Thursday, November 30, 2023

मर्लिन मुनरो : जगाला वेड लावणाऱ्या 'सौंदर्यपरी'ची रहस्यमयी कथा

हॉलिवूडची  सर्वात सुंदर अभिनेत्री आणि सेक्स सिंबल म्हणून ओळखली जाणारी 'मर्लिन मुनरो' हिच्यावर मागील वर्षी बायोपिक येऊन गेला. या बायोपिकचे नाव - 'ब्लॉन्ड' असे होते. या बायोपिकमध्ये हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री Ana de armas हिने मुनरोची व्यक्तीरेखा साकारली. मर्लिनचे सौंदर्य वाखाणण्याजोगे होते. तिचे ग्लॅमरस दिसणे सर्वांना आकर्षून घेणारे होते. डाव्या गालावरील काळ्या रंगाचा ब्युटी मार्क मर्लिनच्या सौंदर्यात आणखी भर टाकायचा. मादक डोळे, चकाकणाऱ्या कुरळ्या केसांमुळे मर्लिनचे सौंदर्य आणखी बहरायचे. पण, हे ग्लॅमर फार काळ टिकू शकलं नाही. मर्लिनचा खूप कमी वयात मृत्यू झाला. प्रचंड ग्लॅमर, आजुबाजूला माणसांची गर्दी, विलासी जगणं आणि अनेक अफेअर्स...शेवटी गूढ मृत्यू...अशी एक हॉलिवूडची तारका मर्लिन मनुरो जिच्या मृत्यूचे रहस्य अद्यापही उलगडू शकले नाही. तिने आत्महत्या केली असे म्हटले जाते, तर काही जण तिचा खून झाल्याचे म्हणतात. पण, अखेर या गोष्टी कधीच उलगडू शकल्या नाहीत. शेवटी मर्लिनचं सौंदर्य, विलासी जीवन, अफेअर्स आणि मृत्यू केवळ पुस्तकांतून प्रतिबिंबीत झालं.


मर्लिन मुनरोचा जन्म १ जून, १९२६ रोजी झाला. तर औषधांची अधिक मात्रा घेतल्याने ५ ऑगस्ट, १९६२ रोजी तिचा मृत्यू झाला. मर्लिन मुनरो हे जगविख्यात नाव आहे. तिचा जन्म आणि बालपण लॉस एंजेलिसमध्ये गेले. मर्लिन मुनरो हॉलीवूडमधील सुंदर अभिनेत्रीपैकी एक होती. मर्लिनला अनेकांकडून प्रेम मिळालं. पण, तिचं दु:ख न कुणी समजलं न कुणी तिचा आधार बनला. सौंदर्य, ग्लॅमर, प्रेम आणि कमी वयात ओढावलेल्या मृत्यू यादरम्यान तिच्या जीवनातील काळी बाजू कुणालाच दिसली नाही, असे म्हणायला हरकत नाही.

तिचं नाव अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी ते गायक फ्रँक सिनात्रा आणि बेसबाल खेळाडू जो डिमॅगियोशीही जोडलं गेले होते. मुनरोने अनेक लग्ने केली, जी अयशस्वी ठरली.

तमाम सवयी आणि बिनधास्त वागणं आणि प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये खेचल्या गेलेल्या मर्लिनच्या खरी आयुष्याची कहाणी कदाचित खूप कमी लोकांना माहिती असावी. तिचे चरित्र लिहिणाऱ्यांनी तिच्या ग्लॅमरस जीवनाची दुसरी बाजू दाखवली. तिने लिहिलेली पत्रे, कविता आणि रोजनिशी, चित्रपटांचे कॉन्ट्रॅक्ट असे अनेक दस्तावेज 'फ्रॅगमेंट्स: पोएम्स, इंटिमेट नोट्स, लेटर्स बाय मर्लिन मुनरो' नावाने छापण्यात आले. तारुण्यात अनेक पुरुषांशी संबंध, शोषणाचे किस्से आणि प्रेमासाठी व्याकूळ झालेल्या मर्लिनचा संदिग्ध मृत्यू जगजाहीर आहे. काही पत्रे, पुस्तकांतून खासगी जीवन सार्वजनिक झाल्याने तिच्या आयुष्यातील अनेक पैलू बाहेर आले.
माणसांची गर्दी सहन व्हायची नाही  

