Monday, February 3, 2025

South Movies : दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये असं काय आहे, जे आपल्याकडे नाही?


https://pudhari.news/south-movies-whats-in-a-southern-movie-that-our-dont-have

दाक्षिणात्य चित्रपट (South Movies) 'आरआरआर'चे यश पाहून भल्याभल्यांची बोलती बंद झालीय. कमाईच्या बाबतीत 'बाहुबली'ला देखील हा चित्रपट टक्कर देईल, असं म्हटलं जातय. (South Movies) साऊथचे येणारे एकापेक्षा एक चित्रपट पाहून अनेकांचे 'तोते उड गए रे' अशी अवस्था झाली आहे. साऊथच्या चित्रपटांमध्ये असं काय आहे, जे आपल्याकडे नाही? नुकत्याच रिलीज झालेल्या 'आरआरआर'च्या सुपरसक्सेसवर काही बॉलीवूड स्टार्सनी मौन धारण केल्याचेही चित्र आहे. मग आपल्याकडे बॉलिवूडमध्ये असे चित्रपट का नाही येत? दक्षिणेतील संस्कृती, जीवनमान वेगळं असलं तरी माणसं तिचं आहेत. साऊथचेच चित्रपट विविध भाषांमध्ये डब करून तो सगळीकडे फिरवले जातात. किंबहुना त्याच चित्रपटांचा रिमेक करण्याची वेळ बॉलिवूडला येते. कोट्यवधींची कमाई करणारे, टॉलिवूडला टक्कर देणारे चित्रपट मग बॉलिवूडमध्ये का येऊ शकत नाही?



दक्षिणेतला मोठा प्रेक्षकवर्ग सिनेप्रेमी आहे. मजूर असो वा महिला, वा मध्यमवर्गीय सर्वच पातळीवरील लोक सिनेमा पाहायला उत्सुक असतात. दिवसभराच्या कमाईतील थोडे पैसे बाजूला ठेवून, वेळात वेळ काढून चित्रपट थिएटरला लागला की तो लगेच पाहणं, हे नित्याचंच झालं आहे. चित्रपटीय मनोरंजनावर खर्च करणं, हे तिथल्या लोकांच्या संस्कृतीचा एक भागचं बनला आहे, असं म्हणायला हरकत नाही.

लोकांच्या मनाला भिडणार्‍या कथा

दक्षिणेतील चित्रपटांचा फिव्हर संपूर्ण देशभरात पाहायला मिळतोय. कन्नड असो, तेलुगु असो वा तमिळ चित्रपट, तिथल्या राज्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही. भाषेच्या भिंती तोडून ते सगळीकडे पसरल्याने मुख्य मुख्य राज्यांच्या त्या-त्या भाषांमध्ये डब झालेला चित्रपट पाहण्याची मजाही कुछ और आहे. अन्य भाषिक लोकांना या चित्रपटांचा रिमेक येईपर्यंत वाट पाहत राहणंदेखील बंद झालं आहे. कारण, कोणत्याही मूळ भाषेतील चित्रपट असो, तो हिंदी, इंग्रजीमध्ये डब करायची सोय करून ठेवली गेलेली आहे.

चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचं झालं तर साऊथच्या चित्रपटांच्या कहाण्या काहीशा मनाला भिडणार्‍या असतात. त्या वर्षांनुवर्षे प्रेक्षकांच्या लक्षात राहणार्‍या ठरतात. काळजाला हात घालणार्‍या अशा कथा पाहून प्रेक्षकवर्गही खुर्चीला खिळून राहतो. शेवटपर्यंत चित्रपट पाहात राहावं, तशी कथा तयार करणं, हे चित्रपट लेखकाचं कौशल्यचं म्हणावं लागेल.

'आई' हा फॅक्टर कॉमन


बहुतांशी चित्रपट पाहिले तर साऊथच्या चित्रपटांमध्ये 'आई' हा कॉमन फॅक्टर असलेलं दिसतं. चित्रपटांमध्ये आई ही असतेच. कधी ती साधीभोळी, प्रेमळ तर कधी कोयता तर कधी हत्यारे हातात घेऊन लढणारी कडक – लढाऊ आई चित्रपटात पाहायला मिळते. या चित्रपटांमध्ये पुष्कळ माणसं असतात. मुख्य भूमिकेतील कलाकारांव्यतिरिक्त काका, मामा, भाचे, आत्या, आजी, बाबा हे  वावरत असतात, ढीगभर माणसांची गर्दी दृश्यास पडते. एकत्र कुटुंबाने वा कुटुंबातील प्रत्येक सदस्याने पाहता येईल, अशी चित्रपटाची रचना केलेली असते.

नुकताच रिलीज झालेला पुष्पा, आरआरआर हे चित्रपटदेखील याचं उत्तम उदाहरण म्हणता येईल. या चित्रपटाची कथा आणि गाणी अद्यापही प्रत्येकाच्या तोंडी ऐकायला मिऴताहेत. लोकांच्या जीवनाच्या जवळ जाणारी कथा दाखवणं हे साऊथच्या चित्रपटांचं वैशिष्ट्य म्हणता येईल. देखण्या अभिनेत्री असल्या तरी तथाकथित  देखणा अभिनेता चित्रपटात असेलच असं नाही. रांगडा, आडदांड नायक असला तरीही प्रेक्षकवर्ग त्यांना स्वीकारतो. चित्रपटातील साधेपणाच हा लोकांना भावतो.

अ‍ॅक्शन चित्रपटांची क्रेझ

साऊथच्या अ‍ॅक्शन चित्रपटांची जादू सगळ्यांवरच झालेली दिसते. तुम्हाला विचार करायला भाग पाडणार्‍या कहाण्या प्रेक्षकांना चित्रपट पाहायला भाग पाडणार्‍या ठरतात. चित्रपटांत ज्या कथेचं चित्रण दाखवतात, त्यात कृत्रिमपणा नसतो. भाषेत, अभिनयात आणि दृष्टीकोनात सौंदर्य लपलेलं असतं आणि ते नैसर्गिक वाटतं. जसं आहे तसं दाखवलं जातं आणि ते आपल्याला सामान्य वाटतं.

खलनायक ठरलेलाच!

प्रत्येक चित्रपटात एखादा दुसरा किंवा अनेक खलनायक असतोच, जो एकट्या हिरोच्या मागे लागलेले असतात. अत्याचार करणार्‍या दृष्ट खलनायकाचा नाश करणारा हिरो लोकांच्या मनात कायमचा घर करून जातो.

कलेला वाव

चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी अभिनेत्याच्या प्रतिमेला किंवा चित्रपटाच्या पोस्टरला पूजा, दुग्धाभिषेक, पैसे आणि फुलांचा हार, ढोल ताशे आणि फटाकड्या वाजवणं ही गोष्ट नित्याचीच बनलीय. आपल्या कलाकारांचं चाहत्यांमधून होत असलेलं स्वागत हे तिथल्या कलेप्रती असलेलं प्रेम दर्शवतं. चित्रपटाच्या बोर्डांना हार घातले जातात, मग आपल्याकडे का नाही घातले जात?.

बॉलिवूडमध्येदेखील दक्षिणेतील कलाकारांचं खास करून अभिनेत्रींचं स्वागत केलेलं दिसतं. यात सामंथा, पूजा हेगडे, काजल अग्रवाल, रश्मिका मंदाना या दाक्षिणात्य सुंदरींचा समावेश असल्याचं दिसतं.

