Tuesday, November 28, 2023

धातूंच्या मूर्ती, पुतळे यांसह प्रभावळी- मखरांतही प्राविण्य!

 यशकथा

- sp

 गोव्याच्या फातर्फा येथील श्रीशांतादुर्गा देवीसमोर मी उभा होतो. दर्शन घेता घेता देवीची चांदीची नक्षीदार आणि अतीव सुंदर प्रभावळ लक्ष वेधून घेत होती. नंतर कासारपालला गेलो. तिथल्या श्रीमहामाया कालिका मंदिरात गेलो. तिचं दर्शन घेताना पुन्हा लक्ष वेधून घेतलं ते तिच्या चांदीच्या प्रभावळीनं. आणखी काही मंदिरात गेलो. तिथंही तशाच प्रभावळी, तशीच आसने. तर लक्षात आलं की, ह्या सगळ्या प्रभावळी आणि आसनांची घडण एका प्रकारची आहे. एकाच कलाकाराच्या हातून त्यांची निर्मिती झालेली आहे.  मी सहज म्हणून महाजनांकडे चौकशी केली, तर त्यांनी मला सांगितलं की, ह्या प्रभावळी आणि इतर सर्व चांदीच्या, पंचधातूंच्या जडणघडणीचे शिल्पकार कोल्हापूरचे आहेत. त्यांचं नाव आहे, सचिन  सदानंद ओतारी.
ओतकाम हा ओतारी समाजाचा परंपरागत उद्योग. ओतारी समाजात सगळ्यांचं आडनाव ओतारीच असतं. सोन्यापासून जस्तापर्यंत सर्व प्रकारच्या धातूंचं ओतकाम हा समाज करतो. सचिन ओतारी यांच्या वडिलांचा बफिंगचा आणि पॉलिश कामाचा व्यवसाय होता. त्यामुळे सचिन हेहि बारावी झाल्यानंतर पॉलिशचं काम करायला लागले. चांदीच्या मूर्ती, मखरं, प्रभावळी यांना ते पॉलिश करायचे. पण मग एके वर्षी चांदीचे दर गगनाला भिडले. चांदीची कामं खूप कमी झाली. त्यामुळं अर्थातच पॉलिशची कामंही मंदावली. एकदा एका व्यापार्‍यांनी सचिन ओतारी यांना दुर्गा देवीच्या मूर्तीचं ओतीव काम करायला सांगितलं. ओतकाम हा परंपरागत व्यवसाय सचिन हे बघत, बारकाईनं निरीक्षण करत आले होते. ही दुर्गेची मूर्ती अश्वारूढ  हवी होती. अगदीच नवख्या असलेल्या सचिन यांनी अश्वारूढ दुर्गेची मूर्ती बनवायला घेतली. पंचधातूंमधून ही मूर्ती घडवायची होती. सोनं, चांदी, तांबे, पितळ आणि जस्त असे पंचधातू. पितळ हा मुख्य धातू. इतर धातू आवश्यक त्या प्रमाणात. मूर्तीचा मेणाचा साचा बनवला. मातीच्या पेटीत तो दाबून बसवला. त्यात रस ओतला. आणि त्यानंतर विविध प्रक्रिया करून ही मूर्ती तयार करण्यात आली. 2003 मध्ये ह्या मूर्तीची किंमत वीस हजार रुपये झाली. अपार परिश्रम होते, पण त्यातून सचिन यांच्यातील कलाकार आकारास येत होता.
ही अश्वारूढ दुर्गेची मूर्ती लोकांनी पाहिल्यावर ते प्रभावित झाले. मग त्यांच्याकडे विविध मूर्तींची मागणी यायला लागली. सचिन यांनाही ओतकामात अधिकाधिक प्राविण्य मिळत गेले. त्यांच्या कामातील कौशल्य आणि सफाईदारपणा लोकांना आकृष्ट करत होता. दरवर्षी 15 ते 18 मूर्ती घडवण्याची मागणी यायला लागली. तेवढ्या मूर्ती ते बनवायला लागले. ओतीव मूर्तीकामाबरोबरच सचिन यांनी नक्षीकामाच्या क्षेत्रात प्रवेश केला. मंदिरातील मूर्तीच्या पाठीमागील प्रभावळी, उंबरठा, चौकट, दरवाजे ही सगळी कामे ओतकाम करून मूय स्वरूपात तयार करणं आणि त्यावर नक्षीकाम करणं यात सचिन तरबेज होत गेले. त्यांनी कोल्हापुरातील गुजरीतील आझाद गल्लीत कारखाना सुरू केला. कामांची सुरुवात कोल्हापुरातून झाली. नंतर बाहेरगावच्या अनेक ग्राहकांनी मागणी करायला सुरुवात केली. अर्धा महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातून त्यांना प्रचंड मागणी यायला लागली. मूर्ती आणि नक्षीकामासाठी ते सर्वत्र जायला लागले. आधी ज्या त्या ठिकाणी जायचं, तिथली मापं घेऊन यायचं, येऊन कामं घडवायची आणि नंतर ती घेऊन जाऊन त्या त्या ठिकाणी पक्की बसवायची. एक महिना आधी मागणी नोंदवून घेतल्यानंतरच ते काम करायला घेतात.
पहिल्यांदा मातीचं मॉडेल बनवायचं,  त्यानंतर त्याचा प्लास्टर मोड बनवायचा, नंतर मेण किंवा फायबरयात प्रतिकृती तयार केली जाते. मॉडेल मातीच्या पेटीत दाबायचं आणि तयार झालेल्या साच्यात धातूचा रस ओतायचा. त्यातून मूर्ती तयार होते. मग कानस आणि ग्राइंडर यांनी घासून त्यानंतर चेहरा, डोळे, दागिने, मुकुटातील नक्षी इत्यादी काम मोळ्यांनी कोरून घ्यायचं. शेवटी पॉलिश करायचं. नक्षीकामासाठी पहिल्यांदा हव्या असलेल्या आकारात कागदावर आरेखन करायचं, ते नक्षीकाम सपाट पत्र्यावर चिकटवायचं. मुख्य नक्षीचा भाग उठाव करून घ्यायचा आणि मग त्यात लाख भरून फिनिशिंग करायचं अशी प्रक्रिया असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, श्रीस्वामी समर्थ, श्रीगणपती, श्रीजोतिबा, श्रीदुर्गा, श्रीमहालक्ष्मी, श्रीकालभैरव अशा अनेक देवदेवता यांच्या मूर्ती, बकर्‍यांचे आणि इतर प्राण्यांचे पुतळे तसेच असंख्य मखरे आणि प्रभावळी अशी अनेकविध कामे सचिन करत आलेले आहेत. सचिन ओतारी यांच्या एकसंबा येथील बकर्‍यांचे पुतळे, कोल्हापुरातील साई मंदिर येथील आसन, प्रभावळ आणि मूर्ती, गोव्यातील कालिका मंदिर आणि शांतादुर्गा मंदिर येथील प्रभावळी, कोल्हापुरातील श्रीअंबाबाई मंदिरातील उत्सवमूर्तीचे आसन आणि प्रभावळ यासह अशा अनेक कामांची तज्ज्ञ, भाविक, सामान्य लोक यांच्याकडून वाखाणणी झालेली आहे.
सचिन ओतारी यांचा मोठा मुलगा ऋतुराज ओतारी कलामंदिर महाविद्यालयात शिल्पकलेचं प्रशिक्षण घेत आहे. मॉडेल बनवणं, फायबर तसेच दगड आणि लाकूड यात कोरीव काम करणं, धातूच्या ओतकामाची प्रक्रिया इत्यादी विषयात तो अधिकाधिक प्राविण्य मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरा मुलगा एम. बी. ए. शिकत आहे. दोन्ही मुलगे कामात तरबेज असून सचिन यांना कामात हातभार लावीत आहेत. वार्षिक  पंधराहून अधिक लाखांची आर्थिक उलाढाल होत आहे.
संपर्क- 9225800334
इन्स्टाग्राम- _shrisamartharts_

