Monday, July 29, 2024

उद्योजक समीर मोहिते

समीर मोहिते हे कोल्हापूरचे उद्योजक. त्यांनी अस्मी (अस्मीचा अर्थ- लोकप्रियतेच्या वाटेवर स्वार होणे) नावाची कंपनी उभारली. अस्मी द नॅचरल अशी टॅगलाईन घेऊन ते बाजारात उतरले आणि अल्पावधीतच त्यांची ही कंपनी नावारुपास आली. ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत, त्याचाच वापर करून उत्पादने मार्केटमध्ये आणायच्या, असे ठरवून डोळ्यापुढे उद्‌योजक होण्याचे ठरवले आणि ते पूणर्देखील करून दाखवले. १०० टक्के केमिकलमुक्त आणि नैसर्गिक उत्पादन हे या कंपनीचे वैशिष्ट्य होय.


१०० टक्के केमिकलमुक्त नैसर्गिक उत्पादने
 
समीर मोहिते यांनी २०२३ला गूळ पावडर बाजारात आणली. आणि नवा स्टार्टअप सुरु केला आणि अल्पावधीतच अस्मी कंपनीला आयएस‌ओ मानांकन मिळालं. मग उद्योगाने भरारी घेतली. सुरुवातीला तीन उत्पादने बाजारामध्ये आणण्यात आली. त्यामध्ये फेस ऑईल, हेअर ऑईल, बॉडी आईल आणलं. ही कंपनी लॉन्च करण्यात आली. खूप कमी वेळेत कंपनीच्या उत्पादनांना कस्टमसर्ची पसंती मिळाली. हेअर कलर, सीरम, फेस पॅक, पौष्टिक न्याहरी, हेअर पॅक, हेअर ऑईल, गुळ, हळद आणि शेती संजीवनी नावाचे अशी उत्पादने मोहिते यांनी स्वत: तयार केली. या व्यतिरिक्त मोहिते यांच्या अस्मी कंपनीने रत्नागिरी ते गोव्यापर्यंत चहा लॉन्च केला आहे. गुळाचा चहा, सेंद्रिय गुळाची काफी, सेंद्रिय गुळाची कोल्ड कॉफी अशी १९ उत्पादने बाजारात आणली आहेत. लेमन टी ची मागणी अधिक असल्यामुळे अस्मीने बाजारात केमिकल मुक्त उत्पादन आणलं. समीर मोहिते हे मुळचे कोल्हापूरचे. त्यांचा हा व्यवसाय मुंबई, गोवा, कणकवली येथे अधिक चालतो.
 
समीर माधवराव मोहिते हे सिव्हिल इंजिनिअरचे शिक्षण घेत के डी वाय‌ पाटील महाविद्यालयातून १९९२ ला पास झाले.  डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंटमधून शिक्षण घेतले. कॅनडा बेस विद्यापीठात नोकरी करत करत डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंटमधून शिक्षण घेतले. ७-८ महिने नोकरी केल्यानंतर त्यांनी पुन्हा आयुष्यात नोकरी केली नाही. ते वळले उद्योगाकडे.
मुळात समीर यांनी आधीपासून ठरवलं होतं की, उद्योगच करायचा. असा ठाम निर्णय घेतल्यामुळे उद्योग क्षेत्रातच त्यांनी स्वत: ला झोकून दिलं. गो पालन, कलर एजन्सी, शेळीपालन, मेंढीपालन, दुग्धव्यवसायात देखील त्यांनी आपले नशीब आजमावले. अनेक उद्योगात आर्थिक तोटा सहन करावा लागला.
 
उद्योगांच्या अभ्यास दौरा

 सन २०१५ च्या दरम्यान परदेशवारी केली. सुरुवातीला पयर्टन म्हणून आणि नंतर विविध उद्योगांचा अभ्यास म्हणून त्यांनी नेक देशांचा दौरा केला. परदेशात गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की तेथील लोकांनी स्वतःची एक संस्कृती जपली. शिवाय भारताची संस्कृती देखील त्यांना आवडते. मग कल्पना आली की, नैसगिक उत्पाद‌नांचा व्यवसाय करायचा. आशिया खंडातील अनेक देशांचा दौरा समीर मोहित यांनी केला. नेपाळ, श्रीलंका, थायलंड, मलेशिया, सिंगापूर, तुर्कस्तान असे परदेश दौरे केले. या दौऱ्यात आयात-निर्यात अभ्यास केला. समीर मोहिते यांनी अभ्यास केला की, आपल्या भारत देशातून परदेशात काय विकलं गेलं? आणि परदेशातून आपल्या भारतात कोत्या गोष्टी विकल्या गेल्या आहेत. मग सुरु‌वातीस समीर मोहिते यांनी परदेशात कपडे, मोबाईल निर्यात केले.
 