साऊथचे हे चित्रपट आपली संस्कृती सोडत नाहीत. कुंकू लावणं, साडी, गजरा घालणं, हिरो लुंगी घालून डान्स करणं या छोट्या-छोट्या गोष्टींतून संस्कृती जपली जाते आणि आपण त्यांच्या प्रेमात पडतो. मग, आपल्याच मातीत आपण दुसर्‍यांच्या प्रेमात का पडतो?.


Thursday, August 8, 2024

पॅलेस थिएटर

केशवराव भोसले नाट्यगृह म्हणजेच पूर्वाश्रमीचे पॅलेस थिएटर. शाहू महाराज १९०२ साली विलायतेस जागतिक दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी रोमलाही भेट दिली. तेथील कुस्ती मैदान आणि नाट्यगृह पाहून तशीच योजना आपल्या कोल्हापूर संस्थानात राबवावी, असे त्यांनी त्याचवेळी ठरविले.


परत आल्यावर त्यांनी त्यासाठी जुन्या खासबागेच्या परिसराची पाहणी केली. एकदा मनावर घेतलं की महाराज त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करीत. त्याचे मूर्त स्वरूप म्हणजे आजचे प्रचंड कुस्त्यांचे मैदान आणि केशवराव भोसले नाट्यगृह होय. या भूतपूर्व पॅलेस थिएटरचा प्लॅन कागलचे ओव्हरसियर जिवबा कृष्णाजी चव्हाण यांच्याकडून त्यांनी करून घेतला.

१९१३ साली पॅलेस थिएटरच्या बांधकामास सुरुवात झाली आणि १९१५ साली हे काम पूर्णही झाले. अवघ्या दोन वर्षांत बांधून झालेल्या या थिएटरचा उद्घाटन समारंभ १९१५ च्या दसऱ्यास युवराज राजाराम महाराज यांच्या हस्ते झाला. उद्घाटनाच्या वेळी महाराजांनी कामावरील सर्व कामगार, कंत्राटदार आणि सर्व संबंधित लोकांचा यथोचित सत्कार केला. या कामाचे कंत्राट बाळकृष्ण गणेश पंडित यांना देण्यात आले होते. त्यांनी त्यासाठी लोखंडी गर्डर्स परदेशातून आणून घेतले. प्रत्यक्ष गर्डर फूट, दीड फूट रुंदीचा आहे. त्यावर कंपनीचे नावही आहे. नाट्यगृहाची रचना, आवाज आणि कोणत्याही वर्गातल्या प्रेक्षकास नाटक चांगले दिसावे अशी योजना केली आहे. स्टेजच्या खाली विहिरीएवढी खोली आहे आणि त्यावर जाड सागवानी फळ्या आहेत. त्यामुळे आवाज घुमत नाही, असे पूर्वी सांगायचे. बांधकामावर महाराजांनी स्वतः जातीने देखरेख ठेवली होती. या नाट्यगृहासारखे महाराष्ट्रात कुठेही दुसरे नाट्यगृह नाही, अशी कबुली अनेकांनी दिली आहे. राजाराम कॉलेजच्या गॅदरिंगसाठी एकदा राजगोपालाचारी आले होते. त्यांनीही नाट्यगृहाच्या रचनेचे कौतुक केले होते.

या नाट्यगृहाचा प्रारंभ किर्लोस्कर कंपनीच्या 'मानापमान" या नाटकाने झाला. शाहू महाराजांनी त्यावेळी किर्लोस्कर कंपनीस मुद्दाम निमंत्रित केले होते. या नाट्य प्रयोगाच्या वेळी दुसरे एक नाट्य घडले, असे आमचे नाट्यप्रेमी मित्र बाबूराव देशपांडे खुलवून सांगत. ते असे, की यावेळी नाटककार राम गणेश गडकरी आणि नटश्रेष्ठ चिंतामणराव कोल्हटकर येथे आले होते. ते दोघे सायंकाळी पूर्वेकडील खासबागेच्या हिरवळीवर बसत. त्याचवेळी गडकऱ्यांना "राजसंन्यास" नाटकाची कल्पना सुचली असे म्हणतात. पूर्वीची आसन व्यवस्था

पूर्वी रंगभूमीच्या समोर जुन्या लाकडी खुर्चा होत्या. म्हणजे त्या खुच्र्यांना हात नव्हते. सुमारे दीडशे ते दोनशे खुर्चा असत. खुर्चाच्या भागास 'खड्डा' म्हणत. त्यांच्यावर दोन अडीच फूट उंचीची सर्व थिएटरभर शहाबादी फरशी घातलेली जागा होती. त्याला ओटा म्हणत. ओट्यात दीड-दोनशे माणसे शहाबादी काळ्या फरशीवर बसत आणि शेवटी भितीपर्यंतही अशीच काळ्या फरशीची प्रशस्त जागा होती. त्यावर प्रेक्षक खाली बसत. त्या वर्गाला 'पीट' म्हणत. पीट म्हणजे सिनेमा थिएटरमधला थर्ड क्लास आणि ओटा म्हणजे सेकंड क्लास. पिटात सामान्य प्रेक्षक बसत. श्रीमंत माणसं खड्ड्यातील खुर्ध्यावर तर मध्यमवर्गाची लोकं ओट्यात बसत. खड्डा, ओटा आणि पीट यांच्यामध्ये भला मोठा आडवा पूर्व-पश्चिम लाकडी कठडा असे. काही आगाऊ प्रेक्षक डोअरकीपरची नजर चुकवून ओट्यात अतिक्रमण करीत. नट मंडळीही पिटातल्या प्रेक्षकांच्या टाळ्या आणि शिट्ट्यांनी सुखावत. चांगले गाणे झाले की "वन्समोर" असा गिल्ला करून ते नटनट्यांना पुन्हा गायला लावत आणि टाळ्या, शिट्या, हशाचा पाऊस पडे. पिटातल्या प्रेक्षकांची पसंती ही चांगल्या अभिनयाची पावती समजत. त्यावेळी काही वृत्तपत्रे तर 'पिटातल्या शिट्ट्या' नामक शीर्षक नाटकांच्या वृत्तांतांना देत असत. माडीवर रंगभूमीच्या समोर दहा-बारा पायऱ्यांची मजबूत सागवानी लाकडाची गॅलरी असून त्यात पुरुष प्रेक्षक बसत.

महिलांची अजब आसन व्यवस्था

रंगभूमीच्या उजव्या आणि डाव्या बाजूच्या गॅलऱ्या या महिला प्रेक्षकांसाठी असायच्या. महिलांची बसण्याची ही व्यवस्था अजब आणि न्यारी होती. म्हणजे उजव्या बाजूच्या गॅलरीत घरंदाज स्त्रिया बसायच्या. तेथे भितीवर लाकडी बोर्डच होता. माझ्या अजून लक्षात आहे, पांढऱ्या रंगावर काळ्या रंगाने 'कुलीन स्त्रिया' असे लिहिले होते. तेथे घरंदाज स्त्रिया व त्यांच्यासमोर पश्चिम गॅलरीत चक्क 'वेश्या' असा पूर्वी बोर्ड होता म्हणे. जुने लोक सांगायचे, या ठिकाणी वेश्या, नायकिणी आणि कसबिणी असे संबोधले जाणाऱ्या स्त्रिया बसायच्या. मला काही तो बोर्ड वाचायला मिळाला नाही, परंतु पूर्वी म्हणे वेश्या तेथे पावडर लावून गिऱ्हाईक हेरणाऱ्या नजरेने पाहत असत. तेही चक्क विजेच्या प्रकाशात त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीचे विदारक दर्शन या स्त्रियांच्या खास आसन व्यवस्थेवरून होते. स्त्रियांच्याकडे पाहण्याचा तत्कालीन समाजाचा दृष्टिकोनही दिसून येतो. त्यावेळी महिला या शब्दाचा लोकव्यवहारात जन्मच नसावा. परंतु पूर्वीची मंडळी आणि त्या वेश्याही प्रामाणिक असाव्यात. तेथे बसण्यास त्यांना कसलाही संकोच वाटत नसे. आपला व्यवसायही त्या प्रामाणिकपणे करीत, त्यात सोंगढोंग काही नसे.