पी. डी. सावंत - सेंद्रीय शेतीतून उभारला लाखांचा उद्योग

- स्वालिया शिकलगार

पांडुरंग दिगंबर सावंत हे एक सेंद्रीय शेती करणारे शेतकरी आहेत. याच सेंद्रीय शेतीतून त्यांनी लाखोंचा नफा मिळणारा सेंद्रीय उत्पादनांचा उद्योग उभारला. हा उद्योग उभारण्यात त्यांची पत्नी पूजा सावंत यांची खंबीरपणे साथ मिळाली. दोघे मिळून शेती आणि उद्योग पाहतात. सिकंदर टाकळी (ता. मोहोळ, सोलापूर) या ठिकाणी पी. डी. सावंत यांची तब्बल २० एकर शेती आहे. इतक्या मोठ्या जागेत केवळ सेंद्रीय शेती केली जाते. सेंद्रीय शेती काळाची गरज ओळखून केवळ नफा न बघता पयार्वरणाचे संवर्धन व्हावे आणि जमिनिचा कस टिकून राहावा, यासाठी सेंद्रीय शेती केली आणि यातूनच सेंद्रीय उत्पादनांची विक्री करणारा सावंत ऑरगॅनिक फार्म या नावाने उद्योग आज दिमाखात उभा आहे.
पी. डी. सावंत यांचे शिक्षण मेकॅनिकल इंजिनिअरींग (१९८१) झाले आहे. ते सुरुवातीला शुगर इंडस्ट्रीमध्ये ट्रेनी इंजिनिअर म्हणून रुजू झाले. १९८२-८३ मध्ये महाराष्ट्र सरकारच्या पाटबंधारे विभागात ज्युनिअर इंजिनिअर म्हणून काम पाहिले. पुढे १९८५ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन आरटीओ झाले. शासकीय नोकरी सांभाळत असताना पी. डी. सावंतांचे वडील दिगंबर सावंत यांचे सन २००४  मध्ये निधन झाले. त्यानंतर वडील दिगंबर सावंत यांनी कष्टाने उभारलेली शेतीची जबाबदारी पी. डी. सावंत यांच्याकडे आली. एकीकडे आरटीओची नोकरी आणि दुसरीकडे शेती अशी दुहेरी जबाबदारी पी. डी. सावंत यांच्यावर येऊन पडली.
दरम्यान, सेंद्रीय शेतीमधील विविध नवनव्या प्रयोगाविषयींचा अभ्यास करण्यासाठी पी. डी सावंत यांनी न्युझीलँड आणि ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. त्यावेळी न्युझीलँडच्या दौऱ्यात तेथील सेंद्रीय शेती ही किती उपयोगी आहे, हे पाहून त्यांनी सेंद्रीय शेतीच करण्याचे ठरवले.
सेंद्रीय शेती कशी करावी, यासाठी त्यांनी सन २००६-२००७ मध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली, राहुरी कृषी विद्यापीठ येथील तज्ज्ञांचे मागदर्शन घेतले. शेतीसाठी पाणी, जमिनीचे परीक्षण, हवामान या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर  सिकंदर टाकळी येथील गावात मातीत फळबागांची लागवड चांगल्या पद्धतीने होईल, असे निष्पन्न झाले. त्यानुसार, शेतामध्ये काही जातीवंत रोपे व कलमे आणून लावली. सुरुवातीला भौतिक फळपद्धतीने लागवड केली.
नफा देणारी भौतिक फळपद्धत लागवड
सेंद्रीय शेती करताना त्यांनी हापूस, केशररत्न आंबा, कालिपत्ती चिकू, नारळ, मोठा आवळा (कांचन ७), सर्व प्रकारचे लिंबू, सीताफळ, चंदन, साग, औषधी वनस्पती-रुद्राक्ष, बेहडा, अश्वगंधा यासारखी फळे आणि औषधी वनस्पतींची लागवड केली. शेतात राशींनुसार नक्षत्र गार्डन देखील उभारले. यासाठी भौतिक फळपद्धत वापरण्यात आली. (भौतिक फळ पद्धत म्हणजे एक फळ नाही आले तर दुसरं पिक येते)
अवषर्णग्रस्त भाग असूनही पाण्याचे उत्तम नियोजन
अवषर्णग्रस्त भाग असून देखील पी. डी. सावंत यांनी विहीर, शेततळे आणि ठिबक सिंचनच्या माध्यमातून पाण्याचे व्यवस्थापन करण्यात आले. शेतात सेंद्रिय फळबागा आणि मिश्रपिकेदेखील घेतली गेली. लसुण, हरभरा, भूईमूग, कारले, ज्वारी, गहू, उसासोबत आंतरपिकेदेखील घेतली. सेंद्रिय केशररत्न आंब्याचे उत्पादन घेण्यात आले. हा आंबा लंडन तेसच स्वित्झर्लंडला निर्यात करण्यात आला. आवळा आणि सर्व जातीचे लिंबू दुबई येथे निर्यात करण्यात आले. तसेच कोणतेही केमिकलयुक्त किटकनाशकांचा वापर न करता शेण, गोमूत्रापासून त्याचबरोबर गांडूळ खते, निम अर्कची फवारणी पिकांवर करण्यात आली. यामुळे फळे पिकांची चव, वास, रंग आणि अधिक काळ टिकून राहण्याची क्षमता अधिक राहिली.
सेंद्रिय उद्योग उभा करण्यात पत्नीची मोलाची साथ
पांडुरंग सावंत यांच्या पत्नी पूजा सावंत यांना शेती करताना आपण एखादा सेंद्रिय उद्योग उभारावा, अशी कल्पना सुचली. आपल्याच सेंद्रिय शेतीतून आलेली फळे-पिके यांच्यावर प्रक्रिया करून ती बाजारपेठेत आणण्याचे प्रयोजन आखले. त्यानुसार, सांवत जोडप्याने माकेर्टिंग, बाजारपेठेचे आव्हान असतानादेखील आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर सेंद्रिय उत्पादनांचा उद्योग उभारला.
सोलापूर ते कोल्हापूर असा कच्च्या मालाचा प्रवास
सेंद्रिय शेतीतून मिळणारी पिके, फळे, औषधी वनस्पती थेट सोलापुरातून कोल्हापुरात आणला जातो. कोल्हापुरातील गोकूळ शिरगाव येथील कारखान्यात प्रोसेसिंगसाठी कच्चा माल आणल्यानंतर त्यावर प्रक्रिया केला जातो. कच्च्या उत्पादनावर प्रक्रिया करून ते बॉटल्समध्ये भरणे, बॉटल्सचे डिझायनिंग-लेबलिंग करणे तसेच पॅकेजिंग केले जाते. या सर्व प्रक्रियेसाठी  दुसऱ्या फूड इंडस्ट्रीची मदत घेतली जाते. पक्का माल तयार झाल्यानंतर ती उत्पादने कोल्हापुरातील 'सावंत ऑरगॅनिक मार्ट मॉल' याठिकाणी पोहोचवली जातात.
सावंत ऑरगॅनिक मार्ट मॉल दिमाखात उभा
सावंत ब्रँडची उत्पादने एकाच छताखाली मिळावी, यासाठी कोल्हापूर शहरात सावंत ऑरगॅनिक मार्ट नावाने मॉल उभारण्यात आला आहे. फळांपासून तब्बल ५० प्रकारची उत्पादने घेतली जातात. त्याचसोबत जवळपास ५०-६० विविध प्रकारचे धान्य, कडधान्य आणि इतर उत्पादने मॉलमध्ये विक्रीसाठी ठेवली जातात. आवळ्यापासून कँडी, च्यवनप्राश आणि गोड, तिखट लोणचे, आवळा कँडी बनवली जाते. आंब्यापासून पल्प, जाम, लोणची बनवले जाते. नारळापासून कोकोनेट ऑईल तयार केले जाते. ८६०३२ हा या उसापासून काकवी, गूळ आणि गूळ पावडर बनवले जाते. हळद, तेल, धान्य, कडधान्य, साखर, तांदूळ, पोहे अशी विविध सेंद्रिय उत्पादनांची निर्यातदेखील केली जाते.  
सर्टिफाइड ऑरगॅनिक शेती
सावंत हे आपल्या शेतीचे वषार्तून एकदा खूप खर्चिक ऑडिट करतात. दरवर्षी केरळची लॅकॉन सटिर्फिकेशन प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था ऑडिट करून त्यांना सेंद्रिय शेतीचे प्रमाणपत्र देते. अशा प्रकारे सेंद्रिय उत्पादनांची विश्वासार्हता जपली जाते.  
सेंद्रिय उत्पादनांची मागणी आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अनेक रिटेलर्स आणि होलसेलर्स ग्राहक थेट सावंत यांच्याशी संपर्क साधून उत्पादने खरेदी करतात. तसेत पी. डी. सावंत हे बी २ बी व्यवसाय (बिझनेस टू बीझनेस) करण्यात सध्या अग्रेसर आहेत. मार्जिन ठेवून आणि डिस्काऊंट देऊन काही इतर आरगॅनिक शॉपींना उत्पादनांचा पुरवठा केला जातो. कोल्हापूर, मुंबईतील अनेक आरगॅनिक दुकाने, मॉल्ससाठी उत्पादने निर्यात केली जातात. या सेंद्रिय उद्योगाची वार्षिक उलाढाल अंदाजे २० ते २५ लाख इतकी आहे.
आकाशवाणी, दूरदर्शन अशा अनेक वृत्तवाहिनींवरदेखील मुलाखतीत सावंत यांनी सरकारलादेखील विनंती केलीय की, प्रत्येक जिल्ह्यात सेंद्रिय बाजारपेठ असावी. आता पुण्यात असा उद्योग उभारण्याचा सावंत यांचा मनोदय असून त्यांचे कार्य अविरतपणे सुरु आहे.  
अनेक पुरस्कारांचे मानकरी
पूजा सावंत आणि पांडुरंग सावंत यांना नागपूर येथे राजभवनमध्ये २०१० ला जिजामाता कृषी भवन पुरस्कार मिळाला. त्यावेळी के शंकरनारायणन हे राज्यपाल आणि अशोकराव चव्हाण हे मुख्यमंत्री होते. गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी देखील सावंत यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव केला आहे.
p d sawant mobile no  - 9822152777