परदेशातील लोक आरोग्याबाबत जागरु‌क आहेत. त्या तुलनेत भारतातील लोक म्हणावे तसे आरोग्याबाबत जागरूक दिसून येत नाहीत. आपण आरोग्याबाबत काही तरी केलं पाहिजे, म्हणून समीर मोहिते यांना या उद्योगाची कल्पना सुचली. सुरुवातीला ऑईलची उत्पादने बनवली. सुरुवातीला हेअर बदाम तेल, एरंडेल तेल यांचे मिश्रण तयार करून हेअर ऑईल' बनवले. लाख-सव्वा लाखाचे ऑईल मॅन्युफॅक्चरिंग मशीन आणले आणि त्यांनी आपल्या घरापासून या व्यवसायाची सुरुवात केली.
 
२०२२ ला "पहिल्यांदा बॉडी ऑईल, हेअर ऑईल आणि फेस ऑईल बाजारात आणलं. जवस, बदाम वापरून बाॅडी ऑईलची निर्मिती केली. २-३ महिने लोकांना, ट्रायल कंपन्यांना पावरण्यास दिलं. मेडिकल सेंटर, डॉक्टर्स, दुकानदारांना, औषध दुकानदारांच्या भेटी घेतल्या. आणि आपली उत्पादने विक्रीसाठी ठेवली. पुढे पुढे या उत्पादनांची मागणी वाढत गेली.
 
समीर मोहित यांच्या सहकारी आसिया मॅडम यांच्या सहाय्याने हेअर शॅम्पूची निर्मिती केली. हेअर पॅक, फेस पॅक, बिअर्ड ऑईल बाजारात आणलं. हळद उत्पादने, शेती संजीवनी, सेंद्रिय गुळाचा चहा, डाएट फूड, पौष्टिक न्याहरी, तीळ, जवस, बदामपासून उत्पादने तयार केली गेली.

कोल्हापुरातून मॅन्युफॅक्चरिंग, परदेशात निर्यात

 आता नेपाळला हेअर ऑईल पाठवलं जातं. त्याआधी गोवा, दुबई, गल्फ, युएस, कॅनडा, जकार्ता मध्ये वेगवेगळी उत्पादने पाठवण्यात आले आहेत. केस गळती, टॅनिंग, वजन नियंत्रण (पौष्टिक न्याहरी -वजन कमी करणे, वजन वाढवण्यासाठी), सुंदर त्वचेसाठी अशी ही निरनिराळी उत्पादने आहेत. या सर्व उत्पादनाचे मॅन्युफॅक्चरिंग कोल्हापुरातून होते.
 
स्पेशल हळद ...

सेंद्रिय हळद केवळ दवबिंदूवर येते. जी कोकणातील देवगड तालुक्यातून आणली जाते. गुळाची पावडर कोल्हापुरात बन‌वली जाते. लहान बाळालादेखील वापरता येईल, असे  फेस ऑईल, बॉडी ऑईल उत्पादन देखील आहेत. कच्च्या मालासाठी बदाम, तीळ बाहेरून आणले जातात. कोल्हापुरातून सेंद्रिय गूळ, शिकाकाई - आंबा, विशाळगड, गगनबावडा (जि. कोल्हापूर), मुलतानी मिठ्ठी - राजस्थान येथून, हळद-देवगड (कोकण) येथून, सीरमसाठी आकोड-काश्मीर येथून आयात केल्या जातात.
 
वांग उठणे, त्वचेसाठी, केस गळणे, पोट सुटणे समस्या वाढत चालल्या आहेत. वजन कमी करण्यासाठी - जवस, तीळ, बदाम वापरून एक उत्पादन आणण्यात आलं आहे. कोणतीही पीझरव्हेटिव्ह वापरले जात नाहीत. सगळी उत्पादने अद्ययावत मशीन्सवर तयार केली जातात. हेअर कलर पाऊच, इतर उत्पादने बाटलीमध्ये आणि सीरम काचेच्या बाटल्यांमध्ये पॅक केले जातात.
 