पूर्वी आताप्रमाणे नाटक सुरू झाल्यावर दिवे मालवले जात नसत. वीज येण्यापूर्वी गॅसबत्त्या ढणढणत असत. कोल्हापुरात १९२० साली वीज आली.

बोलपटांचा जमाना सुरू झाल्यावर नाटकांची संख्याही रोडावली. केव्हातरी महिना, दोन महिन्यांतून एखादं-दुसरे नाटक व्हायचे. नाटक रात्री दहा वाजता सुरू होत असे आणि आठ वाजल्यापासून थिएटर बाहेरच्या वरच्या ठिकाणी बँड वाजवला जायचा, आज नाटक आहे म्हणून लोकांना कळण्यासाठी. एक-दीड रुपयांचे तिकीट असे. स्त्रिया आणि वेश्यांना आठ- आणे तिकीट दर होता. एरवी रात्रन्दिवस नाट्यगृह बंदच असे. आम्ही तेथे खेळायला जायचो. परंतु गोविंदा नावाचा रखवालदार आम्हाला हाकलून द्यायचा. दम द्यायचा. काळा, उंच होता तो. रखवालदार राहायलाही तेथेच असे. प्रयोगच्यावेळी पडदे सरकवणे, लाइट लावणे, बंद करणे, घंटा वाजविणे ही सर्व कामे तोच करे ! सारा वन मॅन शो होता. आता त्यासाठी दहा- बारा नोकर आहेत. खुर्चीवर जाण्यासाठी जे प्रवेशद्वार होते तेथे व्हरांडा होता. त्यावर पत्रा होता. तेथे टेबल, खुर्ची टाकून खुर्त्यांचा प्लॅन समोर ठेवून तिकीट विक्री होई.

पुढे १९५७ साली बाळासाहेब देसाई बांधकाम मंत्री झाल्यावर त्यांनी पॅलेस थिएटरचे 'नामकरण केशवराव भोसले नाट्यगृह' केले. केशवराव भोसले बालगंधर्वांच्या तोडीस तोड अभिनेते आणि गायक होते. कोल्हापूरचे सुपुत्र होते! त्यांचे हे यथोचित स्मारक झाले आहे.


Wednesday, August 7, 2024

बडे अच्‍छे लगते हैं'....

 प्रेम न बाडी उपजै, प्रेम न हाट बिकाय।

राजा परजा जेहि रूचै, सीस देइ ले जाय।। 


संत कबीर यांच्‍या या दोह्‍याने प्रेमाचा खरा अर्थ लक्षात येतो. प्रेम न कुठल्‍या शेतात उगवते न कुठल्‍या बागेत, हा तर तो खजिना आहे जो कुण्‍या व्‍यक्‍तीला आवडला तर ती व्‍यक्‍ती राजा असो वा प्रजा, तो आपल्‍या जीवापेक्षाही अधिक मिळवण्‍यासाठी तत्‍पर असतो. प्रेमाची कोणती सीमा असते ना वय. त्‍यामुळेच आपले प्रेम मिळवण्‍यासाठी इतर कुणाचाही विचार केला जात नाही. कोण काय म्‍हणेल, याची पर्वा त्‍यांना नसते. मग, ती व्‍यक्‍ती वयाने मोठी असो वा लहान. प्रेमामध्‍ये त्‍यांचे वय कधीच आड येत नाही. 

बॉलिवूडमध्‍ये अशा अनेक अभिनेते/अभिनेत्री आहेत, ज्‍यांना 'बडे अच्छे लगते हैं'. आपल्‍यापेक्षा कितीतरी वयाने मोठ्‍या किंवा लहान अभिनेते/अभिनेत्रींशी त्‍यांनी विवाह केला आहे. प्रेमात लोक वेडे होतात. लग्‍न करण्‍यासाठी येथे कोणतेही स्‍टेटस पाहिले जात नाही, पैसे पाहिले जात नाही, धर्म, जात-पात पाहिली जात नाही. येथे केवळ प्रेम पाहिलं जातं. वय लहान असो वा मोठे येथे त्‍याला अजिबात महत्त्‍व दिलं जात नाही. आपल्‍या वयापेक्षा मोठं अथवा लहान अभिनेते/अभिनेत्रींशी विवाह करणे हे अलिकडे वाढल्याचे दिसत असले तरी हा आजचाच ट्रेंड नाही तर जुन्‍या जमान्‍यातही हा ट्रेंड होता.  

अर्जुन कपूर आणि मलायका 

सध्या चर्चेत असलेली हॉट जोडी म्हणजे अर्जुन कपूर आणि मलायका. दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत, अशी चर्चा मध्‍यंतरी सुरू होती. अर्जुन कपूर ३३ वर्षांचा आहे तर मलायका ४५ वर्षांची. अर्थात मलायका अर्जुनपेक्षा १२ वर्षांनी मोठी आहे. मलायकाने अरबाज खानशी घटस्‍फोट घेतला. त्‍यानंतर अर्जुन आणि मलायकाची जवळीक वाढली. दोघे अनेकदा एकत्र स्‍पॉट झाले आहेत. yes

प्रियांका चोप्रा आणि निक जोनस 

प्रियंका चोप्रा आणि निक जोनस जोधपूरमध्‍ये लग्‍नबंधनात अडकले. प्रियांका ३६ वर्षांची आहे तर निक २६ वर्षे. म्‍हणजेच दोघांच्‍या वयात १० वर्षांचे अंतर आहे. दोघांची भेट पहिल्‍यांदा मेट गाला २०१७ च्‍या इव्‍हेंटमध्‍ये झाली होती. smiley

मिलिंद सोमन आणि अंकिता 

heartप्रेम आंधळं असतं, असं म्‍हटलं जातं. प्रेमाच्‍या आड कोणतीच गोष्‍ट येत नाही. मॉडेल मिलिंद सोमणचेदेखील तसेच झाले आहे. त्‍याच्‍यापेक्षा वयाने अर्ध्या असलेल्या अंकिता कोनवारसोबत मिलिंद सोमणने विवाह केला. मिलिंद सोमणचे वय ५२ तर अंकिता २४ वर्षांची आहे. 

मिलिंदची दुसरी पत्नी अर्थात अंकिता ही आसामची असून तिचे खरे नाव सुनकुस्मीता कोणवार असे आहे. मिलिंद सोमनने अंकिताशी २२ एप्रेल २०१८ ला महाराष्‍ट्रीयन पद्‍धतीने लग्‍न केले होते. मिलिंद सोमन आणि अंकिता यांच्‍या वयात २५ वर्षाचे अंतर आहे. अंकिता मिलिंदपेक्षा लहान आहे. या कारणावरुन या जोडीला ट्रोल करण्‍यात आले होते. याआधी मिलिंद सोमनने २००६ मध्‍ये फ्रान्‍समधील अभिनेत्री मिलिन जैम्पेनोई हिच्‍याबरोबर लग्‍न केले होते. त्‍यांचे हे लग्‍न फार काळ टिकू शकले नाही. तीन वर्षांतच ते वेगळे झाले. 