अभिनेत्री म्हणून जगताना ग्लॅमर, चित्रपट, चर्चा आणि बरचं काही अवतीभोवती असतानाही कधी कधी माणसांची गर्दी तिला सहन होत नसे. अभिनेत्री असल्यामुळेच ती आपल्या मनातील गोष्टी कदाचित सार्वजनिकपणे व्यक्त करू शकली नसावी. म्हणूनचं तिने आपल्या लिखाणाचा आधार घेऊन ते कागदावर उतरवण्याचा प्रयत्न केला.

मर्लिनचा जन्म १ जून १९२६ रोजी झाला. तिचं नाव ठेवण्यात आलं- नौरमा जीन बेकर. मर्लिन नावाच्या पुस्तकात नार्मन मेलर म्हणतो- 'एकीकडे अवैधता आणि दुसरीकडे वंशागत विक्षिप्ततेचा इतिहास. तिचे आजोबा मुनरोने आपले शेवटचे आयुष्य एका राजकीय मनोरुग्णांच्या इस्पितळात घालवले होते. तिची आजी अतिशय सुंदर होती. तीदेखील मृत्यू आधी मनोरुग्णांच्या इस्पितळात होती. त्याचप्रकारे तिच्या आईच्या आयुष्य़ातील अधिक काळ मनोरुग्णांसाठी असलेल्या आश्रयस्थानात गेले होते. मर्लिनच्या एका मामाने आत्महत्या केली होती. जेव्हा जेव्हा आईला मनोरुग्ण आश्रयस्थान नेले जायचे. तेव्हा मर्लिनला अनाथालये किंवा पोषणगृहात राहावं लागत असे.' मर्लिनच्या पूर्वायुष्यातील इतिहास तिच्या जगण्याला वेगळा अर्थ देऊ शकला असे म्हणायला हरकत नाही.

सौंदर्यपरी मर्लिन

मर्लिनला अप्रतिम सौंदर्याचे वरदान मिळाले होते. अल्पवयीन असतानाच मर्लिनला समजले होते की, आपल्या सौंदर्याकडे पुरुष आकर्षित होताहेत. 'विलासी सुंदरिया' या हिंदी पुस्तकात म्हटलं गेलं आहे की, तिच्या मृत्यूच्या दोन वर्षापूर्वी तिने लेखक जेक रोजेन्सला सांगितले होते की, सुरुवातीला तिने मॉडेलिंग सुरू केले होते. पुढे हॉलिवूडमध्ये दाखल झाल्यानंतर अनेक चित्रपट निर्मात्यांच्या संपर्कात ती आली. ती एकदा म्हणाली होती की, त्या चित्रपट निर्मात्यांना जे हवंय, हे जर त्या अभिनेत्रीला मान्य नसेल तर तिची जागा घेण्यासाठी ४० जणी तयार असायच्या. तिने यावेळी धक्कादायक माहिती दिली होती की, तिचे अनेक चित्रपट निर्मात्यांशी संबंध आले होते. यापुढेही जाऊन तिने ब्रिटीश पत्रकार डब्ल्यू. जे. वैदरबीसमोर खुलासा केला होता की, स्वत: आपण ठरवू शकत नाही की, कुणाशी संबंध ठेवायचे; नाही तर तुम्ही सिनेतारका कधीच होऊ शकत नाही.  

अनाथालयात जगली

मर्लिनचा जन्म सामान्य कुटुंबात झाला होता. तिचे बालपण अनाथालय आणि बालगृहात गेलं होतं. त्यामुळे तिला खूप कमी शिक्षण घेता आले. तिच्याकडे होतं ते रुप, विलक्षण सौंदर्य. मात्र, तिच्या मानेवर सिनेतारका होण्याचं भूत बसलं होतं. ती त्यासाठी काहीही करायला तयार होती. 