पत्नी डॉक्टर वृंदा मोहिते आणि सूर्यभान मुलगा प्रोडक्शन पाहतात. तर समीर हे माकेर्टिंग पाहतात. टेक्निकल टीममध्ये अजित चौगुले, ब्युटी उत्पादनासाठी आसिया काझी मदत करतात.
समीर यांना कोकणात या व्यवसायासाठी पदीप यशवंत तोडकर यांनी खूप मदत केली. गामसेवक युवराज बोराटे, प्रिया आयरेकर मॅडम ( प्रियदशिर्नी संस्था) यांनी बचतगटाचे मेळावे घेण्यासाठी मदत केली. अचर्ना चव्हाण (दिशा फौंडेशन), शिवम बोदे (लोगो स्टिकसर्साठी), बचत गटाच्या महिलांचीही मदत मिळाली.

 तयार टेस्टी पुरणपोळीही बाजारात आणणार
मोहिते हे तयार पोळी लवकरच बाजारात आणणार आहेत.

Thursday, July 18, 2024

INS Vikrant : छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराची इतकी चर्चा का होते?

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज केरळमधील कोची शिपयार्डमध्ये 'आयएनएस विक्रांत' (INS Vikrant) या युद्धनौकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी INS Vikrant वर नौदलाचा नवीन ध्वज 'निशाण'चे अनावरण केले. 'आयएनएस विक्रांत' ही पहिली स्वदेशी बनावटीची युद्धनौका भारतीय नौदलात दाखल झाली आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी नौदलाचा नवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित केला. नौदलाच्या नवीन ध्वजाला वंदन करुन मी हा नवीन ध्वज भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्पित करत आहे, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केली. भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले, घोडदळ, पायदळ, गडकोट, याबरोबरचं मराठा स्वराज्याच्या संरक्षणासाठी आरमार उभारले. परकीय सत्तांपासून स्वराज्याला वाचवण्यासाठी सागरी ताकद ओळखून खंबायतच्या आखातापासून त्रावणकोर, कोचीनपर्यंतची सागरी सत्ता काबीज करून मराठ्यांचे वर्चस्व स्थापित केले.

शिवरायांसी आठवावे| जीवित तृणवत मानावे| इहलोकी परलोकी उरावे|किर्तिरुपे||

'आरमार हे राज्याचे स्वतंत्र राज्यांगच आहे. ज्यास अश्वबल त्याची पृथ्वी प्रजा आहे. तद्वतच ज्याजवळ आरमार त्याचा समुद्र. याकरिता आरमार अवश्य मेव करावे.' असं आज्ञापत्रात म्हटलं आहे. त्याकाळातील आरमाराचे महत्त्व सांगणारे हे आज्ञापत्रातील वर्णन होय. जाणता राजा, निश्च्यायाचा महामेरू छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आरमाराची सुरूवात नक्की कधी व कशी केली, याविषयी मराठा इतिहासात थेट नोंद नाही. परंतु, बखरी आणि युरोपीय नोंदीमधून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वरुपात माहिती समोर येते, असा संदर्भ 'मराठा आरमार एक अनोखे पर्व' या डॉ. सचिन पेंडसे यांच्या पुस्तकात सापडतो.

छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आणि कौशल्याच्या बळावर समुद्र सुरक्षिततेचे महत्त्व ओळखून मराठा आरमार दलाची (इंडियन नेव्ही) स्थापना केली. आज भारतीय नाविक दल छत्रपती शिवाजी महाराजांना 'Father of Indian Navy' (भारतीय आरमाराचे जनक) मानते. शिवरायांनी त्याकाळी हिंदुस्थानातील पहिले जहाज निर्माण करुन सागरी सुरक्षेची मुहूर्तमेढ रोवली. खंबायतच्या आखातापासून त्रावणकोर, कोचीनपर्यंतची सागरी सत्ता काबीज करून मराठ्यांचे वर्चस्व स्थापित केले. 'ज्याचे आरमार त्याचा समुद्र' ही कृती लक्षात घेऊन समुद्रावर आपलं स्वत:चं वर्चस्व निर्माण करायचं असेल आणि समुद्र जिंकायचं असेल तर आरमाराची आवश्यकता असल्याचे छत्रपतींना वाटले. पोर्तुगीज, इंग्रज आणि सिद्दी यांच्या आक्रमणांपासून हिंदुस्थानला वाचवायचे असेल तर स्वतःचे आरमार हवे, हे शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या वेळीच ओळखले होते.

