Tuesday, November 28, 2023

खास कोल्हापुरी, परवडणार्‍या दागिन्यांसाठी पोत मणी

सोनं ह्या चमकदार पिपळ्या धातूचं मानवाला प्राचीन काळापासून आकर्षण आहे. पण पण कितीही इच्छा असली, तरी जागतिक बाजारपेठेत सर्वत्र नेहमीच मौल्यवान ठरलेल्या सोन्याच्या सतत वाढत जाणार्‍या किमतीमुळं सामान्य माणसाला सोन्याचे वजनदार दगिने परवडत नाहीत, मात्र ग्राहकांना परवडणारा दागिना बनवायचा असेल, तर त्यासाठी पोत मणी अत्यंत उपयोगाचा ठरतो. हा मणी फक्त आणि फक्त कोल्हापुरातच तयार होतो. सचिन बापूसाहेब ढणाल हे पोत मण्यांचे अग्रगण्य उत्पादक आहेत. त्यांच्याशी चर्चा करून पोत मण्यांच्या उत्पादनाची पुष्कळ माहिती हाती लागली.
एक ग्रॅम सोन्यामध्ये जवळ जवळ 135 पोत मणी होतात. पोत मण्याचे स्पॉट मणी, नक्षी मणी असे काही उपप्रकार आहेत. प्रामुख्याने ठुशी, गुंड, गंठण, काही प्रकारच्या बांगड्यांमध्ये हे मणी वापरले जातात. नेकलेस बनवण्यासाठी कमीत कमी एक तोळा सोनं लागतं. पण तेच ठुशी बनवायची असेल, तर पोत मणी वापरून ती बनवता येते. अगदी चार ते पाच ग्रॅम सोन्यांच्या पोत मण्यांत ठुशी होते. मणी बनवण्याची प्रक्रिया मोठी असते. मुख्यतः ही सगळी प्रक्रियाहाताने होते. पहिल्यांदा सोन्याची आटणी केली जाते- म्हणजे सोनं वितळवलं जातं. त्यानंतर त्याची लगड तयार केली जाते. लगडीपासून पाष्टा तयार होतो. पाष्टा करण्यातून सोन्याची अतिशय पातळ अशी पट्टी बनवली जाते. पट्टीचे समान तुकडे होतील, अशा मापानं खुणा करून घ्यायच्या लहान- मोठ्या मण्यांच्या ठरलेल्या आकारानुसार तुकडे करायचे. नंतरच्या प्रक्रियेला बेटणे म्हणतात. ही प्रक्रिया दुहेरी असते. पहिल्या बेटण्याला पहिली बारी आणि दुसर्‍याला तयारी असं म्हणतात. त्याची बिट्टी तयार होते. एका पाटीवर (लिहिण्याची पाटी) बिट्टी फिरवली जाते, म्हणजे हलकेच घासली जाते. मग त्या बिट्टीची बांधणी होते.  त्यानंतर एक लहानसा पोकळ मणी तयार होतो.  त्याला सुवर्ण कारागिरांच्या भाषेत गुजरव असं म्हणतात. हा मणी चार वातींच्या ज्योतीवर तापवण्यात येतो. तेव्हा तो उमलतो. ज्योतींवर उष्णता दिली जात असताना मण्याला हवा लागून चालत नाही. म्हणून हे काम एका छोट्या बंदिस्त जागेतच केलं जातं. त्याला गूढ असं म्हणतात. म्हणजे एखादं रहस्य असतं, तसं. म्हणून अलंकारांच्या भाषेत गूढ. हे सगळं झाल्यानंतर अपेक्षेप्रमाणे लहानसा आणि पोकळ मणी तयार होतो. आधी त्या मण्याला छिद्र पाडलं जातं. मग लाखेच्या दोर्‍यासारख्या कांडीनं त्यात लाख भरली जाते. मणी पुन्हा गरम केला जातो, त्याच्यात लाख विरघळते. काही वेळानं मणी घट्ट होतो. त्याला आरपार छिद्र पाडलं जातं. नंतर त्याला झळाळी येण्यासाठी पॉलिश केलं जातं. अशा मण्यांची दोर्‍यात ओवून लड तयार केली जाते. मग त्या मण्यांनी विविध प्रकारचे अलंकार घडवले जातात.


सचिन ढणाल हे 1995 पासून मण्यांच्या उत्पादनात आहेत. लौकिक अर्थानं त्यांचं शिक्षण खूप कमी झालं, पण पोत मण्यांच्या उत्पादनात ते इतके तरबेज आहेत की आज ते अग्रगण्य सुवर्ण उद्योजक आहेत. पोत मणी पूर्णतः हस्तकलेने बनतात. ते वजनाने अत्यंत हलके असतात. कोणत्याही यांत्रिक साधनाचा यात उपयोग केला जात नाही. हे काम यंत्रावर होऊच शकत नाही. भाऊ अमोल आणि मामा सुरेंद्र पुरवंत हे ठुशीच्या उद्योगात आहेत. त्यांच्या सोबत राहून सचिन यांनी उद्योगात प्रवेश केला. हिरासाो (साहेब नव्हे) झाड यांच्याकडे त्यांनी मणी बनवण्याचं आठ वर्षे प्रशिक्षण घेतलं. मग कोल्हापुरातल्या आझाद गल्लीत स्वतःची कार्यशाळा सुरू केली. तेव्हापासून त्यांच्या उद्योगाचा आलेख चढताच राहिलेला आहे.