...मला आणा कोल्हापुरी साज!



कोल्हापुरी साज हे स्त्रीचे एक वैशिष्ट्यपूर्ण आभूषण आहे.  ह्या साजाला 600 वर्षांची परंपरा आहे. प्रामुख्याने तो कोल्हापुरातच घडवला जात असल्यामुळं त्याला ‘कोल्हापुरी साज असं नाव आहे. हा सुवासिनींनी वापरण्याचा अलंकार आहे. कोल्हापुरी साज घडवण्याची परंपरा जपतानाच नवी परंपरा निर्माण करणारे अस्सला कोल्हापुरी साजाचे उत्पादक अरुण संकपाळ यांची साज उत्पादनात दरमहा 60 लाखांची उलाढाल होते. संपूर्ण कोल्हापूरचा विचार केला, तर दररोजची उलाढाल तीन कोटी रुपयांची आहे. एकूण 124 भागांपासून बनवल्या जाणार्‍या साजाची वैशिष्ट्ये प्रकट करणारा, खास कोल्हापुरी साजाचे उत्पादक अरुण रघुनाथ संकपाळ यांच्याशी चर्चा करून लिहिलेला लेख...

गेली अनेक वर्षे मी ‘एक हौस पुरवा महाराज मला आणा कोल्हापुरी साज’ ही लावणी ऐकत आलेली आहे. पूर्वी फक्त मराठी आणि आज सगळ्याच प्रांतामधील  स्त्रीला कोल्हापुरी साजाचं एवढं आकर्षण का वाटतं, हे मला अरुण रघुनाथ संकपाळ यांनी घडवलेला साज समक्ष डोळ्यांनी पाहून समजलं. हा अलंकार वैशिष्ट्यपूर्ण आहे. ह्या सगळ्या वैशिष्ट्यांसह उत्कृष्ट साज बनवणारे ते उद्योजक आहेत.  त्यांचे वडील रघुनाथ यांनी पाचवी- सहावी शाया झाल्यानंतर ते मुकुंदराव भोसले आणि दत्तात्रय बळवंत पोतदार, मल्लाप्पा बळवंत पोतदार यांच्याकडे सोनारकाम शिकले. विशेषतः ते कोल्हापुरी साज घडवायला शिकले. त्यात त्यांनी प्राविण्य मिळवलं. 1960-61 पासून ते स्वतंत्रपणे साज घडवायला शिकले. डाकवे गल्लीत एक जागा भाड्यानं घेऊन ते आणि पाच- सहा मित्रांनी साज घडवण्याचा कारखाना सुरू केला. ते पप्पा नावानं सर्वपरिचित होते. आज त्यांचाच वारसा अरुण संकपाळ हे समर्थपणे चालवत आहेत. त्यांनी उद्योग वाढवला. त्याचा विस्तार केला. अरुण यांनी सांगितलेली माहिती मोठी रोचक आहे.

साज ह्या अलंकाराचा उगम 600 वर्षांपूर्वी झाला. त्यातल जे नक्षीकाम असते, तिला पान अशी संज्ञा आहे. साजातला प्रत्येक घटक वैशिष्ट्यपूर्ण असतो. साज घडवताना 11 पासून 21 पानाड्यांचा उपयोग होतो. हे घटक असेः 1)चाफेकळी- आकार आणि रंगानं देखणी. सौंदर्य आणि विकासाचे प्रतीक, 2)पंच पानाडी- बेलपान, तुळस पान, विड्याचे पान, आंब्याचे पान आणि गवताचे पाते यांचं प्रतीक,3)बेलपान- शिवशंकराला आवडणारे त्रिदल पान.उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचे प्रतीक, 4)दोडका- फळभाजीचे प्रतीक, 5)कार्ले- षड्रसाचे आणि औषधी वनस्पतीचे प्रतीक, 6)सूर्य- तेजाचे प्रतीक असलेल्या श्रेष्ठ देवाचे प्रतीक, 7)माणिक पानाडी- सूर्याचे रत्न, लाल रंगाचे स्वामीभक्तीचे प्रतीक, 8) मत्स्य- विष्णूचा पहिला अवतार, दशावताराचे प्रतीक, 9)कूर्म- विष्णूचा दुसरा अवतार, दशावताराचे दुसरे प्रतीक, 10)नरसिंह- संकटसमयी धावून येणार्‍या दैवताचे प्रतीक, 11)गुलाबफूल- अत्तराचा जनक असलेले फूल, प्रेमाचे प्रतीक, 12)भ्रमर- रसिकांचा राजा, स्वाद घेण्याची क्षमता, सहिष्णुतेचे प्रतीक,13)चंद्र- शीतलतेचे प्रतीक, 14)पाचू- बुध ग्रहाचे रत्न, सांसारिक सौख्य वाढवणारे, साफल्याचे प्रतीक, 15)गंडभैरी- मिथुन चिन्ह, दोन देह पण आत्मा एक, स्त्री- पुरुष मीलनाचे प्रतीक, 16)मोरचेल- सत्तेचे, राजवैभवाचे प्रतीक, पतीला राजवैभव मिळावे ही भावना, 17)मोरपीस- वैभव, विलास, श्रीकृष्णाने आपल्या मस्तकी धारण केलेले पीस, विविधरंगी सौंदर्याचे प्रतीक,  18) शंख-ध्वनीचे प्रतीक, श्रीकृष्णाचे आवडते रणवाद्य, आवाज दुमदुमत ठेवण्याचे प्रतीक, 19)वाघनख- शस्त्राचे प्रतीक, आवाजाला धार यावी म्हणून शंखाजवळ असलेली पानाडी, 20)नाग- स्त्री- पुरुषाच्या अत्युत्तम मीलनाचे प्रतीक, शासनकर्त्याचे प्रतीक, 21)ताईत- साजातील आणखी एक महत्त्वाचे पान, आपल्या पतीला दृष्टिबाधेपासून वाचवण्याचे प्रतीक. ही झाली 21 पानाडी. आता आणखी तीन घटक असेः 1) जवमणी- साजामध्ये प्रत्येक पानास दोन मणी घालणारा डमरूसदृश मणी. हा घडवताना कारागिराचे कसब पणाला लागते. अरुण संकपाळ यांचा पुतण्या रतन श्रीनिवास संकपाळ हा जवमणी घडवण्यात प्रवीण आहे, 2)-घागरी- प्रत्येक पानास 3 पासून 5 घागर्‍यांचे घोस लावतात. हे जलकुंभाचे प्रतीक आहे. प्रेमाचे प्रतीक, 3)गोंडा- कोल्हापुरी साज हिरव्या रेशमी धाग्यांमध्ये गुंफतात, त्यास लाल रेशमी भरजरी गोंडे लावतात, सौभाग्याचे लेणे.

