Tuesday, November 28, 2023

रिक्षा चालवली, मजुरी केली; पण स्वतःचा उद्योग उभा केला!




राजेंद्र बाळासाहेब पिसाळ आणि संजय बाळासाहेब पिसाळ हे बंधू कोल्हापूरचे. त्यांचे वडील हे बाळसाहेब पिसाळ हे एका खासगी कापडाच्या दुकानात विक्रेते आणि हिशोबनीस अशी दोन्ही कामं सांभाळाचे. तुटपुंज्या वेतनात आपला सगळा बारदाना सांभाळत नेहरू नगरात भाड्याच्या एका खोलीत रहात होते. घरात अठराविसे दारिद्—य. राजेंद्र आणि संजय यांच्या बालपणीच आई वारली. सावत्र आईला चार अपत्यं. त्यामुळं ह्या दोन्ही बंधूंचा अतोनात छळ सुरू होता. दरम्यान, राजेंद्र हा दुसर्‍या एका कापड दुकानात कामाला जायला लागला. बाल वयातच काम करत करत शिक्षण सुरू झालं.संजयचीही शाळा सुरू होती. राजेंद्रचं मन कापडाच्या दुकानात रमत नव्हतं. आपला स्वतःचा कारखाना असावा, हे त्याचंं स्वप्न होतं. मग त्यानं कापडाचं दुकान सोडलं. दिलबहार तालमी जवळील पाटील इंजिनिअरिंग वर्क्स ह्या कारखान्यात तो नोकरीला लागला. हे वर्ष होतं 1975- 76. काम शिकायचं होतं, म्हणून वर्षभर बिनपगारी राबला. मात्र लेथ मशीन चालवण्यात तो तरबेज झाला. तिथून तो दुसर्‍या मोठ्या कारखान्यात कामाला लागला. इथं त्याला रमहा 500 रुपये वेतन मिळायला लागलं. मोठ्या बंधूंच्या सांगण्यानुसार संजय बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर शिवाजी उद्यमनगरात एका कारखान्यात काम शिकायला गेला. त्याला काम शिकताना दरमहा 60 रुपये वेतन मिळायला लागलं.  वेतन कितीही कमी असलं, तरी काम शिकणं महत्त्वाचं होतं. ते वर्ष होतं 1980. काम शिकत असताना जॉब भरलेले गाडे हमालाप्रमाणे ढकलायला लागले. त्याचे मित्र हे बत होते, पण कोणत्याही कामाची लाज न बाळगता संजयनं सगळं काम शिकून घेतलं.
दरम्यान, आपण रिक्षा घ्यावी असं वडील बाळासाहेब पिसाळ यांच्या मनात आलं. कर्ज काढून एक जुनी रिक्षा घेतली. पण ती घेतल्यानंतर चालवायची इच्छाच संपली. रिक्षा नुसती घेऊन ठेवली. तिचं आता करायचं काय? मग संजय ती चालवायला लागला. काही काळ त्यानं रिक्षा चालवली. आपल्या वडिलांना आयुष्यभर दुसर्‍याच्या दुकानात राबराब राबून काही मिळवलं नाही, म्हणून राजेंद्र आणि संजय यांनी मिळून भांडवल गुंतवून त्यांना कापडाचं एक छोटं दुकान काढून दिलं. पण वर्षभरातच पार बट्ट्याबोळ होऊन दुकान बंद करावं लागलं. सगळी रक्कम कुठं गेली हे त्यांना सांगता आलं नाही. त्यांना कुणीतरी फसवलं असावं.
संजय रिक्षा चालवत होता खरा, पण ‘कारखाना’ काही दोन्ही भावांच्या डोक्यातून जात नव्हता. मग पिसाळ बंधूंनी आत्याकडून पाच हजार रुपये उसने घेतले. एक जुनं लेथ मशीन विकत घेतलं. हे लेथ मशीन शिवाजी उद्यम नगरात एक जागा घेऊन तिथं ठेवलं. जागा अर्थात भाड्याचीच होती. एकच मशीन होतं. पण कारखान्याला नाव दिलं ‘विशाल इंडस्ट्रीज’. आपला कारखाना नावाप्रमाणेच विशाल व्हावा, हा त्यामागचा हेतू. मशीनवर करण्यासाठी कामं मिळायला लागली. पण मशीन खूप जुनं होतं. त्याच्यावर काम करायला मर्यादा येत होत्या. त्यामुळं काम कमी मिळत होतं.  उत्पन्न पुरेसं येत नव्हतं.  