शाहिद कपूर-मीरा राजपूत 

शाहिद आणि मीराचे लग्‍न २०१५ मध्‍ये झाले होते. आणि त्‍यावेळी मीरा २१ वर्षांची होती तर शाहिद ३४ वर्षांचा. दोघांच्‍यामध्‍ये १३ वर्षांचे अंतर आहे.  मीरा राजपूतने आपल्‍या इ्‍स्‍टाग्राम चॅटमध्‍ये फॅन्‍सनी विचारलेल्‍या प्रश्‍नांना उत्तर देताना म्‍हटले होते, मी लग्‍नापूर्वी काही वर्षे आधी शाहिदला भेटले होते. त्‍यावेळी माझे वय ६ होते. एक फॅन म्‍हणून मी त्‍याला भेटले होते. 

सैफ अली खान-करीना कपूर 

सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांची जोडी मोठ्‍या पडद्‍यावर सुपरहिट राहिली. रिअल लाईफमध्‍येही या दोघांची जोडी हिट आणि नेहमीच चर्चेत राहिली आहे. करीना कपूर सैफ अली खानपेक्षा ११ वर्षांनी लहान आहे. सैफ करीनावर इतके प्रेम करत होता की, त्‍याने आपल्‍या हातावर करीनाचे नाव गोंदवले आहे. विशेष म्‍हणजे, सैफ विवाहित होता, त्‍याला दोन मुले आहेत. हे माहिती असतानाही करीना सैफशी विवाहबध्‍द झाली. 

सैफचा विवाह अभिनेत्री अमृता सिंहशी झाला होता. त्यांच्याही वयात खूपच अंतर होते. हे अंतर तब्बल १२ वर्षांचे होते. अमृता सैफपेक्षा तब्बल १२ वर्षांनी लहान होती. म्हणजे सैफच्या दोन बायकांच्यामध्ये तब्बल २४ वर्षांचे अंतर आहे हा एकप्रकारचा विक्रमच म्हणावा लागेल. सैफ आणि अमृताला सारा अली खान आणि इब्राहीम ही दोन मुले आहेत. broken heartअमृतापासून वेगळे झाल्‍यानंतर सैफने करीनाशी विवाह केला. सैफ-करीनाला एक मुलगा तैमूर आहे. विशेष म्‍हणजे सैफची दुसरी बायको करीना, सैफ आणि अमृता सिंगच्‍या विवाहात उपस्‍थित होती. 

रितेश देशमुख आणि जेनेलिया 

रितेश देशमुख आणि जेनेलियाची केमिस्‍ट्री मोठ्‍या पडद्‍याबरोबरच रिअल लाईफमध्‍येही जुळली. तुझे मेरी कसम या चित्रपटात दोघे एकत्र आले ते कायमचेच. खर्‍या आयुष्‍यातही ते दोघे फेब्रुवारी २०१२ मध्‍ये एकमेकांचे झाले. रितेश जेनेलियापेक्षा ९ वर्षांनी मोठा आहे. पण म्हणतात ना प्रेमाला वयाची काय कशाचीच मर्यादा बांधून ठेऊ शकत नाही.  heart

संजय दत्त-मान्‍यता दत्त 

मुन्ना भाई अर्थातच संजय दत्तने मान्यता दत्तशी तिसरा विवाह केला होता. मान्‍यता संजयला लग्‍नाआधी ९ वर्षांपासून ओळखत होती. संजय दत्तचे अनेक अफेअर्सही होते. संजय मान्‍यतापेक्षा १९ वर्षांनी मोठा आहे. तरीही मान्‍यताने संजय दत्तशी २००८ मध्ये विवाह केला. 

संजय दत्तची पहिली पत्नी ऋचा शर्मा हिचे कॅन्सरने १९९६ मध्ये निधन झाले. यानंतर संजयने रिया पिल्लई हिच्याशी लग्न केले होते. पंरतु, संजय दत्त आणि त्याचे संबंध बिघडल्याने २००८ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर संजय यांनी मान्यतासोबत विवाह केला.  

आमिर खान आणि किरण राव 

आमिर खान आणि किरण राव ही चर्चित जोडी. कारण आमिर खानने एक अभिनेता म्‍हणून नाव कमावले तर आमिर-किरण आपल्‍या विविध सामाजिक कामांमुळे चर्चेत राहिले आहेत. आमिर किरण रावपेक्षा ९ वर्षांनी मोठा आहे. 

आमिरने किरण रावसाठी आपले पहिले प्रेम सोडले. 'लगान' चित्रपटाने आमिरची पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ दोन्‍ही बदलले. लगान चित्रपटाच्‍या शूटिंगवेळी आमिर आणि किरणची पहिली भेट झाली होती. heart या चित्रपटात किरण शामिन देसाई यांची असिस्टंट होती. किरणलाही आमिर आवडायचा. लगानच्‍या सेटवर आमिरने किरणकडे तिच्‍या कानातील बाली (ईअररिंग्‍ज) मागितले होती आणि तेथूनच दोघांची लव्‍हस्टोरी सुरू झाली होती. २००५ मध्‍ये आमिरने किरणशी विवाह केला. आमिरने २००२ मध्‍ये आपली पहिली पत्नी रीना दत्ताशी घटस्‍फोट घेतला. घटस्‍फोटानंतर आमिरला रिनाला जवळपास ५० कोटी रुपये द्‍यावे लागले होते. 

आमिर आणि रीना दत्ताचे लव्‍ह मॅरेज होते. त्‍यांनी आपल्‍या आई-वडिलांच्‍या मर्जीविरुध्‍द जाऊन लग्न केले होते. अनेक दिवस त्‍यांनी आपले लग्‍न लपवून ठेवले होते. आमिर-रीना दत्ताचे लग्‍न झाले, त्‍यावेळी रीना विद्‍यार्थिनी होती. आमिर त्‍यावेळी 'कयामत से कयामत तक' चित्रपटाचे शूटिंग करत होता. 

फराह खान आणि शिरीष कुंदर

फराह खान शिरीषपेक्षा १० वर्षांनी मोठी आहे. त्‍यांना तीन मुले आहेत. दोघे ९ डिसेंबर, २००४ रोजी लग्नगाठीत अडकले. शिरीषचा जन्म २४ मे, १९७३ रोजी मंगळूरु, कर्नाटकात झाला. तर फराहचा जन्म ९ जानेवारी, १९६५ रोजी मुंबईत झाला. लग्नानंतर जवळजवळ चार वर्षांनी शिरीष आणि फराह तिळ्या मुलांचे आई-वडील झाले. अन्या आणि दीवा ही मुलींची तर जार हे त्यांच्या मुलाचे नाव आहे.

श्रीदेवी आणि बोनी कपूर

बोनी कपूर श्रीदेवी यांच्‍यापेक्षा ८ वर्षांनी मोठे आहेत. श्रीदेवी यांच्‍याशी विवाह केला, त्‍यावेळी बोनी कपूर  दोन मुलांचे बाप होते. श्रीदेवी आणि बोनी कपूर यांना जान्‍हवी आणि खुशी या दोन मुली आहेत. 