साजातील पानाड्यांची सुरुवात चाफेकळीपासून होते आणि ताईत हे पान शेवटी येते. 124 सुट्या भागांमधून साज घडतो. 70 ग्रॅमच्या गळाभरून घसघशीत साजाचे 124 भाग आणि नक्षीकामातील इतर भाग जोडायला कारागिराचे कसब पणाला लागते.

दहावी झाल्यानंतर अरुण उद्योगात आले. त्यांच्या पूर्वी लहान मध्यम आणि मोठा असे तीन प्रकारचे साज बनवले जात. त्यांच्या काळात त्यांनी आणखी दोन प्रकारांची भर घातली. आणि आकारानुसार साजाचे पाच प्रकार झाले. त्यांच्या कारखान्यात 15 ग्रॅम 11 जोडपासून पुढे 20- 25- 30- 40-50ग्रॅमपर्यंत आणि त्याच्याही पुढे जाऊन 150 ग्रॅमपर्यंतही साज घडवले जातात. संकपाळ यांच्याकडे बेलपान, वज्रटीक, चाँद चौकी, पारंपरिक मुसलमानी गलसुरी,पेट्या, जवमणी इत्यादी सुटे भाग 80 मिलिपासून दीड-दोन ग्रॅमपर्यंत नग तयार होतात. ही सर्व आभूषणे पूर्णपणे हातांनी बनवले जातात. यात यंत्रांचा वापर केला जात नाही. ही अतिशय नाजूक कारागिरी आहे. सोन्याच्या अतिशय पातळ पत्र्यापासून हे भाग बनवले जातात.

काही महानगरांमध्ये यंत्रांच्या सहाय्याने साज पनवण्याच प्रयत्न केला जातो, पण अस्सल कोल्हापुरी बाजाची सर त्या साजांना येत नाही.  साज घडवण्यात कोल्हापूरची मक्तेदारीच आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. सामान्यतः साज घडवण्यासाठी 92 ते 95 टंच सोन्याचा उपयोग केला जातो. एक साज घडवण्यासाठी तीन दिवस लागतात. ग्राहकांच्या मागणीनुसार हॉलमार्क साजही घडवला जातो.

पूर्वीच्या काळी केवळ लाखेचे साज बनवले जात होते. गेल्या दहा वर्षात भरीव आणि भरीव-पोकळ साज बनवण्याची नवी परंपरा अरुण संपाळ यांनी निर्माण केलेली आहे. त्यात लाख नसते. पूर्वीच्या घाटाच्या ठिकाणी आधुनिक पद्धतीचे पदक वापरण्याची पद्धत संकपाळ यांनी सुरू केली. साज खपण्याचे प्रमाण पूर्वीपेषाही आता वाढलेले आहे. हा नमुना अँटिक असल्यामुळं आधुनिक काळातील महिलाही मोठ्या हौसेनं तो गळ्या धारण करतात. सोन्याच्या दरानुसार साजाच्या किंमती बदलतात. लहान 20 ग्रॅम- 1 लाख 22 हजार, त्याहून थोडा मोठा- 25 ग्रॅम- 1 लाख 54 हजार, मध्यम 30 ग्रॅम- 1 लाख 85 हजार, त्याहून मोठा 40 ग्रॅम- 2 लाख 50 हजार, सर्वात मोठा 50 ग्रॅम- 3 लाख 10 हजार रुपये. अर्थात 250 ग्रॅमचा साजही घडवला जातो.

कोल्हापुरात दररोज कमीत कमी शंभर साज विकले जातात. दररोजची तीन कोटी रुपयांची उलाढाल होते. अरुण संकपाळ यांच्याकडून दररोज दोन साज विकले जातात. विक्रीमध्ये वस्तुविनिमयाचा भाग असतो, तथापि, त्यांची  दरमहा 60 लाखांची उलाढाल असते. संकपाळ हे उत्पादक असल्याने त्यांचा संबंध व्यापार्‍यांशी असतो, थेट ग्राहकांशी नसतो. संकपाळ यांनी घडवलेले साज संपूर्ण भारतासह इंग्लंड, कॅनडा, अमेरिका, पोर्तुगाल, फ्रान्स, रशिया, स्वीडन, दुबई याही देशात निर्यात होतात. इग्लंडच्या राणीच्या गळ्यातही कोल्हापुरी साज आहे आणि तो थेट कोल्हापुरातूनच गेलेला आहे, असे अरुण संकपाळ सार्थ अभिमानानं सांगतात.

ह्या उद्योगात स्वतः अरुण, त्यांचा मुलगा कपिल, पुतण्या रतन यांच्यासह विश्वास माने, गोपाळ सांगवडेकर, अक्षय कांबळे, शहाजी शेख, अभिजित जाधव, उत्तम पवार, सार्थक चौगुले हे कारागीर कार्यरत आहेत.

ग्राहकांमध्ये गोडवा निर्माण करणारे ढिसाळ फरसाण स्वीट मार्ट

कोल्हापुरातील भाऊसिंगजी रोडवर गेली ६० वर्षांपासून महानगपालिकेसमोर असणारे ढिसाळ यांचे सर्वात जुने दुकान होय. प्रसिद्ध खत्री यांच्या मिठाईच्या दुकानानंतर गोड आणि नमकिन पदार्थ बनवणारे ढिसाळ फरसाण स्वीट मार्ट नावाने दुकान नावारूपास आले. सध्या या दुकानाचे सर्व काम दिलीप ढिसाळ हे १९७५ पासून ते आजतागायत पाहतात. या कामात त्यांना त्यांचा मुलगा विजय ढिसाळ मदत करतात. हा व्यवसाय पुढे नेणारे दिलीप ढिसाळ यांची ही दुसरी पिढी आहे. फरसाण आणि पेढ्यांसाठी प्रसिद्ध असणारे ढिसाळ हे स्वत: दिवाळीच्या सणासाठी लागणारे सर्व पदार्थ आणि फराळ तयार करून विकतात. उत्कृष्ट प्रतीचे आणि रुचकर फराळ बनविण्यात ढिसाळ यांचा हातखंडा आहे. अप्रतिम चव आणि गुणवत्ता असल्याने विविध पदार्थांची दिवाळीच्या सणामध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री होते. शिवाय इतर गोडधोड आणि नमकिन पदार्थांची  रिटेल आणि होलसेल विक्री होतच असते.

