मणी असा हा दागिना घातल्यानंतर अधिक आकर्षक दिसतो. डिझाईनर साडीवरदेखील ही गडी ठुशी उठून दिसते. ही ठुशी भारदस्त असते, म्हणून तेवढी एकच परिधान केली, तरी व्यक्तिमत्त्व आकर्षक दिसतं.
ठुशी मंगळसूत्र
मंगळसूत्र हा प्रत्येक विवाहित महिलेच्या जिव्हाळ्याचा विषय. ठुशीमध्येही मंगळसूत्राचे वेगवेगळे डिझाईन्स मिळतात. मंगळसूत्रांची विविध प्रकारची आकर्षक डिझाईन्स असतात. ठुशीच्या डिझाईन्समधलं मंगळसूत्र अधिक आकर्षक दिसतं. अगदी गळ्याबरोबरील मंगळसूत्रापासून ते ठुशीच्या डिझाईन्सच्या लांबलचक मंगळसूत्रचे हरेक नमुने मिळतात. कोल्हापुरी पद्धतीचा केवळ एक डाळिंबी रंगाचा खडा आणि बाकी काळ्या मण्यांचा ठुशीप्रमाणे गुंफलेला हार हा मिलाफ अधिक महिलाप्रिय आहे. ठुशीप्रमाणे गुंफलेले सोन्याच्या रंगाचे मणी आणि काळ्या मण्यांची त्याला जोडलेली माळ यालाही बरीच मागणी आहे. हे ठुशी मंगळसूत्र दिसायला मोठं आणि आकर्षक दिसतं.
सालिह
**स्वालिया** (Swaliya / Swaliha) या नावाचा मुख्य अर्थ **"पुण्यवान", "सदाचारी", "धार्मिक" किंवा "चांगल्या ...
-
कोल्हापूर समग्र दर्शन ओळख पुरेपूर कोल्हापूर *मुख्य परिचय (Introduction)* ⦁ कोल्हापूरचे ऐतिहासिक, भौगोलिक आणि सांस्कृतिक महत्त्व ⦁ दक्षिणेच...
-
केशवराव भोसले नाट्यगृह म्हणजेच पूर्वाश्रमीचे पॅलेस थिएटर. शाहू महाराज १९०२ साली विलायतेस जागतिक दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी रोमलाही...
-
Pudhari News Published on: 10 Mar 2021, 8:21 am ब्रेकअप झाल्यानंतरच्या अनेक विचित्र घटना आपण ऐकल्या, पाहिल्या असतील. ब्रेकअपनंतर कुणी डिप...
