Monday, May 20, 2024

मंजिरी कपडेकर : पाककला शिक्षणातून सुरु केला व्यवसाय

कोल्हापुरात पाककला क्षेत्रातील सध्याचे आघाडीचे नाव म्हणजे मंजिरी कपडेकर. केवळ पाककलेतील खवय्येगिरी नव्हे तर हजारो महिलांना, तरुण-तरुणींना पाककलेचे धडे देणाऱ्या 'सुगरण' अशी त्यांची ख्याती आहे. त्या मूळच्या सोलापूरच्या,  सासर कोल्हापूरचे. त्यामुळे त्यांना सोलापूर-कर्नाटक आणि आजूबाजूच्या प्रदेशातील खाद्यसंस्कृती चांगली माहिती आहे. कोल्हापुरात आल्यानंतर इथली पाककला शिकून घेतली. या पाककला शिक्षणाचा उपयोग इतरांसाठी व्हावा, म्हणून त्यांनी क्लासेस सुरु केले.

गृहिणी घडवणे, ज्यांना बिझनेस सुरु करायचा आहे त्यांच्यासाठी, ज्यांना कॅफे सुरु करायचा आहे किंवा फूड व्हॅन सुरु करायचा आहे, फूड स्टॉल करायचा आहे, त्यांच्यासाठी प्रोफेशनल शिक्षण देण्याचे काम मंजिरी कपडेकर करतात. कोल्हापुरातील व्हिनस कॉर्नर येथे त्यांचे प्रशिक्षण देण्यासाठीचे ठिकाण असून एक वेगळा व्यवसाय त्यांनी हाती घेतला आहे.

अशी झाली सुरुवात

मंजिरी यांचे बी.कॉमपर्यंत झाले. बालपणापासूनच पाककलेत आवड असल्यामुळे त्यांनी पाककलेतून पुढे जाण्याचं ठरवलं. कपडेकर यांचे कुटुंबीय मोठे असल्यामुळे १००-१०० लोकांचे जेवण करणे, अनेक कार्यक्रमातून स्वयंपाक करणे, यामुळे त्यांचा पाककलेत हातखंडा आहे. शिवाय सासू यादेखील उत्तम सुगरण होत्या. त्यामुळे सासू-सून मिळून उत्तम स्वयंपाक बनवायच्या. सासूच्या हातचे अनेक चविष्ट पदार्थदेखील कपडेकर यांनी शिकून घेतले. अनेक हॉटेल्सना भेटी देऊन तिथे ग्रेव्ही, मसाले कशा पद्‌धतीने बनवून ठेवले जाते. ऑर्डर आली की लगेच कमी वेळेत पदार्थ कसे बनवावेत, हे शिकून घेतले. नाशिक, पुणे, कोल्हापूर, कर्नाटक अशी भारतभर भ्रमंती करून त्यांनी तेथील खाद्यपदार्थ शिकून घेतले. पुढे त्यांनी रत्नागिरी, गोवा, मिरज, सांगली, सोलापूर बेळ‌गाव, इचलकरंजी येथे जाऊन प्रशिक्षण दिले.

देश-विदेशात विद्यार्थी कार्यरत

मंजिरी हर्षराज कपडेकर कुकिंग क्लासेस या नावाने नावारूपाला आलेला एक वेगळा व्यवसाय, असंख्य महिलांना कुकिंगचे धडे देण्याचे काम मंजिरी यांनी केले आहे. यामध्ये तरुणदेखील मोठ्या उत्साहाने मंजिरी यांच्याकडे पाककलेचे धडे घेण्यासाठी येतात. अनेक विद्यार्थी-विद्यार्थीनी त्यांच्याकडे प्रशिक्षण घेऊन चांगल्या पदापर्यंत पोहोचले आहेत. हे विद्यार्थी संपूर्ण भारतभर आणि भारताबाहेर आज विविध पदांवर कार्यरत आहेत. युएस, ऑस्ट्रेलिया याठिकाणी कपडेकर यांचे विद्यार्थी चांगल्या पदांवर कार्यरत आहेत. त्यांना कॉन्टेटल - मेक्सिकन, थाई, इटालियन पदार्थाचे ट्रेनिंग मंजिरी कपडेकर यांनी दिले आहे.