 
दिवाळीत होते  गोडधोड-नमकीनची प्रचंड विक्री  

दिवाळीचा फराळ म्हणजे गोडधोड. फराळ आपल्या नातेवाईंकामध्ये-शेजाऱ्यांना देऊन सामाजिक बंध जपण्यासाठी दिवाळीचा काळ उत्तम मानला जातो. समाजाची वीण घट्ट होण्यासाठी फराळ हे एक माध्यम ठरते. याकाळात अनेक गोड, खारे पदार्थ विक्रीची दुकाने पदार्थांनी सजलेली असतात. ढिसाळ यांच्याकडेही दिवाळी फराळाची मागणी अधिक असते. अधिकरून फराळामध्ये पुडाची वडी, मसाला वडी, तिखट शेव, चिवडा याची मागणी प्रचंड असते. ढिसाळ यांच्याकडे दिवाळीमध्ये तब्बल १० प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. त्यामध्ये गोड-नमकिन खारी बुंदी, रवा-बेसन-बुंदीचे लाडू, चिवडा, मसाले चिरोटे, शंकरपाळे, चकली, म्हैसूरपाक, बारीक-मोठी शेव, भाकरवडी, करंज्या अशा पदार्थांचा समावेश आहे. हे सर्व पदार्थ मिळून तब्बल एक ते दीड टन मालाची विक्री दिवाळी काळात होते. महत्त्वाचे म्हणजे, ढिसाळ हे स्वत: हे फराळ तयार करतात. खूप जुने दुकान असल्याने आणि ग्राहकांची विश्वासर्हता टिकून राहिल्यामुळे असंख्य गिऱ्हाईकांची रिघ ढिसाळ यांच्या दुकानामध्ये लागलेली असते.

६० वर्षांपूवीचे दुकान आणि उद्योग

कोल्हापुरातील जुन्या खुणा असलेले ढिसाळ फरसाण स्वीट मार्ट या दुकानाचा जसा जुना लूक होता, तो आताही तसाच आहे. पांडुरंग ढिसाळ यांनी आपले भाऊ खंडेराव यांच्यासोबत मिळून १९६८ रोजी यांनी हे दुकान उभारले होते. कोल्हापुरातील प्रसिद्ध खत्री यांच्या दुकानानंतर ढिसाळ यांचे फरसाण दुकान सर्वात जुने आहे. पांडुरंग आणि खंडेराव या ढिसाळ बंधूंनी आपला स्वत:चा उद्योग उभारावा ही इच्छा बाळगून  हे दुकान सुरु केले. पुढे जाऊन पांडुरंग यांच्या आणखी दोन भावंडांनी नोकरी सोडली आणि या दुकानासाठी हातभार लावला. असे ढिसाळांची चार भावंडे फरसाण स्वीट मार्ट उद्योगात जोडले गेले. पुढे त्यांनी स्वत:चा कारखाना काढून मिठाई, नमकीन पदार्थ बनवणे सुरु केले. कालानुरुप, त्या-त्या भावंडांनी आपले स्वतंत्र उद्योग उभे केले.
 
चविष्ट फरसाण तयार करणे ही ढिसाळ बंधूंची खासियत आहे. त्यावेळीही फरसाणला प्रचंड मागणी होती आणि आजदेखील ढिसाळ यांच्या सर्व पदार्थांना ग्राहकांची पसंती आहे. आजदेखील कोल्हापुरी मिसळसाठी लागणारे फरसाण ढिसाळ यांच्याच कारखान्यातून खरेदी केला जातो. जसजसा उद्योग वाढत गेला, तसतसे दुकानामध्ये विविध वस्तू विक्रीला ठेवण्यात आले. यामध्ये पेढे, लाडू,  मिठाई, मलई बर्फी, खवा पेढे, खवा बर्फी या पदार्थांचा समावेश आहे. खासकरून ढिसाळ यांच्याकडे कंदी पेढ्यांचीही अधिक मागणी असते. पेढे आणि बर्फी चार दिवसांपासून अधिक काळ टिकू शकत नाहीत. पावसाळ्यात-उन्हाळ्यात माल अधिक खराब होतो. त्या काळात मालाची क्वांटीटी कमी केली जाते. त्यामुळे पेढे, बर्फीसारखे गोड पदार्थ बनवण्यापासून ते विक्री होऊपर्यंत टिकून राहण्यासाठी खूप काळजी घ्यावी लागते. म्हणून जोखीम घेऊन हे पदार्थ तयार करावे लागतात.
 
नृसिंहवाडीतून आणला जातो खवा

फराळाचे पदार्थ असो किंवा अन्य मिठाईसाठी लागणार खवा खास शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी (जि. कोल्हापूर) या गावातून आणला जातो. (कृष्णा - पंचगंगा संगम स्थळ असलेली नृसिंहवाडी खव्यासाठी प्रसिद्ध आहे.)  या खव्याची उत्कृष्ट चव आहे. शुद्ध दूध आणि अस्सल खव्यापासून ढिसाळ हे अनेक पदार्थ आपल्या कारखान्यामध्ये बनवतात. यासाठी कारखान्यामध्ये ३ कारागीर काम करतात. कोल्हापुरातच लक्षतीर्थ वसाहत जवळ सुतारमळा येथे हा कारखाना आहे. विशेष म्हणजे सर्व पदार्थ हातांनी बनवले जातात. कुठल्याही मशीन्सचा वापर ते करत नाहीत.
 
जशी मागणी येईल तसा पदार्थांचा पुरवठा केला जातो. कारखान्यात तयार होणारा माल टेम्पोतून दुकानात आणला जातो. शहरातल्या शहरात दुकान आणि कारखाना यांच्यातील अंतर फार नसल्याने वाहतुकीचा खर्च वाचतो. त्यांची वार्षिक उलाढाल ३० लाख आणि वार्षिक नफा सुमारे १० लाख इतका आहे.

ढिसाळ यांना या उद्योगाचा डोलारा उभारताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. पण, संकटसमयी दिलीप यांचा भाचा आणि मेव्हणे यांच्याकडून मदत मिळाली आणि पुन्हा डौलात कारखाना सुरु झाला. गिऱ्हाईक आमचे दैवत अशी टॅगलाईन घेऊन दिलीप ढिसाळ यांचा फरसाण स्वीटमार्ट उद्योग आता प्रगतीपथावर सुरु आहे.
 
दिलीप ढिसाळ मोबाईल क्र - ९६३७८३७७८४
विजय ढिसाळ मोबाईल क्र- ८७९६४४६०६१ 

ठसकेबाज ठुशीचे उत्पादकः भवानी गोल्ड अँड सिल्व्हर



कोणत्याही सोहळ्यात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे दागिने बघायला मिळतात. पण त्यातल्या ठुशी ह्या आभूषणाचा ठसका काही निराळाच आहे. वैविध्यपूर्ण दागिन्यांंमध्ये ठुशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता मागणीनुसार बाजारामध्ये विविध प्रकारच्या ठुशीच्या वेगळ्या डिझाईन्स दिसतात. इतकंच नाही, तर मंगळसूत्रांमध्येही ठुशीचं डिझाईन दिसून येतं. ठुशीतल्या पदकाचा भाग हा हिर्‍यांनी अथवा खड्यांनी सजलेला असतो. ठुशी हा खरं तर खास मराठी दागिना म्हणून ओळखला जातो. हा दागिना गळ्याभोवती बांधला जातो. ठुशीच्या मध्यभागी पाचू, माणिक, रत्न यासारखे खडे जोडले जातात. ठुशी म्हणून खरं तर ठासून भरलेले गोल मणी. छोट्या मण्यांच्या गळ्याबरोबर असलेला हा दागिना अत्यंत उठावदार असून कोणत्याही वयाच्या स्त्रीचं सौंदर्य खुलवून दाखवतो.