१६५९ ला महाराजांनी आरमाराची मुहुर्तवेढ रोवली असा उल्लेख सापडतो. इतिहासकार सुरेंद्रनाथ सेन म्हणतात, मराठ्यांकडे युद्धाची परंपरा असली तरीही समुद्र हा त्यांच्यासाठी एक नवीनच पैलू होता. भारताच्या इतिहासात शिवाजी हे कदाचित एकमेव राजे होते, ज्यांनी नौदलाची स्थापना राजकीय दृष्टीने केली. महाराजांनी केवळ साम्राज्याच्या संरक्षणासाठी आरमाराचा उपयोग केला नाही तर व्यापाऱ्याच्या दृष्टीनेदेखील खुबीने त्याचा वापर केला.

आरमार उभारण्यासाठी महत्त्वाची कारणे –

  • युरोपीय शक्तींना राजकीय हस्तक्षेपापासून दूर ठेवणे.
  • कोकणातील प्रजेचे सिद्दी आणि पोर्तुगीजांच्या हल्ल्यांपासून संरक्षण करणे.
  • बंदरे आणि त्यांमधून होणाऱ्या व्यापार आणि उत्पन्नाचे रक्षण करणे
  • व्यापारी जहाजांची सुरक्षा करणे
  • नाविक नाकेबंदीपासून कोकणाचे संरक्षण करणे.

आरमारी जहाजांचे प्रकार-

मराठ्यांच्या युद्धनौका

साधारणपणे ७० टन क्षमतेचे असून वल्ह्यांच्या सहाय्याने हाकले जाई. यात २० माणसे बसतील, अशी सोय होती.

गुरब – १५० ते ३०० टन क्षमतेचे असे. गुरबाच्या वरची बाजू बांबूची बनलेली असे. पुढच्या भागात नाळ असे. या बांधणीमुळे प्रवासात ते मोठ्या प्रमाणात हेलकावे घेत असे. गुरबाच्या वरच्या बाजूला भागात नाळेवर ९ ते १९ पौंडाच्या दोन तोफा असत. या तोफा पुढच्या बाजूला डागल्या जात तर गुरबाच्या बाजूला ६ ते ९ पौंडाच्या तोफा असत.

पाल – मराठा आरमारातील सर्वात मोठी युद्धनौका होय. विजयदुर्गाच्या लढाईनंतर ७४ तोफा असलेले एक मोठे (पाल) इंग्रजांना सापडले होते. पाल हे दुमजली असे. वरच्या भागात एक आराम करण्यासाठी आणि निरीक्षणासाठी जागा असे.

व्यापारी जहाजे

मचवा – याचा उपयोग मुख्यत: मासेमारी आणि सामान वाहून नेण्यासाठी केला जात असे. मासेमारीसाठी वापरण्यात येणाऱ्या मचव्यास कोला किंवा कोळी मचवा असे म्हटले जाई. यात शिडांच्या उपयोगाबोरबर वल्ह्यांचाही वापर करण्यात येत असे. काही मोठ्या मचव्यांवर २-६ तोफा ठेवून त्यांचा आरमारात उपयोग केला जात असे. मचवा २ ते ३ टन क्षमतेचा असे आणि त्यात ५० माणसे मावत.

महागिरी – महागिरी २० ते ३० टन क्षमतेची असे. महागिरीचा वापर मंगलोरहून विटा आणि कौले आणण्यासाठी केला जात असे. महागिरीवर शीड आणि वल्ही याचा उपयोग केला जात असे.

पटीमार – पटेमारी, पटेमार

पटीमार हे मचव्यापेक्षा मोठे, अरूंद, देखणे हाज असे. पटेमार २५ ते १०० टन क्षमतेचे असे. पटेमार हे अतिशय वेगवान असून सामान वाहून नेण्याची क्षमता अधिक असे.