प्रोफेशनल प्रशिक्षण

प्रोफेशनल क्लासेस घेऊन त्यांनी आतापर्यंत अनेकांना कॅफे सुरु करण्यासाठी, हॉटेल वा नाश्ता सेंटरसाठी, खाद्य व्यवसायासाठी प्रशिक्षण दिले आहे. कपडेकर यांच्या प्रशिक्षण  वर्गात सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ जसे की, पिझ्झा, सँडविच, मॉकटेल, पुरीभाजी, शेकचे प्रकार, पास्ता, कुर्मापुरी, उपीट, शिरा, पोहे, साउथ इंडियन फूड, बर्गर, त्याचबरोवर कोल्हापुरी मटण थाळी, नॉनव्हेज स्टार्टर, डोसाचे विविध प्रकार, बिर्याणीचे प्रकार शिकवले जातात. त्यांच्याकडे कोल्हापूरसोबतच मुंबई, पुणे, कर्नाटक, गोवा येथून अनेक पाककला शिकण्यासाठी येतात.  खास म्हणजे, त्यांच्याच एका विद्यार्थ्याने नाशिकमध्ये खूप मोठे हॉटेल उघडले आहे. तिथे मिळणारे सर्व पदार्थ जसे की, कोल्हापुरी मटण थाळी, चिकन थाळी, बिर्याणीचे प्रकार या पदार्थांचे प्रशिक्षण त्या विद्यार्थ्याने कपडेकर यांच्याकडून घेतले आहे.

टीव्हीवर अनेक शो आणि कार्यक्रम

बहुतांश सर्व मराठी वाहिन्यांवर देशभरातील प्रसिद्ध शेफबरोबर पाककला सादर करण्याची संधी त्यांना मिळाली. मंजिरी कपडेकर यांचे टीव्हीवर अनेक शो होतात. बी चॅनेल, कलर्स मराठी, झी टीव्ही, साम टीव्ही, वर त्यांनी आपल्या मेजवानीचे सादरीकरण केले आहे. ई टीव्हीच्या त्या मेजवानी शोच्या वा विजेत्या देखील आहेत. महाराष्ट्र सुगरणमध्ये त्या रनरअप ठरल्या आहेत.

अनेक पुस्तके प्रकाशित

कपडेकर यांच्या पाककले‌ची अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. शाकाहारी-मांसाहारी, खाद्य पदार्थांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अनेक प्रसारमाध्यमांमध्ये पाककला विषयक लेखन त्यांनी केलेलं आहे. खाद्यसंस्कृतीचा अभ्यास त्या करत असून आपली खाद्यसंस्कृती पोहोचली पाहिजे, पुढच्या पिढीपर्यंत त्याचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे, यासाठी  कपडेकर प्रयत्न करतात. आकाशवाणीवरूनदेखील त्यांनी आपल्या पाककला संस्कृतीबद्‌दलची व्याख्याने आणि मार्गदर्शन केले आहे. सणवार आणि खाद्यसंस्कृती यावर लेख आणि व्याख्याने प्रसिद्‌ध झाली आहे.

देश-विदेशातील फूड मशिन्सचे प्रशिक्षण

तरुण-तरुणींना तसेच गृ‌हिणी, नवविवाहितांना विविध प्रकारच्या उसळी, फळभाज्या, चपाती, भाकरी, पुलके पासून पिटलं भात, वरण भात, पंजाबी डिश, चायनीजचे प्रकार, आईस्क्रीम, मॉकटेल, कॉक्टेल्स शिकवले जाते. भारतात आणि परदेशात किचन इलेमेंट्समध्ये काही प्रमाणात वैविध्य असतं. त्यामध्ये परदेशातील मायक्रो ओव्हनमधील जेवण, फूड ‌प्रोसेसर मशीन, ओटीजी ओव्हन, ब्लेंडर कसे वापरायचे याचे प्रशिक्षण दिले जाते.

यामध्ये नामदेव शिंपी समाजाचे दोन पुरस्कार, रागिनी पुरस्कार, दामिनी, भगिनी पुरस्कार, कोल्हापूर सुगरण, अन्नपूर्णा पुरस्कार, उत्कृष्ट माता पुरस्कार, नवऊर्जा पुरस्कार, उत्कृष्ट संघ पुरस्कार मिळालेले अहित.

No comments:

Post a Comment

सालिह

**स्वालिया** (Swaliya / Swaliha) या नावाचा मुख्य अर्थ **"पुण्यवान", "सदाचारी", "धार्मिक" किंवा "चांगल्या ...