ठुशीच्या उत्पादनात कोल्हापूरच्या भवानी गोल्ड अँड सिल्व्हर ह्या उद्योगाचं स्थान अग्रभागी आहे. हे उद्योजक आहेत वैभव सुरेंद्र पुरवंत. पूर्वीच्या काळात स्त्रिया पायाच्या बोटांत चांदीच्या मासोळ्या घालत असत. वैभव यांचे आजोबा  नारायण यांनी ह्या मासोळ्यांचं उत्पादन 1920 मध्ये सुरू केलं. हे उत्पादन थेट ग्राहकांपर्यंत जायचं. मधे दलाल नव्हता.1971 मध्ये सुरेंद्र पुरवंत यांनी प्रामुख्याने चांदीची इतर उत्पादनं करायला सुरुवात केली. त्यांनी चांदीची अनेक आभूषणे आणि वस्तू व्यापार्‍यांमार्फत परप्रांतात पाठवली. नंतर वैभव पुरवंत यांनी चांदीकडून सोन्याकडे प्रवेश केला. ठुशी हा खास कोल्हापुरी अलंकार गेल्या 400 वर्षांपासून प्रसिद्ध आहे. पण मध्यंतरी एका वाहिनीवर ‘जय मल्हार’ ही मालिका आली आणि त्यातल्या म्हाळसाच्या गळ्यातील ठुशी पाहून ती स्त्रियांमध्ये नव्याने अतिप्रिय ठरली. तेव्हा वैभव पुरवंत यांनी हे अचूक हेरलं आणि इतर दागिन्यांपेक्षा कोल्हापुरी धाटणीच्या ठुशीवर लक्ष केंद्रित केलं. आत वैभव यांच्यासोबत त्यांचा मुलगा तनिष्क हाहि ठुशी घडवण्यात वाकबगार झालेला आहे.

ठुशीमध्ये आठ प्रमुख प्रकार आहेतः एकेरी पानाडी ठुशी, पूर्ण झालर ठुशी, अर्धी झालर ठुशी, महाळसा ठुशी, वज्रटीक ठुशी, बेलपान ठुशी, टीक ठुशी, घाटदार ठुशी. ह्या सर्व प्रकारच्या ठुशीचं उत्पादन वैभव पुरवंत करतात. त्यांची ठुशी कोल्हापूर परिसरासह प्रामुख्यानं मराठवाड्यात जाते. कमीत कमी अडीच ग्रॅम वजनापासून ठुशी घडवता येते. मग ग्राहकाच्या मागणीप्रमाणे जास्तीत जास्त कितीही वजनाची ठुशी घडवता येते. अडीच ग्रॅम वजनाची ठुशी सुमारे वीस हजार रुपये किमतीची असते.

आधुनिक ठुशीमध्ये टेंपल ज्वेलरी  हा प्रकार घडवला जातो. ह्या ठुशीमध्ये पदकावर श्रीमहालक्ष्मीचा ठसा असतो. ठुशी तयार करण्यासाठी लागणार्‍या मण्यांचे चार प्रकार असतात. ह्या चार प्रकारांचे संमिश्र नक्षीकाम घेऊन ठुशी गाठवली जाते. पैकी मण्यांचे आणि त्यातही लाखी मण्यांचे उत्पादन फक्त कोल्हापुरात केले जाते. पोत मणी, स्पॉट माणी, जवमणी, लाखी मणी (किंवा नक्षी मणी) हे चार प्रकार वापरून ठुशी घडवली जाते. गहू मणी हाहि एक प्रकारचा वैशिष्ट्यपूर्ण मणी आहे, पण त्याचा उपयोग अपवादाने केला जातो.

ठुशी गाठवण्याचेही दोन प्रकार आहेत. पारंपरिक पद्धतीनुसार वज्रटीक ही गादीवर गाठवली जाते, तर ठुशी नायलॉन दोर्‍यात गाठवली जाते. केंद्र शासनाच्या नियमानुसार 18, 20 आणि 22 कॅरेट सोन्यामध्ये ठुशीचं उत्पादन केलं जातं. ठुशीबरोबरच वैभव यांची इतर आभूषणांची सगळी उत्पादने मागणीनुसार व्यापार्‍यांकडे जातात. वैभव यांच्याकडून दरमहा जवळ जवळ 30 ठुशींचे उत्पादन होते व त्यांची विक्री होते. ठुशीबरोबरच सोन्यामधले बंगाली धाटणीचे दागिनेही वैभव पुरवंत घडवतात. त्यांची वार्षिक उलाढाल 70 लाखांच्या आसपास आहे.

ठुशीचे आणखी काही प्रकार असे आहेतः

महालक्ष्मी ठुशी
हा प्रकार इतिहासकालीन दागिन्यांपैकी एक आहे. ही ठुशी भरीव असते. तसंच यामध्ये ठुशीचे जास्त पदर असतात. पारंपरिक ठुशीमध्ये एकच माळ असते. पण या ठुशीमध्ये एका खालोखाल एक असे हाराप्रमाणे पदर असतात. तिला एक राजघराण्यातील दागिन्यांचा  लुक असतो. ही ठुशी परिधान केल्यावर गळा अगदी भरलेला दिसतो.

क्लासिक गोल्डन ठुशी
काही स्त्रियांना पारंपरिक  रूपाच्या ठुशी आवडत नाहीत. त्यांच्यासाठी आधुनिक नक्षीकाम असलेली ही ठुशी आहे.हे नक्षीकाम बारीक असतं. तुकोणत्याही प्रकारच्या कपड्यांवर ही ठुशी घालता येते. पारपंरिक ठुशीमध्ये मण्यांची एकमेकांमध्ये गुंफण असते. पण तशी गुंफण ह्या ठुशीत नसते. हल्ली अनेक समारंभामध्ये साडीपेक्षा घागरा आणि चोळी घालण्याची फॅशन आली आहे. त्यामुळे अशा फॅशनेबल कपड्यांवर अशी ठुशी खूप शोभून दिसते.


कोल्हापुरी  लांबट मण्यांची ठुशी
प्रत्येक ठुशीचं डिझाईन हे वेगळं असतं.  ठुशी ही गळ्याभोवतपरिधान केली जाते, म्हणून तिचा आकार गोलाकार असतो. ह्या कोल्हापूरी प्लेन लांबट मण्यांच्या ठुशीमध्ये बर्‍यापैकी लांबट आकाराची ठुशी मिळते. यामध्ये लांबट मणी असल्यामुळेच याला लांबट ठुशी असं म्हटलं जातं. काही लोकांना गोल आकाराचे मणी आवडत नाहीत अथवा काही जणांना नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं घेण्याची हौस असते. त्यांच्यासाठी अशा प्रकारची ठुशी नक्कीच उपयोगी पडते. एक  वेगळ्या पद्धतीचा अलंकार परिधान केल्याचा आनंद मिळतो.

हस्तकारागिरीची ठुशी
या ठुशीला पारंपरिक ठुशीप्रमाणेच जास्त प्रमाणात मागणी आहे. सध्या सोन्याप्रमाणेच चांदीच्या  ठुशीची मागणीही वाढताना दिसून येत आहे. ह्या ठुशी वेगवेगळ्या डिझाईनच्या साड्यांवर अथवा कुर्त्यांवरही खुलून दिसतात. ज्यांना कॉटनच्या साड्या अथवा ड्रेस घालण्याची हौस आहे त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. शिवाय हस्तकारागिरी असल्याने त्यांचे अनोखेपण शोभून दिसते.  