शिबाड-  शिबाड ही पटेमारची मोठी आवृत्ती होती. शिबाडाचे वेगळेपण त्याच्या चौकोनी आकाराची मागची बाजू यातून दिसे. पाल व्यतिरिक्त इतर भारतीय जहाजांची मागची बाजू निमुळती असे.

बटेला – मचवा आणि पडावाची मोठी आवृत्ती म्हणजे बटेला. बटेलाचा उपयोग मलबार, कोकण, गुजरातमधील वाहतुकीसाठी केला जात असे.

जहाज बांधणी – जहाज बांधणीसाठी इमारती लाकडाची उपयोग करण्यात येत असे. जहाजाचे पठान (keel), बाहेरील फळ्या आणि समुद्राच्या पाण्याशी संबंध असलेले भाग हे लाकडांपासून बनवलेले असतं. तर जहाजाच्या आतील भागासाठी उंडी, आंबा, फणस या झाडांच्या लाकडाचा उपयोग केला जात असे. डोलकाठ्यांसाठी पुन्नी आणि आइन ही दोन प्रकारची लाकडे उपयोगात आणली जात असे. मराठ्यांच्या काळात उत्तर कोकणात कल्याण, भिवंडी, वसई, ठाणे, कुलाबा या जिल्ह्यांच्या किनाऱ्यावर नागाव आणि बाणकोट, विजयदुर्ग येथे जहाजबांधणी होत असे.

युरोपीय जहाजे –गॅलिओत, गल्लीयोत, गॅलीओते, कॅरक, गॅलियन, कॅरवेल, चौकौनी शिडाचे कॅरवेल, फ्रिगेट, Ship of the line, मॅन ऑफ वॉर, बॉम्ब वेसल (बॉम्ब केच), स्लूप, इस्ट इंडिया मेन, छत्रपती महाराजांनी खुबीने आरमारात व्यापारी दृष्टीकोन आणला. समुद्री व्यापार वाढवण्यासाठी महाराजांनी केलेले प्रयत्न इंग्रज, पोर्तुगीज, डच इ. च्या विविध नोंदीतून हे स्पष्ट होतात. १२ मार्च, १६६५ मधील एका नोंदीनुसार, महाराजांच्या ताब्यातील ८-९ बंदरामधून दरवर्षी २-३ जहाजे पर्शिया, बसरा आणि मोख्याला व्यापारासाठी पाठवत असल्याची नोंद आहे. या काळात कोकणातून तांदूळ आणि मिठाचा व्यापार, दाभोळ, कल्याण, भिवंडी, वेंगुर्ला, पेण आणि राजापूर या बंदरातून होत असे.

जलदुर्ग –

कोकण किनारपट्टीच्या सुरक्षिततेबरोबरच, संदेशवहन, दळणवळण, व्यापार ही आरमार आणि जलदुर्ग उभारणीची काही प्रमुख उद्दीष्टे आहेत. आरमाराच्या हालचाली, संरक्षण यातून जलदुर्गाचे महत्त्व अनन्यसाधारण होते. सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, खांदेरी-उंदेरी विजयदुर्ग, सुवर्णदुर्ण असे कित्येक जलदुर्ग आणि आरमार यांची जोड संरक्षण आणि व्यापाराला होती.

आरमारी तोफा – आपल्या आरमारांचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आरमारी तोफांच्या मारक शक्तीचा पुरेपूर उपयोग करून आरमारी तोफखाना ही नवी संकल्पना पुढे आली. आरमारी तोफांचा उपयोग पहिल्यांदा १५ व्या शतकात करण्यात आला आणि या तोफांमुळे काही अंतरावरूनच शत्रूच्या जहाजांना बुडवता येते, हे आढळल्यानंतर तोफा या जहाजावरील मुख्य अस्त्र म्हणून प्रस्थापित झाल्या.

त्याहूनि करावे विशेष । तरीच म्हणावे पुरुष ॥
या उपरी विशेष । काय लिहावें ॥१९॥

या पंक्तीप्रमाणे छत्रपती महाराजांची स्वराज्य संरक्षण, अर्थव्यवस्थेची नीतीबाबतचा दूरदृष्टीकोन किती अफाट होता, हे दिसून येते. महाराजांनी स्थापलेल्या या आरमाराने हिंदुस्थानच्या इतिहासातील एका नवीन पर्वाची सुरूवात झाली, असं म्हणायला हरकत नाही.