अनेक अफेअर्स केल्यानंतर मर्लिन उदासिन झाली होती. ती प्रेमासाठी काहीही करायला तयार होती. तिला अनेकांनी गाडी, बंगले, विलासी चैनचे आमिष दाखवले. पण, ती कायमस्वरुपी त्या-त्या पुरुषासोबत राहायला तयार नव्हती. तिला हवं होतं ते 'प्रेम.' खरं प्रेम जे तिला आयुष्यात कधीही मिळालं नाही.

मर्लिनचा शेवटचा फोन

त्यादिवशी ती थोडी अस्वस्थच होती. ज्या व्यक्तीला तिने फोन केला, ते तिचे शेवटचे बोलणे होते. त्या व्यक्तीचे नाव लाफोर्ड होते. लाफोर्डने सांगितले होते की, मर्लिनला त्याने रात्रीच्या जेवणासाठी आमंत्रित केलं होतं. पण, जेव्हा त्याने संध्याकाळी मर्लिनला फोन केला, तेव्हा ती चिडचिड करत होती. तिने जेवणासाठी येण्यास नकार दिला. ती उदास वाटत होती. तिच्या स्वरात कंप जाणवत होता.

लाफोर्डदेखील हॉलीवूडशी संबंधित होता. लाफोर्डने पुढे सांगितले- रात्री ८ वाजता पुन्हा मर्लिनला फोन केला, तेव्हाही तिने येण्यास नकार दिला. कापऱ्या आवाजात ती म्हणाली, 'प्रेसिडेंटना गुडबाय सांग आणि तुलादेखील गुडबाय.' पण, लोकांना वाटत होतं की, तो खोटी कहाणी सांगत आहे. मर्लिनला अमेरिकन राष्ट्राध्यक्ष प्रेसीडेंट जॉन एफ केनेडी आणि त्यांचे भाऊ यांच्यासोबत सातत्याने पाहिले जात होते. लाफोर्ड आणि केनेडी बंधूंचे चांगले संबंध होते.

'तो' रहस्यमयी मृत्यू

असं म्हटलं जातं की, मर्लिनने झोपेच्या गोळ्या खाऊन आपलं जीवन संपवलं होतं. पण, काही जण म्हणतात की हा खून होता. प्रश्न हा होता की, तिने खाल्लेल्या इतक्या झोपेच्या गोळ्या कुठून आल्या? औषधांची बाटली कुठे गायब झाली? ज्या बेडवर तिचा मृतदेह होता, त्यावरचे बेडशीट जरादेखील विस्कटलेले दिसले नाही.

असंही म्हटंलं गेलं की, मर्लिनच्या किडनीमध्ये ड्रग्ज मिळाले नाही. तिने गोळ्या खाल्ल्या नाहीत तर तिला इंजेक्शन दिले गेले आहे. एकूणच परिस्थिती संशयित होती. लोकांनी संशयाचे बोट जॉन एफ केनेडी यांच्याकडेही दाखवले. कारण, केनेडी आणि मर्लिनचे संबंध खराब झाले होते आणि ती त्यांच्याविरोधात एक पत्रकार परिषद घेणार होती.

अनेक पत्रकारांनी तिच्या मृत्यूनंतर टेलिफोनचे रेकॉर्ड आणि अन्य माहिती शोधण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांच्या हाती काही लागले नाही.

पत्रकाराला मिळाले सिक्रेट पत्रांचे बंडल

एका पत्रकारला मर्लिनच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी पत्रांचे बंडल मिळाले. हे पत्र मर्लिन और केनेडी बंधुंमध्ये एकमेकांना लिहिलेली पत्रे होती.

गुडमनने एक केनेडी आणि मर्लिन यांच्या भोवती फिरणारे पुस्तकही लिहिले. पण, कोणत्याच प्रकाशकाने ते छापण्यास सहमती दर्शवली नाही. मर्लिनच्या आत्महत्येनंतर एक वर्षांनी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांची हत्या झाली. अखेर ते पुस्तक छापण्यात आलेच. पुस्तकाचे नाव होते 'मर्लिनचा रहस्यमयी मृत्यू'.

No comments:

Post a Comment

सालिह

**स्वालिया** (Swaliya / Swaliha) या नावाचा मुख्य अर्थ **"पुण्यवान", "सदाचारी", "धार्मिक" किंवा "चांगल्या ...