कोल्हापुरी वज्रटिक ठुशी
खास कोल्हापुरी बाज असलेली वज्रटिक ठुशी पूर्वी केवळ कोल्हापूर परिसरात जास्त वापरात होती.तिचे नक्षीकाम आणि मणी इतके आकर्षक असतात की, आता याची मागणी बाहेरही खूप वाढलेली आहे. वज्रटिक ठुशीचं डिझाईन हे महालक्ष्मी ठुशीशी मिळतंजुळतं आहे. तिच्यामध्ये कोल्हापुरी ठसका दिसून येतो. अगदी भरलेल्या मण्यांची अशी ही ठुशी घातल्यानंतर भारदस्तपणाचा अनुभव येतो. -

डिझाईनर ठुशी
पारंपरिक दागिने प्रत्येक स्त्रीला आवडतातच असं नाही. आता वेगवेगळ्या फॅशनेबल कपड्यांवर तसे फॅशनेबल दागिने परिधान करायला पसंती दिली जाते. तशा वैविध्यपूर्ण कपड्यांवर अशा प्रकारच्या डिझाईनर ठुशी घालून परंपरा आणि आधुनिकता असा मेळ साधता योतो. ह्य ठुशीमध्ये वेगळी वेणी ठुशी अथवा वेगवेगळ्या रंगाच्या ठुशी घेता येतात.  

राजस्थानी कंठी ठुशी
आता फक्त महाराष्ट्रातच नव्हे, इतर प्रांतातही ठुशी लोकप्रिय झालेली आहे. राजस्थानी  कंठी ठुशी हा अलंकार आता सर्वत्र वापरला जातो. हे डिझाईन राजस्थानी बाजाने बनवण्यात आलं असलं तरी त्याचं महाराष्ट्रीय वैशिष्ट्य जपलेलं असतं. वेगळ्या प्रकारच्या आधुनिक पेहरावावर अशा प्रकारची राजपूती कंठी ठुशी वापरली तर ती निश्चितच छान शोभून दिते. ही  फॅशन सध्या खूप प्रचलित झालेली आहे. बर्‍याच डिझाईनर लेहंग्यावर अशा प्रकारचे दागिने  सुंदर दिसतात.

फॅन्सी ब्रॉड ठुशी
ही अधिक फॅशनेबल ठुशी आहे. हिचा एक पदर मोठा असतो. ह्या ठुशीचं डिझाईन योग्य तर्‍हेने बनवण्यात आलेलं असतं. परंपरागत ठुशीप्रमाणे हिचं डिझाईन नाही. हिचे मणी अगदी एकमेकांमध्ये गुंफलेले नसतात. तसंच यामध्ये काही ठिकाणी मोती आणि इतर खड्यांचाही वापर करण्यात येतो. पारंपरिक ठुशीमध्ये तसा करण्यात येत नाही.

गडी ठुशी
महालक्ष्मी आणि वज्रटिक ठुशी या दोन्हींचा सुरेख मेळ म्हणजे गडी ठुशी. हिचं डिझाईन थोडं वेगळं असतं. ही ठुशी अगदी गळ्याबरोबर घातली की, तिचा उठाव खूपच सुंदर दिसतो. वरच्या बाजूला केवळ डिझाईनची पट्टी आणि तिच्याखाली गुंफलेले मणी असा हा दागिना घातल्यानंतर अधिक आकर्षक दिसतो.  डिझाईनर साडीवरदेखील ही गडी ठुशी उठून दिसते. ही ठुशी भारदस्त असते, म्हणून तेवढी एकच परिधान केली, तरी व्यक्तिमत्त्व आकर्षक दिसतं.

ठुशी मंगळसूत्र
मंगळसूत्र हा प्रत्येक विवाहित महिलेच्या जिव्हाळ्याचा विषय. ठुशीमध्येही मंगळसूत्राचे वेगवेगळे डिझाईन्स मिळतात.  मंगळसूत्रांची विविध प्रकारची आकर्षक डिझाईन्स असतात. ठुशीच्या डिझाईन्समधलं मंगळसूत्र अधिक आकर्षक दिसतं. अगदी गळ्याबरोबरील            मंगळसूत्रापासून ते ठुशीच्या डिझाईन्सच्या लांबलचक मंगळसूत्रचे हरेक नमुने मिळतात.  कोल्हापुरी पद्धतीचा केवळ एक डाळिंबी रंगाचा खडा आणि बाकी काळ्या मण्यांचा ठुशीप्रमाणे गुंफलेला हार हा मिलाफ अधिक महिलाप्रिय आहे. ठुशीप्रमाणे गुंफलेले सोन्याच्या रंगाचे मणी आणि काळ्या मण्यांची त्याला जोडलेली माळ यालाही  बरीच मागणी आहे. हे ठुशी मंगळसूत्र दिसायला मोठं आणि आकर्षक दिसतं.

खास कोल्हापुरी, परवडणार्‍या दागिन्यांसाठी पोत मणी

सोनं ह्या चमकदार पिपळ्या धातूचं मानवाला प्राचीन काळापासून आकर्षण आहे. पण पण कितीही इच्छा असली, तरी जागतिक बाजारपेठेत सर्वत्र नेहमीच मौल्यवान ठरलेल्या सोन्याच्या सतत वाढत जाणार्‍या किमतीमुळं सामान्य माणसाला सोन्याचे वजनदार दगिने परवडत नाहीत, मात्र ग्राहकांना परवडणारा दागिना बनवायचा असेल, तर त्यासाठी पोत मणी अत्यंत उपयोगाचा ठरतो. हा मणी फक्त आणि फक्त कोल्हापुरातच तयार होतो. सचिन बापूसाहेब ढणाल हे पोत मण्यांचे अग्रगण्य उत्पादक आहेत. त्यांच्याशी चर्चा करून पोत मण्यांच्या उत्पादनाची पुष्कळ माहिती हाती लागली.
एक ग्रॅम सोन्यामध्ये जवळ जवळ 135 पोत मणी होतात. पोत मण्याचे स्पॉट मणी, नक्षी मणी असे काही उपप्रकार आहेत. प्रामुख्याने ठुशी, गुंड, गंठण, काही प्रकारच्या बांगड्यांमध्ये हे मणी वापरले जातात. नेकलेस बनवण्यासाठी कमीत कमी एक तोळा सोनं लागतं. पण तेच ठुशी बनवायची असेल, तर पोत मणी वापरून ती बनवता येते. अगदी चार ते पाच ग्रॅम सोन्यांच्या पोत मण्यांत ठुशी होते. मणी बनवण्याची प्रक्रिया मोठी असते. मुख्यतः ही सगळी प्रक्रियाहाताने होते. पहिल्यांदा सोन्याची आटणी केली जाते- म्हणजे सोनं वितळवलं जातं. त्यानंतर त्याची लगड तयार केली जाते. लगडीपासून पाष्टा तयार होतो. पाष्टा करण्यातून सोन्याची अतिशय पातळ अशी पट्टी बनवली जाते. पट्टीचे समान तुकडे होतील, अशा मापानं खुणा करून घ्यायच्या लहान- मोठ्या मण्यांच्या ठरलेल्या आकारानुसार तुकडे करायचे. नंतरच्या प्रक्रियेला बेटणे म्हणतात. ही प्रक्रिया दुहेरी असते. पहिल्या बेटण्याला पहिली बारी आणि दुसर्‍याला तयारी असं म्हणतात. त्याची बिट्टी तयार होते. एका पाटीवर (लिहिण्याची पाटी) बिट्टी फिरवली जाते, म्हणजे हलकेच घासली जाते. मग त्या बिट्टीची बांधणी होते.  त्यानंतर एक लहानसा पोकळ मणी तयार होतो.  त्याला सुवर्ण कारागिरांच्या भाषेत गुजरव असं म्हणतात. हा मणी चार वातींच्या ज्योतीवर तापवण्यात येतो. तेव्हा तो उमलतो. ज्योतींवर उष्णता दिली जात असताना मण्याला हवा लागून चालत नाही. म्हणून हे काम एका छोट्या बंदिस्त जागेतच केलं जातं. त्याला गूढ असं म्हणतात. म्हणजे एखादं रहस्य असतं, तसं. म्हणून अलंकारांच्या भाषेत गूढ. हे सगळं झाल्यानंतर अपेक्षेप्रमाणे लहानसा आणि पोकळ मणी तयार होतो. आधी त्या मण्याला छिद्र पाडलं जातं. मग लाखेच्या दोर्‍यासारख्या कांडीनं त्यात लाख भरली जाते. मणी पुन्हा गरम केला जातो, त्याच्यात लाख विरघळते. काही वेळानं मणी घट्ट होतो. त्याला आरपार छिद्र पाडलं जातं. नंतर त्याला झळाळी येण्यासाठी पॉलिश केलं जातं. अशा मण्यांची दोर्‍यात ओवून लड तयार केली जाते. मग त्या मण्यांनी विविध प्रकारचे अलंकार घडवले जातात.