बोनी कपूर हे त्‍यांचा भाऊ अनिल कपूर आणि श्रीदेवी यांना घेऊन  'जुदाई' चित्रपट बनवत होते. त्‍याचदरम्‍यान, श्रीदेवी यांची आई राजेश्वरी यांची तब्‍येत बिघडली. त्‍यांना उपचाराकरता अमेरिकेला घेऊन जावे लागले. त्‍यावेळी श्रीदेवी बोनी कपूर यांना आपल्‍यासोबत घेऊन गेल्‍या. श्रीदेवी यांच्‍या आईच्‍या उपचारावेळी बोनी कपूर यांनी त्‍यांना पाठिंबा दिला. परंतु, श्रीदेवी यांच्‍या आईचे निधन झाले. बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्‍या आईवर चुकीच्‍या पध्‍दतीने उपचार झाल्‍याचा आरोप करत कोर्टात खटला दाखल केला आणि संघर्ष करून मोबदला वसूल केला. श्रीदेवी यांनी अनुभवले की, बोनी कपूर नि:स्वार्थ भावनेने हे सर्व करत होते. बोनी विवाहित आहेत, हे माहिती असतानादेखील श्रीदेवींना बोनी कपूर यांच्‍याशी जवळीक वाटून प्रेम झाले. 'जुदाई' या चित्रपटाच्‍या निर्मितीवेळी बोनी कपूरही श्रीदेवीच्‍या प्रेमात पडले होते. त्‍यानंतर बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्‍याशी दुसरा विवाह केला. त्‍यावेळी बोनी कपूर यांना आपल्‍या कुटुंबीयांकडून नाराजीचा सामनादेखील करावा लागला. बोनी यांचा दुसरा विवाह असल्‍याने त्‍या काळात हे प्रकरण खूप वादग्रस्‍त ठरले होते. 

धर्मेंद आणि हेमा मालिनी 

आणखी एक हिट जोडी म्‍हणजे धर्मेंद आणि ड्रीम गर्ल हेमा मालिनी. 'शोले'च्‍या सेटवर हेमा यांच्‍याशी धर्मेंद्र यांना प्रेम झालं. मग काय, धमेंद्र आधीपासूनच विवाहित असतानाही हेमा यांनी त्‍यांचं प्रेम स्‍वीकारलं. आपल्‍यापेक्षा १३ वर्षांनी मोठे असणारे धर्मेंद्र यांच्‍याशी हेमा यांनी विवाह केला. धर्मेंद्र हे हेमा यांच्‍यावर इतके प्रेम करत होते की, हेमा यांच्‍याशी लग्‍न करण्‍यासाठी त्‍यांनी आपला धर्म बदलला होता. 

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी १९७० मध्‍ये पहिल्‍यांदाच मोठ्‍या पडद्‍यावर दिसले होते. 'शराफत' आणि 'तुम हसीन मैं जवां' या चित्रपटांनंतर दोघांमध्‍ये जवळीक निर्माण झाल्‍याची चर्चा सुरू झाली होती. याशिवाय, लग्‍नानंतर देखील पहिली पत्‍नी प्रकाश आणि मुलांना मी सोडू शकत नाही. माझा परिवार स्‍वीकारावा लागेल, अशी अट धर्मेंद्र यांनी हेमा यांच्‍यासमोर ठेवली होती. हेमा यांनी ती अट स्‍वीकारली आणि दोघांनी १९७९ मध्‍ये विवाह केला.  

धर्मेंद्र यांच्‍या पहिली पत्‍नीचे नाव प्रकाश कौर असे आहे. त्‍यांना चार मुले- सनी, बॉबी, अजिता आणि विजिता आहेत. तर धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी हेमा मालिनी यांच्‍या दोन मुली ईशा आणि अहाना आहेत.

दिलीप कुमार आणि सायरा बानो 

दिलीप कुमार आणि सायरा बानो या जोडीने एक काळ गाजवला. ही  जोडी त्‍यावेळची फेमस जोडी. १९६६ मध्‍ये २२ वर्षांच्या सायरा बानोला दिलीप कुमार आवडायचे. दिलीप यांचे त्यावेळी वय होते ४४ वर्षे. परंतु, प्रेमापोटी आपल्‍या वयापेक्षा दुपटीने असलेल्‍या दिलीप यांच्‍यासोबत विवाह करण्‍याचं धाडस सायरा यांनी केलं होतं. १९८० मध्‍ये त्‍यांच्‍या नात्‍यात काही काळासाठी दुरावा आला होता. परंतु, काही काळानंतर दोघे पुन्‍हा एकत्र आले. 

एज-डिफरन्‍स लव्‍ह 

एकेकाळी वयात इतके अंतर म्‍हटलं की, भुवया उंचवायच्‍या. आपल्‍यापेक्षा ५-७ वर्षांनी मोठ्‍या असणार्‍या व्‍यक्‍तीबरोबर लग्‍न करायचे म्‍हणजे, जगातील दहाव्‍या आश्‍चर्याप्रमाणे असायचं. परंतु, अशा प्रकारची नाती तेव्‍हाही बनायची आणि आताही तो सिलसिला कायम आहे.  बॉलिवूडमध्‍ये अशा नात्‍यांना नेहमीच मान्‍यता दिली गेली. आता बॉलिवूडमध्‍ये ऐज-डिफरन्‍स लव्‍ह कॉमन गोष्‍ट बनली आहे. 

सलमान खान

तरी बरं सल्‍लू भाईने आपल्‍या लग्‍नाचा विषय ड्रॉप केला आहे. जर सलमान आणि कॅटरीनाचं प्रेम पक्‍क झालं असतं तर येथे १९ वर्षांचं अंतर पाहायला मिळालं असतं. एवढेच नाही तर जर लुलियासोबत त्याने लग्न करायचे ठरवले तर दोघांमध्ये १५ वर्षांचे अंतर असेल. 

वयातील अंतर या कपल्‍सच्‍या आयुष्‍यात गौण आहे. त्‍यामुळेच या जोड्‍या जीवनाता यथासांग आनंद घेत आहेत. लग्नामध्ये एज गॅप हा विषय आता कॉमन झाला आहे. म्‍हणजेच जर तुमचे लग्‍नाचे वय होऊन गेले आहे आणि घरचे स्‍थळ शोधत असतील तर जरा पेशन्‍स ठेवा. तुम्‍हालाही कदाचित अगदीच कमी वयाचा किंवा खूपच एजेड मॅच्युअर्ड पार्टनरही मिळू शकतो. आताच्या ट्रेंडचे विचाराल तर आजची तरुणाई गुणगुणत आहे... 'बडे अच्‍छे लगते हैं'.

मैफिलीतील सुरेल गानसम्राज्ञी सुब्‍बुलक्ष्‍मी

केसांच्या मधून पाडलेली भांग, कपाळावर लावलेली गोल मोठी टिकली, त्याखाली लावलेला टिळा, नाकात दोन्हीकडे घातलेली नथणी, कानात घातलेली छोटी फुले (दागिना), स्मितहास्य असं सुब्बुलक्ष्मी यांच्या चेहऱ्यावरचं तेज. त्यांच्या या सौंदर्याबरोबरच त्यांच्या गायकीतील सुरेल सौंदर्याने संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवले. 'मदुरै षण्मुखवडिवु सुब्बुलक्ष्मी' अर्थातच एम. एस. सुब्बुलक्ष्मी प्रसिध्‍द गायिका. कुंजम्मा या नावाने त्यांना बालपणी लाडाने बोलवत असत. त्यांची आई अक्कमलाई या प्रसिध्‍द व्हायोलिन वादक होत्या. संगीताचं बाळकडू त्‍यांना त्‍यांच्‍या आईकडूनच मिळालं.  सुब्बुलक्ष्मी यांच्‍याबद्‍दल थोडक्‍यात जाणून घेऊयात.  

