महाराष्ट्रात "मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना" नोव्हेंबर - २०२१ सालापासून सुरु झाली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश असा की, शेतमाल पोहोचविण्यासाठी रस्ते नसल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. हिच बाब लक्षात घेऊन सरकारने "मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद योजना" अंमलात आणली. शेतीमधील कमी होणारी मनुष्यबळाची उपलब्धता लक्षात घेता शेतीची कामे करण्यासाठी यंत्रांचा उपयोग केला जातो. यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी आणि अन्य कामे करण्यासाठी, यंत्रसामुग्री शेतापर्यंत नेण्यासाठी आणि शेतमाल बाजारात पोहचविण्याकरीता बारमाही शेतरस्त्यांची आवश्यकता असते. ग्रामीण भागात शेतरस्त्यांची भूमिका गावाच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी महत्वाची आहे. अशा रस्त्यांमुळे शेती विकासालाही चालना मिळू शकेल. त्यामुळेच ‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना’ महत्वाची आहे.
असे रस्ते तयार करून शेतकऱ्यांना सुविधा देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राज्यात ‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना’ राबविण्याचा निर्णय घेतला गेला होता. या रोजगार हमी योजनेंतर्गत अनेक बेरोजगार लोकांना रोजगारही मिळाला. शेत पाणंद रस्त्यांच्या कामामुळे कोणत्याही खासगी जमिनीवर अतिक्रमण होणार नाही याची काळजी घेतली जाते. पाणंद रस्ते तयार करण्यासाठी विविध रोजगार हमी योजनांतून बेरोजगारांच्या हातांना काम दिले जाते. गावागावात, शेतकऱ्या-शेतकऱ्यांमध्ये असणारी वाद मिटवण्यासाठी पाणंद रस्ता महत्त्वाचा दुवा ठरतो. मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणांद रस्ते योजना , मनरेगा यांचा मुख्य उद्देश मागेल त्याला अकुशल रोजगार उपलब्ध करुन देणे असा असून त्यासोबतच ग्रामीण भागात त्याची अंमलबजावणी केली जात आहे.‘मातोश्री शेत/पाणंद रस्ते योजना’ राज्यात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेत वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या. मात्र, या योजनेच्या माध्यमातून तयार होणाऱ्या रस्त्यांची गुणवत्ता निश्चित होत नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी शेतरस्त्यांची कामे होऊनही रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला नाही. यातून काही वेळा वाददेखील विकोपास जातात. पाणंद रस्त्याच्या अभावामुळे शेतमालाच्या वाहतुकीला मर्यादा येतात आणि त्यामुळे शेतकरी फायद्याचे पीकही घेऊ शकत नाहीत. प्रमाणित दर्जाचे शेत, पाणंद रस्ते तयार करण्याकरिता ‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना’ राबविण्यास राज्यात मान्यता देण्यात आली. पण, तरीही काही महत्त्वाच्या बाबींमुळे योजेशी संबंधित काही आव्हाने उभी राहतात.
आव्हाने- ग्रामीण लोकसहभागाचा अभाव
काही ठिकाणी ग्रामस्थांना योजनांबाबत संपूर्ण माहिती नसते किंवा त्यांनी त्या योजनेत सक्रिय सहभाग घेतलेला नसतो. त्यामुळे योजना यशस्वी होण्यासाठी स्थानिक नागरिकांचा सहभाग आणि जागरूकता वाढवणे गरजेचे आहे. कारण, काहीवेळा पाणंदसाठी शेतकऱ्यांकडून आपली जमीन दिली जात नाही. अशावेळी शेतकऱ्याला विश्वासात घेऊन त्याचे महत्त्व पटवून देणे, आवश्यक ठरते.
ग्रामीण भागात रस्ते, वीज, पाणीपुरवठा, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या पायाभूत सुविधा अद्यापही अपुऱ्या आहेत. या योजनेअंतर्गत त्या सुधारण्याचे उद्दिष्ट ठेवले असले, तरी प्रत्यक्षात अंमलबजावणी करताना अनेक तांत्रिक अडचणी येतात. पाणंद रस्त्यांची कामे पावसाळ्यात करणे जिकरीचे किंवा अडचणीचे ठरते. त्यामुळे खरीप हंगाम काढणीनंतर कामे सुरु केली जातात. योजना अंमलबजावणी करताना होणाऱ्या विलंबामध्ये निविदा प्रक्रियेत होणारा विलंब, मंजुरीसाठी लागणारा कालावधी आणि स्थानिक प्रशासनाच्या मर्यादा अशा काही गोष्टी सांगता येतील. शेती व्यवसायासाठी महत्त्वाच्या असलेल्या शेत रस्ता तसा गरजेचा आहे. पण काही शेतकऱ्यांना लोकवर्गणीतून पाणंद रस्त्याची दुरुस्ती करण्याची काहीवेळा वेळ येते. तसे प्रयत्नही शेतकऱ्यांकडून होत असल्याचे चित्र लाखनी तालुक्यात पाहावयास मिळाले होते.
नवनवीन विकास प्रकल्प उभारताना पर्यावरणीय प्रभावाचा विचार करणे गरजेचे आहे. अनियोजित विकासामुळे भूजल पातळी कमी होणे, जैवविविधतेला धोका निर्माण होणे आणि जंगलतोड यांसारख्या समस्या वाढू शकतात. ग्राम-समृद्धी योजनेंतर्गत शेतीला चालना देण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु अद्ययावत तंत्रज्ञान, सिंचन सुविधा आणि कृषी क्षेत्रातील शिक्षणाचा अभाव ही मोठी आव्हाने ठरतात. त्याचप्रमाणे, ग्रामीण भागात स्थानिक उद्योग आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे.
शेतात जाण्यासाठी अडचणी
रात्री शेतामध्ये जागलीकरिता किंवा पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना जावे लागते. पण ग्रामीण रस्त्यांसह शेतशिवारातील पाणंद रस्ते काही ठिकाणी दुर्लक्षित असल्याचे चित्र आहे.
मातोश्री ग्राम-समृद्धी योजना ही ग्रामीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असून, तिच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी वरील आव्हानांचा सामना करणे आवश्यक आहे. सरकार, स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थ यांचे परस्पर सहकार्य हे या योजनेंतर्गत उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अत्यावश्यक आहे. योग्य नियोजन, पारदर्शकता, लोकसहभाग आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास ही योजना ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास घडवून आणू शकते.