सचिन ढणाल हे 1995 पासून मण्यांच्या उत्पादनात आहेत. लौकिक अर्थानं त्यांचं शिक्षण खूप कमी झालं, पण पोत मण्यांच्या उत्पादनात ते इतके तरबेज आहेत की आज ते अग्रगण्य सुवर्ण उद्योजक आहेत. पोत मणी पूर्णतः हस्तकलेने बनतात. ते वजनाने अत्यंत हलके असतात. कोणत्याही यांत्रिक साधनाचा यात उपयोग केला जात नाही. हे काम यंत्रावर होऊच शकत नाही. भाऊ अमोल आणि मामा सुरेंद्र पुरवंत हे ठुशीच्या उद्योगात आहेत. त्यांच्या सोबत राहून सचिन यांनी उद्योगात प्रवेश केला. हिरासाो (साहेब नव्हे) झाड यांच्याकडे त्यांनी मणी बनवण्याचं आठ वर्षे प्रशिक्षण घेतलं. मग कोल्हापुरातल्या आझाद गल्लीत स्वतःची कार्यशाळा सुरू केली. तेव्हापासून त्यांच्या उद्योगाचा आलेख चढताच राहिलेला आहे.

एक पोत मणी दहा मिलिचा असतो. त्याची किंमत सुमारे 65 रुपये असते. एका ग्रॅममध्ये सुमारे 135 मणी होतात. त्यांची किंमत 6 हजार 200 रुपये होते. संपूर्ण सराफी व्यापारी म्हणजे पोत मण्याची बाजारपेठ आहे. सचिन यांनी बनवलेले मणी संपूर्ण भारतात आणि परदेशात, विशेषतः दुबईला जातात. दुबईत मोठमोठ्या हवेल्या आणि हॉटेलात विशिष्ट प्रकारचे पडदे बनवले जातात. त्यांच्या झालरी ह्या पोत मण्यांपासून बनवल्या जातात. दहा कारागिरांकरवी दिवसाला पाच हजार मणी तयार होतात. सचिन ढणाल यांची वार्षिक उलाढाल सुमारे आठ कोटी रुपये होते.

कोल्हापुरी बाजाचे वैशिष्ट्यपूर्ण जव मणी

पोत मण्यांप्रमाणेच जव मणी हा खास कोल्हापुरी बाज असलेला मणी आहे. सन 1900 पासून शिवराम बाबाजी नागवेकर यांनी जव मण्यांच्या उत्पादनात पदार्पण केले. आज त्यांच्या चौथ्या पिढीचे रजत राजेंद्र नागवेकर हे जव मण्यांच्या उत्पादनात अग्रेसर आहेत. त्यांचे वडील राजेंद्र मुरलीधर नागवेकर यांनी हा उद्योग 1988 मध्ये आपल्या हातात घेतला. पोत मण्या मण्याप्रमाणेच जव मणीसुद्धा खास हस्तकलेचा नमुना आहे. त्याचे सर्व काम कारागिरांच्या हातातून होते. पहिल्यांदा सोन्याची आटणी केली जाते. त्यानंतर लगड पाडली जाते. त्याचा पाष्टा केला जातो. मग त्याची बेटणी होते. आधी चिमटणी होते, नंतर सवाणा नावाच्या साधनानं तो वाकवला जातो. त्याला गोलाकार दिला जातो. मग जव बांधणी- त्याची गाठ मारली जाते. 

त्यानंतर त्याचं तोंड मारलं जातं. त्यामुळे तो काहीसा चपटा होतो व त्याला जोडकामासाठी कडी लावली जाते. जोडकाम केल्यानंतर मग त्याला उजाळा दिला जातो. चिमटून सवाण्यानं भोपळ्यासारखा तयार केला जातो. एक मणी शंभर मिलिचा असतो. हा आकार कमीत कमी असतो. त्याच्या पुढे दीडशे, दोनशे मिलि असा वाढत जाऊन 1 ग्रॅम 500 मिलि एवढ्या मोठ्या आकाराचा मणी घडवला जातो. अर्थात हा मणी पोकळ असतो, त्यात लाख भरली जाते.


साज, ठुशी, गुंड, मनचली अशा गळ्यातल्या अलंकाराबरोबरच बांगड्यांतसुद्धा जव मणी वापरला जातो. स्थानिक बाजारपेठत तर सगळ्या सराफी व्यापार्‍यांकडून जव मण्याला मागणी असतेच. शिवाय जगभरही मागणी असते. भारतात केरळ ही मुख्य बाजारपेठ आहे. दुबईतही जव मण्याला खूप मागणी आहे. एक जव मणी घडण्यासाठी आठ दिवसांचे परिश्रम लागतात. फक्त जुन्या पिढीतील कारागीरच जव मणी घडवतात. नागवेकर यांच्या उद्योगात वर्षाला सुमारे पाच किलो सोन्याची उलाढाल होते. रुपयांत विचार केला, तर सुमारे चार कोटी रुपयांची ही उलाढाल असते. हे मणी भविष्यात यंत्रांद्वारे घडवले जातीलही, पण त्यात लहा जजनाचे जव मणी होऊ शकणार नाहीत. यांत्रिकीकरणाने ते घडवायचे असतील, तर जास्त वजनाचे मणी घाडवावे लागतील.

Monday, July 31, 2023

कियाराची ६५ हजारांची बिकीनी आहे तरी कशी? सिडसोबत समुद्रात एन्जॉय (Video)

 Kiara Advani

पुढारी ऑनलाईन डेस्क : सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा आडवाणीची लव्ह स्टोरी 'शेरशाह' चित्रपटाच्य़ा सेटवर झाली होती. त्यानंतर दोघांमधील अफेअरवरून चर्चा रंगू लागली. त्याचवर्षी दोघे ७ फेब्रुवारी रोजी राजस्थानच्या सूर्यगढ़ पॅलेसमध्ये लग्नबंधनात अडकले. आता दोघे वैवाहिक जीवन एन्जॉय करत आहेत. कियाराने ३१ जुलै रोजी आपला वाढदिवस साजरा केला. तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो व्हायरल होत आहे. 

 कियाराने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती आणि सिद्धार्थ मल्होत्रा समुद्रात उडी मारताना दिसत आहेत. तिने ब्लॅक कलरची मोनोकिनी घातली आहे. या बिकिनीची किंमत जवळपास ६५ हजार रुपये आहे.  हा व्हिडिओ आतापर्यंत २५ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे.

लग्नानंतर कियाराचा पहिला बर्थडे

सिद्धार्थ मल्होत्रासोबत लग्नानंतर कियाराचा हा पहिला बर्थडे होता. दोघानी सुंदर लोकेशनवर एकमेकांसोबत टाईन स्पेंड केला. हा व्हिडिओ शेअर करताना कियाराने कॅप्शनमध्ये लिहिलं, 'हॅप्पी बर्थडे टू मी.'



सालिह

**स्वालिया** (Swaliya / Swaliha) या नावाचा मुख्य अर्थ **"पुण्यवान", "सदाचारी", "धार्मिक" किंवा "चांगल्या ...