एक पोत मणी दहा मिलिचा असतो. त्याची किंमत सुमारे 65 रुपये असते. एका ग्रॅममध्ये सुमारे 135 मणी होतात. त्यांची किंमत 6 हजार 200 रुपये होते. संपूर्ण सराफी व्यापारी म्हणजे पोत मण्याची बाजारपेठ आहे. सचिन यांनी बनवलेले मणी संपूर्ण भारतात आणि परदेशात, विशेषतः दुबईला जातात. दुबईत मोठमोठ्या हवेल्या आणि हॉटेलात विशिष्ट प्रकारचे पडदे बनवले जातात. त्यांच्या झालरी ह्या पोत मण्यांपासून बनवल्या जातात. दहा कारागिरांकरवी दिवसाला पाच हजार मणी तयार होतात. सचिन ढणाल यांची वार्षिक उलाढाल सुमारे आठ कोटी रुपये होते.

कोल्हापुरी बाजाचे वैशिष्ट्यपूर्ण जव मणी

पोत मण्यांप्रमाणेच जव मणी हा खास कोल्हापुरी बाज असलेला मणी आहे. सन 1900 पासून शिवराम बाबाजी नागवेकर यांनी जव मण्यांच्या उत्पादनात पदार्पण केले. आज त्यांच्या चौथ्या पिढीचे रजत राजेंद्र नागवेकर हे जव मण्यांच्या उत्पादनात अग्रेसर आहेत. त्यांचे वडील राजेंद्र मुरलीधर नागवेकर यांनी हा उद्योग 1988 मध्ये आपल्या हातात घेतला. पोत मण्या मण्याप्रमाणेच जव मणीसुद्धा खास हस्तकलेचा नमुना आहे. त्याचे सर्व काम कारागिरांच्या हातातून होते. पहिल्यांदा सोन्याची आटणी केली जाते. त्यानंतर लगड पाडली जाते. त्याचा पाष्टा केला जातो. मग त्याची बेटणी होते. आधी चिमटणी होते, नंतर सवाणा नावाच्या साधनानं तो वाकवला जातो. त्याला गोलाकार दिला जातो. मग जव बांधणी- त्याची गाठ मारली जाते. 

त्यानंतर त्याचं तोंड मारलं जातं. त्यामुळे तो काहीसा चपटा होतो व त्याला जोडकामासाठी कडी लावली जाते. जोडकाम केल्यानंतर मग त्याला उजाळा दिला जातो. चिमटून सवाण्यानं भोपळ्यासारखा तयार केला जातो. एक मणी शंभर मिलिचा असतो. हा आकार कमीत कमी असतो. त्याच्या पुढे दीडशे, दोनशे मिलि असा वाढत जाऊन 1 ग्रॅम 500 मिलि एवढ्या मोठ्या आकाराचा मणी घडवला जातो. अर्थात हा मणी पोकळ असतो, त्यात लाख भरली जाते.


साज, ठुशी, गुंड, मनचली अशा गळ्यातल्या अलंकाराबरोबरच बांगड्यांतसुद्धा जव मणी वापरला जातो. स्थानिक बाजारपेठत तर सगळ्या सराफी व्यापार्‍यांकडून जव मण्याला मागणी असतेच. शिवाय जगभरही मागणी असते. भारतात केरळ ही मुख्य बाजारपेठ आहे. दुबईतही जव मण्याला खूप मागणी आहे. एक जव मणी घडण्यासाठी आठ दिवसांचे परिश्रम लागतात. फक्त जुन्या पिढीतील कारागीरच जव मणी घडवतात. नागवेकर यांच्या उद्योगात वर्षाला सुमारे पाच किलो सोन्याची उलाढाल होते. रुपयांत विचार केला, तर सुमारे चार कोटी रुपयांची ही उलाढाल असते. हे मणी भविष्यात यंत्रांद्वारे घडवले जातीलही, पण त्यात लहा जजनाचे जव मणी होऊ शकणार नाहीत. यांत्रिकीकरणाने ते घडवायचे असतील, तर जास्त वजनाचे मणी घाडवावे लागतील.

No comments:

Post a Comment

सालिह

**स्वालिया** (Swaliya / Swaliha) या नावाचा मुख्य अर्थ **"पुण्यवान", "सदाचारी", "धार्मिक" किंवा "चांगल्या ...