फ्रेंडशिप मध्ये कधी मिळालं प्रेम तर कधी…

हिंदी चित्रपटांनी आज तमाम रूढी-प्रथांना छेद दिला आहे. येणाऱ्या काळाचा प्रवाह पाहता नव्या प्रेक्षकांना काय वाटतं, त्यांना काय हवंय याकडे अधिक लक्ष देण्यात आलं. आणि त्याप्रकारचे चित्रपट बनवण्यात आले.

चित्रपटांचे विषय, भाषा, पात्र, सादरीकरण सर्व पातळीवर बदलता समाज आणि प्रेमाचे विविध पैलू प्रतिबिंबीत करणारे चित्रपट तयार झाले. यामुळेचं असे चित्रपट पाहणारा एक नवा प्रेक्षक वर्ग तयार झाला.

भारतीय चित्रपटांमुळे समाजात प्रेमाची परिभाषाही बदलली आणि प्रेक्षकांनी ती स्वीकारलीदेखील! अशा बदललेल्या काही चित्रपटांची निर्मिती झाली, ज्यांनी समाजाची ठराविक घालून दिलेली चाकोरी मोडीत काढली.

वेकअप सीड, दिल चाहता है, लव्ह सेक्स और धोका, इंग्लिश-विंग्लिश, मसान, पिकू, अलिगढ, बधाई हो, सर यासारख्या चित्रपटांनी प्रेमाच्या सौंदर्याचं वेगळ्या प्रकारे सादरीकरण केलं.

अनेक चित्रपटांनी वेगवेगळ्या प्रकारच्या सिनेमा-सौंदर्यशास्त्राचा विकास घडवून आणला. मानवी भावना काळानुरुप बदलत राहिल्या आहेत. परिस्थितीनुसार, प्रेम हे समाजातील चांगलं किंवा वाईट घटनांसाठी एक शक्तिशाली घटक ठरला आहे.

अयान मुखर्जी (वेक अप सीड), फरहान अख्तर (दिल चाहता है), दिबाकर बॅनर्जी (लव्ह सेक्स और धोका), गौरी शिंदे (इंग्लिश-विंग्लिश), नीरज घेवन (मसान), अमित शर्मा (बधाई हो), Rohena Gera (सर), जीयो बेबी (द ग्रेट इंडियन किचन) यासारख्या दिग्गज दिग्दर्शकांनी लेखकांच्या कल्पना, कथांना कागदावरून मोठ्या पडद्यावर सहजपणे उतरवलं.

बदलत्या काळासोबत, भारतीय समाजाची प्रेमाप्रती असलेली धारणा, त्याचे परिणाम आणि चित्रणदेखील बदललं. आणि ते हिंदी सिनेमांच्या माध्यमातून प्रतीत झालं.

प्रेम अमर्त्य आहे. ते मनामनातून वाढत राहतं. चित्रपट हा समाजाचा आरसा असतो. समाजात जे काही घडतं, त्याचं प्रतिबिंब चित्रपटाच्या माध्यमातून दिसत असतं.

कधीकधी ते मसानप्रमाणे क्रूर शोकांतिका किंवा पिकूप्रमाणे आनंद व्यक्त करत असतं. त्या-त्या काळाचं प्रतिबिंब त्या-त्या काळाच्या चित्रपटांमध्ये उमटत गेलं.

कधी-कधी चित्रपटातील प्रेमाचा संघर्ष, प्रणयविषयक कल्पना आणि वेगवेगळा दृष्टीकोण व्यापक होत गेला. पण, प्रेमाचा शेवट नेहमीच सुखद होईल, असे नाही.

या ८ चित्रपटांनी २१ व्या शतकातील प्रेमाचा दृष्टीकोणच बदलला…

दिल चाहता है 

फरहान अख्तरचा आयकॉनिक चित्रपट समीर (सैफ अली खान), सिद्धार्थ (अक्षय खन्ना) व आकाश (आमिर खान) च्या भोवती फिरतो. या तिघांना प्रेमाचा खरा अर्थ कळतो.

या सिनेमाने एका वेगळ्या स्क्रिनप्लेचं उदाहरण प्रेक्षकांसमोर ठेवलं. एरवी, फक्त प्रेम हे कथानक मांडणारा सिनेमा दिल चाहता हैच्या निमित्ताने बदलला. या सिनेमात लव्ह, मॅच्युरेशन आणि फॉरबिडन लव्ह या प्लॉटची मांडणी केली.