देशातीलच नव्‍हे तर आंतरराष्‍ट्रीय पातळीवरची ख्‍यातनाम गायिका. गायिकाच नाही तर त्या संगीतकार देखील होत्‍या. व्‍यकंटेश स्तोत्रामुळे त्‍या प्रसिध्‍दीच्‍या झोतात आल्‍या. त्‍यांचे गाजलेले गाणे म्‍हणजे विष्णुसहस्रनाम. त्‍यांचं भक्‍ती संगीत भारतातल्‍या घराघरांत पोहोचलेलं. संपन्‍न घराण्‍यातल्‍या त्‍या गायिका. श्रीनिवास अय्यंगर, मुसिरी सुब्रमण्यम अय्यर व सेम्मानगुडी श्रीनिवास अय्यर यांच्याकडे एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचे सांगीतिक शिक्षण झाले. 
वयाच्‍या दहाव्‍या वर्षी त्यांची पहिली मैफिल झाली. पुढे जवळजवळ ७५ वर्षे त्‍यांनी मैफिली केल्‍या. त्‍याचं वैशिष्‍ट्‍ये असं की, साधारणपणे, १९८४-८५च्‍या नंतर त्‍यांनी जाहीर कार्यक्रम मोफत केले. त्‍या-त्‍या संस्‍थेसाठी म्‍हणून त्‍या बिदागी (मानधन) घ्‍यायच्‍या नाहीत. कोट्‍यवधीं रुपयांची मदत त्‍यांनी अनेक संस्‍थांना केली. त्‍यातल्‍या प्रमुख संस्‍था म्‍हणजे, पुण्‍यातील महात्‍मा गांधी ट्रस्‍ट, गांधी स्‍मारक निधी, कस्‍तुरभा स्‍मारक निधी, अशा राष्‍ट्रीय पातळीवरच्‍या संस्‍थांसाठी त्‍यांनी मैफिली केल्‍या. अनेक सार्वजनिक संस्‍थेसाठी त्‍यांनी कार्यक्रम केले. अनेक संस्‍थांना त्‍यांनी मदत केली. तिरुपती बालाजी, चेन्‍नईचा गांधी मेमोरिअल मंडप, हिंदी प्रचार सभा, रामनाथ स्‍वामी मंदिर, अमेरिकेतल्‍या हिंदू मंदिरांसाठी मदत, शाळा आणि महाविद्‍यालये आणि अनेक संगीत संस्‍थांना मदत त्‍यांनी केली होती. 
अनेक थोर गायकांशी त्‍यांचे निकट संबंध होते. बडे गुलाम अली खाँ हे सुब्‍बुलक्ष्‍मी यांचा उल्‍लेख करताना 'सुस्‍वरलक्ष्‍मी शुभलक्ष्‍मी' असे करायचे. विलायत खाँ हेदेखील त्‍यांना खूप मानायचे. त्‍यानंतर पंडित रविशंकर, पंडित जसराज, अमजद अली खान यासारखे अनेक मोठे कलावंत त्‍यांचा आदर करायचे. परमेश्‍वरी साधना आणि ईश्‍वरभक्‍ती ही त्‍यांच्‍या गाण्‍यांची वैशिष्‍ट्‍ये. 
महात्‍मा गांधी, नेहरू गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्‍याशी त्‍यांचे चांगले संबंध होते. महात्‍मा गांधी यांचं आवडतं भजन 'हरि तुम हरि' हे सुब्‍बुलक्ष्‍मी यांनी गायलं होतं, असे म्‍हटले जाते. नेहरू त्‍यांना आपली मुलगी मानायचे. पंडित नेहरू सुब्‍बुलक्ष्‍मींना म्‍हणायचे, 'तू माझी पहिली मुलगी आहेस आणि इंदू दुसरी.' (इंदिरा गांधी)
इंदिरा गांधी आणि सुब्‍बुलक्ष्‍मी एका कार्यक्रमात शेजारी-शेजारी बसल्‍या होत्‍या. राजीव गांधी त्‍यावेळी ४ वर्षांचे होते. त्‍यावेळी कार्यक्रमात राजीव खूपच दंगा करत असल्‍यामुळे सुब्‍बुलक्ष्‍मी यांनी इंदिराजींच्‍या हातातून राजीव यांना घेतले. त्‍यांना थोपटलं आणि शांत केलं, अशी आठवण सुब्‍बुलक्ष्‍मी यांनी राजीव गांधी यांची हत्‍या झाल्‍यानंतर एका ठिकाणी बोलून दाखवली होती. नेहरू-गांधी परिवाराशी सुब्‍बुलक्ष्‍मी यांचे संबंध होते. 
असं म्‍हटलं जातं की, त्‍यांचे गाणं-स्‍तोत्र ऐकल्‍याशिवाय लोक कामाला सुरुवात करायचे नाहीत. त्‍यांनी जी गाणी गायली त्‍यात व्‍यकंटेशस्‍तोत्र तर आहेच. शिवाय, त्‍याच्‍यापलीकडे मीरा, तुलसीदास, कबीर, सूरदास आणि तुकारामांचे अभंग (मराठी) अशा थोर संतांच्‍या रचनाही त्‍यांनी गायल्‍या. लोकांच्‍या मनावर अधिराज्‍य गाजवणार्‍या गानसम्राज्ञी सुब्‍बुलक्ष्‍मी यांनी बंगाली रवींद्र संगीत देखील त्‍यांनी गायले आहे. 
अखेरच्‍या काळात त्‍यांनी बिदागी (मानधन) घेऊन त्‍यांनी एकही मैफिल केली नाही. २०० पेक्षा अधिक मैफिली त्‍यांनी सार्वजनिक कार्यासाठी आणि ३ कोटी रुपयांहून अधिक देणग्‍या त्‍यांनी विविध कामांसाठी दिल्‍या. त्‍यांचे पती ‘कल्‍की’ नावाचे साप्‍ताहिक चालवायचे. सुब्‍बुलक्ष्‍मी आणि त्‍यांचे पती यांनी मिळून ‘सावित्री’ हा चित्रपट काढला होता (१९४१). त्‍यात सुब्‍बुलक्ष्‍मी यांनी नारदाची भूमिका केली. तर सावित्रीची भूमिका मराठमोळी अभिनेत्री शांता आपटे यांनी साकारली होती.  
दक्षिणेतील लोकप्रिय साप्‍ताहिक कल्‍की नंतरच्‍या काळात तोट्‍यात आलं. आर्थिकदृष्‍ट्‍या तोट्‍यात आल्‍यामुळे त्‍यांनी साप्‍ताहिक बंद केलं. चेन्‍नईत त्‍यांचा 'कल्‍की गार्डन्‍स' नावाचं एक बंगला होता. आर्थिकदृष्‍ट्‍या अडचणीत आल्‍यामुळे त्‍यांनी तो बंगला विकला आणि साध्‍या घरात राहायला गेल्‍या. बंगला विकून त्‍यांनी कामगारांची देणी भागवली.  
'संत मीरा' नावाचा चित्रपट सुब्‍बुलक्ष्‍मी यांनी काढला. तो दाखवण्‍यासाठी सुब्‍बुलक्ष्‍मी या दिल्‍लीत पं. नेहरूंच्‍या निवासस्‍थानी गेल्‍या होत्‍या. त्‍या सिनेमाचं स्‍क्रिनिंग नेहरूंसाठी ठेवण्‍यात आलं होतं, असं म्‍हटलं जातं. 'मीरा' या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर त्यांनी अभिनय क्षेत्राला पूर्णविराम देऊन आपलं संपूर्ण लक्ष संगीतावर केंद्रित केलं. त्यांनी चित्रपटांतही अभिनयही केला. त्यांच्या चित्रपटांत सेवासदनम, शाकुंतलम या तमिळ, आणि मीरा/मीराबाई या तमिळ/हिंदी चित्रपटाचा समावेश आहे. त्रिवेंद्रम येथील मंदिराच्या श्रीरंगम गोपुर बांधणीच्या खर्चासाठी सुब्बलक्ष्मी यांनी मुंबईत मैफिल केली होती.
सुब्बलक्ष्मी यांच्या आवाजातील काही हिंदी/संस्कृत गीते -
चाकर राखो जी (हिंदी), पग घुंगरु बाँध मीरा नाचे रे, भज गोविंदम, मधुराक्षतम्‌, मोरे आँगना में (हिंदी), मोरे तो गिरिधर गोपाल (हिंदी), श्रीवेंकटाचलपते तव सुप्रभातम्‌, विष्णुसहस्रनाम, वृंदावन कुंज भवन (हिंदी), हनुमान चालिसा, हरि तुम हरो (हिंदी).
पुरस्कार -
पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्‍न पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, संगीत कलानिधी, संगीत कलाशिखरमणी पुरस्कार, कालिदास सन्मान, रॅमन मॅगसेसे पुरस्कार.
११ डिसेंबर २००४ मध्‍ये त्‍यांचं निधन झालं. 