जागेचं भाडं भागवायलाही  जमेना. मग कालातरानं हेच मशीन घरी आणलं. आता घरी महापालिकेचा परवाना, थ्री फेझ विजेची जोडणी इत्यादी कामे करण्यासाठीही पैसे नव्हते. मग संजयनं एक निर्णय घेतला, पुन्हा रिक्षा चालवण्याचा. मग एका मित्राची रिक्षा भाड्याने आणून चालवायला सुरुवात केली. काहीतरी चलन चालू झालं. मग बाराशे- तेराशे रुपये जमा करून विजेची जोडणी घेतली.  दोघा भावांनी स्वतः काम करून खोली उभी केली. नंतर सुशिक्षित बेरोजगार योजनेखाली 25 हजार रुपयांचं कर्ज काढलं. नवीन लेथ मशीन, ड्रिल मशीन आणलं. जम बसल्यावर राजेंद्र यानं परक्याच्या कारखान्यातील नोकरी सोडली. त्यानंतर ‘विशाल इंडस्ट्रीज’ हा उद्योग जोमानं सुरू झाला. कामं मिळत गेली, ती वाढत गेली. दोघांनी कारखानदार मित्र जमा केले. त्यांच्या मोलाच्या सहकार्यानं उद्योग वाढायला लागला.  त्यानंतर पिसाळ बंधूंनी मागे वळून पाहिलंच नाही.
घरच्या कारखान्यात भरपूर कामं सुरू होती. त्याच वेळी पिसाळ बंधूंनी गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीत ‘श्री केदारेश्वर इंडस्ट्रीज’ हे कारखान्याचं दुसरं युनिट सुरू केलं. तिथं वेगवेगळ्या प्रकारची अत्याधुनिक यंत्रसामुग्री आणली. प्रत्येक जॉबला अ‍ॅक्युरसी आणि फिनिशिंग आणणारं होनिंग मशीन आणलं. कारखान्यात चार चाकी वाहनांचे ब्रेक सिलेंडर्स, ब्लॉक पिस्टन्स असे विविध प्रकारचे भाग तयार करण्यात यायला लागले. त्यानंतर परदेशात निर्यात केले जाणारे जॉब तयार व्हायला लागले. हे जॉब मोठ्या जहाजाने निर्यात केले जातात, सागराच्या खार्‍या वार्‍यानं त्यांना गंज चढू नये, म्हणून त्यांना विशिष्ट प्रकारचे कोटिंग चढवण्यात यायला लागले. ड्रिलिंग, मशिनिंग, होनिंग, फॉस्पेरिंग, ब्लॅकनिंग अशी कामे करण्यात पिसाळ बंधू तरबेज झाले. अनेक प्रकारचे सुटे भाग तयार करण्याची अत्याधुनिक यंत्रणा उभी झाली. ‘विशाल इंडस्ट्रीज’ हा घरी सुरू असलेला कारखाना रहिवासी क्षेत्रात होता, त्यामुळं तो रात्री बंद करावा लागायचा. हा कारखानाही मग गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीत नेण्यात आला. तिथंही कामं वाढत गेली. ग्राहकांच्या मनात पिसाळ बंधूंच्या अचूकता आणि प्रमाणशीरता याविषयी विश्वास निर्माण झाला. त्यातून उद्योग वाढत गेला. आज हा उद्योग ३० लाखाची उलाढाल करतो.हे यश मिळण्यात उद्यम नगरातील ‘रामचंद्र इंजिनिअरिंनग वर्क्स’ च्या प्रफुल्ल डुणुंग यांचं मोलाचं सहकार्य लाभलं.
विशाल आणि श्री केदारेश्वर इंडस्ट्रीजमध्ये सर्व निर्यात केले जाणारे ऑटोमोबाईल्सचे पार्ट्स तयार होतात. निर्यात उत्पादनाचा दर्जा कायम टिकवून ठेवण्यात पिसाळ बंधू यशस्वी झाले आहेत. आज राजेंद्र पिसाळ    वर्षांचे आहेत. त्यांना दोन मुलगे, एक मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. संजय पिसाळ हे आज 61 वर्षांचे आहेत. त्यांच्या पत्नीचे गतवर्षी कर्करोगाने निधन झाले. त्यांना एक मुलगी, एक मुलगा, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्यांची मुलेही हा उद्योग सांभाळत आहेत.

No comments:

Post a Comment

सालिह

**स्वालिया** (Swaliya / Swaliha) या नावाचा मुख्य अर्थ **"पुण्यवान", "सदाचारी", "धार्मिक" किंवा "चांगल्या ...