कॅमेरा, कथानक आणि अभिनयाच्या दृष्टीने सकस असणाऱ्या या सिनेमाने प्रेमाची एक नवी व्याख्या प्रेमाची नवी व्याख्या भारतीय प्रेक्षकांसमोर ठेवली.

समीर खूप रोमँटिक असतो. पण, तो कुठल्याही मुलीकडे आकर्षित झाला की त्याला वाटतं, त्याचं खरं प्रेम मिळालं आहे. दुसरीकडे, चित्रकार असलेल्या सिद्धार्थ प्रेमात पडलेला नसतो. तो आपल्या कामाच्या प्रती खूप गंभीर आणि समर्पित असतो.

तर आकाश हा शालिनी (प्रीती जिंटा) नावाच्या मुलीवर प्रेम करतो. पण, तिचा आधीचं कुणाशी तरी साखरपुडा झालेला असतो.

पुढे सिद्धार्थ त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या आणि घटस्फोटीत तारा (डिंपल कपाडिया) च्या प्रेमात पडतो. पण, तो आपल्या भावनांना दाबून ठेवतो. कारण, त्याला माहित असतं की, समाजातील लोक या संबंधांना घृणास्पद मानतात.

पुढे तारा मरते. नंतर सिद्धार्थ गोव्यात एका सुंदर मुलीला भेटतो. तो सुंदर स्माईल देतो, याचा अर्थ आहे की, आता तो तारामध्ये अडकून राहिलेला नाही. सिद्धार्थने भूतकाळ मागे टाकून आपली पावले पुढे टाकली आहेत.

सर 

रोहेना गेरा (Rohena Gera) यांच्या सर या चित्रपटात प्रेम हे असंख्य अडथळ्यांनी भरलेले आहे. प्रेमासाठी वर्ग, शिक्षणाच्या भिंती नेहमी अडथळे बनून समोर येतात. पण, तरीदेखील एकमेकांप्रती आदर, प्रोत्साहन यांच्या माध्यमातून प्रेम दर्शवण्यात आलं आहे.

लव्ह, सेक्स और धोका (एलएसडी)

दिवाकर बॅनर्जीचा लव्ह, सेक्स और धोका हा चित्रपट प्रेम, ऑनर किलींग, एमएमएस घोटाळे आणि स्टिंग ऑपरेशन्स या गोष्टींची मांडणी करतो. एलएसडीने प्रेमाची 'ती' गडद बाजू किंवा प्रेमाच्या नावावर केलेली प्रत्येक गोष्ट दाखवली. तात्पुरतं असलेलं प्रेम शेवटी एक अनैतिक व्यक्तीच्या हातात पडून 'तिच्या' शोषणाचं साधन बनतं. सौंदर्य, धाडसी प्रणय आणि अखेरीस प्रेमात मिळालेली फसवणूक हे प्रेयसीच्या मृत्यूचं कारण बनतं.

मसान

नीरज घेवन दिग्दर्शित मसान हा चित्रपट बनारसमधील दोन वेगवेगळ्या कथांनी मिळून बनला आहे. पहिली कथा देवीची आहे. ती आपल्या पार्टनरसोबत एका हॉटेलमध्ये जाते.

तेथे पोलिस छापा टाकतात आणि त्यांना ताब्यात घेतात. त्यानंतर तिचा पार्टनर आत्महत्या करतो. देवीकडून पोलिस जबरदस्तीने गुन्हा कबूल करून घेतात. आणि ही गोष्ट लपवण्यासाठी पैसे मागतात.

दुसरी कहाणी स्मशानभूमीत काम करणाऱ्या दीपक (विक्की कौशल) ची आहे. तो तथाकथित समाजव्यवस्थेनुसार खालच्या जातीचा आहे. एक दिवस त्याची भेट एका उच्चवर्णीय मुलगी शालू गुप्ता (श्वेता त्रिपाठी) शी होते. दोघांना एकमेकांवर प्रेम होतं. परंतु, ते वेगवेगळ्या जातीचे असतात.