महात्मा गांधी

 महात्मा गांधी यांचे वेळोवेळी हत्येचे प्रयत्न झाले. तब्बल सात वेळा त्यांच्या हत्येचा प्रयत्न झाला. पुण्यातील एका जीवघेण्या घटनेच्या, मृत्यूच्या जबड्यातून सुटल्यावर खुद्द महात्मा गांधीनीचं म्हटले होते, 'परमेश्वर कृपेने मी सात वेळा मृत्यूच्या जबड्यातून सहीसलामत सुटलो आहे.'


गांधींचा खून होण्याच्या १४ वर्षे आधी गांधींना ठार मारण्याचा प्रयत्न पुण्यात जून १९३४ मध्ये झाला होता. त्यात सात जण जखमी झाले होते. सुदैवाने गांधी वाचले. पाचगणी, सेवाग्राम आणि पुण्याजवळ गांधींना मारण्याचा प्रयत्न झाला, असा उल्लेख जगन फडणीस यांच्या 'महात्म्याची अखेर' या पुस्तकात सापडतो.  

पुण्यात २० जानेवारी, १९४८ च्या स्फोटापूर्वी गांधींना मारण्याचे चार प्रयत्न झाले. पुण्यात १९३४ मध्ये त्यांच्यावर बॉम्ब फेकण्यात आला होता. त्यानंतर १० वर्षांनी १९४४ रोजी सुरा घेऊन गांधींजींवर नथुराम गोडसेने हल्ल्याचा प्रयत्न केला. त्याला मी स्वत: पकडले असे पुण्यातील सुरती लॉजचे मालक मणिशंकर पुरोहित यांनी न्यायमूर्ती कपूर आयोगाकडे सांगितले होते. १९६६-६७ रोजी गांधी हत्येच्या कटाची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती जे. एल. कपूर यांचा आयोग नेमण्यात आला होता.

साताऱ्यातील पाचगणी येथेही गांधींवर हल्ला (१९४४) झाला होता. महात्मा गांधी यांची मे १९४४ रोजी तुरूंगातून सुटका झाली. पण, मलेरियाने ते आजारी पडले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, ते जुलै, १९४४ मध्ये गांधी विश्रांतीसाठी पाचगणीला आले. त्यावेळी पुण्याहून खास बस करून काही अठरा -वीस जणांचा एक गट पाचगणीला हजर होता. आणि या गटाने दिवसभर गांधीविरोधी घोषणा दिल्या. ही बाब गांधींना समजल्यानंतर त्यांनी नथुराम गोडसेचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी त्याला बोलावले. पण, गोडसेंनी गांधींना भेटण्यास नकार दिला.
सायंकाळची वेळ होती. गांधीजींची प्रार्थना सुरू झाली. नेहरू शर्ट, पायजमा आणि जॅकेट घातलेला एक तरुण गांधीविरोधी घोषणा देत, जॅकेटच्या खिशातून सुरा काढत गांधींच्या दिशेने धावला. तेव्हा मणिशंकर पुरोहित आणि आणखी एकाने त्याला पकडले. पकडलेला तो तरुण नथुराम गोडसे होता. या प्रकारमुळे प्रार्थना सभेत एकचं गोंधळ उडाला. गांधी शांत होते. त्यांनी गोडसेला निरोप दिला आणि आठ दिवस माझ्याजवळ राहा म्हणजे तुझे विचार मला समजून घेता येतील, असे कळवले. परंतु, यासही गोडसेने नकार दिला, असे फडणीस यांनी आपल्या पुस्तकात (पान क्र. ६४) म्हटले आहे.

पाचगणीत नथुराम गोडसेकडून गांधींवर झालेला हल्ल्याच्या प्रयत्नाबद्दल अनेक मतमतांतरे आढळून येतात. कारण, गोपाळ गोडसेने न्या. कपूर आयोगापुढे दिलेल्या साक्षीत नथुराम पाचगणीला गेला नव्हता, असे सांगितले. तर गांधी पाचगणीला असताना पाचगणीहून महत्त्वाची बातमी येईल, असे नथुराम गोडसे आम्हाला सांगितले होते, असे तत्कालीन जोगळेकर नावाचे एक वार्ताहर, पत्रकाराने सांगितले होते. दुसरीकडे पूना हेरा२ल्डचे संपादक ए. डेव्हीड यांनी आयोगापुढे त्या दिवशी पाडगणीत गांधींना ठार मारण्याच्या हेतूने नथुराम गोडसे सुरा घेऊन धावला होता, अशी साक्ष दिली होती. पाचगणीत पोलीस नोंदीत सुरा सापडल्याची नोंद नाही. याबद्दलही भिन्नभिन्नता आढळते.    

गांधींना वाचवण्यात भिलारे गुरूजींचे योगदान

विशेष म्हणजे पाचगणीत गांधीजींना वाचवण्याचे श्रेय भिलारे गुरूजींना दिले जाते. त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता गांधींना वाचवलं होतं. स्वातंत्र्यसैनिक भीकूदाजी भिलारे असे त्यांचे नाव होते. भिलारे गुरुजी म्हणून त्यांची ख्याती होती.

 लेखकों को दिए अपने इंटरव्यू में भिलारे ने कहा था,'पंचगनी में महात्मा गांधी की प्रार्थना सभा में कोई भी शामिल हो सकता था। उस दिन उनके सहयोगी ऊषा मेहता, प्यारेलाल, अरुणा असफ अली और अन्य प्रार्थना में मौजूद थे। गोडसे दौड़ते हुए आया, उसके हाथ में चाकू था। वह कह रह था कि उसके पास कुछ सवाल हैं। मैंने उसे रोका, उसका हाथ मरोड़ा और चाकू छीन लिया। गांधी जी ने उसे जाने दिया।'

जब भिलारे के सहयोगी मणिशंकर पुरोहित को कमिशन के सामने पेश किया गया तो उन्होंने बताया कि यह घटना 1944 में नहीं जुलाई 1947 में हुई थी। इस घटना में भिलारे का कोई खास जिक्र भी नहीं था। कमिशन को बस इतना पता चला कि 1944 में उस दिन प्रार्थना सभा में कुछ लोगों के कारण अशांति का माहौल हो गया था।