चित्रपटाच्या एका सीनमध्ये दिग्दर्शकाने धक्कातंत्राचा वापर केला आहे. आपल्याचं प्रेयसीचं प्रेत प्रियकर तिच्या बोटातील अंगठीवरून ओळखतो आणि तिथेच धाडकन कोसळतो. दोन जातीतला संघर्ष होण्याआधीचं चित्रपटातील प्रियकराला अपघातात आपली प्रेयसी गमवावी लागते.

वेक अप सिड

अयान मुखर्जीच्या वेक अप सिडमध्ये, प्रेम हा प्रगल्भ असण्याचा एक टप्पा आहे. अशी मांडणी करणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटातील प्रेम हे केवळ आकर्षण नाही. आयेशाच्या मते ती एक जबाबदारी आहे. आयेशा ही सिडची मैत्रीण असून ती सिडपेक्षा वयाने मोठी असते.

आयशाचा (कोंकणा सेन) स्वाभिमान सांगतो की, सिड (रणबीर कपूर) ने आता मॅच्युअर्ड व्हायला हवं. ती एका मॅच्युअर्ड पार्टनरच्या शोधात आहे. सिड-आयेशा एकत्र राहू लागतात. दोघांचे विचार, आवडीनिवडी एकदम वेगळ्या आहेत. पण, तरीही दोघे एकत्र राहू शकतात, हे चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न झाला.

द ग्रेट इंडियन किचन

जीयो बेबी हा चित्रपट खूप सुंदररित्या भारतीय कुटुंबातील पितृसत्ताक पध्दतीला दर्शवतं. एकीकडे प्रेम आणि दुसरीकडे महिलांच्या रोजच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा मध्यमवर्गीय कुटुंबाची कहाणी असणारा चित्रपट होय.

नात्यानात्यात प्रेम आहे. पण, ती घरात रोज राबराबते; हे डोळ्यांनी पाहून देखील गप्प बसणारे मंडळी याचं घरात असतात. पतीच्या प्रत्येक गोष्टी, मागण्या तिला पूर्ण करायच्या असतात. पण, ती आपलं सासर, आपलं कुटुंब म्हणून नि:स्वार्थपणे तितकचं प्रेम करते. या प्रेमाची तुलना कुठल्याच गोष्टीशी होऊ शकत नाही.

इंग्लिश-विंग्लिश

शशी गोडबोले (श्रीदेवी) एक भारतीय गृहिणी असते. ती छोटी व्यावसायिक आहे. तिला इंग्रजी येत नसल्यामुळे तिचा पती सतीश आणि मुलगी सपना तिची खिल्ली उडवतात. तिचा नेहमी अपमान करतात. तराही ती आपल्या कुटुंबावर खूप प्रेम करत असते.

शशी वेळोवेळी नकारात्मक विचार आणि असुरक्षितता अनुभवते. जेव्हा ती इंग्रजी शिकण्याचा क्लास लावते. दरम्यान, एका अन्य अभिनेत्याचं प्रेम ती नाकारते. कारण, ती तिच्या पतीवर खूप प्रेम करते. एका भाषणात ती आपण विवाहित असल्याचं सांगत आपल्या कुटुंबाचे कौतुक करताना दिसते.

बधाई हो

आजी होण्याच्या वयात एक महिला (नीना गुप्ता) म्हणजेच बधाई हो या चित्रपटातील अभिनेता आयुष्मान खुराना (नकुल) ची माता ही आई बनते.

नीना गुप्ता आणि गजराज राव कशाप्रकारे आपल्या कुटुंबासमोर या प्रेग्नेंसीचे रहस्य उघड करतात. समाजाकडून या गोष्टीच्या रिॲक्शन्स काय येतात? नकुलची आजी (सुरेखा सिक्री) आपल्या सुनेला (नीना गुप्ता) कशाप्रकारे समजून घेतात? याची मांडणी सिनेमात उत्तम प्रकारे झाली आहे.

'बधाई हो'मधील प्रसंग विनोद, हाणामारी, पती-पत्नीमधील थोडे भांडण आणि त्यांच्यातील रोमान्स सौंदर्यात भर घालतात. अर्थात प्रेम हे कोणत्याही वयात होऊ शकतं, नाही का?

सालिह

**स्वालिया** (Swaliya / Swaliha) या नावाचा मुख्य अर्थ **"पुण्यवान", "सदाचारी", "धार्मिक" किंवा "चांगल्या ...