विसंगती, मतमतांतरे काहीही असो...पण आजही पाचगणीतील भिलार (पुस्तकांचे गाव) या गावामध्ये भिलारे गुरूजींचे वारस आहेत. ते भिलारे गुरूजींच्या अमूल्य योगदानाबद्दल सांगतात.
महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांच्या कागदपत्रातही पाचगणीचा संदर्भ येतो. ते या प्रकाराबद्दल म्हणतात-
३० जानेवारी, १९४८ रोजी दुपारी ४ वाजता सरदार पटेल गांधींना भेटायला गेले. गांधींनी त्यांची प्रार्थनेची वेळ झाल्याचे सरदारांना सांगितले. ५ वाजून १० मिनिटांना ते आपल्या खोलातून निघाले. मनू आणि आभा गांधी यांच्या खांद्यावर हात ठेवून ते गर्दीतून वाट काढत प्रार्थनास्थळाकडे गेले. लोकांना नमस्कार करण्यासाठी मुलींच्या खांद्यावरून त्यंनी आपले हात काढले. तेवढ्यात नथुराम गोडसे नावाचा एक तरूण गांधींच्या समोर आला. तो पाया पडणार आहे, अशा कल्पनेतून मनूने त्याचा हात धरून त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण, गोडसेने तिचा हात झयकला आणि अगदी जवळून गांधींच्या छातीवर तीन गोळ्या जाडल्या. गांधींनी 'हे राम' उद्गार काढले. नेहरूंना ही बातमी कळताच ते ताबडतोब बिर्लाभवनवर आले. रेडिओवर बोलताना नेहरू म्हणाले, 'THE LIGHTS HAVE GONE OUT OF OUR LIVES.' गांधींच्या हत्येनंतर चौकशा होऊन त्याच्यामागे कट असल्याचे नंतर सिध्द झाले. तथापि, एका गोष्टीचा मात्र उलगडा होत नाही. त्या कटातील एक साथीदार मदनलाल पहावा आधी हाती कसे लागले नाहीत?, असे अरूण सारथी हे शोध महात्मा गांधींचा खंड २ (पान क्र. ५६०) या आपल्या पुस्तकात म्हणतात.

संदर्भ - महात्म्याची अखेर, जगन फडणीस
शोध महात्मा गांधींचा, अरूण सारथी  

ब्रेकअपनंतर लोक आजारी पडतात का?

Pudhari News

10 Mar 2021, 8:21 am 

ब्रेकअप झाल्यानंतरच्या अनेक विचित्र घटना आपण ऐकल्या, पाहिल्या असतील. ब्रेकअपनंतर कुणी डिप्रेशनमध्ये जातं, तर कुणी निराश राहतं तर कुणी दुसऱ्या जोडीदारांचा शोध घेतात. तर अनेकजण यातून सावरण्यासाठी प्रयत्न करत राहतात. पण, ब्रेकअपनंतर लोक आजारी पडतात का?

 

असं म्हणतात की, प्रेम हे ब्रेकअपनंतर वेदनादायी असतं. काही जण तर भावूक होऊन त्यातून बाहेर पडतंच नाहीत. कारण, ज्याच्यावर आपण भरभरून प्रेम केलेलं असतं, तिचं व्यक्ती शेवटी दु:ख देते. या भावनिक वेदना आपल्या मेंदूच्या पलीकडच्या असतात. येथे कुणाचे काही चालत नाही. आपलं मनदेखील हे स्वीकारायला तयार नसतं, की खरचं आपलं ब्रेकअप झालं आहे.

पण, ब्रेकअपच्या जाळ्यातून आपण बाहेर पडलो नाहीच तर? पुढे काय? 

यावर अनेक संशोधने झाली आहेत. संशोधक म्हणतात की, ब्रेकअपनंतर आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते. आणि याचा फटका आपल्या आरोग्याला बसू शकतो आणि आपण आजारीदेखील पडू शकतो.

 

ओहियो स्टेट युनिव्हर्सिटीतील प्रा. मानसशास्त्रज्ञ जेनिस कीकोल्ट-ग्लेसर म्हणतात की, एका पार्टनरशी तुमचे नाते तुटल्यानंतर लोक एकटे पडतात.

काळानुसार, भावनिक जखमा भरून निघतील. हे परंतु, तो आपल्या एक्सच्या विचारांशी किती जोडला आहे, यावर अवलंबून आहे. त्यांच्या संशोधनानुसार, किकॉल्ट-ग्लेझरला आढळले आहे की, हरवलेल्या प्रेमामुळे त्या व्यक्तीला क्रोध येऊ शकतो. पण, दुसऱ्या एका केसमध्ये ते एकटे पडू शकतात, तणावात जाऊ शकतात आणि आत्मविश्वास कमी होऊ शकतो. हे सर्व रोगप्रतिकारक कार्यावर परिणाम करू शकतो. 

तणाव हार्मोन (स्ट्रेस हार्मोन्स) एक गुन्हेगारासारखे आहेत. आपल्या रोगप्रतिकारक यंत्रणेच्या पेशींमध्ये रिसेप्टर्स असतात जे तणाव, नैराश्य आणि इतर ब्रेकअप-

प्रेरित भावनिक प्रतिसादाशी संबंधित अनेक भिन्न संप्रेरकांवर प्रतिक्रिया देतात. जर ब्रेकअप झाल्यामुळे आठवड्यातून किंवा काही महिन्यांपर्यंत ताणतणावाचे संप्रेरक वाढत राहिले तर ते आरोग्यास हानिकारक ठरू शकते. आजारपणास कारणीभूत असणाऱ्या रोगजनकांपासून आपल्या शरिराचे संरक्षण कमी होण्याची शक्यता असते. 

मानसिक तणावाबद्दल ॲरिझोना युनिर्व्हसिटीचे मानसशास्त्राचे प्रा. डेविड स्ब्रा म्हणतात, तुमचा ताण जितके काळ अधिक असू शकते आणि तुमच्या दु:खदायक भावना

कायम राहिल्यास तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीला जितका मोठा धक्का बसू शकतो. संशोधनानुसार, तुम्ही आणि तुमचा पार्टनर खूप जवळ असता. जेव्हा तुमचा पार्टनर तुमच्यापासून दूर गेला तर त्याच्या गैरहजेरीत तुमच्या झोपेवर, भूकेवर, तापमानाचे नियमन यावर परिणाम होऊ शकते. 

दुसरीकडे, तुमचे रिलेशनशीपचे हॅप्पी एन्डिंग

झाले असेल तर तुमच्या तुमच्या रोगप्रतिकारक कार्यावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता नसते. तुम्हाला या सर्व ब्रेकअप, दु:खापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी, तुम्ही ब्रेकअपच्या दु:खातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि जवळचे मित्र आणि परिवाराशी जोडण्याचा प्रयत्न करा, असे स्ब्रा यांनी नमूद केले. 

योग्य आहार घेणे, व्यायाम करणे आणि दारू टाळणे हेदेखील आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मदतशीर ठरू शकते. तुम्ही पार्टनरपासून वेगळे झाल्यानंतर

तुम्हाला मानसिकदृष्ट्या चांगले राहण्यास मदत होऊ शकते. 

तुम्ही तुमच्या पार्टनरला भेटण्याआधी जर कराओके गात असाल, सी-फूड शिजवत असाल तर त्या गोष्टी तुम्ही ब्रेकअपनंतर पुन्हा सुरू करा, 

असे ग्रेस लार्सन (रिसर्चर ॲण्ड ग्रॅज्युएट स्टुडंट इन सायकॉलॉजी, नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटी) यांनी शिफारस केली आहे. आमच्या अभ्यासात आढळले आहे की, लोकांनी या गोष्टी मान्य केल्या आहेत, असेही त्या म्हणाल्या. 

कुठलेही जवळचे नाते संपवणे कठीण आहे, दु:खदायक आहे. परंतु, जितकं तुम्ही त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल, मित्रांसोबत राहाल, तितक्या लवकर तुमची रोगप्रतिकारशक्ती परत येईल.

सालिह

**स्वालिया** (Swaliya / Swaliha) या नावाचा मुख्य अर्थ **"पुण्यवान", "सदाचारी", "धार्मिक" किंवा "चांगल्या ...